दोलायमान स्थिती

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
गुरुवार, 25 मार्च 2021

अर्थविशेष

दररोज बाजाराच्या उतारचढावात भाग घेतलाच पाहिजे अशी सक्ती नाही. ही आपल्या संयमाची परीक्षा आहे असे समजावे. अशा काळात आपल्या निवडीवर दृढविश्वास ठेऊन शांत राहणे सर्वोत्तम.
थांबवेना, चालवेना पुढे वाट सापडेना। 
मज आज दाखवेना, दिशा कुणी।
विकवेना, घेववेना, मती पुढे चालवेना।
स्वस्थही बसवेना, द्विधा मनी।।

गेला आठवडाभर बाजार तळ्यात-मळ्यातचा खेळ खेळला. आठ तारखेपासून हलकेच वर जाता जाता १२ व १५ मार्च या दिवशी बाजार चांगल्या मंदीत सापडला. त्यातही चंदेरी किनार म्हणजे १५ तारखेला पुन्हा खालच्या पातळीवर खरेदी झाली. सध्यातरी अमेरिका व इतर पाश्चिमात्य बाजारांच्या तालावर आपला बाजार नाचतोय; १४४०० ते १५३०० असा हा खेळ आहे. व्याजदर वाढणे, महागाई वाढणे ही सारी निमित्त आहेत. खरं तर बाजाराचे सर्व घटक गोंधळलेल्या अवस्थेत असावेत अशी शंका येते. मागील आठवड्यात लिहिल्याप्रमाणे कन्सॉलिडेशनमधून ही पातळी बाजार स्वीकारेल आणि त्यानंतरच पुढील चाल ठरेल. सर्वच निकषावर निफ्टी अथवा सेन्सेक्स थोडे महाग झाले आहेत. निफ्टीचे २०२२-२३ चे उपार्जन  ७८० ते ८०० रुपये असेल असा विश्लेषकांचा अंदाज आहे. निफ्टीचे  किंमत / उपार्जन गुणोत्तर अगदी सावधपणे २० ते २२ असे गृहीत धरले तरी निफ्टीचा स्तर वर्षअखेर १६ हजारच्या आसपास दर्शवतो. (आज गेल्या बारा महिन्यासाठी हे गुणोत्तर ३० आहे, व २० टक्के वृद्धी गृहीत धरल्यास पुढील वर्षासाठी २५च्या दरम्यान आहे). प्रत्येक पडझडीतच खरेदी करायची शिफारस आहे ती यामुळे.

शेअर बाजार ट्रेडिंग झोनमध्ये आहे हे म्हटले खरे, पण मग गुंतवणूकदाराने करायचे तरी काय? काही खरेदी करावी तर नेमका तोच शेअर खाली येतो. काही विकावे असे ठरवले तर नेमका तोच शेअर वर जातो. बाजार असा सूड घेतल्यासारखा वागतो. ही आपल्या संयमाची परीक्षा आहे असे समजावे. अशा वेळी आपल्या निवडीवर दृढविश्वास ठेऊन शांत राहाणे सर्वोत्तम. दररोज बाजाराच्या उतारचढावात भाग घेतलाच पाहिजे अशी सक्ती नाही. आपल्यावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्र गेले वर्षभर प्रसन्न आहे. तिथली तेजी संपली नाही. या सदरात अनेक वेळा सुचवलेले ‘इन्फोसिस’, ‘कोफोर्ज’, ‘माइंड ट्री’, ‘एचसीएल  टेक’, किंवा ‘टेक महिंद्रा’ (गेल्या पंधरवड्यात १० टक्क्यांखाली मिळत होते.) ‘एलएनटी इन्फो’ आता फक्त सांभाळायचे आहेत. तसेच लोहखनिज व पोलाद निर्मात्यांची बाजारावरील पकड मजबूत आहे. ‘टाटा स्टील’ (रु. ६७० ते ७००), ‘जेएसडब्ल्यू स्टील’ (रु. ३६३ ते ३७५), ‘जेएसपीएल’ (रु. ३१० ते ३१८) अजूनही संग्रहित करता येतील. प्रत्येकच प्राधान्य क्षेत्रातील वर जाणाऱ्या शेअरकडे लक्ष ठेऊन तो विसावला की घेता येईल. तीच तऱ्हा खासगी बँका व एनबीएफसी कंपन्यांची. खाली आलेल्या ‘आयसीआयसीआय बँक’, ‘एचडीएफसी बँक’ किंवा ‘इंडस इंड बँके’कडे नजर ठेवून घेता येतील.  

तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे, दह्यामध्ये लोणी आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. पण जे घुसळणे जाणतात त्यांनाच ते जमते व मिळते. तसेच याच बाजारात पैसे मिळतात हे सर्वांना माहीत आहे पण त्यासाठी निरीक्षण आणि परीक्षणाचे जे कष्ट करतील त्यांनाच ते मिळतील. असो. 

मध्यंतरी ‘सेबी’च्या नव्या आदेशाने बाँड गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले होते. बऱ्याच सरकारी व खासगी बँका AT1 या नावाने चिरस्थायी (perpetual) रोखे विक्रीस काढतात. इक्विटी सदृश असल्यामुळे भांडवल मापनात बँकांना या रोख्यांची चांगली जोड मिळते. शेअर बाजाराची जोखीम न घेता नियमित उत्पन्न मिळत राहावे म्हणून अनेक सधन व्यक्ती अशा रोख्यात गुंतवणूक करतात. ठेव बाजारात सूचीबद्ध असले तरी यात व्यवहार नियमितपणे होत नाहीत. परतफेडीसाठी कॉल ऑप्शनची तारीख जाहीर केलेली असते. बँक ठेवीपेक्षा जास्त व्याज व नियमित परतफेडीची खात्री असल्यामुळे म्युचुअल फंडांची या रोख्यात ३३ हजार कोटींची गुंतवणूक आहे. बँकेचा नफा पुरेसा नसेल तर या रोख्याचे व्याज देणे बँक टाळू शकते. सेबीच्या आदेशानुसार या रोख्यांना चिरस्थायी समजून त्यांचे मूल्यांकन शंभर वर्षांची मुदत गृहीत धरून केले पाहिजे. तसे केल्यास मूल्य मोजता येणार नाही व सर्व फंड्स AT 1 बाँड्सची विक्री करण्यास धावतील. सार्वजनिक बँकांना तसेच गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसू शकतो. सुदैवाने अर्थ मंत्रालयाच्या हे लागलीच लक्षात आले व सेबीला तिचा आदेश मागे घेण्यास सांगण्यात आले. एक वादळ घोंघावण्यापूर्वीच शांत झाले व आधीच फ्रॅन्क्लीन प्रकरणात सैरभैर झालेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. अर्थात सेबीही चटकन आदेश मागे घेणार नाही (कारण येस बँकेचे AT 1 रोखे बुडीत गेल्यामुळे गुंतवणूकदारांचे चांगलेच नुकसान झाले होते.)  पण त्यातील तरतुदी बदलता येतील किंवा अंमलबजावणी पुढे ढकलता येईल. रोग वाईट की त्याचा इलाज अधिक वाईट असा एक वाद यातून रंगू शकतो!

मार्च महिना नव्या भागविक्रीचा अखंड झरा घेऊन आला आहे. अर्थात प्रवर्तक विक्री करतात ती तेजी बघूनच! वाजवी किमतीला शेअर्स मिळण्याची शक्यता धूसरच. मेंढीधाव (herd mentality) पद्धतीने व खासगी बाजारातले (बहुतांशी वाढविलेले ) प्रीमिअम पाहून नवगुंतवणूकदार नव्या भागविक्रीला सामोरे जात असल्यामुळे हे झटपट श्रीमंतीचे आमिष यशस्वी होते. सूचीबद्ध झाल्यावर भाव किती टिकतो यावर दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरण आखले पाहिजे. अत्यंत वाजत गाजत आलेल्या बर्गर किंगच्या शेअरचे उदाहरण घेऊ. रु. ६० दर निश्चित केलेला हा शेअर ११० रुपयांना सूचीबद्ध झाला व तीनच दिवसात दुप्पट झाला. आज तीन महिन्यानंतर तो १३० ते १४० रुपयांच्या पट्ट्यात रेंगाळत आहे. काल वरचे सर्किट होते म्हणून २०० रुपयांपर्यंत मागेपुढे न पाहता खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या हाती दोनच पर्याय आहेत. वाट पाहणे किंवा तोटा नोंदवून भांडवल मोकळे करणे. पुढे येणाऱ्या प्राथमिक भागविक्रीकडे नीर- क्षीर विवेकानेच बघितलेले बरे. प्रत्येकच भागविक्रीत गुंतवणूक करण्याची सक्ती अजून नसल्यामुळे नुसते ‘पास’ म्हटले तरी चालते.

‘सेबी’ने काही सधन गुंतवणूकदारांना मान्यता देण्याचे (accreditation) ठरवले आहे. दोन कोटी रुपयांवर वार्षिक उत्पन्न असलेले किंवा ७.५ कोटीची संपत्ती (त्यातील अर्धी आर्थिक मत्ता असावी) अथवा १ कोटी उत्पन्न व ५ कोटींची संपत्ती (त्यातील अर्धा निवेश आर्थिक पर्यायात) असलेले गुंतवणूकदार यापुढे ‘समंजस’ या नामाभिमानास पात्र व मान्यवर ठरतील. शेअरबाजाराची व भांडवलबाजाराची जोखीम समजून उमजून ते गुंतवणूक करतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी कुठल्याही पर्यायाची किमान गुंतवणूक अर्हता शिथिल करता येईल. कदाचित अशा ‘समंजस’ गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ व्यवस्थापन योजनेत कमी भांडवल गुंतवून सुरुवात करता येईल. (सध्या किमान ५० लाख रुपये गुंतवावे लागतात.) ही मान्यता एक वर्षासाठी असेल. ‘सेबी’ने यावर अभिप्राय मागवले आहेत. असे वर्गीकरण विकसित देशात प्रचलित आहे. थोडक्यात काय, शेअर बाजार गोंधळलेला असताना, बाजाराशी थोडा दुरावा ठेवणे, ‘भाव भगवान है’ ही उक्ती लक्षात ठेऊन चोखंदळपणे खरेदी करणे एवढेच आपल्या हातात आहे.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी.  शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या