ऐकावे जनाचे ... करावे मनाचे 

भूषण महाजन 
सोमवार, 28 डिसेंबर 2020

अर्थवेध

नवे नवे उच्चांक करता करता ध्यानीमनी नसतांना बाजाराने एक कोलांटउडी मारली. सोमवारी २१ तारखेला अचानक मुंबई सेन्सेक्स १४०० व निफ्टी ४३२ अंश घसरले. मिंक ह्या प्राण्यापासून काही नागरिकांना नव्या स्वरूपातल्या कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे डेन्मार्कने  जाहीर केले. (मिंक हा अंगावर तांबूस केस असलेला मुंगुसाच्या जातीचा प्राणी). अज्ञात प्रजातीतील प्रारंभिक स्पिलओव्हर इव्हेंट वगळता मनुष्याला कोरोना व्हायरसची बाधा करू शकतो असा मिंक हा एकमेव प्राणी आहे. मांजरी आणि कुत्री यासारख्या इतर प्राण्यांना मानवाच्या संसर्गामुळे लागण झाल्याची काही उदाहरणे आहेत, परंतु त्या पाळीव प्राण्यांच्या संसर्गामुळे माणसांमध्ये कोरोना संक्रमित झाल्याची माहिती नाही. मात्र या घडामोडींमुळे इंग्लंड मधे पुन्हा लॉकडाउन जारी झाल्याची बातमी आली, त्याबरोबर युरोप मधील बऱ्याच देशांनी नवे निर्बंध जाहीर केले आणि बाजार गडगडले. 

खरं तर, थोडी मंदी आली तर खरेदी करू असा संकल्प सोडलेले गुंतवणूकदार (नेहमीप्रमाणे) पुढे आलेच नाहीत. मंदी कधी सांगून येत नाही, ती अचानक येणार असे गृहीत धरून तयार राहावे लागते. त्यासाठीच किमान १० टक्के तरी नफा खिशात टाकण्याची शिफारस मागील काही सदरात केली होती. असो. आजही या खाली आलेल्या भावात माहिती तंत्रज्ञान व औषध उद्योगाचे शेअर्स जरूर संग्रहित करावे. इन्फोसिस, कोफोर्ज, एचसीएलटेक व टीसीएस, सुवेन, डिव्ही, अलेम्बिक, डॉ रेड्डीज आदी. नावे तीच आहेत. फक्त साहस हवे. भाव येईपर्यंत वाट पाहण्याचा संयम आपल्याकडे हवा. कदाचित आजची ही पडझड निफ्टीच्या १३१५०/१२८०० या पातळीच्या खाली जाणार नाही, त्यावरच थांबेल असा अंदाज आहे. तसे गृहीत धरून पुढचा विचार केला पाहिजे. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत शेअरबाजार कदाचित सावरलाही असेल. तसे झाल्यास पुन्हा नव्या जोमाने बाजारात उतरावे. एक साधे पथ्य यापुढे नक्की पाळावे. कुठलीही नवी खरेदी करतांना आपण कुठला शेअर विकू शकतो याचाही अंदाज घ्यावा. व त्या विक्रीतून खरेदी करावी. तसे न झाल्यास (म्हणजे या आठवड्यात बाजार न सावरल्यास) बाजाराच्या पुढील  उसळीत काय विकायचे आणि कुठल्या भावाला, याचा गृहपाठ करून ठेवावा. बजेटच्या आधी एक उसळी/ एक तेजी, येऊ शकते हे लक्षात घ्यावे. 

मात्र एक सावधगिरीचा इशारा. युरोप मधील बातम्यांकडे लक्ष असू द्यावे. मिंकमध्ये परिवर्तित झालेल्या आणि मानवांमध्ये पसरलेल्या विषाणूची आवृत्ती अधिक संक्रमित किंवा मानवांमध्ये अधिक गंभीर आजार निर्माण करू शकत नाही असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, जे शेअर्स आपण दीर्घकाळ सांभाळू शकतो ते सोडून अल्प मुदतीसाठी केलेल्या  

गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची तयारी असू द्यावी. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे वाऱ्याबरोबर वर जाणारा पालापाचोळा गोळा करण्यापेक्षा दर्जेदार शेअर्सनी आपले भांडार भरण्याची ही चांगली संधी आहे. तसेच फ्युचर मार्केट पासून दूर राहिलेले बरे!

जेव्हा जेव्हा शेअरबाजारात वारेमाप तेजी येते तेव्हा तेव्हा स्वयंघोषित तज्ज्ञ कुठला शेअर घ्यावा असे सुचवू लागतात. प्रत्येकच गुंतवणूकदाराचा आत्मविश्वास वाढतो व बाजाराची भीती वाटेनाशी होते. टीव्ही वर, नेट वर, चर्चामंडळात अन्य माध्यमांमध्ये जेथे पहावे तेथे नवे नवे गुरूच भेटतात, अशा वेळी काय करावे हे रामदासस्वामी सांगून गेले आहेत.

उदंडाचे उदंड ऐकावे

परी ते प्रत्यये पहावे

खरे खोटे निवडावे 

अंतर्यामी 

प्रत्यय आल्याशिवाय विश्वास ठेऊ नये. भांडवल आपले आहे, जोखीम आपली आहे आणि त्यातून होणारा नफा/ तोटाही आपलाच आहे, प्रत्येकाची जोखीम पचवायची ताकद वेगळी असते व त्याच्या मानसिक खंबीरपणावर आधारित असते. तेव्हा ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हा मंत्र उत्तम. 

सर्व लोह व अलोह धातूंच्या किंमती वर जात आहेत. गेल्या तीन महिन्यात स्टीलचे भाव व त्यानुसार स्टील तयार करणारे शेअर्सही वाढले. लोखंड तयार करतांना एका टनामागे १.८ ते २ किलो ग्रॅफाईट लागते. त्यामुळे आयर्न ओअर, लोह खनिजे आणि लोहनिर्मिती आदींची मागणी जशी वाढली तसा ग्रॅफाईट इलेक्ट्रोडचा खपही वाढला. गेली दोन वर्षे मंदीत असलेल्या ह्या उद्योगांना नवी उभारी आली. ग्रॅफाईट इंडिया व एच इ जी या दोन कंपन्या ग्रॅफाईट निर्मितीत अग्रेसर आहेत. त्यात ग्रॅफाईट इंडियाची उत्पादन क्षमता जास्त आहे (९८००० मे. टन) गेले वर्ष ग्रॅफाईट इंडियाला वाईट गेले होते. मात्र कंपनीचा ताळेबंद मजबूत आहे, २४०० कोटी रोख व गुंतवणुकीत आहेत. स्वत:चा विद्युतनिर्मितीचा प्रकल्प आहे. या खेरीज कंपनीने अमेरिकेतील ग्राफिन कॉर्पोरेशन मधे ४६ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. ग्राफिन हे मोठे विलक्षण आहे. लोखंडासारखी ताकद व वजनात हलकी, अत्यंत पातळ पापुद्र्यासारखी असलेल्या ह्या वस्तूचे गुणधर्म अफलातून आहेत. तिचा उपयोग सोलर सेल, वैद्यकीय, रासायनिक प्रक्रिया, अनेक प्रकारचे उद्योग आदी ठिकाणी होऊ शकतो. त्याखेरीज ग्राफिन हे उत्कृष्ट विद्युतवाहक आहे. भविष्यात प्रचंड वापर होण्याची क्षमता व शक्यता असलेले ग्राफिन, ग्रॅफाईट इंडियाचे भविष्य बदलेल असे वाटते.

दोन वर्षे थांबण्याची तयारी असली तर बांगूर उद्योग समूहाची ही कंपनी चांगला भाव देईल असा अंदाज आहे.

कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, केपटाऊन झालंच तर आपल्या मराठवाड्यातील अनेक गावे, किती नावे सांगावीत... या सर्व ठिकाणी दर वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष ठरलेलंच. तीन तीन वर्ष पाऊस नाही आणि मग एकदम जोरदार वादळवारा व पावसाची झोड! अधूनमधून वणवे ठरलेलेच. पर्यावरणवाद्यांनी कितीही पाणी जपून वापरायचा आग्रह धरला तरी भरपूर पाणी जिथे आहे तिथे सामंजस्य कमीच. यावर शिकागो मर्कंटाईल एक्स्चेंजने एक अभिनव उपाय योजलाय. जसे क्रूड ऑइल, गोल्ड, सोया तसेच वॉटर फ्युचर सुरु केले आहे. म्हणजे थोडक्यात आता स्टॉक एक्स्चेंज मधे पाणी विकत मिळणार. पाण्याच्या किंमती वाढतच जाणार आहेत हे गृहीत धरले पाहिजे कारण २०२५ सालापर्यंत जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवेल असा अंदाज आहे. थोडक्यात आज जवळपास ५०० डॉलर पर एकर फूट असलेला (म्हणजे  एक एकर जागेच्या एक फूट खोल खड्ड्यात जेवढे पाणी मावेल त्याची किंमत ५०० डॉलर) पाण्याचा भाव वाढत जाणार हे नक्की. हे पाण्याचे फ्युचर सहा महिन्यांचे व कॅश  सेटल्ड आहेत (त्याचे देणे-घेणे रोखीत होणार) कारण पाणी जागेवर पोहोचवण्याचा खर्च झेपणार नाही. हा सगळा विषय चर्चेला येण्याचे कारण म्हणजे पाणी केंद्रस्थानी ठेऊन मोठी व्यापारपेठ उभी राहतेय , जल संवर्धन, जलनि:सारण, समुद्राच्या पाण्याचा वापर, त्याचे पृथ:करण, डीसॅलीनेशन, जलपर्याय शोधन आणि जलविहीन निर्यात (आज आपण गहू, तांदूळ धान्य निर्यात करतो; त्यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते). लवकरच एखादा म्युच्युअल फंड या नावाने नवी गुंतवणूक योजना काढू शकतो. थोडक्यात काय, पाणी हे उद्याचे कच्चे तेल आहे. जलसाठवण व संवर्धन हे भविष्यातील मोठे उद्योग असतील. (अगदीच काही जमले नाही तर स्वत:च्या मालकीची एखादी विहीर तरी असावी असे गुंतवणूकदाराला वाटले नाही तरच नवल). 

अमेरिकेतील साउथ कॅरोलिना राज्याने एक क्रांतिकारक विधेयक प्रस्तावित केले आहे. त्यात सोने व चांदी यावरील विक्री व भांडवली कर रद्द करण्याची शिफारस आहे. किंबहुना अप्रत्यक्षपणे रोख चलनाऐवजी सोन्यामधे परस्पर संमतीने व्यवहार करणे प्रोत्साहित केले आहे. तेथील नागरिक राज्यातील कर सोन्याच्या रूपात भरू शकतील. अमेरिका हे फेडरल स्टेट असल्यामुळे प्रत्येक राज्य असे कायदे करू शकते. उटाह ह्या राज्याने हा नवा विचार मांडला, वायोमिंग, ओक्लाहोमा व कॅरोलिना अशी ही चार राज्ये ह्या विचारांची आहेत. हे लोण पुढे देशभर कसे पसरते व डॉलर किती कमकुवत होतो यावर सुवर्णबाजाराची चाल ठरेल.

(महत्त्वाचे या लेखातील सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअरबाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवले. तसेच मी व माझ्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे, हेही ध्यानात घ्यावे.

संबंधित बातम्या