संयम महत्त्वाचा 

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 14 डिसेंबर 2020

अर्थविशेष

शेअरबाजार खरेदी आणि विक्री दोन्ही बाजूला अतिरेक करतो म्हणतात ते काही खोटे नाही. बोलता बोलता १३२०० च्या पातळीवर निफ्टी अन ४५५०० वर मुंबई सेन्सेक्स पोहोचला. सिरम व भारत बायोटेक तसेच फायझर सारख्या लसनिर्मात्या कंपन्यांनी लसीच्या वापरासाठी परवानगी मागितल्याच्या वृत्ताने बाजारात तेजीचे नवे उधाण आले. थोडा फार नफाही खिशात टाकून झाला, आता पुढे काय? 

ह्या सदरात वारंवार सांगितल्या प्रमाणे माहिती तंत्रज्ञान, औषधउद्योग, ग्राहकोपयोगी वस्तूंचे निर्माते आणि शेवटी शेवटी खासगी बँक्स यात आपली गुंतवणूक असेल तर कच्च्या बच्च्यांसमोर थोडीशी फुशारकी मारायला हरकत नाही. ह्या पातळीवर नव्याने गुंतवणूक करणे धाडसी ठरू शकते. अशावेळी संयम ठेऊन काहीच न करणेही मालमत्ता वाढवून जाते. ‘बाय आणि होल्ड’ रणनीतीतील खरेदी करून झाली आहे आता बाजार अधिक वर जात असेल तर समाधानाने कडेला थांबणे श्रेयस्कर.

या टप्प्यात, चांगली गुणवत्ता असलेले पण शेअरबाजाराने दुर्लक्षिलेले समभाग बघावे. आयटीसी, स्टेट बँक सारखे शेअर येथून पुढे चाल देऊ शकतात. आयटीसीचे संजय पुरी आपल्या भागधारकाला अधिक परतावा कसा देता येईल याचा सतत विचार करीत असतात. हिंद लिव्हरहून आकर्षक किंमत /उपार्जन प्रमाण (P/E रेशो) असूनही बाजार आयटीसीला भाव देत नाही ह्याचे मुख्य कारण आहे सिगारेटचा व्यवसाय. करोना संसर्गाच्या काळात व लॉकडाऊन मधे सिगारेट विक्री थंडावली होती, तसेच हा व्हायरस धुमाकूळ घालत असताना, आरोग्यतज्ज्ञ धूम्रपान करू नका असा सल्लाही  देत. आता अनलॉक ट्रेंड सुरू आहे, सिगारेट विक्री पूर्वपदावर येत आहे. आयटीसीने २०१५ मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून सॅव्हलॉन ब्रॅण्ड,  विकत घेतला होता. करोना काळात या नावाखाली कंपनीने बरीच उत्पादने आणली. सॅव्हलॉन मधून किमान १००० कोटी रुपयांच्या  विक्रीचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सिगारेट व अन्य व्यवसाय वेगळे केले जातील अशी अफवा आहे. तसे जरी झाले नाही तरी कंपनी दरवर्षी घसघशीत लाभांश देत असते. अधूनमधून बोनसही जाहीर होत असतोच. भागधारकाप्रती इतकी संवेदनशील असणारी कंपनी आपल्या भांडारात हवीच.

तीच कहाणी स्टेट बँक या शेअरची. नोव्हेंबर महिन्यात या समभागाने कात टाकली. चांगला गृहकर्ज व्यवसाय, देशातील एक नंबरच्या म्युच्युअल फंड व विमा व्यवसायाची मालकी आणि अनार्जित कर्जे आवाक्यात येत असणारा बँकिंग व्यवसाय. चालू वर्षात किमान १५००० ते २०००० कोटी नफा होण्याचा अंदाज!  

आणखी काय हवे? तेही आहेच! बँकेने  ‘योनो’ या ब्रॅण्ड खाली डिजिटल व्यवसायाला सुरुवात केली आहे. दुर्लक्षित करण्यासारखा हा समभाग नाहीच. यापूर्वीही १७० ते १९० या टप्प्यात शिफारस केलेली ही गुंतवणूक दीर्घ पल्ल्यात निराशा करणार नाही. योग्य तो सल्ला घेऊन व अभ्यास करून इथे हात घालावा. 

नुकतीच व्होडाफोन आयडियाने पोस्ट पेड शुल्कात वाढ केली. त्यापासून स्फूर्ती घेऊन भारती तसे करण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओही आता व्होडाफोनच्या दिवाळखोरीची वाट न पाहता शुल्क वाढवेल असे दिसते. ह्या बातमीने भारती एयरटेल वाढला. तोही पुढे ५५० पर्यंत जाऊ शकतो 

गेल्या वीस वर्षात आपल्या शेअरबाजारात अनेक सुधारणा झाल्या आहेत. शेअरच्या मालकीचा दाखला असलेले प्रमाणपत्र (Share certificate) डिमॅट करण्यापासून सुरुवात झाली. नंतर ‘बदला’ बंद झाला, दोन दिवसात व्यवहार पूर्ण करण्याचे बंधन आले. आणि पुढे सुधारणा होतच गेल्या. आज भारतीय शेअर बाजार जगात सर्वात सुरक्षित आहे, याचे श्रेय नि:संशयपणे सेबीला जाते. आज आपल्या खात्यातून एक पैसाही बाहेर न जाता नवीन शेअर विक्रीला अर्ज करता येतो. कंपनी, शेअर दलाल आणि गुंतवणूकदार सर्वांच्याच सुरक्षिततेसाठी सेबी सतत नवे नवे उपाय योजत असते. 

कार्व्ही शेअर ब्रोकिंगने परस्पर ग्राहकाच्या खात्यातील शेअर्स प्लेज करून स्वत:साठी पैसे उभे केले. ती केस चालूच आहे. काय ते खरे खोटे कळेलच . पण या घटनेने सावध होऊन, तशी घटना  यापुढे कधीही कशी होणार नाही याकडे सेबी डोळ्यात तेल घालून बघत आहे. त्यातूनच मार्जिनचा नियम कडकपणे अंमलात आणायचे सेबीने ठरविले. गुंतवणूकदाराने स्वत:चे शेअर स्वत:च प्लेज करावे, त्याखेरीज त्याला कुठलीही खरेदी करता येणार नाही, असा नियम झाला व तो कुरकुरत का होईना ट्रेडर्स पाळू लागले.  आता पीक मार्जिन रिपोर्टिंग (Peak margin reporting) लागू झाले आहे. त्यात ते कुठेही कमी पडल्यास दंड भरावा लागणार. हे मार्जिन वाढत वाढत सप्टेंबर २१ पर्यंत ७५ टक्के होणार आहे. ट्रेडिंग अधिक सुरक्षित व्हावे असा अत्यंत उदात्त हेतू यामागे आहे. पण त्याचा एक परिणाम म्हणून डेट्रेडिंग कमी होऊ शकते. दिवसभरात कितीही तेजीमंदी केली तरी दिवस अखेर पोझिशन शून्य असेल तर मार्जिनचा अहवाल देताना, ब्रोकर्स; मार्जिन कमी पडत नाही असे म्हणू शकतात. व या पळवाटीचा फायदा घेऊन, ट्रेडर्सच्या दिवसभराच्या व्यवहारासाठी भांडवलाच्या अनेक पट लिमिट देऊ शकतात.. हा प्रकार टाळण्यासाठी पीक मार्जिन रिपोर्टिंग बंधनकारक केले आहे. 

गुंतवणूकदाराला हे रोज नव्याने  येणारे परिपत्रक जाचक वाटले तरी सध्या तो एव्हढेच म्हणू शकतो : 
मज रोज रोज येती, खलिते नवे नवे 
निघतात बादशाही, फतवे नवे नवे
समजावले कुणी जर,मी आपसूक घेई 
रोगाहुनी जालीम बटवे नवे नवे 

ट्रेडिंग वाईट असेलही, पण कुणीतरी ते केल्याशिवाय गुंतवणूकदाराला शेअर खरेदी विक्रीसाठी तरलता (liquidity) कशी  मिळणार? रोजचे व्यवहार दखल घेण्याइतके कमी झाल्यास, त्यावर कदाचित सवलतही  मिळेल. सध्यातरी गुंतवणूकदार व ट्रेडर्स ह्यांच्या मनाची तयारी करणे एव्हढेच आपल्या हाती आहे. असो. 

दरम्यान रिझर्व्ह बँकेने, एचडीएफसी बँकेला चांगलेच फटकारले आहे. या पुढे, रिझर्व्ह बँकेने हिरवा कंदील दाखविल्याशिवाय बँकेला नवी क्रेडीट कार्ड्स विकता येणार नाहीत. तसेच डिजिटल स्वरूपात कुठलीही नवी सेवा देता किंवा वाढवता येणार नाही. नोव्हेंबरच्या २१ तारखेला बँकेची नेट बँकिंग सेवा कोलमडली. असंख्य ग्राहक मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग पूर्ण कार्यक्षमतेने वापरू शकले नव्हते. ग्राहकांच्या कुरकुरीचे रूपांतर आक्रोशात व्हायच्या आधीच एचडीएफसी बँकेने ही त्रुटी दूर केली. मात्र रिझर्व्ह बँकेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी कुठली पावले उचलणार ह्याचे स्पष्टीकरण दिल्याखेरीज पुढील  परवानगी मिळणे कठीण दिसते. (Corrective action  and Preventive action, CAPA)  शेअरबाजारात या बातमीमुळे या समभागाची थोडी पडझड होऊ शकते, मात्र एसबीआय कार्डसाठी ही एक संधी असेल. याच सदरात ७५० रुपयांना सुचवलेला हा शेअर ८५० च्या आसपास घुटमळत आहे. तो पुढेही जाऊ शकतो.

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण ४ डिसेंबर रोजी जाहीर झाले. समितीने एकमुखाने रेपो व व्याजदर स्थिर ठेवले. महागाई निर्देशांकात वाढ होऊन देखील व्याजदर वाढले नाहीत हे तेजीचे पाहिले कारण. दुसरे म्हणजे भरभरून येणारा परदेशी पैसा. आपला आशावादी सूर कायम  ठेवत समितीने राष्ट्रीय सकल उत्पन्नाचे आकुंचन कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवले. (contraction in GDP reduced) निफ्टी व बँकनिफ्टी तेजीतच राहील असे दिसते. चारपाचशे अंशाची मंदी झाल्यास तिथे नवीन  खरेदीला वाव मिळेल असे दिसते. 

बांधकाम क्षेत्राला बरे दिवस येतील असे दिसते. एकतर पुरवठा मर्यादित असल्यामुळे मागणी वाढल्याची जाणीव होतेय. आपले नॉन कोअर उद्योग विकून कर्जफेड करावी हा राजमार्ग या क्षेत्राने निवडला आहे. गोदरेज, सोभा, डीएलएफ ह्या शेअर्सचा नक्कीच विचार करता येईल. किंवा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून या क्षेत्रात गुंतवणूक करता येईल. एचडीएफसी  किंवा कॅन फिन होम, त्यात उत्तम. 

ऑस्ट्रेलियातील पहिली वन डे चालू असताना काही प्रेक्षक, अदानी उद्योगाविरुद्ध घोषणा देत होते. अदानी २०१० पासून तेथील कारमायकल कोळसा खाण उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. स्थानिक नागरिक व पर्यावरणवाद्यांचा त्यास विरोध आहे. ह्या विरोधामुळे जगातील मुख्य बँकांनी (चायनीज बँकांसह) भांडवल पुरवण्यास नकार दिला आहे. अंदाजे ७५०० कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव आहे. स्टेट बँकेने हे प्रकरण विचारार्थ घेतले आहे. अदानी समूहाचा दिवाळखोरीचा कुठलाही इतिहास नसला तरी स्टेट बँकेने हे कर्ज देऊ नये, असे स्थानिकांना वाटते. एका बाजूला जर्मनी सारख्या देशाने कोळशावर आधारित विद्युत निर्मिती टप्प्याटप्प्याने बंद करायचे ठरवले आहे तर दुसऱ्या बाजूला आपण ती कास सोडू शकत नसल्याचे चित्र दिसते. स्टेट बँकेने नकार दिला तर हा प्रकल्प बासनात जाईल. अदानी समूहाच्या सर्व समभागांची शेअरबाजारात घोडदौड चालू असताना ही बातमी येतेय हे लक्षणीय आहे. 

बाजार तापलेला असला व अवास्तव तेजीकडे झुकलेला असला तरी परदेशी भांडवलाचा ओघ चालूच आहे. थोडा संयम, थोडी नफावसुली, थोडी दुर्लक्षित समभागांमध्ये गुंतवणूक करीत किमान १० टक्के तरी रोखीत यावे असे वाटते. तेजीत स्टॉपलॉस व मंदीत सबुरी नेहमीच कामास येते. 

संबंधित बातम्या