शेअरबाजारात तेजी 

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

अर्थविशेष

बराच काळ पावसाने ओढ दिल्यानंतर, धो धो पाऊस पडावा व तो पडतच राहावा तशी तेजी ता. १८ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, शेअर बाजारात आली. आता थोडी उघडीप पडावी असे गुंतवणूकदारांना वाटणे नैसर्गिक आहे, पण तसे झालेच तर शेअर खरेदीची हिंमतही दाखवायला हवी. अंदाजाप्रमाणे निर्देशांक वाढले तरी निफ्टीने ११६५० ची लक्ष्मणरेखा राखली. तसेच लार्ज कॅपमध्ये विक्री झाली नाही. 

मागील आठवड्यात केलेल्या भाकिताप्रमाणे गुणवत्ता असलेले मध्यम व लहान भांडवल असणारे समभाग वाढले. सुचवलेल्या शेअर्सपैकी लॉरस लॅब्स २११, डीव्ही १७४, सुव्हेन ७५ तर बायोकॉनने २० रुपये वाढ दाखवली. औषधे व आरोग्य क्षेत्रातील, तसेच खास रसायने तयार करणारे उद्योग व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर वाढले व वाढतच गेले. अर्थात ही तेजी आपल्या हातात अंक पडण्याआधी झाली. परंतु त्यामुळे नाउमेद न होता प्रत्येक पडत्या भावात हे समभाग जमा केले पाहिजेत. कारण एकूणच हे क्षेत्र पहिल्या क्रमांकाने गुंतवणूकजन्य आहे. तीच गत सॉफ्टवेअरमधील मिड कॅप शेअर्सची! त्याशिवाय, लार्ज कॅप शेअर्स पडणार नाहीत पण मिड व स्मॉल कॅप वाढतील हा होराही अचूक ठरला. आजकाल गुंतवणूकदारांच्या गळ्यातील ताईत असलेला डॉ. रेड्डीज लॅब घसघशीत १९ % वाढला. रशियाने विकसित केलेली कोरोना महामारीवरील लस भारतात ही कंपनी वितरित करणार आहे व तसा करारही झाला आहे. त्याखेरीज लुपिन, नाटको लॅब, इन्फोसिस, महिंद्र, टीसीएस, एचसीएल टेक, एसकॉट, सिप्ला, हिरो मोटो, बजाजही वाढले. अॅफल, डीस्कॉन, एपीएल अपोलो, सुदर्शन केमिकल (हा शेअर चालायला सुरुवात झाली आहे, जरूर लक्ष द्यावे) सारखे गुणवत्ता असलेले समभागही वाढले. स्फुटनिक लस रशियाने थोडी घाईघाईने बाजारात आणली असा पाश्‍चात्त्य देशांचा आरोप आहे. या सारख्या उलटसुलट बातम्यांच्या परिणामामुळे हा शेअर खाली येईल तेव्हा अवश्य संग्रहित करावा. 

तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील एचसीएल टेकने चांगल्या भरीव कामगिरीचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, इन्फोसिसने गाइड व्हिजन ही युरोपियन कंपनी विकत घेतली. या वेधक बातम्या या क्षेत्रासाठी स्फूर्तिदायक ठरल्या. सरकार वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी जीएसटी दर कमी करणार अशी चर्चा आहे. त्यामुळे वाहन उत्पादक व त्यांचे पुरवठादार उत्साहित आहेत व त्याचे प्रतिबिंब त्यांच्या बाजारभावात आहे. 

आपल्याला काय वाटते यापेक्षा शेअरबाजार रोजच्या चढउतारातून काय सांगतो आहे हे बघितले पाहिजे. बँकांच्या एकूणच कामगिरीबद्दल गुंतवणूकदारांच्या मनात साशंकता आहे. पुढे येणारी अनार्जित कर्जे, कितीही भांडवल उभे केले तरी ते पुरे पडेल की नाही याबद्दलची उत्कंठा, अनेक लोकप्रिय निर्णय, ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ या न्यायाने बँकांवर लादल्यामुळे, सिंहापुढे बांधलेल्या शेळीचे जसे वजन वाढत नाही तसे या क्षेत्रातील समभागही वाढत नाहीत. दिलेल्या कर्जाचे हप्ते घेऊ नका, एवढेच नाही तर व्याज व व्याजावरील व्याज केव्हा घ्यायचे किंबहुना घ्यायचे की नाही याचा निर्णय कोर्ट ठरवणार. वाढीव बुडीत कर्जे व दिलेल्या कर्जांचे पुनर्गठन आणि अर्थव्यवस्था कधी सुधारेल याची अनिश्‍चिती, या सर्व संदर्भामुळे काही दिवस तरी या क्षेत्राकडे दुर्लक्षच केलेले बरे. अगदी घ्यायचेच असल्यास सिटी युनियन बँक व एसबीआय कार्डस या समभागांचा विचार करावा. दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी बँकिंग व फायनान्शियल फंडात सिप माध्यमातून (SIP) किमान ३ वर्षे भांडवल घालावे असे सुचावावेसे वाटते. किंवा बँक ETF मध्ये थोडी रक्कम दरमहा जमा करावी. सुरवातीला तोटा झाल्यास तो सहन करावा. 

ॲमेझॉन, रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करणार अशी चर्चा असतानाच ॲमेझॉनने बिर्ला समूहातील मोअर या रिटेल साखळीत ४२०० कोटी गुंतवायचे ठरवले आहे. अर्थात रिलायन्सचा आवाका फार मोठा आहे आणि बिर्ला समूहाला ‘आयडिया’ जिवंत ठेवण्यासाठी आपल्या इतर गुंतवणुकी मोकळ्या कराव्या लागणार आहेत. रिलायन्सला हे आधीच कसे सुचले नाही एवढीच उत्सुकता. रिलायन्स रिटेलच्या समभागांना इतकी मागणी आहे, की सॉफ्टबँक  
व कार्लाईल समूहाला गुंतवणुकीच्या प्रतीक्षायादीत ठेवले आहे. 

सरकारचे  वाहन व इतर उद्योगातील रॉयल्टी देयकाकडे लक्ष गेले आहे व ती कमी करावी असे सुचवले आहे. तसे करणे भाग पडल्यास मारुती, लिवर नेस्ले इत्यादी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे अधिक लक्ष देता येईल. 

भाजपचा सर्वांत जुना सहकारी पक्ष अकाली दल सरकारवर नाराज आहे. कृषिविषयक विधेयके शेतकरी विरोधात आहेत असा निषेध करीत अकाली दलाच्या एकमेव मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. शेतकरी संघटनांना या आंदोलनात फारसा जनाधार नाही, त्यामुळे या शेतमालाच्या विक्री योजनेतील सुधारणा बळीराजाच्या पचनी पडल्या असाव्यात असे वाटते. शेतीमाल देशभर कुठेही विक्री करण्याची मुभा आणि कंत्राटी शेतीला प्रोत्साहन ही दोन्ही विधेयके लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाली.  काँग्रेसने वरवर जरी विरोध केला असला तरी ही सुधारणा आम्हीच करणार होतो (सरकार आल्यावर) असेही म्हटले. 

एअर इंडिया चालवणे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा अवस्थेला पोचले आहे. नुकतेच सरकारने अगतिकपणे मान्य केले, की आता दोनच पर्याय शिल्लक आहेत. मिळेल त्या चांगल्या किमतीत विक्री करणे किंवा ही विमानकंपनी बंद करणे. एअर इंडियाच्या कर्जाचा भार जर सरकारने उचलला, तर ही विक्री आकर्षक होऊ शकेल. टाटांखेरीज हिंदुजा व एका अमेरिकन समूहाने इच्छा दर्शवली आहे. त्याशिवाय एअर इंडिया एक्सप्रेस व फ्लाइट किचनचा ५०% हिस्सा विक्रीचीही सरकारची योजना आहे. आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीत ५०% व देशांतर्गत १३% हिस्सा असलेली ही विमानसेवा कर्तबगार उद्योजकाकडे हस्तांतरित झाली तर तिचे सोने होईल. 

या अनुषंगाने असे पांढरे हत्ती किती काळ पोसता येतील याचाही विचार करायला हवा. १०० लाख कोटी रुपये खर्च करून बुलेट ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. आज अर्थपुरवठा जरी जपान सरकार करणार असले तरी कधीतरी ते पैसे परत करावे लागणार आहेत. किमान दुरुस्ती व देखभालीचे उत्पन्न तरी तिकीट विक्रीतून वसूल होणार का, हे बघितले पाहिजे. चीन आणि स्पेन सरकारने असेच प्रकल्प करून तेथील रेल्वेला कर्जाच्या विळख्यात टाकले आहे हेही विसरून चालणार नाही. 

सार्क देशातून होणाऱ्या आयातीवर याआधी करात सवलत दिली जात असे. ती आजही मिळणार आहे पण नव्या आदेशानुसार यासाठी परदेशी निर्यातदाराकडून एक प्रमाणपत्र मिळवावे लागणार आहे. त्या देशात किमान ३५ % मूल्यवर्धित निर्मिती झाली आहे याचा यापुढे पुरावा लागेल. यामुळे श्रीलंकेसारख्या देशातून नावापुरता ‘कंट्री ऑफ ओरिजिन’चा शिक्का मारून होणारी आयात थांबेल पण सामान्य आयातदाराच्या अडचणीत भरच पडेल. करसंकलन वाढवण्यासाठी असे पर्याय परिणामांचा विचार फारसा न करता आणले जातात आणि कधीकधी मागेही घेतले जातात. 

सध्या महामारीच्या काळात व पगारांची अनिश्चिती असल्यामुळे क्रेडीट कार्डांचा वापर वाढला आहे. एसबीआय कार्डस हा या क्षेत्रातील एकमेव शेअर बाजारात आहे. २०२० चे उपार्जन १३.३ आहे व P/E गुणोत्तर ४३.३ पडते. २०२२ चा विचार केल्यास EPS १८.९ होईल असा अंदाज आहे व त्यामुळे PE ३०.७ पडतो. ३३५ डॉलर्स भाव असलेला मास्टर कार्ड या क्षेत्रातील १ नंबर चा शेअर. त्याचा  PE ४७ आहे. भारतीय ग्राहकही आता डिजिटल झाला आहे, क्रेडीट कार्डाचा वापर वाढतच जाणार. त्यात इतर बँक आपले क्रेडीट कार्ड स्वतःच्या शाखांमधून विकतात. स्टेट बँक त्यासाठी त्याबरोबरच बाहेरील चॅनेलही वापरते. सहसा आयुष्यभर क्रेडीट कार्ड वापरण्यासाठी कुठलेही शुल्क न आकारण्याची पद्धत आहे (Life Time Free). स्टेट बँक मात्र शुल्क आकारते व शुल्काइतक्या किमतीचे पॉइंट बक्षीस म्हणून देते. असे अनेक मुद्दे आहेत, सर्वच विस्ताराने देणे शक्य नाही. सारांश म्हणजे आज व प्रत्येक पडझडीत हा शेअर किमान ३ वर्षांसाठी घेतल्यास चांगला नफा होऊ शकतो. 

वॉल स्ट्रीट वर या आठवड्यात जरी मंदी असली (अंदाजे १ टक्का घसरण), तरी नवीन शेअर्स चे IPO जोरात आहेत. नुकताच तेथे क्लाऊड काम्प्युटिंगमधील ‘स्नोफ्लेक’ कंपनीच्या इश्यूला भरघोस प्रतिसाद मिळाला. १२० डॉलर्सची ऑफर किंमत असलेल्या या शेअरची नोंदणी दुप्पट किमतीला झाली. हे क्षेत्र अतिशय आकर्षक आहे आणि त्यात वॉरन बफे यांनीही गुंतवणूक करायचे ठरविले आहे. (या निमित्ताने डिजिटल क्षेत्रातील आपल्याकडील हॅपीएस्ट माईंड IPO ची आठवण होणे साहजिक आहे.) अॅपलने नवे अॅपल वॉच आणले आहे, त्यात ऑक्सिजनची शरीरातली पातळी नोंदवण्याची सोय आहे. ही नावीन्यपूर्ण क्लृप्ती नवे ग्राहक आकर्षित करू शकते. गेले वर्षभरात हा शेअर दुप्पट झाला. 

किमान पुढील पाच वर्षे व्याजदर शून्यतम राहतील असे फेडने जाहीर केले आहे. कमी असणारे व्याजदर याचा अर्थ जोखीम घेण्याची क्षमता वाढणे, म्हणजेच सोने, चांदी व शेअरबाजारात तेजी! परिणामतः आणखी काही काळ तेथे तेजी राहू शकते. नोव्हेंबरमध्ये होणारी अध्यक्षीय निवडणूक बाजाराची पुढील दिशा ठरवेल असे वाटते. 

चीनने, कोरोना महामारीनंतर औद्योगिक क्षेत्रात लक्षवेधक सुधारणा केली आहे. देशांतर्गत मागणी व निर्यातही सुधारली आहे. परिणामतः तेथील CSI ३०० निर्देशांक या आठवड्यात २ टक्के वर गेला. चीनचे रेन्मिम्बी हे चलन बरेच वधारले आहे. (१० महिन्यांतील उच्चांक) ही घटना, परदेशी पैसा उदयोन्मुख शेअर बाजारांकडे वळतो आहे असे दर्शवते. ट्रम्प यांच्या भावनिक व राजकीय भूमिकेकडे योग्य तेवढे दुर्लक्ष करून जगभरची गुंतवणूक चीनकडे वळते हेही लक्षात घेतले पाहिजे. 

एखादा शेअर आपण विकत घ्यावा आणि छातीशी घट्ट कवटाळून सांभाळावा. खाली आला तरी पर्वा न करता आपला पेशन्स संपेपर्यंत ठेवावा. नेमका आपण विकायचाच अवकाश, की दुसऱ्याच  दिवसापासून त्याने वर जायला सुरुवात करावी, असे बऱ्याच गुंतवणूकदारांच्या बाबतीत होते. बरेचदा विकलेला शेअर वर जाणे आणि घेतलेला खाली येणे हे नित्याचेच होते, अशा वेळी काय करावे? 

सोपा उपाय म्हणजे, कुठलाही शेअर विकत घेण्याआधी, त्याबद्दल किमान माहिती घेऊन, तो आपण का विकत घेत आहोत आणि किती काळासाठी याची मनात नीट आखणी करावी. आपल्या निवडीबद्दल दृढ विश्वास असल्याशिवाय गुंतवणूक करू नये. शेअर विकत घेतल्यावर नफा व्हावा म्हणूनच आपण पैसे पेरतो. तेव्हा वाढ झाल्यास ती सहन करण्याचीही मानसिकता हवी. आपलेही अंदाज कधीकधी अचूक असू शकतात, हे स्वत:ला समजावत राहिले पाहिजे. पुढेही सतत त्या शेअरचा मागोवा घ्यायला हवा व आपला विश्वास अनाठायी नाही ना याची खातरजमा करत राहिले पाहिजे. आपली चूक होत असल्यास प्रसंगी थोडी तोशीस लागली तरी त्या गुंतवणुकीतून बाहेर पडता आले पाहिजे. नाहीतर (थोडा वाढल्यामुळे) घरातला रिलायन्स विकला जातो आणि रिलायन्स पॉवर आयुष्यभर सांभाळला जातो.

संबंधित बातम्या