थोडा संयम थोडी सावधानता

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 8 मार्च 2021

अर्थविशेष

गेल्या आठवड्याचा आढावा घेताना म्हटले होते की थोडा अधिक संयम ठेवला तर १३,७५० ते १४,६७५ या दरम्यान खरेदीच्या अनेक संधी मिळतील. अर्थात मंदीला तळ नाही आणि तेजीला आभाळ नाही...

प्रत्यक्षात वेगळ्याच कारणांमुळे बुधवारी, गुरुवारी बाजार तेज राहिला (त्याचा ऊहापोह पुढे करू), मात्र याचा वचपा निर्देशांकांनी शुक्रवारी काढला. निफ्टी ३५९ अंश आणि सेन्सेक्स १३०० अंशांनी पडले. एखाद्या आजारी रुग्णावर त्याची प्रतिकारशक्ती पूर्ववत होण्याच्या आतच प्रतिजैविकांचा मारा करावा तसे नेमके शुक्रवारीच घडले. (आपला बाजार बंद झाल्यावर) अमेरिकेने १८०० अब्ज डॉलर्स पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेत ओतले. खाली जाऊ इच्छिणारे जगभरचे शेअर बाजार पुन्हा उसळले. आपला बाजारही त्याला अपवाद नव्हता. सोमवारी १ मार्चला पुन्हा तेजी आली ती यामुळे. 

आपले निफ्टीचे टार्गेट (१५,५०० ऐवजी १५,४३०) आले असे समजायला हरकत नाही. निर्देशांकांचे घोडे आता थकले आहेत. पायउतार होता येईल. याचा अर्थ, तेजी आहेच पण ती निवडक मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये पसरू शकते. मात्र शेअर्सची निवड करतांना अधिक जागरूक राहायला हवे. जिथे नफा होत असेल तिथे तो कागदावर न ठेवता थोडातरी हाती घेतला पाहिजे. 

दिसती खचित साऱ्या सोप्या दुरून वाटा 

कळतात खाचखळगे पाऊल टाकतांना

बाजार तेज आहे, गाफील करे आम्हा

संतोष खास देतो खात्यात मांडतांना 

मोह सोड आता, या भासवी नफ्याचा 

ईप्सित साध्य होई, खिशात पाहतांना

मार्चअखेर आता जवळ आली. शेअर्सच्या नफानुकसानीचा लेखाजोखा घ्यायची वेळ आली. त्यामुळे हा महिना शेअर बाजार ट्रेडिंग झोनमध्ये राहू शकतो. तेव्हा संधिसाधू वृत्तीने बाजाराकडे पाहणे उत्तम. 

बुधवारी (२४ फेब्रुवारी) बाजारात वेगळीच धमाल झाली. पहिल्या बाकावर बसणाऱ्या मुलाने अचानक शाळेला दांडी मारून मॅटिनी शोला जावे, तसेच अत्यंत दणकट व कार्यक्षम ट्रेडिंग यंत्रणा असलेले नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अचानक चक्क बंद पडले.

‘एनएसई’च्या ‘टेलिकॉम लिंक’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी कामकाज थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. कामकाज कधी सुरू होईल हे नक्की कळेना. आजकाल पीक मार्जिन रिपोर्टिंग बंधनकारक आहे. पूर्तता न झाल्यास, १ मार्च पासून त्यावर दंड आकारला जाईल. ‘एनएसई’चे अडकलेले सौदे ‘बीएसई’वर पूर्ण करण्याची सोय आहे. पण ‘बीएसई’चे एकूण व्यवहार ‘एनएसई’च्या तुलनेने जेमतेम ५ ते १० टक्के आहेत. तरीही ही जबाबदारी ‘बीएसई’ने लीलया पेलली. (एरवी ५ हजार कोटींचे रोजचे व्यवहार  असतात ते त्या दिवशी ते ४० हजार कोटींचे झाले). बाजार बंद पडण्यापूर्वी ज्या ट्रेडरनी बाजारात मंदीचे व्यवहार केले होते, त्यांना बाजारातील तेजी बघून मंदीच्या व्यवहारातून बाहेर पडण्यासाठी तेजी करणे आवश्यक होते. तीच गत तेजीवाल्यांची! अचानक एक्स्चेंज बंद पडल्याने सर्वत्र घबराट पसरली. (या ठिकाणी वॉरन बफेच्या वचनाची आठवण होते. ‘अशी गुंतवणूक करा की तुम्ही खरेदी केल्यावर पाच वर्ष जरी बाजार बंद पडले तरी त्याचा परिणाम गुंतवणुकीवर होता कामा नये.’) त्यात दुसऱ्या दिवशी वायदा अखेर असल्यामुळे मंदीवाल्यांना फारसा पर्याय नव्हता. चढ्या भावात खरेदी (शॉर्ट कव्हरिंग) केल्यामुळे निफ्टीने जोरदार १४,९८२ अंशावर बंद दिला. 

अर्थ मंत्रालयाने ‘एनएसई’वर झालेल्या तांत्रिक दोषाचा संपूर्ण अहवाल मागविला आहे, त्यात कुणाला दोष द्यायचा ते कळेलच. गुरुवारीही शॉर्ट कव्हरिंगचीच पुनरावृत्ती होऊन बाजार तेजीत बंद झाला. आमच्या मते हे दोन्ही दिवस अपवादात्मक समजून, निफ्टीची खरी इच्छा विसावा घेण्याची आहे, हे लक्षात घ्यावे असे वाटते. कारण भारतात व अमेरिकेतही व्याजदर वाढू लागले आहेत. त्यात कच्चे तेल, पोलाद आणि इतर अलोह धातूंच्या किमती वाढत आहेत. तांबे तर नऊ वर्षांच्या उच्चांकावर आहे. (सोलर पॅनेल, विजेवर चालणारी वाहने, पवनचक्क्या आदी ठिकाणी तांबे भरपूर प्रमाणात लागते.) किमती तरी कमी व्हायला हव्यात किंवा महागाईला सामोरे तरी जायला हवे. कोरोनामुळे पुन्हा लॉकडाउनची वेळ येते की काय अशीही शंका आहे. उद्योग आपली नफा क्षमता त्याच गतीने वाढवू शकतील का? याचे उत्तर एप्रिल महिन्याचे आकडे बघताना मिळेल. तेव्हा सावध राहायला काय हरकत आहे? 

अर्थात आम्हाला पूर्णपणे चूक ठरवण्याचा संपूर्ण अधिकार शेअर बाजाराला आहे. 

जीएसटीचे संकलन लागोपाठ पाचव्या महिन्यात एक लाख कोटींच्यापुढे गेले आहे. वार्षिक तुलनेत ७ टक्के अधिक असले तरी गेला मार्च कोरोना पीडितच होता, हे बघितल्यावर हर्षोल्हास कमी होतो. गेल्या महिन्यात आयात कराचा महसूलही वाढला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत निर्यात अधिक होत होती. निर्यातीच्या तुलनेत आयात कमी होण्याने (कच्चे तेल वगळून) वेगळेच प्रश्न उभे राहू शकतात. त्यातील एक म्हणजे कंटेनर्सची कमतरता. निर्यात करताना त्याच देशातून त्याच कंटेनरमध्ये आयात होत असते. आयात कमी झाल्यास कंटेनर नसल्यामुळे तीन तीन आठवडे बंदरात माल थांबून राहतो. आजतरी या प्रश्नाला उत्तर नाही. निर्यातदारांना अधिक भाडे भरून व तरीही थोडा उशीर सहन करणे क्रमप्राप्त आहे. 

अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबद्दल रिझर्व्ह बँकेने नुकतेच समाधान व्यक्त केले आहे. रब्बीचे पीक समाधानकारक आल्यामुळे भरपूर अन्नसाठा शिल्लक आहे. तसेच शेतमालाच्या पायाभूत किमती वाढविल्यामुळे सरकारी गोदामेही भरलेली आहेत. रिझर्व्ह बँकेला या कारणाने महागाईची अति चिंता नाही. तसेच सार्वजनिक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ४जी स्पेक्ट्रमच्या लिलावात पहिल्याच दिवशी ७७ हजार कोटींची बोली लागली आहे. मागील तुलनेत हा आकडा छोटा असला तरी तो मान्य करणे आवश्यक आहे. दोन दिवसातच लिलाव गुंडाळला जाईल असे दिसते. थोडा विसावा घेऊन आपला बाजारही पुढील स्वारीसाठी सज्ज होईल.   

कर्ज आणि तोट्याच्या ओझ्यामुळे अॅक्सल तुटलेला ट्रक जसा चालतो तशी टाटा मोटर्सची अवस्था झाली होती. नवीन नेतृत्वाखाली तो अॅक्सल जोडला गेला आहे. खासगी वाहनांना वाढती मागणी तर आहेच, पण टाटांची व्यापारी वाहनेदेखील पूर्वीसारखी खपताना दिसतात. जेएलआरची मागणीही वाढत आहे. यापुढे प्रगतीचा वेग वाढेल अशी अपेक्षा आहे. मागील सदरातही ही गुंतवणूक सुचवली होती. दीर्घ पल्ल्यासाठी जरूर विचार करावा.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)
 

 

संबंधित बातम्या