काही दिवस दृढीकरणाचे 

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 15 मार्च 2021

अर्थविशेष

पंधरा दिवसांपूर्वी, २६ फेब्रुवारीला, झालेल्या मोठ्या विक्रीनंतर शेअर बाजार पुन्हा सावरला. एक ते तीन मार्च खरेदीचा जोर होता. त्यात निफ्टीने १५,२७३ ला स्पर्श करून पुन्हा खालची वाट धरली.

मागील अंदाजाप्रमाणे शेअर बाजार ट्रेडिंग झोन सांभाळतो आहे. १४,४७० ते १५,२५० असा हा पट्टा आहे. एकदा खरेदी केल्यानंतर काहीही करू नका, फक्त सांभाळा असा सल्ला मागे दिला होता. आता बाजार म्हणतोय खालच्या बाजूला घ्या आणि नफा झाल्यास विका, पुन्हा संधी मिळेल. आपल्या विश्वात शेअर बाजार सर्वोच्च असल्याने बाजाराच्या हालचालीवरून मिळालेले संदेश पाळायलाच हवेत. एकदा हे दृढीकरण (consolidation) संपले की पुढील दिशा ठरेल. येत्या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न ११.५ टक्के वाढण्याचा अंदाज तेजी दर्शवतो. परंतु ८ मार्चला वाजतगाजत वर उघडलेला बाजार टिकला नाही. वरच्या पातळीवर विक्रीदबाव वाढला. तसेच परदेशी गुंतवणूकदारदेखील विक्रीतून खरेदीच्या ‘मूड’मध्ये यायला हवे. त्यासाठी अमेरिकीन व आपले व्याजदर वाढणे थांबायला हवे. खरेतर २ टक्क्यांपर्यंत अमेरिकीन व्याजदर वाढले तरी चालतात, फक्त अकस्मात वाढीचा बाजार धसका घेतो एव्हढेच! आपले बाँड मार्केट रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपानंतर नीट चालू शकते. कदाचित वर्षंअखेरचे ताण संपल्यावर एप्रिलमध्ये बाँडच्या किमती वाढू शकतात मग व्याजदर खाली आल्यासारखे वाटतील.

या सदराच्या सर्व महिला वाचक व गुंतवणूकदारांना नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज महिलांनी त्यांच्या कर्तबगारीने पुरुषांची मक्तेदारी मानली गेलेली क्षेत्रेही काबीज केली आहेत. गुंतवणुकीच्या विषयातही निधीव्यवस्थापक, विश्लेषक तसेच सल्लागार म्हणून अनेक यशस्वी महिलांची नावे घेता येतील. नोकरी व्यवसायात असलेल्या स्त्रियांना आपण गुंतवणूक करावी याची जाणीव असते, पण सहसा हा निर्णय त्या स्वतंत्रपणे घेत नाहीत असा अनुभव आहे. वडील, भाऊ, पती, कार्यालयातील सहकारी या कामी सल्लागाराची भूमिका घेतो. खऱ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आर्थिक निर्णय घेण्याची क्षमताही जोपासायला हवी. किंबहुना आर्थिक, भावनिक व शारीरिकदृष्ट्या स्त्री सक्षम हवी. कुणावरही भावनिकदृष्ट्या अवलंबून न राहता, अगदी निवृत्तीनंतरही आरोग्य चांगले राखून, प्रसंगी एकटे राहण्याची वेळ आल्यास भावनाविवश न होता आत्मसन्मानाने जगता यायला हवे. शेअर बाजारातदेखील महिला उत्कृष्ट गुंतवणूकदार होतील याची खात्री वाटते. साध्या जमाखर्चापासून सुरुवात करून पुढे लागणाऱ्या भांडवलाचे  नियोजन करणे थोड्या प्रयत्नाने जमू शकते. वाचन वाढवणे, योग्य तो सल्लागार गाठणे व गृहपाठ करणे या स्वयंसिद्ध पद्धतीने हे आत्मसात करता येईल.

कच्च्या तेलाचे भाव नेटाने वाढत आहेत. पाहता पाहता ते ७० अमेरिकी डॉलरच्या आसपास ते घुटमळत आहेत. या भाववाढीमुळे एका बाजूला त्यातून जागतिक अर्थव्यवस्थेच्या उभारीबद्दल दिलासा मिळतो तर दुसऱ्या बाजूस भारताच्या महागाई दराच्या वाढीचा इशारा. आपल्याकडील इंधनाचे भाव सरकारी करांच्या कृपेने कधीही शंभरी ओलांडतील अशी अवस्था आहे. विरोधकांच्या हातात आणखी एक कोलीत मिळण्यापलीकडे वाढत्या वाहतूक खर्चामुळे जीवनावश्यक वस्तू महागतील ही चिंता आहे. मागे पंतप्रधानांनी भविष्यात गॅसला जीएसटी लागू करण्याचे सूतोवाच केले होते. सरकारी महसूल कमी होऊ नये म्हणून 

पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवलेले आहे. त्यात राज्य व केंद्र दोघांचेही अर्धवट पोट भरते. जीएसटी लागू केल्यास किमती २० ते २५ रुपयांनी कमी होतील अशी अपेक्षा आहे. 

दुसरा उपाय म्हणजे नव्याने लागू केलेला रोड सेस कमी करणे. तिसरा उपाय म्हणजे पेट्रोल मधील इथेनॉलचे प्रमाण वाढवणे. अर्थात, त्यासाठी वाहनांची इंजिने सक्षम आहेत का हेही बघावे लागेल. आज जगात इंधनावरील सर्वोच्च कर भारतात आकारतात. मूळ किमतीच्या अडीचपट वेगवेगळे करच आहेत. बंगालसह इतर राज्यातील निवडणुका नजीकच्या काळात आल्यामुळे पेट्रो कंपन्यांना पुढील भाववाढ स्थगित करण्याच्या अप्रत्यक्ष सूचना मिळतील. मात्र भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल १० डॉलरने जरी वाढले तरी आपले भाव शंभरी ओलांडतील. कच्‍या तेलाचे भाव वर गेल्यामुळे ऑइल टँकर वाहतूक महाग होईल. 

आजमितीला जहाज बांधणी व तेल वाहतूक व्यवसाय मंदीत आहे. जागतिक अर्थव्यवस्था सुधारली तर या वर्षीच्या दुसऱ्या सहामाही पर्यंत शिपिंगला चांगले दिवस यावेत. या क्षेत्रात ‘जी ई शिपींग’ हा शेअर गुंतवणुकीसाठी खुणावतोय. गेली तीन वर्षे तीनशेच्या आतबाहेर थबकलेला हा शेअर पुढील वर्षभरात डोके वर काढू शकतो. चांगले व्यवस्थापन ही जमेची बाजू, या क्षेत्रातील इतर कंपन्या दिवाळे काढत असतांना ‘जी ई शिपींग’ने टँकर विक्रीतून कर्ज कमी केले आहे. व्यवसाय मंदीत असल्यामुळे विक्री व नफा वाढता नाही. ‘शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या लिलावातही कंपनीने बोली लावली आहे. गेल्या बारा महिन्याचे ५५ रुपये उपार्जन असलेला हा समभाग ३११ रुपयांना मिळतोय; २७०/२८०च्या स्टॉप लॉस ने घेतल्यास  दीर्घ पल्ल्यात ४५० रुपयांची अपेक्षा ठेवता येईल. 

छोटा भीम, मोटू पतलू, हालाप्ले, इपीक क्रिकेट, वर्ल्ड क्रिकेट इत्यादी लोकप्रिय खेळाचे जनक असलेल्या ‘नझारा टेक’ या कंपनीला नुकताच नव्या शेअर विक्रीसाठी हिरवा कंदील मिळाला. पुढील १०-१५ दिवसात विक्री खुली व्हावी. गेमिंग क्षेत्रातील पहिलाच शेअर असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेसह जगभरात १५० अब्ज डॉलर व भारतात ७००० कोटी रुपयांचा व्यवसाय असलेले हे क्षेत्र वेगाने वाढत आहे. स्मार्ट फोनचा वापर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्यामुळे सर्व वयातील स्त्री-पुरुष मोबाईल गेम खेळतात. ड्रीम ११वर एकदा तरी स्वत:चा चमू तयार करण्याचा मोह आवरत नाही. कँडी क्रश, पोकर, रमी, ब्रिज आदी अनेक खेळ सर्वांनाच आकर्षित करतात. अजाण वयातील मुले पबजी आणि पोकेमॉन सारख्या खेळांच्या नादी लागल्यामुळे टीका जरी होत असली तरी ज्येष्ठांच्या एकलेपणावर हा छान विरंगुळा आहे, हे मान्य केलेच पाहिजे. तसेच ऑनलाइन शिक्षणातही गेमिंगमुळे मोठी क्रांती घडू शकते. सरकारने या क्षेत्रात समंजस धोरण आखून गेमिंगला कायद्याच्या चौकटीत नीट बसवले तर त्यातूनही कर महसूल वृद्धीच्या कल्पना राबवता येतील. थोडक्यात ‘नझारा टेक’च्या प्रथम भाग विक्रीचा सन्मान करायला हवा. या वर्षाच्या अखेरीस देशात ६० कोटींवर लोक डिजिटल गेमिंग वापरत असतील असा अंदाज आहे. प्राथमिक भागविक्रीत लॉटरी न लागल्यास बाजारातूनही शेअर्स घेता येतील. 

या सदरात मागे ७२-७५ रुपयांच्या दरम्यान सुचवलेला ‘टाटा पॉवर’ ११० रुपयांवर आला आहे. त्यात अंशतः नफा ताब्यात घेता येईल. पुढेही चाल मिळू शकेल पण कदाचित तो पुन्हा नव्वदीत मिळावा

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या