गाडी विकताय?

ॲड. रोहित एरंडे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

विशेष

आपली स्वतःची गाडी असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही लोक नवीन गाडी घेऊन सुरवात करतात किंवा काही लोक सेकंड हॅंन्ड गाडी घेतात. तर काही लोक नवीन गाडी घेताना आपली जुनी गाडी विकतात. या सर्व प्रकारात केवळ गाडीचे पैसे दिले-घेतले म्हणजे प्रश्न संपत नाही, तर गाडीची मालकी कायद्याने तबदील म्हणजेच ट्रान्सफर होणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने अलीकडेच ‘नवीन कुमार विरुद्ध विजय कुमार आणि इतर, (अपील क्र .१४२७ /२०१८)‘ या याचिकेवर ६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालावरून स्पष्ट होईल. 

 या केसची पार्श्वभूमी विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्यापैकी अनेकांची याच प्रकारची चित्तरकथा असू शकते. विजय कुमार यांच्या मालकीची मारुती-८०० गाडी ते २००७ मध्ये एका व्यक्तीला विकतात आणि अशा प्रकारे ३-४ वेळा ती गाडी विकली जाऊन सरते शेवटी ती पिटीशनर नवीन कुमार हे २००९ मध्ये विकत घेतात. मे २००९ च्या सुमारास गाडी मागे घेताना अपघात होऊन जाईदेवी आणि नितीन या चुलती-पुतण्यांना अपघात होतो, ज्या मध्ये जाईदेवी या गंभीर जखमी होतात, तर नितीनचा जागेवरच मृत्यू होतो. कालांतराने नुकसान भरपाईसाठी वेगळ्या २ याचिका दाखल होतात. या याचिकांमध्ये अपघाताची जबाबदार कोणाची असा प्रश्न मोटार अपघात प्राधिकरणापुढे उपस्थित होतो. त्यातच गाडीचा इन्शुरन्स संपलेला असतो. मोटर वाहन कायद्याच्या कलम २ (३०) प्रमाणे  ज्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन झालेले असते, तीच व्यक्ती गाडीची मालक समजली जाते. याला अपवाद म्हणजे ती व्यक्ती अज्ञान असेल तर किंवा हायर-पर्चेस कराराने गाडी घेतली असेल तर अनुक्रमे त्या व्यक्तीचा पालक आणि ज्याच्या ताब्यात गाडी असेल ती व्यक्ती मालक समजली जाते. या केस मध्ये ४-५ वेळा गाडी विकली गेली असली तरी अजूनही आरटीओच्या रेकॉर्ड रजिस्टर मध्ये मालक म्हणून विजय कुमार यांचेच नाव असते. सबब गाडी जरी ३-४ वेळा विकली गेली असली तरी अद्यापही विजय कुमार यांचे नाव मालक म्हणून रजिस्टरला असल्यामुळे त्यांनीच नुकसान भरपाई द्यावी असा निकाल मोटर अपघात प्राधिकरण देते. या निकालाविरुद्ध विजय कुमार पंजाब- हरियाना उच्च न्यायालयात याचिका दाखल करतात. ही याचिका मान्य करताना उच्च न्यायालय सर्वोच न्यायालयाच्या काही निकालांचा आधार घेऊन निकाल देते, की जरी आरटीओ मधील रजिस्टर मध्ये मालकाचे नाव बदल नसले तरी, सदरील गाडीची मालकी ३-४ वेळा बदलून शेवटी ती पेटिशनर यांना विकल्याचे पुरावे आहेत, सबब मूळ मालकाला केवळ रजिस्टर मधील नाव बदलेल नाही, म्हणून जबाबदार धरता येणार नाही, उलट शेवटचा मालक म्हणून नवीन कुमार यांनाच जबाबदार धरले पाहिजे. शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचले. आपल्या १४ पानी निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने एकंदरीतच या प्रश्नाच्या विविध पैलूंचा आणि पूर्वीच्या विविध निकालांचा उहापोह केला आहे. सर्वोच न्यायालायने मोटर अपघात प्राधिकरणाचा निकाल कायम करताना असे प्रतिपादन केले, की जरी पैसे दिल्यानंतर आणि गाडीचा ताबा दिल्यानंतर मालकी हक्क बदलत असला तरी, मोटर वाहन कायद्यामधील ‘मालक‘ या व्याख्येप्रमाणे आरटीओ रजिस्टरला ज्या व्यक्तीचे नाव असेल, तीच व्यक्ती मालक म्हणून समजली जाईल आणि यात बदल करता येणार नाही. नुकसान भरपाई मागणाऱ्या व्यक्तीला नुकसान भरपाई मिळणे सोपे जावे आणि रजिस्टरला नोंद न झालेल्या वेगवेगळ्या तथाकथित गाडीमालकांचा शोध घेत त्याला फिरावे लागू नये, हा हेतू या तरतुदीमागे आहे, असेही सर्वोच्च न्यायालायने शेवटी नमूद केले. थोडक्‍यात जरी करारनामा करून गाडी विकली असेल किंवा मोठ्या मनाने दुसऱ्याला मोफत दिली असेल, पण आरटीओ रजिस्टरला असा बदल नोंदविला गेला नसेल, तर मूळ मालकाला जबाबदार धरले जाऊ शकते. या निकालाचे महत्त्व आता लक्षात आले असेलच. या निकालाबाबद ‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे‘ असे वाटले तरी ज्यांनी ज्यांनी गाडी विकली असेल त्यांनी त्वरित त्यांचे नाव आरटीओ रजिस्टरला बदललेले आहे, की नाही याचा पाठपुरावा करावा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाडीचा इन्शुरन्स चालू आहे, की नाही यावर लक्ष ठेवावे आणि इन्शुरन्सचे हप्ते वेळेवर भरावेत.

संबंधित बातम्या