शेअरबाजाराचे सततचे घुमजाव !

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

अर्थविशेष

श्री  समर्थ रामदासस्वामी सांगून गेले आहेत -
वाट पुसल्याविण जाऊ नये
फळ वोळखल्याविण खाऊ नये
पडिली वस्तू घेऊ नये

एकाएकी

या वचनाची आठवण होण्याचे कारण म्हणजे मागील सप्ताहात दोन नवीन शेअर्स दिमाखात सूचीबद्ध झाले. कॅम्स व केमकॉन केमिकल्स! ज्यांना ही लॉटरी लागली त्यांना लगेच ११५ टक्के व १८ टक्के नफा खिशात टाकता आला. दोन्ही शेअर्सना भरपूर मागणी होती. केमकॉनची विक्री किंमत कंपनीने ३०६ रुपये ठरवली होती, पण फार्मा क्षेत्राच्या संदर्भामुळे, गुंतवणूकदारांनी विक्रीला आलेल्या शेअर्सच्या १४७ पट मागणी नोंदवली. भरमसाट मागणी व अनधिकृत व्यवहारात वेडीवाकडी किंमत याचा परिणाम होऊन शेअर ७४३ रुपयांना सूचीबद्ध झाला. पण हा हन्त हन्त! गुरुवारी शेअर खालच्या सर्किटवर ५८४ रुपयांना बंद झाला. पहिल्या दिवशी बाजारात खरेदीची घाई केलेल्या अधीर गुंतवणूकदारांना तात्पुरता तोटा सहन करावा लागतोय असे दिसते. कॅम्सचा शेअर मात्र टिकून आहे.

नीट अभ्यास केल्याशिवाय आपला पैसा गुंतवू नये असा संत श्री रामदास ह्यांच्या वचनाचा भावार्थ आहे. या अनुषंगाने, थोडा धीर धरल्यास व बाजाराची हवा ओसरल्यावर गुंतवणूक केल्यावर कसा नफा मिळवता येतो याचे एक उदाहरण देतो. कॅम्ससारखाच सीडीएसएलचा शेअर जून २०१७ मध्ये भांडवल बाजारात दाखल झाला. १४५ ते १४९ रुपयांचा पट्टा निर्धारित केलेला हा शेअर २५० रुपयांना सूचीबद्ध झाला व महिन्याभरातच, जुलैच्या १४ तारखेला ४८६ रुपयांचा उच्चांक नोंदवून शांत झाला. पुढची दोन वर्षे त्याने विसावा घेतला. नऊ ऑगस्ट १९ या दिवशी त्याने १८० रुपयांचा निचांक नोंदवला. नंतर मार्चमध्ये बाजार पडल्यावर २७ मार्चला त्याच किमतीला स्पर्श करून सीडीएसएलने आपली घोडदौड सुरू केली, गुरुवारचा बंद ४८४ रुपये आहे. पळत्याच्या पाठी न लागता योग्य वेळ बघून, संधी साधता आली तर तिचे सोने कसे करता येते याचे हे उदाहरण. पण त्यासाठी हवा स्वतःच्या निवडीवर दृढ विश्वास व संयम!

शेअरबाजार जरी मागील आठवड्यात तेजीवर स्वार झाला असला तरी ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात आशानिराशेचा खेळ करीत दोन्ही निर्देशांक १ टक्का खाली आले. दोन ऑक्टोबरला अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष ट्रम्प यांना कोरोना संसर्ग झाल्याची बातमी आली. आपल्या बाजाराला सुटी असल्यामुळे तो कोसळला नाही. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या मतनोंदणीला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या राज्यात टप्प्याटप्प्याने मतदान होईल. मतमोजणी ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदारांना पोस्टाने मत नोंदवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. दरम्यान तेथील संकेताप्रमाणे उभे असलेले दोन्ही अध्यक्ष (तिनदा) व उपाध्यक्ष (एकदा) असे किमान चार वेळा वादविवाद/चर्चा करतील. यात देशासमोरील आव्हानांचा सामना आम्ही कसा करू याचा ऊहापोह करणे अपेक्षित असते. पण त्याऐवजी एकमेकांना घालून पाडून बोलणे, शक्य तेव्हढी निंदानालस्ती करणे, आत्मश्लाघा याची चढाओढ चालत असलेली दिसते. दिवसेंदिवस या चर्चांची पातळी खालावत चालल्याचे दिसत आहे. स्पेन, ब्रिटन, नेदरलॅंड, इस्राईल आणि इराणमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दुपटीहून वाढली आहे व त्याबरोबरच पुन्हा दुसऱ्या संसर्गाची भीतीही! या भीतीच्या छायेतच युरोपियन बाजार आपापल्या कुवतीप्रमाणे वरखाली होत असतात.

ओरॅकल व टीकटॉक बहुचर्चित एकत्रीकरणाचे भिजत घोंगडे तसेच आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टने मात्र व्हिडिओ गेमिंग कंपनी झेनिमॅक्स, ७५०० कोटी डॉलरला विकत घेतली. या निमित्ताने नझारा टेक, ड्रीम ११ इत्यादी भारतात लोकाश्रय असलेल्या कंपन्या भांडवलबाजारात येऊ घातल्या आहेत. याची दखल घेऊन, त्यांचे बाजारमूल्य काय असेल याची कल्पना आपण करू शकतो. हे नवे क्षेत्र अत्यंत आकर्षक आहे. पब्जी सारख्या घातक खेळापेक्षा, ड्रीम ११ पालकांसाठी अधिक स्वीकारार्ह आहे.

 पाहता पाहता सप्टेंबर महिना संपला आणि आपण वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत आलो. कोरोनाने अप्रिय केलेले हे वर्ष संपत आले. अनलॉक ५.० ची मार्गदर्शक तत्त्वे सरकारकडून जाहीर झाली आहेत, साहजिकच हळूहळू का होईना अर्थव्यवस्थेने उभारी धरायचा प्रयत्न सुरू केला आहे. शेअरबाजारात आपल्या सर्वांच्या मानसिकतेचे प्रतिबिंब असते असे म्हणतात ते कसे खरे आहे हे शेअरबाजार दाखवीत आहे. त्यामुळे कधी तेजी तर कधी मंदी असा लपंडाव चालू आहे. नुकतेच सप्टेंबरच्या वाहन विक्रीचे आकडे जाहीर झाले. (वरील चौकट बघावी) त्यात मारुती उद्योगाने ३३ टक्के तर टाटा मोटरने १६१ टक्के वाढ दाखवली आहे. एस्कॉर्टची विक्री जरी कमी झालेली दिसत असली तरी पुढील तिमाहीचे मार्गदर्शन अधिक आशावादी आहे. खरीप पीक छान झाले आहे, बळीराजा सुखावला आहे. भरपूर पाणी पुरवठा असल्यामुळे रब्बीचे पीकही उत्तम येण्याचा अंदाज आहे. त्यात जीएसटी संकलन लक्षणीयरीत्या वाढल्याची आकडेवारी सरकारने जाहीर केली. सलग दुसऱ्या महिन्यात कारखानदारी उत्पादन सुधारले आहे. सप्टेंबरच्या निर्यातीत गेल्या आठ वर्षातील सर्वोच्च वाढ नोंदवली गेली आहे. पण दुसरीकडे कोरोनाचा कहर आटोक्यात येत नसल्याचे दिसते पण त्यामुळे सामान्य गुंतवणूकदाराची कितीही इच्छा असली तरी बाजार गडगडत नाहीये. प्रत्येकच खालच्या स्तराला नवी गुंतवणूक येत आहे. सद्यःस्थितीत भीती थोडी बाजूला ठेऊन ठराविक क्षेत्रात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हेच इष्ट आहे. ही क्षेत्रे प्रत्येकवेळी सांगत असतो. माहिती तंत्रज्ञान, औषध उद्योग, खास रसायने, ग्राहकपयोगी वस्तूंचे निर्माते व शेती उद्योग यातील समभाग आकर्षक आहेत व त्यात अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी असे पुन्हा एकदा सुचवतो. गेल्या महिन्यात निफ्टी १ टक्के खाली आली पण आयटी क्षेत्राचा निर्देशांक ११ टक्के वर गेला. आज जरी किंमत वाढीव वाटत असली तरी भाव वर जाण्यास भरपूर जागा आहे. किमान वर्षभर तरी वरील सर्व क्षेत्रातील गुंतवणूक सांभाळायला हवी.

बाजार कधी गडगडतो याची वाट न पाहता चोखंदळपणे गुंतवणूक करणे व अपेक्षा नसताना बाजार कोसळलाच तर त्यात वाढ करणे, हे तंत्र प्रत्येक गुंतवणूकदाराला शिकायला हवे. गेल्याच सप्ताहात निर्देशांकाने ७ टक्के पडून दाखवले होते. अशा वेळी खरेदीची संधी साधणे जमायला हवे.  

क्र.    नाव    सप्टेंबर २०२०    सप्टेंबर २०१९    फरक    टक्केवाी
१    मारुती    १,४७,९१२    १,१०,४५४    ३७,४५८    ३३.९१
२    ह्युंडाई    ५०,३१३    ४०,७०५    ९,६०८    २३.६०
३    टाटा    २१,२००    ८,०९७    १३,१०३    १६१.८३
४    किया    १८,६७६    ७,७५४    १०,९२२    १४०.८६
५    महिंद्रा    १४,८५७    १४,३३३    ५२४    ३.६६
६    होंडा    १०,१९९    ९,३०१    ८९८    ९.६५
७    रेनॉल्ट    ८,८०५    ८,३४५    ४६०    ५.५१
८    टोयोटा    ८,११६    १०,२०३    -२,०८७    -२०.४५
९    फोर्ड    ५,७६५    ५,५५६    २०९    ३.७६
१०    एमजी    २,५३७    २,६०८    -७१    -२.७२
११    फोक्सवॅगन    २,०५०    २,५५०    -५००    -१९.६१
१२    स्कोडा    १,३१२    १,२३३    ७९    ६.४१
१३    निसान    ७८०    १,४३३    -६५३    -४५.५७
१४    जीप    ५५४    ६०३    -४९    -८.१३
    एकूण    २,९३,०७६    २,२३,१७५    ६९,९०१    ३१.३२

संबंधित बातम्या