व्हिटॅमिन एम 

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

अर्थविशेष

आपल्या प्रत्येकाच्या आर्थिक सुदृढतेसाठी हे व्हिटॅमिन हवेच. शेअरबाजार, अर्थव्यवस्था, त्यावर परिणाम करणाऱ्या जागतिक व स्थानिक घटना यांचा परामर्श घेत पुढे पाहण्याचा हा प्रयास! 

‘दबंग’मधल्या खलनायकासारखे, ‘मै कुछ जादा तो नही चल गया’ असे म्हणत शेअरबाजाराने १२ सप्टेंबरला संपलेल्या मागच्या आठवड्यात थोडासा विसावा घेतला. यापुढील चाल, तळ्यात मळ्यात करत ११००० ते ११६५० अंशापर्यंत (निफ्टीच्या) सीमित राहील असे वाटते. ११६५० च्या वर बाजार दोन दिवस टिकल्यास १२००० ची पातळी नक्की येऊ शकते. आपल्या बाजाराची दिशा सतत पश्चिमेला काय चालले आहे यावर अवलंबून असते. अमेरिकन बाजारात वारेमाप तेजी आल्यामुळे व सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात नोटाछपाई झाल्यामुळे जगभरचे बाजार सुधारले, त्याला आपलाही बाजार अपवाद नव्हता. 

आता वॉल स्ट्रीटवर अशी अफवा होती, की ‘सॉफ्टबँके’ने ४०० कोटी डॉलर्सचे स्टॉक ऑप्शन अमेरिकन बाजारात विकत घेतले. तेही अॅपल, मायक्रोसॉफ्ट, टेसला इत्यादी अत्यंत लोकप्रिय शेअर्सचे! त्यातून मोठी तेजी निर्माण झाली, पण काही तज्ज्ञ हे नाकारतात. कुठलीही संस्था, अशी वारेमाप तेजी करीत नाही, ऑप्शन्स घेतले असतील तर त्याखालील शेअर्सही विकले असतील, असे त्यांचे म्हणणे. त्यात सॉफ्टबँक ही जपानी कंपनी व्हेन्चर कॅपिटल, अनेक टेक्नॉलॉजी, एनर्जी उद्योगांची मालक आहे. असा आततायीपणा ते करणार नाहीत असा समज आहे. 

ते बोट दाखवतात तरुण पिढीकडे - जनरेशन झी - रॉबिनहूड गुंतवणूकदार! खरे खोटे माहीत नाही, पण लवकरच कळेल. आता जरी पडझड झाली असली तरी पुन्हा नवी खरेदी होऊ शकते! बाजार सावरला तर ही अफवाच होती असे म्हणता येईल. 

आपला बाजार आजकाल रिलायन्सच्या पाठीवर बसून वर जातो. खरेच, या समभागाचे चाहते आणि टीकाकार समसमान आहेत. नुकतेच जिओ प्लॅटफॉर्मचे शेअर परदेशी गुंतवणूकदारांना विकून या कंपनीने दीड लाख कोटी रुपये जमवले होते, आता रिटेलची खासगी समभाग विक्री सुरू होत आहे. जगभरचे पी/ई फंड त्यात आकर्षित होत आहेत, त्यातच ॲमेझॉन कंपनीला २०००० कोटी डॉलर्सचे शेअर्स रिलायन्स देईल अशी अफवा आहे, तेव्हा हा शेअर धावला नसता तरच नवल! या आठवड्यात २३६ रुपये म्हणजे ११ टक्के वाढला. टीकाकार म्हणतात रिलायन्सच्या नफ्यातून रोखीचा प्रवाह दिसत नाही, भाव अतिशय वाढलेला आहे, तेव्हा दूर राहिलेले बरे. घेणारे म्हणतात ही कंपनी म्हणजे भारतीय ॲमेझॉन होऊ घातली आहे. भारतीय ग्राहक आता डिजिटल झाला आहे, या क्षेत्रात तिचा सर्वांत जवळचा स्पर्धक म्हणजे डीमार्ट. डीमार्टची यावर्षीची (२०२०-२१) विक्री २५००० कोटी रुपये होईल, रिलायन्स रिटेलची १९०००० कोटी होण्याची शक्यता आहे. दर आठवड्यातील ३५ लाख ग्राहक, ११८०० स्टोअर्स आणि ७००० शहरांत अस्तित्व - रिलायन्स रिटेलकडे परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होणारच! 

आपण आकर्षित व्हायचे की नाही हे स्वतःच ठरवायचे आहे. 

आज आपण पाहतो, की म्युच्युअल फंडांच्या शेकडो योजना आहेत. यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जातो. अशावेळी केवळ नाव वाचून गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांकडून चुकीची योजना निवडली जाऊ शकते. गुंतवणूकदाराचे हित जपण्यासाठी ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली तयार केली. त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटॅगरीमध्ये एकच फंड चालवणे बंधनकारक झाले. त्यातच मल्टीकॅप नावाची कॅटॅगरी होती. या फंडात किमान ६५ टक्के रक्कम कुठल्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा होती. 

नुकत्याच काढलेल्या नवीन आदेशानुसार मल्टीकॅप फंडात लार्ज, मिड व स्मॉल कॅप शेअरचे प्रमाण प्रत्येकी किमान २५ टक्के असणे अनिवार्य करण्यात आले आहे. सेबी असे बदल अधूनमधून करीत असते व त्यातून अजाण गुंतवणूकदाराचे संरक्षण साधत असते. आपले काय भले होणार आहे हे गुंतवणूकदाराला जरी कळले तरी पुरे! यातील मेख अशी आहे, की आजच्या कुठल्याही मल्टीकॅप फंडात लार्जकॅप शेअरचे प्रमाण (काही अपवाद वगळता) ७० टक्के किंवा त्याहून अधिक आहे. आता बाळबोधपणे विचार केला, तर सर्व स्कीम्स धरून ४०००० कोटी रुपयांची विक्री करावी लागेल व त्यातून मध्यम व लहान भांडवलमूल्य असलेले शेअर्स विकत घ्यावे लागतील. यासाठी ४ महिन्यांची मुदतही देण्यात आली आहे. हे करणे व्यवहार्य आहे का व त्यातून गुंतवणूकदाराचे भले साधेल का, हा खरा प्रश्न आहे. याचा फेरविचार व्हावा अशी विनंती सेबीला अॅम्फीतर्फे करण्यात येईल असे दिसते. मध्यम व लहान शेअर्समध्ये द्रवता कमी आहे, त्यात सर्वच शेअर्स गुंतवणूकजन्य नाहीत. तेव्हा गुणवत्ता असलेले समभाग वर जाऊ शकतात. नव्याने खरेदी करायची इच्छा असल्यास औषध, रसायने व सॉफ्टवेअर क्षेत्रातून निवड करावी. डीव्हीज लॅब, सुवेन फार्मा, लॉरस, सिन्जीन, बायोकॉन, नवीन फ्लोरिन, पीआय इंडस्ट्री, एस आर एफ, टाटा एलेक्सी, एन आय आय टी टेक व यासारख्या शेअर्समधे अभ्यासपूर्ण गुंतवणूक करता येईल. 

जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पायउतार होत आहेत. त्यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा जपानची अर्थव्यवस्था ४.३ टक्के आकुंचन पावत होती. अत्यंत  
निर्धाराने सरकारने आर्थिक पावले उचलली. व्याजदर शून्याखाली आणले. त्या आधीच्या दशकात तेथील बँकांनी वारेमाप कर्जे दिल्यामुळे अनार्जित कर्जांचे प्रमाण वाढले होते व नवीन कर्जपुरवठा करण्यास त्या तयार नव्हत्या. सरकारने त्यांना प्रोत्साहन दिले व चलनपुरवठा वाढवला. महागाई वाढलीच तर त्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले, किंबहुना अॅबे यांनी महागाईचा दर २ टक्क्याने वाढला तरी चालेल असे सूचित केले. त्यातून बेरोजगारी तीन टक्क्यांच्याही खाली आणून दाखवली. कोरोनाचे संकट आले नसते तर याहूनही अधिक प्रगती झाली असती. हे सारे सूचित करण्याचे कारण म्हणजे आपला देशही अशाच संकटातून जात आहे. खंबीर नेतृत्व, मूलभूत आर्थिक सुधारणा, उद्योगाच्या हाती भरपूर खेळते भांडवल, आक्रमक निर्गुंतवणुकीकरण या साऱ्या पावलांची भारताला गरज आहे. तसे झाल्यास भविष्य उज्वल आहे. 

या अनुषंगाने आयुर्विमा संस्थेच्या दहा टक्के भांडवलविक्रीच्या निर्णयाकडे बघता येईल. यातून सरकारला एक लाख कोटी मिळावे अशी अपेक्षा आहे. आयुर्विमा कर्मचारी संघटनेचा या निर्णयाला विरोध आहे, पण त्यात त्यांचे काहीही नुकसान नाही हे जर पटवून देता आले व चालू तेजीत हा विषय पुढे नेता आला तर ते फार सोयीचे ठरेल. एलआयसीकडे ३१ लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. जवळजवळ ५.६१ लाख कोटीचा प्रीमियम एलआयसी दरवर्षी गोळा करते. दरवर्षीचा नफा अडीच लाख कोटी आहे. याशिवाय सेन्सेक्समधील ३१ समभागांमध्ये घसघशीत गुंतवणूक आहे. एलआयसीसाठी परदेशी संस्थांकडून जोरदार मागणी येईल असा होरा आहे. यावर्षीचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. 

उत्पादननिगडीत प्रोत्साहन योजना इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात लागू झाली आहे. त्याअंतर्गत सरकारने ७,४०,००० कोटी रुपयांच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. फॉक्सकॉम, डिक्सॉन ,सॅमसंग, पेगाट्रॉन इत्यादी निर्यातदारांना याचा फायदा होईल. डिक्सॉन हा एक चांगला गुंतणूकजन्य समभाग आहे. किंमत चढी वाटत असली तरी थोडा खाली आल्यास जरूर विचार करावा. आपण सहसा किंमत/ उपार्जन हे गणित वापरून शेअर स्वस्त आहे, की महाग याचा विचार करतो. त्याबरोबरच विक्रीतील वाढही विचारात घेतली पाहिजे. डिक्सॉनची विक्री दरवर्षी ४० टक्क्यांनी वाढते आहे. त्यामुळे किंमत/उपार्जन/नफ्यातील वाढ (Price/Earning/Growth) लक्षात घेतली पाहिजे. सध्या शेअरमागे उपार्जन (EARNING) १०५ रुपये आहे व बाजारभाव ९२००! नफ्याचे % प्रमाण कमी असले तरी निर्यात व स्थानिक मागणी जोरदार असल्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी खरेदीला ८००० च्या आसपास सुरुवात करावी. मोबाईल फोन, सीएफएल बल्ब असेम्ब्ली, इलइडी टीव्ही - थोडक्यात इलेक्ट्रॉनिकमधील सर्वकाही कंपनी तयार करू शकते. आपल्या भांडारात हा समभाग हवाच. 

एक आनंदाची बातमी म्हणजे ग्रामीण क्षेत्रात रोजगारनिर्मिती व ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणीही वाढत आहे. व्हीएसटी टीलर्सचा खप चांगल्या पिकपाण्यामुळे वाढत आहे, तसेच एस्कॉर्ट ट्रॅक्टर्सची मागणी सतत वाढते आहे. ११५० रुपये भावात किं/उ ३१ पडते. कोरोना महामारीच्या काळात विक्री ८० टक्क्यांनी वाढणे नेत्रदीपक आहे. किमान १ ते २ वर्षांसाठी या शेअरचा विचार करता येईल.
सप्टेंबर महिन्यात बरेच नवीन समभाग गुंतवणुकीसाठी बाजारात येत आहेत. नीरक्षीरविवेक वापरूनच त्यात निवड करावी.

संबंधित बातम्या