तिबेटमधील ‘पोटाला पॅलेस’

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

भ्रमंती

गेली अनेक शतके ‘पोटाला पॅलेस’ तिबेटमधील बौद्ध लोकांच्या भावना आणि विश्‍वासाचं प्रतीक म्हणून ताठपणे तिबेटच्या राजधानीत उभा आहे. त्याचं जुनं परंतु वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्व ध्यानात घेऊन युनेस्कोनं या राजवाड्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे.

कैलास मानसची पहिली यात्रा, मी भारत सरकारतर्फे उत्तराखंड राज्यातील कुमाऊँ प्रदेशातून आयोजित मार्गाने केली होती. अख्खा हिमालय ओलांडून, हिमालयाचं रौद्र भयानक रूप डोळ्यात साठवून आम्ही त्यावेळी लिपू लेख हा सतरा हजार फूट उंचीवरील पास ओलांडून भारताच्या सीमेपल्याडच्या तिबेटमध्ये पोहोचलो होतो. त्यावेळीच खरंतर मी आगळ्या निसर्गासौंदर्यानं नटलेल्या तिबेटच्या प्रेमात पडले होते. कैलास पर्वताच्या जवळ, मानसखंडातून उगम पावणाऱ्‍या ‘यारलुंग त्सँगपोंला’ डोळे भरून पाहायचे होते. समुद्र सपाटीपासून तेरा हजार फूट उंचावर, थंड वाळवंट अशी ओळख असलेल्या देशात या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्‍या तिबेटमधील सर्वात महत्त्वाच्या या नदीला, जी प्रचंड जलौघ घेऊन नंतर आपल्या भारत देशात येते..., पुन्हा एकदा पाहण्याची मनस्वी इच्छा होतीच! शिवाय तिच्या काठावरील अनोख्या निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या तिबेटचं रूप पुन्हा पाहायचं होतं. त्यामुळे ल्हासामार्गे कैलास मानसला जायचं आहे हे कळताच मी अगदी अचानक या यात्रेला जायचं ठरवलं. सर्वांनी काठमांडूच्या शांग्रिला हॉटेलमध्ये जमायचं होतं. त्याप्रमाणे मी मुंबई-काठमांडू हा प्रवास करून ठरल्या दिवशी काठमांडूला पोहोचले. एक दिवसानंतर ल्हासाची फ्लाइट होती. चिनी विमान कंपन्या सिक्युरीटीच्या नावाखाली बऱ्‍याच गोष्टींसाठी अडवणूक करतात असं सांगण्यात आलं होतं. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या संदर्भातील माहिती, लिखित स्वरूपातील कुठलंही साहित्य मोबाईल, लॅपटॉप यामध्ये किंवा छापील स्वरूपात एखाद्याच्या सामानात सापडलं तर त्या व्यक्तीला त्याच पावली परत पाठवलं जातं असंही सांगण्यात आलं होतं. या सगळ्या माहितीमुळे उगाचच धाकधूक वाटत होती. पण कसलाही त्रास न होता अख्ख्या ग्रुपचं चेक इन आणि बोर्डिंग पार पडलं.

काठमांडू ते ल्हासा या विमानानं प्रवास करताना जर आकाश निरभ्र असेल तर आपल्याला विमानातून एव्हरेस्ट, मकालू, लोत्से, नुपत्से ही हिमालयातील आठ हजार मीटरच्या वरची उंच हिमशिखरं दिसतात. त्यामुळे मी धडपड करून डाव्या बाजूची खिडकी मिळवली. फोटो काढण्यासाठी कॅमेरा तयारीत ठेवला. पण आभाळात इतके ढग होते, की कुठलेही बर्फाच्छादित शिखरच काय त्याचं नखही आम्हाला दिसलं नाही. खिडकीतून बाहेर डोकावून मान मात्र दुखायला लागली. असो, ल्हासामध्ये दोन दिवसांचा मुक्काम होता. उंचावरील वातावरणाशी आणि कमी प्राणवायू असलेल्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं होतं. 

दुसरे दिवशी सकाळी पोटाला पॅलेस पाहण्यासाठी बाहेर पडलो. पोटाला पॅलेस पाहण्यासाठी दिवसाकाठी ठरावीक पर्यटकांनाच परवानगी दिली जाते. त्यामुळे त्यासाठी आधी नंबर लावावा लागतो. पोटाला पॅलेस पाहण्याचं स्वप्न कैक वर्षांपासून मनात जपलं होतं. ते पुरं होणार याचा मनस्वी आनंद झाला होता. पोटाला पॅलेस आता एक म्युझियम आहे आणि युनेस्कोनं त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. कारण १९५९ साली जेव्हा चीन सरकारनं दलाई लामांचे अधिकार काढून घेतले तेव्हा चौदाव्या दलाई लामांनी आपल्याला अटक होईल या भीतीनं आपल्या असंख्य अनुयायांसहित भारतामध्ये राजकीय आश्रय घेतला. तेव्हापासून आजतागायत दलाई लामा आणि हजारो तिबेटी लोक आजही भारताच्या आश्रयाला आहेत. 

दलाई लामांचं राहतं घर असलेल्या या राजवाड्याचं पोटाला हे नाव ‘पोटालका’ या पवित्र पर्वताच्या नावावरून दिलं आहे. हे पौराणिक पर्वत शिखर म्हणजे बोधिसत्त्व अवलोकितेश्‍वराचं निवासस्थान आहे, असं मानलं जातं. तिबेटचे धर्मगुरू पाचवे दलाई लामा यांनी इ.स. १६४५ साली या ‘झोंग’च्या बांधकामास सुरुवात केली. झोंग म्हणजे किल्ला...! त्यांच्या गुरूंनी ल्हासामधील ही जागा या राजवाड्यासाठी सुयोग्य असल्याची ग्वाही दिली होती. ल्हासा शहरातील ड्रेपुंग आणि सेरा या अत्यंत महत्त्वाच्या बौद्ध गोम्पांच्या म्हणजेच मठांच्या मधे एका उंच टेकडीवर पोटाला पॅलेस आहे. सातव्या शतकातील राजा सोंगत्सेन गॅम्पो यानं बांधलेल्या लाल रंगाच्या राजवाड्याच्या अवशेषांवरच पोटाला पॅलेस बांधण्यास सुरुवात करण्यात आली होती. या संपूर्ण इमारतीची पूर्व पश्चिम लांबी सुमारे चारशे मीटर आहे तर उत्तर दक्षिण रुंदी साडेतीनशे मीटर आहे. डोंगराच्या उतरणीवर असलेल्या या राजवाड्याचा पाया म्हणून बांधलेल्या भिंती काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी पाच मीटर रुंद आहेत. पाया भक्कम करण्यासाठी यामध्ये वितळलेलं तांबं ओतलेलं असून त्यामुळे भूकंपापासून या तेरा मजली उंच इमारतीचं गेली चारशे वर्षं संरक्षण झालेलं आहे. याशिवाय भिंतींचं बांधकाम भक्कम करण्यासाठी, दोन दगडांच्या मधे तेथील कुठल्याशा झाडांचं गवत घातलेले आहे. या गवताला धार्मिक दृष्ट्याही महत्त्व असल्याचं सांगण्यात आलं. 

तेरा मजली पोटाला राजवाड्यात एकूण एक हजार खोल्या आहेत. दहा हजार तीर्थस्थानं आहेत. संपूर्ण पॅलेस सपाटीपासून तीनशे मीटर उंच अशा ‘लाल पर्वता’वर बांधण्यात आलेला आहे आणि त्याची उंची ११७ मीटर एवढी आहे. असं म्हणतात की ल्हासा शहरातील तीन महत्त्वाच्या टेकड्या तिबेटचं संरक्षण करणाऱ्‍या तीन बोधिसत्त्व देवता आहेत. पोटाला पॅलेस ज्या लाल टेकडीवर बांधलेला आहे ती ‘मारपोरी’ टेकडी म्हणजे बोधिसत्त्व अवलोकीतेश्‍वर आहे, तसंच पोटालाच्या दक्षिणेस असलेली ‘चोकपोरी’ या नावाची टेकडी म्हणजे बोधिसत्त्व वज्रपाणी असून ‘पोंगवारी’ या नावाची टेकडी म्हणजे बोधिसत्त्व मंजुश्री आहे, अशी तिबेटी लोकांची धारणा आहे. तिबेटचं राजकीय मध्यवर्ती ठिकाण तसंच, पाचव्या दलाई लामा यांचं हिवाळ्यातील वास्तव्य स्थान म्हणून बांधला गेलेला पोटाला पॅलेस, जगातील सर्वात उंच जागी असलेला प्राचीन राजवाडा म्हणून जगभरात ओळखला जातो!

गेली अनेक शतके हा प्राचीन राजवाडा तिबेट मधील बौद्ध लोकांच्या भावना आणि विश्‍वासाचं प्रतीक म्हणून ताठपणे तिबेटच्या राजधानीत उभा आहे. त्याचं जुनं परंतु वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्व ध्यानात घेऊन युनेस्कोनं या राजवाड्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. या भव्य वास्तूचे प्रामुख्यानं दोन विभाग आहेत. लाल राजवाडा आणि पांढरा राजवाडा. यापैकी लाल राजवाडा उंच आहे आणि यामध्ये अनेक बौद्ध देवळं किंवा चैत्य आहेत. प्रार्थना करण्यासाठी किंवा ध्यानधारणेसाठी दलाई लामांकडून यांचा उपयोग होत असे. पॅलेसच्या या भागात बौद्ध धर्माचा अभ्यास आणि त्यासंबंधी कार्याला महत्त्व दिलं जात असे. याच भागात पूर्व दलाई लामांच्या समाध्या आहेत. ओळीनं बांधलेले, सोन्याचं पाणी दिल्यामुळे चकाकणारे स्तूप, म्हणजेच पूर्व दलाई लामांच्या समाध्या पाहताना विचित्र वाटत होतं. ब्राँझमध्ये तयार केलेले बरेचसे पुतळेसुद्धा इथं होते. पाचव्या दलाई लामांनी हा पॅलेस बांधायला घेतला होता, त्यामुळं त्यांचं समाधी स्थळ पाच मजली इमारती एवढं मोठं आहे. त्यावर सोन्याचा वर्ख, हिरे माणकं जडवलेले आहेत. पांढऱ्‍या रंगाचा राजवाडा हा भाग मुख्यत्वे करून सर्व दलाई लामांचे आणि त्यांच्या दरबारातील इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे राहण्याचे ठिकाण म्हणून वापरले जात होते. या भागातच दलाई लामांच्या सरकारातील महत्त्वाची कार्यालये होती. १७७५ साली ‘नोरबुलींगका’ या नावानं ओळखला जाणारा राजवाडा बांधल्यानंतर पांढरा राजवाडा हा दलाई लामांचा हिवाळी राजवाडा झाला. उन्हाळ्यात लामांचे वास्तव्य नोरबुलींगका राजवाड्यात असे. याच राजवाड्यात राहात असताना १७ मार्च १९५९मध्ये साध्या तिबेटी माणसाचा वेष धारण करून चौदावे दलाई लामा घोड्यावर बसून, गळ्यात एक रायफल घेऊन बाहेर पडले. आधी ते आपल्या कुटुंबीयांकडे गेले. नंतर सर्वांसह त्यांनी ल्हासा सोडलं. हिमालयाच्या दुर्गम भागातून घोड्यावर बसून तसंच पायी चालून त्यांनी आणि त्यांच्या बरोबर आलेल्या अनेकांनी हा प्रवास केला. जवळजवळ दोन आठवडे खडतर वाटचाल करून दलाई लामा यांनी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. असं म्हणतात की अरुणाचल प्रदेशच्या तवांग मॉनेस्ट्रीमध्ये त्यांनी या दरम्यान आश्रय घेतला होता. चिनी अधिकाऱ्‍यांना दलाई लामांनी देश सोडल्याचं दोन दिवसांनी कळालं होतं.

पोटाला पॅलेस पाहण्यासाठी फारच कमी वेळ दिला जातो. आपल्याला हवा तितका वेळ या सुंदर वास्तूमध्ये रेंगाळता येत नाही. मुख्य म्हणजे गाइड चांगला मिळणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. नाहीतर आपण काय पाहतो आहे आणि त्याचा संदर्भ काय हे लक्षात येणं जवळ जवळ अशक्यच आहे. बौद्ध धर्माविषयी थोडी फार माहिती नसेल तर काहीच कळणार नाही. शिवाय आपल्याकडील बौद्ध धर्म संकल्पना आणि तिबेटी बौद्ध धर्म यात खूप फरक आहे. भिंतीवर अगणित म्युरल्स रंगवण्यात आलेली आहेत. ती पाहण्यासाठी वेळ अपुरा पडतो. शिवाय काही भागात फोटो काढण्यासाठी बंदी आहे. काही भागात जाण्यास हल्ली परवानगी नसते. पण पोटाला पाहून तिबेटी संस्कृतीचं अतिशय मनोरम दर्शन घडतं. पोटाला पॅलेसच्या टेरेसवरून आपल्याला ल्हासा शहराचं विहंगम आणि सुंदर दर्शन होतंच. पण पॅलेसच्या समोरील मैदानात तिबेटच्या सांस्कृतिक क्रांतीचं प्रतीक म्हणून बांधलेला चौक ठळकपणे पाहायला मिळतो.

पोटाला पॅलेसनंतर जोखँग ही मोनॅस्ट्री पाहायला गेलो. ल्हासा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली जोखँग गोम्पा गेलुग्पा या बौद्ध पंथींयाची, म्हणजेच जे पिवळ्या रंगाची टोपी घालतात त्यांची, मुख्य गोम्पा आहे. गेलुग्पा तिबेटी बौद्धांसाठी जोखँग मोनॅस्ट्री फार महत्त्वाची आहे. कारण ही अतिशय प्राचीन गोम्पा आहे. जोखँगचा अर्थ ‘बुद्धाचे घर.’ ही गोम्पा पहिल्यांदा  इ.स. ६४७मध्ये बांधली होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोखँग गोम्पाच्या भव्य मंडपात मध्यभागी सातव्या शतकातील साक्यमुनी बुद्धाची पूर्ण आकारातील मूर्ती आहे. तिबेटमधील ही सर्वात प्राचीन मूर्ती आहे. सोन्याचा मुलामा आणि मूल्यवान रत्नांनी सुशोभित केलेली ही मूर्ती तिबेटींच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र आहे. असं म्हणतात की ही प्रतिमा बारा वर्षांच्या बुद्धाची आहे. पद्मसंभव नावाच्या भारतीय प्राचार्यांनी सातव्या शतकात बौद्ध धर्म तिबेटमध्ये पोहोचवला. त्यामुळे पद्मसंभव यांना तिबेटींच्या दृष्टीने बुद्धाच्या खालोखाल मान दिला जातो. सर्वच गोम्पांमधून यांच्या मोठ्या प्रतिमा असतात. तशीच ती जोखँग गोम्पामध्येही आहे. 

या बुद्धिस्ट मोनॅस्ट्रीमध्ये सगळं काही बंद बंद असतं. जीव घुसमटल्यासारखं होऊन जातं. या गोंधळातून कधी एकदा बाहेर पडतेय असं होऊन गेलं होतं. मात्र छतावर गेल्यानंतर सोनेरी वर्खानं मढवलेली गोम्पाची शिखरं पाहून त्यांचं खरं वैभव पाहायला मिळालं. जोखँग मंदिराच्या छतावरून आपल्याला पोटाला पॅलेसची सुंदर इमारत दिसते. टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा पोटाला पाहून ल्हासा भेटीचं सार्थक झाल्याचं समाधान मिळतं.

तिबेट हा देश खूप छान आणि वेगळा आहे. पण मनसोक्त भटकायला आणि सगळीकडे जायला परवानगी मिळतेच असं नाही. पण आत्ताचे तिबेट आणि ल्हासा म्हणजे चीननं नव्यानं वसवलेलं शहर आहे. मूळ ल्हासाचं खरं तिबेटी रूप पुसून टाकण्याचा चीन सरकारचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झालेला आहे.

संबंधित बातम्या