...स्पर्शीले नभमंडला  

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

अर्थविशेष

आता तरी खाली येईल या अपेक्षेने बाजाराकडे डोळे लाऊन बसलेल्या तमाम मंदीवाल्यांचे डोळे पांढरे झाले अन् तेजीवाल्यांच्या आकांक्षा वाढू लागल्या. ऑक्टोबरच्या ९ तारखेला संपलेल्या सप्ताहात बाजार पुन:श्च ४०,००० चा टप्पा पार करून ४०,५०९ वर स्थिरावला. निफ्टीचा बंदही ११,९१४ आहे. आता स्वर्ग दोनच बोटे उरलाय. (जुन्या उच्चांकापेक्षा निर्देशांक दोनच टक्के खाली आहेत.) आता पुढे काय? वेळोवेळी शेअरबाजार नफा वसुलीची संधी देतो, तिचा लाभ घेऊन थोडा नफा पदरात पाडून घेणे सुज्ञपणाचे ठरेल. नफावसुलीने दिवाळखोरी येत नाही हे नक्की. No one has become bankrupt by booking profits अशी एक उक्ती आहे.

मागील दोन्ही लेखांत गुंतवणुकीसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्स निवडा असे सुचवले होते. बोलता बोलता गेल्या आठवड्यातच  हे क्षेत्र १० टक्के वाढले (त्यात एप्रिल पासून आयटी इंडेक्स ८० टक्के वाढलेला), मग त्याला हात कसा लावायचा असा सवाल सामान्य गुंतवणूकदाराला पडणे साहजिकच आहे. थोडा संयम ठेवल्यास पुढील दोन चार सप्ताहात संधी नक्की मिळेल अशी आशा आहे. मात्र निफ्टी व आयटी निर्देशांक दोघेही खाली आले तर त्यात गुंतवणूक करायलाच हवी. त्यावेळी मागे हटणे म्हणजे संधी गमावणे. कलाकार नेहमीचेच यशस्वी; इन्फोसिस, एचसीएलटेक, पर्सिस्टंट सिस्टिम्स, टेक महिंद्र, माईंड ट्री, एलएनटी इन्फो, एमफसीस, टीसीएस वगैरे (टीसीएसला थोडा विसावा घेऊ द्यावा आणि नंतर हात लावावा). डॉलर कमजोर झाला तर तंत्रज्ञान क्षेत्राला फटका बसू शकतो अशी समजूत आहे. पण लॉकडाउनचा सर्वाधिक फायदा या क्षेत्राला झाला आहे. कार्यालयांच्या देखभालीचा व कार्यालये चालू ठेवण्याचा खर्च कमी झालाय. टीसीएसने तर २५-२५ धोरण जाहीरच केले आहे. वर्ष २०२५ पर्यंत कंपनीचे २५ टक्के कर्मचारीच ऑफिसमधून काम करतील अशी योजना आहे. जागेचे भाडे तर वाचेलच पण उत्पादकताही वाढेल, असे टीसीएसला वाटते. तसेच परदेशातील कामकाज भारतातूनच होऊ शकेल. कोरोना साथीचा सर्वाधिक फायदा या क्षेत्राला झाला आहे. त्यात एच-१ बी व्हिसा, त्याची फी वाढणे या सर्व जाचातून किमान एक वर्ष (कदाचित अधिकही) सुटका आहे. या क्षेत्रात पगारवाढ फारशी झाली नाही. मात्र एआय (Artificial Intelligence), मशिन लर्निंग इत्यादी डिजिटल सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या संधी वाढल्या आहेत. दरवर्षी ३ ते ५ टक्के विक्री वृद्धी दाखवली तरी समाधान देणारे हे क्षेत्र यापुढे १० ते १४ टक्के विक्री व नफावृद्धी दाखवेल असा अंदाज आहे. त्यात कुठलेही कर्ज व व्याजाचा भार नसल्यामुळे आलेल्या रोखीचे चलन भागधारकांच्या खिशातच जाऊ शकते, बाय बॅक ऑफर्स सतत येतील असे वाटते.

मनात वसे भयगंड 
परी अभिलाषा प्रचंड
हिमतीविना उदंड 
भोगिशी कैचे 

शेअरबाजाराची भीती वाटते, पैसेही मिळवावेसे वाटतात, पण भीतीची भावना दूर केल्याशिवाय ते कसे मिळतील? असा काहीसा या वचनाचा अर्थ आहे. ज्यांच्या मनातले भय संपत नाही त्यांनी म्युचुअल फंडाची किंवा फिक्स्ड डिपॉझीटसची कास धरलेली बरी!

मागील लेखात एस्कॉर्टस कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीचा उल्लेख केला होता. ऑगस्ट २० मध्ये मागील वर्षांच्या तुलनेत ८० टक्के वाढ झाली होती. सप्टेंबरमध्ये त्यात भर पडली असली तरी २०१९च्या तुलनेत वाढ २ टक्केच असल्यामुळे भाव पडला. शेअरबाजाराला कुठलाही अपेक्षाभंग चालत नाही हेच त्यातून अधोरेखित होते. खरिपाचे पीक छान झाले आहे व ग्रामीण भागात ‘अच्छे दिन’ येण्याच्या मार्गावर असताना ट्रॅक्टर विक्रीत भरघोस वाढ का नाही? असा बाजाराला पडलेला पेच! त्याची अनेक कारणेही असू शकतात, विक्रीच्या अपेक्षेने आधीच करून ठेवलेला साठा, कर्ज उपलब्धता व त्यात लागणारा वेळ वगैरे वगैरे. पण भाव खाली आहेत तोपर्यंत हा शेअर संग्रहित केला पाहिजे. त्यासाठी ११५० ते १२०० रुपये ही किंमत योग्य वाटते. तीन महिन्यात १३५० रुपयांच्या वर भाव मिळू शकतो. अर्थात, खरेदीच्या १०० रूपये १२० रुपये खाली स्टॉप लॉस ठेवायला हवा. रुपये १३५०च्या वर शेअर जायला लागला तर स्टॉप लॉस वर वर सरकवत जावा. 

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीत तीन नवे सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. आयआयएम अहमदाबाद येथील प्राध्यापक डॉ. जयंत वर्मांसारखे अभ्यासू व्यक्तिमत्त्व त्यातील एक. सेबी, रघुराजन समितीत त्यांनी काम केले आहे. त्याबरोबरच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार आशिमा गोयल ते पद सोडून, शशांक भिडे यांच्याबरोबर समितीत दाखल झाल्या. तीन दिवस खल केल्यानंतर कर्ज दरात काहीही बदल न करण्याचे समितीने ठरवले आहे. हे अपेक्षितच होते. पण रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेला आशावाद बाजाराला उसळी मारण्यास प्रवृत्त करून गेला. वाढीव महागाई दराचा बागुलबुवा उभा न करता तो यथावकाश खाली येईल अशी अपेक्षा, मंदीचे वारे बदलते आहे व अर्थव्यवस्था फेरउभारणीच्या तयारीत आहे, हे निरीक्षण निश्चितच प्रेरणादायक आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर ४ टक्क्यांवर स्थिर राखत पतधोरणात लवचिकता कायम ठेवली आहे. गृह कर्जांचे जोखीम भार गुणोत्तर कमी केले आहे. (गृहकर्जाचे व्याजदर कमी झाल्यास घरबांधणी क्षेत्राची घरघर कमी होऊ शकेल.) अनार्जित कर्जाखाली दबलेल्या बँकांसाठी रोख्यांच्या एचटीएम (Hold Till Maturity) प्रमाणात वाढ व पुरेशी रोकडसुलभता दिलासादायक ठरेल. शेअरबाजार आता बँकिंग क्षेत्राकडे दयाळूपणे बघेल अशी आशा आहे.

मागील सप्ताह वेदांत समूहाच्या डिलिस्टिंगच्या बातमीने गाजला. रुपये ८७.५० या किमतीत गुंतवणूकदारांचे शेअर्स विकत घेण्याच्या ऑफरला गुंतवणूकदारांनी धुडकावून लावले. शेअरची पुस्तकी किंमत १४८ रुपये असताना रुपये ८७.५० रुपयांना भागधारक प्रतिसाद देणार नाहीत हे अपेक्षितच होते. अशावेळी रिव्हर्स बुक बिल्डींग पद्धतीने डिलिस्टिंगची आधारभूत किंमत किती असावी हे निर्धारित केले जाते. बहुसंख्य गुंतवणूकदारांनी (म्युचुअल फंडांसह) १६० ते २०० रुपये मिळाल्यास आम्ही विक्री करण्यास तयार आहोत असे दर्शविले. आयुर्विमा महामंडळाने मात्र ३२० रुपयांच्या खाली देणार नाही अशी भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. ताज्या बातमीनुसार डिलिस्टिंग फसल्याचे कंपनीने अधिकृतपणे घोषीत केले आहे. इच्छित शेअर्ससाठी कुठल्याही किमतीला बिडिंग झाले तरी ते मान्य न करता प्रवर्तकातर्फे सुधारित ऑफर देता येते. मात्र आता ३२० रुपयांखाली ते होणार नाही असे दिसते. तसेच हिंदुस्थान झिंककडून मिळालेला १२ रुपये लाभांशही भागधारकांना द्यावा लागेल. आजच्या भावात (रु. १२०) हे उत्पन्न १० टक्के आहे. दहा टक्के डिव्हिडंड यिल्ड व ३२० रुपयांना पुढील आयुष्यात कधीतरी विक्री करण्याची संधी, आकर्षक वाटते. पण एकच मेख आहे! भविष्यात डिलिस्टिंगची कल्पनाच कंपनी बासनात गुंडाळून ठेऊ शकते. ती जोखीम मनात ठेऊनच गुंतवणूक करणे इष्ट! 

जपान व तेथील तंत्रज्ञान नेहमीच साऱ्या विश्वात आदराचे स्थान राखून असते. या आदराला तडा जाण्याचा प्रसंग २ ऑक्टोबरला घडला. जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेले टोकियो स्टॉक एक्स्चेंज चक्क बंद पडले. वारंवार होणारे भूकंप, ज्वालामुखीचे विस्फोट अशा नैसर्गिक आपत्तीतही स्टॉक एक्स्चेंज एक मिनिटही बंद नव्हते. टोकियोत स्टॉक एक्सचेंजमध्ये फुजीत्सूची अॅरोहेड ट्रेडिंग सिस्टीम वापरतात. त्यातील विदा साठवणूक व सुरक्षा (data storage and security system) यंत्रणाच बंद पडली. अत्यंत मजबूत व सर्वाधिक जलद असलेली ही पद्धत अपयशी ठरेल ही कल्पना स्वप्नातही नसलेले जपानी अर्थतज्ज्ञ त्यामुळे हादरून गेले. तरीही तिथल्या शिष्टाचाराला अनुसरून त्यांनी फुजीत्सू कंपनीला कुठलाही दोष दिला नाही. गुंतवणूकदारांची पुन्हापुन्हा क्षमा मागत त्यांनी सर्व दोष स्वत:वर घेतला. रोज एक हजार लाखांहून अधिक व्यवहार होणारे हे अग्रगण्य एक्स्चेंज आहे. आठ तासांत सर्व यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाली व कामकाज सुरू झाले. आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब म्हणजे, आपल्या NSEवर रोज याच्या तिप्पट (३००० लाखांहून) अधिक व्यवहार होतात (आणि त्यात १० पट वाढ झाली तरी ती मागणी पूर्ण करण्यास आपला बाजार सक्षम आहे) अन तरीही एक पूर्ण दिवस बाजार बंद पडला असे कधी घडलेले नाही. मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांत उद्‌ध्वस्त झालेला मुंबईचा शेअरबाजार एका दिवसात सेवेला हजर झाला होता याचीही इथे नोंद घ्यायला हवी.  

अमेरिकेतील निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. आतातरी बायडेन शर्यतीत पुढे आहेत असा आभास आहे. निवडून आल्यास, व्यक्ती (४,००,०००$ पुढील उत्पन्न गट) व कॉर्पोरेट कर वाढतील. ट्रम्प यांनी कर ३५ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर आणला होता. बायडेन निवडून आल्यास तो पुनश्च वाढून २८ टक्के होईल. तीन नोव्हेंबरला मतपेटीतून काय बाहेर पडते यावर मात्र जगाचे लक्ष असेल हे नक्की.  

संबंधित बातम्या