घोडदौड थांबणार?...

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 18 जानेवारी 2021

अर्थवेध

तुम्ही सर्वांनी कॅडबरी ५-स्टारची जाहिरात पाहिलीच असेल. एक वृद्ध महिला रस्त्यावर बाकावर  बसली आहे, तिच्या हातातली नेमकी छडी खाली पडते. शेजारी कॅडबरी खाण्यात मग्न झालेला तरुण मुलगा आहे. ती त्याला कळवळून म्हणते, ‘बेटा मेरी वो छडी दोगे?’ तो काहीच  हालचाल करत नाही हे बघून तीच छडी घ्यायला उठते, तेव्हढ्यात ती जिथे बसली असते त्या जागी वरून मोठ्ठे फर्निचर पडते आणि  तिचा जीव वाचतो. साहजिकच तिच्या तोंडून शब्द येतात, ‘अच्छा हुवा बेटा, तुने कुछ नही किया!’

गेले तीन महिने शेअर विकायचे ठरवून काही न करता थांबलेले गुंतवणूकदार कदाचित स्वत:ला हेच सांगत असतील, ‘अच्छा हुवा बेटा, तुने कुछ नही किया!’

आता मात्र कृती करायची वेळ आलीच आहे. शेअरबाजार काही नवे उच्चांक करणे थांबवत नाही, परदेशी पैसा भारतात येणे थांबत नाही, कुठल्याही वाईट बातमीचा परिणाम न होता निर्देशांकाची  घोडदौड चालू आहे. आता रिझर्व्ह बँकेनेच हत्यार उपसले आहे. वित्तीय स्थिरता अहवालात सप्टेंबर पर्यंत बुडीत कर्जे दुप्पट होतील अशी साधार भीती व्यक्त केली आहे. आजही बँकांची कर्जमागणी सुदृढपणे वाढत नाही, हे या अहवालाने अधोरेखित केले आहे. दुसरे म्हणजे शेतकरी आंदोलन मागे घेण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. कोरोनाची भीती कमी होत असताना बर्ड फ्लूच्या साथीला देशाला तोंड द्यायची पाळी आली आहे. सारे काही आलबेल आहे असे म्हणताना देखील दोन आवंढे गिळावे लागतात. 

अर्थात जमेच्या बाजूला पुढील आठवड्यात सुरू होणारे लसीकरण आणि उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेचे यश आहे. जॉर्जियात डेमोक्रॅटिक पक्षाचा विजय आणि त्यातून बायडेन ह्यांची अंकुशविरहीत सत्ता आल्यामुळे जागतिक बाजारांना हायसे वाटले. पुढील स्टीम्युलसच्या आशेने अमेरिकी बाजार नव्याने उसळले. प्रचंड नोटा छपाईमुळे डॉलर कमकुवत झाल्याने भारतीय बाजारातील भांडवलाचा ओघही काही केल्या थांबत नाही. मागील तिमाहीत निफ्टी निर्देशांकातील शेअर्स ने नफ्यात १० टक्के वाढ नोंदवली.  

आपण मात्र मागे सुचविल्याप्रमाणे, शिस्तबद्धपणे, निफ्टीच्या प्रत्येक ५०० अंशाला किमान ५ ते १० टक्के नफा खिशात टाकायला हवा!!!  निफ्टी १४५०० अंशाच्या नजीक आली आहे आणि सेन्सेक्स ४९००० अंशांपुढे! थोडी पडझड होण्यास काहीही निमित्त पुरू शकते. अर्थात पुन्हा निफ्टी ७५०० होणे नाही, पण १४००० किंवा कदाचित त्याखालील १३६५० ही पातळी येऊ शकते. या प्रसंगी आपली गुंतवणूक कुठे आहे याचे भान ठेवले पाहिजे. 

गेली दोन महिने पालापाचोळा वर जात आहे. त्यात तर आपले पैसे गुंतले नाहीत ना? वानगीदाखल काही नावे देतो.. 

गेल्या दोन महिन्यात बारट्रोनिक्स १.७० रु. वरून ४.२५, रिलायन्स कॉम १.६५ वरून २.२२, रोल्टा ४.५० वरून ६.२५, सिंटेक्स ३.१५ वरून ५.१५, सुराणा टेली ३.८५ वरून ६.४९ झाले आहेत. किती नावे घ्यावीत? चुकून गुंतवणूक केली असेल आणि वरकरणी ५० ते २००% फायदा जरी दिसत असला तरी तो खिशात टाकणे श्रेयस्कर. निदान आपले मुद्दल तरी ताब्यात घ्यावे. स्वस्त आहेत म्हणून गुंतवणूकदार दहा दहा हजार शेअर्स विकत घेतात. हा मोह घातक आहे. किमान १०० शेअर्स चा अभ्यास केल्यानंतर अशा खालच्या भावात एखादा मल्टी बॅगर मिळतो. तेव्हा ‘ड’ दर्जाचे शेअर्स कितीही आकर्षक वाटले तरी दुरूनच चांगले. अगदी त्यांच्या वाटेलाच जायचे असेल तर वन डे सारखी चिकी सिंगल काढावी.

दर्जेदार गुणवत्ता व चांगले व्यवस्थापन असलेले शेअर्स खाली आले तरी निवेशनीय असतात. कचऱ्यात एखादे माणिक सापडतेही, पण ते कुणाच्या हातून पडले आहे आणि कुणाच्या हातात जाणार आहे हे बघावे लागते. उदा. सी जी पॉवर. गेल्या पाच महिन्यात हा समभाग चौपट झाला आहे. गौतम थापर ह्यांची ही कंपनी आर्थिक घोटाळ्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली,  नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलला केस गेल्यावर मुरगप्पा समूहाने कंपनीचे पुनर्गठन व पुनरुज्जीवन करायचे ठरवले. चेअरमन सुबैय्या वेल्लायन ह्या कामात वाकबगार समजले जातात. ट्यूब इन्व्हेस्टमेंट, चोलामंडलम आदि उद्योगांना दिमाखात वैभव  शिखरावर नेण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. आज सी जी पॉवरचे पुस्तकी मूल्य उणे २.३० आहे. सर्व गंगाजळी संपली आहे . गेली चार वर्षे कंपनी तोट्यात आहे व तो तोटा वाढतच आहे. मुरगप्पा समूहाने कंपनीत ७०० कोटी भांडवल ओतले. तसेच वारंट्स पोटी २५% रक्कम जमा केली व कंपनी बोर्डाचा ताबा घेतला. भागधारकांनी गौतम थापर आदि प्रभृतींची हकालपट्टी करून वेलायन यांना अध्यक्षपदी निवडले.  स्टेट बँकेकडून १००० कोटीच्या कर्जाची सवलत मिळवल्यानंतर वेल्लायन यांनी कंपनीला ऋणमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. मोठी जोखीम घेण्याची व किमान पाच वर्षे थांबण्याची तयारी असेल तर ३५ ते ३९ रुपयांपर्यंत हा शेअर घेता येईल. स्टॉप लॉस ३० रुपयांखाली ठेवता येईल. किमान १०० रुपयांवर किंवा त्यापुढेही वाढण्याची अपेक्षा ठेवता येईल. 

संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी सांगितलेच आहे: वाळवंटातली गारगोटी कितीही झगमग करीत असली तरी पारख्याने अमूल्य खडाच ओळखावा, निवडावा व जवळ बाळगावा. असो. 

या सदरात सतत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल लिहीत आहे. आठ जानेवारी रोजी टीसीएसच्या तिमाही निकालाने बोहनी झाली. अपेक्षेपेक्षा अधिक जोरकस निकाल जाहीर करून कंपनीने अपेक्षापूर्तीचा आनंद दिला. गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक नफा नोंदवत कंपनीने प्रती शेअर ६ रुपये लाभांशही दिला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ४० टक्के शेअर पुनर्खरेदीची शिफारस असली तरी कंपनीने किरकोळ भागधारकांनी देऊ केलेले सारेच शेअर्स खरेदी केले. टीसीएसचे या तिमाहीचे शेअर मागे उपार्जन उच्चांकी २४.६५ रुपये आहे. तेही पुढे २८ ते २९.५ रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या निकालामुळे या संपूर्ण क्षेत्राबद्दलच्या कामगिरीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. डिजिटल व क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित दूरस्थ सेवा देण्याची मागणी वाढत राहिली तर पुढील वर्ष असेच तेजीत जाईल. आयटी निर्देशांक गेल्या  आठ महिन्यात दुप्पट झाला आहे. (१३५०० ते २७०२७). या भावात थोडी घसरण जरी झाली तरी पुढील एक तिमाही या क्षेत्राला अधिक बळ देईल असा अंदाज आहे.

चीनमधील प्रचंड मागणीमुळे लोह खनिजांचे भाव अस्मानाला टेकले आहेत. पर्यावरणाच्या नियमांमुळे उत्पादन बरेच नियंत्रित झाले आहे. भारतातही स्टील कारखानदार खनिजांच्या वाढीव भावाबद्दल तक्रार करीत असतात. टाटांकडे व जिंदाल समूहाकडे स्वत:च्या मालकीच्या खाणी आहेत. इतर कारखानदार तेव्हढे सुदैवी नाहीत. त्यामुळेच खनिजांबरोबर स्टीलचे भावही गगनाला भिडले आहेत. चीनचे पोट भरल्याशिवाय ही तेजी कमी होणार नाही. सहसा ऑस्ट्रेलिया व ब्राझील या देशातून जगाला लोह खनिजांचा पुरवठा होतो. त्यात भारताचाही वाटा आहेच. ब्राझील मधील एक मोठे धरण फुटल्यामुळे व ऑस्ट्रेलियातील नैसर्गिक आपत्तीमुळे मागणी पुरी होत नाही. भारतीय निर्यातदारांसाठी ही मोठी संधी आहे. एनएमडीसी या सरकारी उद्योगाचा या दृष्टीने विचार करता येईल. अर्थात टाटा स्टील स्वत:ही लोह खनिज निर्यात करते. 

अर्थ विश्लेषकांचे डोळे आता अंदाजपत्रकाकडे लागले आहेत. शंभर वर्षात झाले  नाही असे बजेट अर्थमंत्री मांडणार आहेत. कदाचित त्यामुळेच सिमेंट व इतर पायाभूत सुविधा निर्मिती करणारे उद्योग तेजी दाखवीत आहेत. अपेक्षा आणि अपेक्षाभंग ह्या हिंदोळ्यावरच शेवटी बाजार चालतो हे लक्षात घेतले पाहिजे.

यापुढे सावध आशावादी दृष्टिकोनातूनच शेअरबाजाराकडे बघायला हवे.

(महत्त्वाचे -या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअरबाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉस ला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या