दीर्घकालीन गुंतवणूक आवश्‍यक

भूषण महाजन 
सोमवार, 23 डिसेंबर 2019

अर्थविशेष
 

गेला सप्ताह अत्यंत उलाढालीचा होता. १५ डिसेंबर जवळ येताच ट्रम्प महोदयांनी आपली टोपी थोडी तिरकी केली. आता अमेरिका चीनवर नवे आयात निर्बंध लावणार नाही (जुने आहेतच), चीननेही काही शेतमाल विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. WTO ची अवस्था औरंगजेबानंतरच्या मुघल राजांसारखी झाली आहे. तिचे कोणी ऐकत नाही. बराक ओबामांचे बहुराष्ट्रीय धोरण सोडून द्विराष्ट्रीय व्यापार धोरणाची पद्धत ट्रम्प यांनी सुरू केली आहे. धोरण ठरवणार तेच, एकतर्फे कर वाढवणार तेच अन् अन्यायाविरुद्ध निवाडा देणारही तेच. ‘अमेरिका फर्स्ट’ या नावाखाली सारे चालून जाते. पण तेवढ्या बातमीने मरगळ आलेल्या जागतिक बाजारात लगेच तेजी आली. तसेच ब्रिटनचे मोदी, बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाला भरभरून मते मिळाली. याचेही बाजाराने उत्साहात स्वागत केले. ब्रेक्झिटच्या प्रस्तावाला त्यामुळे गती येईल. जगभरच स्वदेशी राष्ट्रवादाची लागण झाली आहे. चीनसारख्या निर्यातदार देशाला त्यामुळे स्वतःचा देशांतर्गत खप वाढवण्यासाठी ठोस उपाय योजावे लागतील. 

आपला बाजार ६ डिसेंबर रोजी मंदीचे हेलकावे खात होता. निफ्टीचा बंद ११,९२१ होता. ९ व १० तारखेला धारणेत काही बदल झाला नाही, पण पुढील तीन दिवसांत मात्र वरील पार्श्‍वभूमीवर शेअर बाजाराने १२,०८६ च्या पातळीवर, आठवड्याचा उच्चांकी बंद दिला. बाह्या सरसावून तेजी करावी, तर अर्थव्यवस्थेची मंदीसदृश स्थिती डोळ्यासमोर नाचायला लागते. मंदी करावी तर निफ्टी व बँक निफ्टी नव्या उच्चांकाकडे धावायला लागतात.  थोडक्यात, एका पट्ट्यात शेअर बाजार फिरतो आहे. तो ११,७०० - ११,८०० ही पातळी सहसा तोडणार नाही आणि १२,२५० च्या वरही जाणार नाही असे मानायला बराच वाव आहे. तेव्हा दोनच पर्याय आहेत. एकतर दीर्घकालीन गुंतवणुकीला तयार रहा, नाहीतर या टप्प्यात ट्रेडिंगला तयार व्हा.

गेल्या आठवड्यात कॅथोलिक सिरीयन बँकेचा शेअर नोंदला गेला. १९३-१९५ च्या पट्ट्यात प्रचंड मागणी असलेला हा शेअर ३०० रुपयांवर नोंदला गेला आणि त्यानंतर मात्र खालीच येत आहे. केरळ येथील ९८ वर्षांचा इतिहास असलेली ही बँक, दक्षिणेत चांगलीच पाय रोवून उभी आहे. सोने तारण कर्ज, तसेच लघू उद्योग कर्ज ही तिची बलस्थाने आहेत. परंतु, गेली दोन वर्षे बँकेला सतत तोटा होत आहे. चालू वर्षाच्या सहामाहीत नफा दिसत असला तरी तो नगण्य आहे. चालू किमतीला (२३५) बाजारभाव/उपार्जन PE गुणोत्तर १७३ आहे. तेव्हा हा भाव कितपत टिकेल याची शंका वाटते. होत असलेला नफा खिशात टाकावा असे वाटते. पुढे कामकाज सुधारणार आहे, त्याआधी हा शेअर घेण्याची संधी मिळेल.

तसेच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचीही शेअर बाजारात वाजतगाजत नोंदणी झाली. ३७ रुपयांचे मूल्य ठेवलेल्या शेअरची ५८ रुपयांनी नोंदणी झाली. बँकेचा नफा एका वर्षात ६८ कोटींवरून १,९९२ कोटींवर गेला आहे. या क्षेत्रातील ए यू फायनान्स बँक सर्वात महाग (PE ६०.८) आहे. या नव्याने नोंदलेल्या सर्व छोट्या बँकांचे सरासरी बाजारमूल्याचे PE गुणोत्तर २९-३० आहे. हा शेअर ४५ ते ४७ रुपयांवर स्थिर व्हावा. चालू भावात कंपनीचे संपूर्ण बाजारभांडवल ९,००० कोटी आहे व प्रमोटर कंपनी उज्जीवन फायनान्सचे बाजारभांडवल ३,९७४ कोटी आहे. (होल्डिंग कंपनी ६६% सवलतीत मिळत आहे.) ‘उलट विलीनीकरण’ (REVERSE MERGER) पद्धतीने दोन्ही कंपन्या विलीन व्हाव्या अशी व्यवस्थापनाची इच्छा आहे. पण त्याला रिझर्व्ह बँकेची परवानगी लागेल. कदाचित त्यात दोन वर्षेही जाऊ शकतात. उज्जीवन फायनान्स विकून स्मॉल फायनान्स बँक घेणे हा एक पर्याय असू शकतो. दोन्ही कंपन्यांचे कामकाज उत्तम आहे, तेव्हा किमान दोन वर्षे थांबण्याची तयारी असेल तर दोन्ही शेअर ठेवावे. 

सहकारी बँका नवनवीन आव्हाने घेऊन येत असतात. त्यातील शहरी सहकारी बँका थेट रिझर्व्ह बँकेच्या नियमनाखाली आणण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यामुळे सात लाख कोटीवरची कर्जे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येतील. BASELIII च्या बंधनात येण्यास त्यांना थोडी मुदतही देण्यात येईल. पीएमसी बँकेच्या पराक्रमानंतर हा निर्णय घेण्यात आला. सहकारी बँकांच्या ठेवीदारांना त्यातून थोडा दिलासा मिळावा.

नुकताच कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगने बराच नियमबाह्य व्यवहार केल्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले होते. कार्व्ही स्वतः डीपॉझिटरी पार्टीसिपंट असल्यामुळे, गुंतवणूकदारांचे शेअर्स परस्पर स्वतःच्या नावाने वर्ग करून ते कंपनीने गहाण ठेवले. त्यावर कर्ज घेऊन स्वतःच्या बांधकाम क्षेत्रातील उपकंपनीत गुंतवले. सगळा गैरव्यवहार सेबीच्या ध्यानात आल्यावर त्याची सेबीने तत्काळ दखल घेऊन पुढील कार्यवाही केली व साऱ्या धनकोंना गुंतवणूकदारांच्या खात्यात शेअर हस्तांतरित करण्यास भाग पाडले. या प्रकरणी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आदी कंपन्यांना तोटा (एकूण अंदाजे १,००० कोटी रुपये किंवा अधिक) होऊ शकतो. शेअर्सची मालकी कुणाची आहे याची शहानिशा न करता कर्ज दिले, असा ठपका ठेवून त्यांचा पुनर्विचाराचा अर्ज निकालात काढला जाईल असे दिसते. तसेच स्टेट बँकेने आपली अनर्जित कर्जे ११,९३२ कोटींनी कमी दाखवल्याचे निदर्शनास आले आहे. बाजार तेजीच्या मूडमध्ये असल्यामुळे या साऱ्या बातम्यांचा काहीही परिणाम झाला नाही. 

अनेक तज्ज्ञ अभ्यास करून गुंतवणुकीसाठी चांगल्या कल्पना घेऊन येतात. त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून सामान्य गुंतवणूकदार स्वस्त वाटलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असतो. या बाबतीत अग्रेसर असलेला शेअर म्हणजे येस बँक. येस बँकेत मार खाल्ला नाही असा गुंतवणूकदार कळवा आणि हजार रुपये मिळवा असे विनोदाने म्हणता येईल. सरकार कुठलीही बँक बुडू देणार नाही हा आत्मविश्‍वास त्यामागे असावा. राणा कपूर यांच्या व्यवस्थापनेखाली असलेली ही बँक, चांगल्या वाईट, थोड्या डाव्या उजव्या प्रस्तावांनादेखील कर्ज देत असे. ही कर्जे वसूल करण्याची धमक कपूर यांच्याकडे होती किंवा असावी. त्यांना रिझर्व्ह बँकेने दूर केल्यानंतर वरील कर्जे अनर्जित व्हायला लागली. या कर्जांची बुडीत होण्याची तरतूद करायची असेल, तर नवे भांडवल गोळा करायला हवे. बँकेने १४,००० कोटी रुपये उभे करायचे ठरवले आहे. हे भांडवल कुठल्या भावाने शेअर विकून जमा होऊ शकेल यावर या शेअरची पुढील वाटचाल अवलंबून आहे. 

स्पेशालिटी रसायने, कीटकनाशके, शेतीच्या निरनिराळ्या उपयोगांसाठी लागणारी रसायने यांना जगभर मागणी आहे. त्यात एसआरएफ, पीआय इंडस्ट्री, नवीन फ्लोरिन आदी अग्रेसर आहेत. एसआरएफ फ्लोरोकेमिकल तयार करते, त्याला चांगली मागणी आहे. उत्पादन वाढवण्याची तरतूद कंपनीने केली आहे, मे २०२० पर्यंत नवी क्षमता कार्यान्वित होईल. तसेच काही उत्पादने बंद करायचेही ठरवले आहे. मागणीचा जोर असाच राहिल्यास पुढील वर्षाचे उपार्जन १६० ते १८० रुपये होऊ शकते व शेअरचा भाव ४,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तसेच नवीन फ्लोरिनही पुढे वाढू शकण्यास जागा आहे. एक ते दोन वर्षांचा विचार करून ही संधी घेता येईल.

पुढील आठवड्यात कंपन्यांनी भरणा केलेल्या अग्रिम करांचे आकडे जाहीर होतील. तसेच अमेरिका-चीन यांचे ऋणानुबंध कसे पुढे येतात याकडे बाजाराचे बारीक लक्ष आहे. दोघांचे सूत जमलेच तर १२,२५० कडे निफ्टी वाटचाल करेल. या दोन्ही ठिकाणी निराशा पदरी पडली, तर मात्र ११,७०० - ११,८०० हा स्तर येऊ शकतो. 

संबंधित बातम्या