लक्ष्यभेद व त्यानंतर...

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
रविवार, 31 जानेवारी 2021

अर्थवेध
 

गेले तीन महिने स्वप्नवत वाटणारा ५० हजार अंशाचा टप्पा सेन्सेक्सने ओलांडला आणि युद्ध जिंकल्यानंतर विजेत्याला हमखास येणारा थकवा शेअर बाजारालाही आला.

सव्वीस जानेवारीची सुटी आणि फेब्रुवारीच्या एक तारखेला मांडले जाणारे अंदाजपत्रक, भरीस भर वायद्याची अखेर, या सर्व घडामोडींमुळे हा अंक तुमच्या हातात पडेपर्यंत बाजार आळसावलेला, थोडाफार मलूलच असेल. निफ्टी निर्देशांक १४ हजार किंवा वाईटात वाईट १३,६०० या पातळीला स्पर्श करून वर येऊ शकतो. त्याखाली बंद झाल्यास तो महत्त्वाचा इशारा आहे. आलटून पालटून एकेका क्षेत्रात तेजी होत होत, शेवटी वाहन उद्योगाचा नंबर लागला. सर्वच क्षेत्रीय निर्देशांक आपापला लक्ष्यभेद करून विसावले आहेत. (टार्गेट आल्यामुळे) माहिती तंत्रज्ञान, औषध उद्योग, रसायने, विमा उद्योग, ग्राहकाभिमुख उद्योग आपली पुढील चाल बजेटनंतरच ठरवतील असे दिसते. 

एक मात्र निश्चित, चाळीस हजार, पन्नास हजार, साठ हजार हे निर्देशांकाच्या प्रवासातले टप्पे आहेत. सेन्सेक्सने ५० हजार अंशाला स्पर्श केला म्हणजे सगळे संपले असे नाही, पुढील टप्पेही गाठायचेच आहेत. यावर्षी की पुढल्या वर्षी एव्हढेच औसुक्य !

डॉ. महम्मद इक्बाल यांचे शब्द थोडे बदलून तेजीवाल्याला सांगायचे तर,

सितारोंके आगे इक जहॉं और भी है, 

बजारके कई इम्तिहान और भी है।  

तू शाही है, परवाज है, काम तेरा, 

तेरे सामने आसमान और भी है।।  

शेअर बाजाराला अनेक आव्हानांचा अजून सामना करायचा आहे. वित्तीय क्षेत्रातील अडचणी अजून पूर्णपणे पुढे आलेल्या नाहीत. नुकतेच बजाज फायनान्सने आपले तिमाही निकाल जाहीर केले. गुंतवणूकदार व फंड मॅनेजर्सचा लाडका असलेला हा समभाग व त्याचे निकाल बँकेव्यतिरिक्त फायनान्स कंपन्यांच्या भवितव्याचे दिशादर्शक असतात. नफा २९ टक्के कमी असूनही निकालानंतर हा शेअर ३.५ टक्क्यांवर बंद झाला. त्याचे मुख्य कारण म्हणजे विविध परदेशी विश्लेषकांनी केलेले निकालाचे मूल्यमापन. बर्नस्टाईन या आंतरराष्ट्रीय विश्लेषक संस्थेने अत्यंत आशादायक चित्र रंगवत, कंपनीला फिनटेकचा दर्जा देऊन आजच्या वाढीव किमतीचे समर्थन केले आहे. परंतु पुढील काही महिन्यासाठी तरी हे पटणारे नाही. बुडीत कर्जांसाठी कंपनीने या तिमाहीत २,३५० कोटीची तरतूद केली आहे. ढोबळ बुडीत कर्जे ०.५५ टक्के व निव्वळ बुडीत कर्जे ०.१९ टक्के अशी जरी दिसत असली तरी वर निर्देशित केलेली तरतूद बघितल्यास हे प्रमाण ३.७ टक्के आहे. शेअर पुस्तकी किमतीच्या नऊ पट भावाला (५,१०० रुपये) आज मिळत आहे. हा भाव कितपत टिकेल अशी शंका येते. पुढील तिमाहीत कदाचित तितकीच तरतूद दिसेल असे वाटते. शेअर ४,५०० रुपयांच्या खाली पुढेमागे मिळू शकतो.  

दुसऱ्या बाजूस, याचबरोबर अत्यंत कार्यक्षम व महत्त्वाकांक्षी व्यवस्थापन, वर्षअखेर अथवा त्याआधीच येणारे ‘बजाजपे’ अॅप, म्युचुअल फंड, शेअर ब्रोकिंग इत्यादी व्यवसायात पदार्पण आणि विस्तार हे बघता, या शेअरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यावर्षीचा अपेक्षित नफा ४,४०० कोटी असून तो दुप्पट करण्याचा कंपनीचा मानस आहे. त्याप्रमाणे व्यवस्थापन पावले उचलीत आहे. या कंपनीत नेहमी दरवर्षी ३० ते ४० टक्के नफा वृद्धी दिसण्याची शेअर बाजाराला सवय झाली आहे. आज ही वाढ कमी झालेली दिसते व त्या जुन्या पातळीवर येण्यास किमान सहा महिने लागावेत. हा समभाग ४ हजार ते ४,५०० या भावपातळीवर मिळाल्यास जरूर संग्रही ठेवावा. बाजाराच्या पडझडीत हा भाव मिळू शकतो. 

बजाज फायनान्सचे निकाल महत्त्वाचे असण्याचे अजून एक कारण म्हणजे अर्थव्यवस्थेवरील ताण त्यातून कळतो. फ्रॅन्कलीन टेम्पलटन म्युचुअल फंडाला अडचणीत आलेल्या सहा निखळ उत्पन्न देण्यासाठी योजलेल्या, ठेव प्रकृतीतील योजना बंद करण्यास न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. या योजनांमधील काही रक्कम जमा होणे बाकी आहे. रक्कम जशी जमा होईल तसे त्याचे वाटप होणार आहे. हे सारे गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा पाहणारे आहे. अधिक व्याज मिळवण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या जोखीमक्षमतेकडे दुर्लक्ष करता कामा नये हा मुद्दा त्यातून पुन्हा अधोरेखित होतो. मुद्दलात तोटा सहन करता येत असेल तर शेअर बाजार काय वाईट आहे? साहजिकच अर्थव्यवस्था पूर्णपणे आत्मनिर्भर झाली नाही, असे दिसते. सार्वजनिक बँका व मायक्रो फायनान्स क्षेत्र यांना बुडीत कर्जाचा किती फटका बसतो याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. या घटनांमुळे बँक निफ्टी दबावाखाली राहील व त्याचा परिणाम निफ्टीच्या घोडदौडीला लगाम घालू शकेल. 

हॅवेल्सचेही तिमाही निकाल आले आहेत. इलेक्ट्रिक केबल्स, गृहोपयोगी टिकाऊ वस्तू, लाइट फिटिंग्ज ही कंपनीची उत्पादने आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत ४० टक्के, तसेच मागील तिमाहीच्या तुलनेत २६ टक्के, तर निव्वळ नफ्यात ७० टक्के अशी घसघशीत वाढ कंपनीने दाखवली आहे. सर्व आकडेवारी बघता कोरोनामुळे बाजारपेठेत मंदी आहे की नाही अशी शंका यावी. असेच उल्लेखनीय निकाल इतर ग्राहकाभिमुख क्षेत्रांतून येतील असाही विश्वास वाटतो. हॅवेल्सच्या जोरदार प्रगतीमुळे बांधकाम क्षेत्रातील तेजी दूर नसावी असा संदेश मिळतो. डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टी, ओबेरॉय, सोभा यांसारख्या शेअर्सकडे लक्ष असू द्यावे. 

तिमाही निकाल आजपर्यंत तरी अपेक्षापूर्ती करीत आले आहेत. अल्ट्राटेक सिमेंटने २२.८२ मे.टनाची सिमेंट विक्री दाखवीत, सिमेंट क्षेत्राबद्दल अत्यंत गोजिरवाणे चित्र रंगविले आहे. बांधकाम क्षेत्र व सरकारी प्रोत्साहनाने पायाभूत सुविधा निर्मिती करणाऱ्या उद्योग क्षेत्रांतील सिमेंटची मागणी वाढती आहे. ढोबळ नफा २१ टक्क्यांवरून २६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर निव्वळ नफा ७७ टक्के वृद्धी दाखवत १,५८४ कोटी झाला आहे. हेच चित्र कजारिया सिरॅमिक्स, डीसीएम श्रीराम, तसेच किर्लोस्कर फेरस, लार्सन, शारदा क्रॉप, नवीन फ्लोरिन (विक्री १६ टक्के तर नफा ४५ टक्के वाढीव) दाखवीत आहेत. ही आकडेवारी प्रसिद्ध झाली असल्याने इथे पुनरुक्ती करीत नाही. त्यात मिळणारी दिशा महत्त्वाची. 

या साऱ्या निकालात अपवाद दिसतो तो रिलायन्सचा. कच्चे तेल जरी पुन्हा तेजीत येत असले तरी तेल शुद्धीकरणातील कमाई कमी होत असावी असा अंदाज आहे. कंपनीने हुशारी करून शुद्धीकरण व रसायन विभागाचे एकत्र वर्गीकरण केले आहे. शुद्धीकरणातील कमाई प्रती बॅरल ५.७ ते ६ डॉलर असावी असा विश्लेषकांचा अंदाज आहे. पॉलिमर विभागात अत्युच्च कमाई असल्यामुळे असे केले असावे. नफा ३७ टक्क्यांनी, रु. १३,१०१ कोटी, वाढूनही निकालातील अपारदर्शकतेमुळे बाजाराने नापसंत केले व शेअर ६ टक्के खाली आला. शेअरचा नफा वाढला पण भाव खाली आला या घटनेला बाजाराचा लहरीपणा समजून दुर्लक्ष केले जाते; पण याची अनेक कारणे असतात. काही वेळा चांगल्या नफ्याच्या अपेक्षेने शेअर आधीच वर गेला असतो, त्यामुळे चांगल्या निकालानंतरही तो पडतो. तर कधी कधी खोलात शिरल्यास बाजाराला काय बोचते आहे याचा अंदाज येतो, असो. 

केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी जुन्या वाहनांवर पर्यावरण कर लागू करण्याचे ठरवले आहे. आठ वर्षांवरील व्यापारी वाहनांना व १५ वर्षांवरील सर्व वाहनांना तो लागू होईल. बजेटच्या आधीचे बजेट सुरू झाल्याची ही नांदी आहे. मात्र सरकारी मालकीच्या १५ वर्षावरील वाहनांची योग्य मूल्यमापन करून नोंदणी रद्द करण्याचे धोरण १ एप्रिल २०२२ पासून अमलात येईल. अशी वाहने टाकाऊ म्हणून भंगारात गेली तर व्यापारी वाहन निर्मिती उद्योगाला नवसंजीवनी मिळेल. ही ह्या क्षेत्राची प्रलंबित मागणी होतीच. 

येणारे अंदाजपत्रक हा कुतूहलाचा विषय आहे. निर्गुंतवणुकीचे कितीही मोठे आकडे अर्थमंत्र्यांनी मांडले तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. ते कधीही समाधानकारकरीत्या पूर्ण झालेले नाहीत. आयातकरातील वाढ, कॉर्पोरेट व व्यक्तिगत आयकरात कुठलीही नवी सवलत नाही, पण वाढ झाल्यास तिचे स्वागत करण्याची मानसिकता जोपासली तर बजेटमुळे कुठलीही बोच राहणार नाही. माझा हा अंदाज चुकल्याचा मात्र आनंदच होईल.

(महत्त्वाची सूचना : या लेखातील सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे.)

 

संबंधित बातम्या