के दिल अभी भरा नाही...

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

अर्थवेध

अर्थसंकल्पानंतर ढगफुटी व्हावी तसा तेजीचा वर्षाव गुंतवणूकदारांवर झाला. पैसे मिळवणे खूपच सोपे असल्याची भावना जनमानसात पसरली. दोन दिवसात हजार अंश या वेगाने बाजार वर गेला तर निर्देशांक मार्चअखेर किती होईल, या विचारांचे पतंग आता उडू लागले आहेत. भोजनाच्या पंगतीत ‘पोट भरले पण मन भरले नाही,’ असे वाटत राहते तेव्हाच हात आवरलेला बरा! रात्री पुन्हा जेवण आहेच. ‘दिल अभी भरा नाही,’ या भावनेतून जागे होणे इष्ट.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात १२,२६६ कोटी रुपयांची खरेदी केली. साहजिकच ८ फेब्रुवारी रोजी ५१,३४८ अंशावर सेन्सेक्स बंद होताना आठ दिवसात ५ हजार अंश वाढला आहे. निफ्टीही १४८० अंशांनी वाढून १५,११५ या पातळीवर पोहोचली आहे. आलेखाप्रमाणे निफ्टीचे अल्पकालीन लक्ष्य १५५०० च्या आसपास असावे असा अंदाज आहे. बाजारात येणारा भांडवलाचा ओघ असाच कायम राहिला तर तेजी मिड व स्मॉल कॅप शेअरकडे वळू शकते.  

वाहत्या नदीच्या काठावर उभे राहून, पाणी थांबल्यावर पाण्यात उतरेन असे म्हणणे जसे फोलपणाचे आहे, तद्वतच शेअर बाजार चांगला खाली आला तर मी खरेदी करेन असे म्हणणे आहे. इथे ‘चांगला’ खाली म्हणजे किती खाली या प्रश्नाला उत्तर नाही. बजेटच्या आधी निफ्टी १३,६६० या पातळीवर आलीच होती. ही पातळी येऊ शकते, किंबहुना तिथेच मागणी येईल अशी शक्यता ता. ३० जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या ‘लक्ष्यभेद व त्यानंतर’ या लेखात वर्तवली होती. कुठल्याही बाजारात खरेदीविक्रीच्या संधी शोधायच्या असतात. त्या असतातच, आपल्या नजरेत येत नाहीत इतकंच! कित्येकदा काही न करणेही समंजसपणाचे असते, पण त्याआधी आपली खरेदी पूर्ण करायची असते. असो. 

हा विचार मनात येण्याचे कारण, अर्थसंकल्पानंतर सुरू झालेली अविश्रांत तेजी! इतके दिवस या सदरात वेळोवेळी खरेदीचा पाठपुरावा केला आहे. मालमत्तेचे वर्गीकरण करून काही नफा खिशात टाकण्याची सतत शिफारसही केली आहे. हमखास छोटी घसरण येते त्यात हा नफा चोखंदळपणे गुंतवण्याचा सल्लाही दिला आहे. येणाऱ्या तेजीची पावले ओळखणे आणि सावधपणे क्षेत्रनिहाय आपले खरेदीचे धोरण आखणे हा मूलमंत्र. यासाठी हवी मनाची आशावादी ठेवण व भारतीय क्रयशक्तीवर विश्वास. 

याचा अर्थ, शेअर बाजार कधी खाली येणारच नाही का? असा विचार करणेही तितकेच चुकीचे आहे. बाजार कदाचित लगेच खाली येणार नाही पण काही शेअर खाली येऊ शकतात. अपेक्षा आणि अपेक्षाभंग या दोन तरफांवर बाजार चालतो. तेजी असो वा मंदी दोन्ही दिशेने बाजार अतिरेक करतोच. फक्त तितका संयम आपण पाळू शकत नाही एव्हढेच.  

२०१७ साली शेअर बाजारात सर्वंकष तेजी अवतरली होती, तिचा उच्चांक जानेवारी २०१८ मध्ये झाला. हा पतंग काटण्याचे काम तत्कालीन अर्थमंत्री या नात्याने अरुण जेटली यांनी केले. त्यांच्या अर्थसंकल्पामुळेच मंदी आली असे नाही, ती पुढे कुठल्यातरी निमित्ताने आलीच असती! ही मंदी ऑक्टोबर २०१९ पर्यंत चालली, पुढे कोरोनाचा अपघात झाला नसता तर फेब्रुवारी २०२० पासून पुढे शेअर बाजाराला चांगले दिवस आले असते असे म्हणायला जागा आहे. 

ही सारी मीमांसा करण्याचे कारण म्हणजे ५१००० हा काही अंतिम निर्देशांक नव्हे! मागील लेखात म्हटल्याप्रमाणे भविष्यातला आकडा स्वप्नवत काहीही असू शकतो. पण आता जोखीम/ मोबदला गुणोत्तर व्यस्त होत चालले आहे. तेव्हा यापुढील वाटचाल सावध हवी. इंडिया विक्स मर्यादा सांभाळून आहे तोपर्यंत तेजीचे घोडे पळत राहणार. स्टॉपलॉस आता खोलवर ठेवायला हवे.  

आपले गुंतवणूक धोरण आता क्षेत्र परिभ्रमण (Sector Rotation) या पद्धतीने चालवायला हवे. आता दिवस अर्थक्षेत्राचे आहेत. खासगी वा सरकारी बँका (मागे रु.  १९० दर असताना सुचवलेली स्टेट बँक), बडोदा बँक, आयसीआयसीआय, ए यू फायनान्स बँक आदी गुंतवणुकीला चांगल्या. त्या फार वरच्या भावात मिळत असतील अन  बाजार त्यांच्या मागे जात असेल तर आपण तात्पुरत्या खाली असलेल्या पण आपण पसंत केलेल्या माहिती तंत्रज्ञान वा औषध उद्योगाकडे वळावे. मात्र ही नवी खरेदी अल्पकालीन असावी (कारण आपण मागे घेतलेले या क्षेत्रातील अनेक शेअर आपल्या भांडारात आहेतच). माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वर गेल्यास तिथे विक्री करून त्यावेळी खाली आलेल्या वाहन उद्योग, किंवा औषध उद्योग याकडे मोर्चा वळवता येईल. हे सोपे वाटले तरी त्यासाठी रोजचे निरीक्षण परीक्षण महत्त्वाचे आहे. वानगीदाखल माहिती क्षेत्रातील महत्त्वाच्या शेअर्सचे गेल्या तिमाहीचे निकाल देत आहे. (कृपया चौकट पहा) डिसेंबरच्या तिमाहीत सहसा या क्षेत्राची कामगिरी घसरते. चालू वर्ष मात्र अफलातून असावे असे हे आकडे दर्शवतात. आयटी क्षेत्राला हे वर्ष घबाड योगाचे आहे. तात्पर्य एकच! नफाखोरीमुळे यातील काही शेअर खाली आले तरी लक्ष विचलित न होऊ देता संग्रहित करावे. तीच स्थिती औषध उद्योगाची आहे.

वाचकहो, बाजाराच्या पातळीवरून आपण विकत घेऊ इच्छिलेल्या शेअरच्या पातळीकडे ध्यान वळवणे अधिक फायद्याचे ठरू शकते. स्टॉप लॉस लांबचा ठेवा आणि सहभागी व्हा. जोखीम अधिक वाटत असेल तर बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडांना आपलेसे करावे.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या