अटकेपार...

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

अर्थवेध

मुंबई सेन्सेक्सने गाठलेला ५२ हजार अंशाचा टप्पा पुढील काही काळ सेन्सेक्स वर तेजीवाल्यांचे राज्य असेल असे दर्शवणारा आहे. 

शेअर बाजाराशी दुरूनच संबंध असणाऱ्या ठेवीदारांना वाटते की सेन्सेक्सचे हे सारे आकडे फसवे आहेत आणि हा बुडबुडा कधीही फुटेल, वगैरे वगैरे. हा जर बुडबुडा असलाच तर तो प्लास्टिकचा आहे. इतका सहज फुटणार नाही. तेजीची कारणे उदा. कमी व्याजदर, अमाप परदेशी भांडवलाचा ओघ, कोरोना महामारीतून पुन्हा नव्या जोमाने उभा राहिलेला आपला देश आणि नुकतेच आलेले नवी दिशादर्शक, धाडसी अंदाजपत्रक. पुन्हा पुन्हा ही उदाहरणे देऊनही भीती काही कमी होत नाही. या गुंतवणूकदारांना धीर देण्यासाठी एक सांगता येईल की सेन्सेक्स वा निफ्टी या निर्देशांकात समाविष्ट असणाऱ्या शेअरने जाहीर केलेले आकडे खोटे ठरण्याची घटना अपवादानेच घडते. ‘सत्यम’चा घोळ उघडकीस आला तो २००९ मध्ये. त्यानंतर वरील निर्देशांकात नसलेले पण गुंतवणुकीवर परिणाम होणारे आयएलएफएस, दिवाण हाउसिंग, येस बँक इत्यादी अपघात घडले खरे; पण त्याला कारण असलेल्या व नजरेत आलेल्या पळवाटा आता नियामकांनी एकेक करीत बंद केल्या आहेत. लेखापालांवरची जबाबदारी वाढते आहे. कितीही सिग्नल्स उभे केले तरी जसे मोटर अपघात होतात तसे नवे नवे ‘जुगाड’ कदाचित होतीलही, पण ५- ६ हजार सूचीबद्ध शेअरमध्ये ही संख्या अत्यल्प असेल. त्यातही एक लाख कोटीहून अधिक बाजारभांडवल असलेल्या कंपन्यांच्या प्रत्येक हालचालींकडे विश्लेषकांचे बारीक लक्ष असते. लहानसहान चुकीला देखील बाजार मोठी शिक्षा देतो; त्यामुळे अशा शेअरमध्ये चुकीची आकडेवारी जाहीर होण्याची शक्यता कमी! या जोखमीतून मुक्त व्हायचे असेल तर काही उपाय:

  • पूर्वइतिहासाने सिद्ध झालेल्या चांगल्या व्यवस्थापन असलेल्या शेअरमध्येच गुंतवणूक करावी. शक्यतो निर्देशांकातील अथवा ‘अ’ गटातील.
  • आपण गुंतवलेल्या शेअरचा मागोवा घेत राहावा. कंपनी करीत असलेला प्रत्येक बदल, एकत्रीकरण, विभाजन आदी. आपल्याला कळलाच पाहिजे. त्यासाठी कंपनीकडून येणारी ईमेल किमान वाचली तरी पाहिजे.
  • इतर गटातील गुंतवणुकीतून वेळोवेळी नफा ताब्यात घेत राहावे व भांडवल खेळते व फिरते ठेवावे.
  • आपण विकल्यावर शेअर वर जाणे नैसर्गिक आहे. त्याचे वाईट वाटून घेऊ नये. थोडा संयम ठेवल्यास तो पुन्हा विकत घेता येईल किंवा तेजीत इतर भरपूर संधी मिळतील.
  • काहीच जमले नाही तर म्युचुअल फंडाची कास धरावी.

अविश्रांत तेजी सुरू असण्याचे आणखी एक कारण म्हणजे डॉलर रुपया विनिमय दर. गेल्या वर्षी एप्रिलच्या १२ तारखेला ७६.५५चा उच्चांक केल्यानंतर गेले वर्षभर डॉलर घसरतोच आहे. कोरोनामुळे थंडावलेल्या अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी ओतलेला प्रचंड मोठा पैसा (जवळजवळ सहा हजार अब्ज डॉलर्स ) त्याला कारणीभूत आहे. हा दर पुढील वर्षभरात ६७-६८ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. आपले चलन स्थिर वा मजबूत होत असले तर परदेशी गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा होतो. तेजी पुढे किती दिवस चालणार हे ठरवताना इंडिया विक्स व डॉलर-रुपया विनिमय दर हे देखील बघितले पाहिजे.

दरम्यान टाटा मोटरने कात टाकायचे ठरवले आहे. इलेक्ट्रिक कार केंद्रस्थानी पुढील वाटचाल करण्याचे कंपनीने ठरवले आहे. तीन वर्षात कर्जमुक्त होऊन, किमान १० टक्के ढोबळ नफ्याचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने मांडले आहे. नेक्सॉन, टीयागो, हॅरीयर सुधारून अधिक देखणी केलेली सफारी ह्या सर्व मॉडेलची  मागणी वाढती आहे. तसेच जेएलआर श्रेणीतल्या वाहनांना चीनकडून मागणी वाढते आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा जुना आधारस्तंभ, व्यापारी वाहने विशेषतः अवजड वाहने यांची मागणी पुन्हा वाढत आहे. वरील नफ्याचे लक्ष्य साध्य झाल्यास या शेअरला जुनी झळाळी प्राप्त होईल असा अंदाज आहे. टाटा मोटर ऐवजी टाटा मोटर डीव्हीआरही घेता येईल. तो त्या प्रमाणातच वाढून हसत खेळत २०० रुपये होऊ शकतो.

यावेळी तेजीतला बँक निफ्टीचा सहभाग लक्षवेधक आहे. मागेही या सदरात आयसीआयसीआय बँकेचा शेअर सुचवला होता. तो अजूनही घेता येईल, ७५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तसेच इंडस इंड बँकेकडेही लक्ष वळवायला हवे. सोमवारचा (ता.१५) १०५७ चा बंद चांगला संदेश देत आहे. व्यापारी वाहन उद्योगाने उभारी घेतल्यामुळे या शेअरभोवतीचे मळभ दूर होत आहे. एकेकाळी दोन हजार रुपयांवर असलेला हा शेअर १३५०, १५०० असे टप्पे घेत पुढे झेप घेऊ शकतो. तसेच बहुतांशाने लघुउद्योगांना पतपुरवठा करणारी सिटी युनियन बँक १५५ ते १६० रुपयांपर्यंत खाली आल्यास तिचाही विचार करावा. वर्षभरात २४० ते २५०चा भाव दिसू शकतो. स्टेट बँकेबद्दल या सदरात वेळोवेळी १९०च्या भावापासून लिहिले आहे. सोमवारचा बंद ४०७ आहे. इतक्यात विकण्याची घाई करू नये. ह्या समभागाचा वकूब  ४६० ते ५०० रुपये भाव होण्याचा आहे. 

जगात चौथ्या क्रमांकावर असलेली भारतीय रेल्वे, देशाचा आकार व वाहतूक या गुणोत्तरात एक नंबरला आहे. सव्वा लाख किलोमीटरचे जाळे असलेली भारतीय रेल्वे बाराशे अब्ज टनाची वाहतूक करते. सरकारने २०२३-२४ पर्यंत सर्व लोहमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचे  ठरवले आहे. तसेच पायाभूत सुविधांमध्ये २०३० पर्यंत पन्नास लाख कोटी रुपये गुंतविण्याची योजना आहे. सरकारी प्राधान्यक्रमामुळे या क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढते आहे. खासगी रेल्वे मालवाहतूक अथवा खासगी कंटेनर फ्रेट स्टेशन हे आता दिवास्वप्न राहणार नाही. रेल संबंधित अनेक सार्वजनिक उद्योगांची अंतश: भागविक्री सरकारने केली आहे. आयआरसीटीसी, राईटस, आरव्हीएनएल या मागोमाग रेलटेल येत आहे. रेलटेलचे भारतभर ऑप्टिकल फायबरचे जाळे आहे. रेल्वेच्या डिजिटल महत्त्वाकांक्षा रेलटेलच्या माध्यमातून पुऱ्या होतील. मालवाहतूक तसेच फ्रेट स्टेशन जोडणी, दूरसंचार व विदाकेंद्रांचे व्यवस्थापन रेलटेलकडे सोपवले आहे. थोडक्यात रेल्वे व्यवस्थेचा आधुनिकीकरण व डीजीटायझेशनचा पाया रेलटेलच्या मजबूत सुविधांमध्ये आहे. नवीन भागविक्रीत जरी आपला नंबर लागला नाही तरी सूचीबद्ध झाल्यावर घेण्याजोगा हा शेअर आहे.

वाहनउद्योगांना सहाय्यभूत मालपुरवठा करणारे क्षेत्र अत्यंत उल्हसित निकाल देत आहे. विशेषतः पुढील तिमाही अधिक चांगली जाईल असे भाकीतही व्यवस्थापन करीत आहे. मदरसन सुमी, भारत फोर्ज, मिंडा हे शेअर वरच आहेत, ते यामुळे. तसेच ग्रीव्हज कॉटन, सीडीएसएल आपले लक्ष वेधत आहेत. सीडीएसएलने डिमॅट खात्यांमध्ये ५९ टक्के मार्केट काबीज केले आहे. पुढे येणाऱ्या आयुर्विम्यासारख्या  भागविक्रीत भारताच्या कानाकोपऱ्यातून नव गुंतवणूकदार सहभागी होतील हे लक्षात घ्यायला हवे. 

थोडक्यात सांगायचे तर तेजी आहे व टिकेल असे वाटते. निफ्टीचे टार्गेट १५,५०० आहे. ते गाठल्यावर निर्देशांक तेथे थोडा विसावा घेऊ शकतात. मिड व स्मॉल कॅपमध्ये तेजी आहेच, नवीन संधी तेथेच मिळतील. बाजारात ३ ते ५ टक्के घट होणे ही खरेदीची उत्तम संधी असेल.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या