हवा हवा ही

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 29 मार्च 2021

अर्थविशेष

फाल्गुन मासात वसंत ऋतू सुरू होतो. शेअरबाजाराचा आपला वसंत एप्रिलमध्येच सुरू होईल असे वाटते.

या हवेचे पाय मी बांधू कसे?
तर्कशास्त्र हे पंगू कसे?
पळत्याला थांब मी सांगू कसे?
लोभाला धीराने बांधू कसे? 

आजकाल मार्केट वर जावो की खाली, काही शेअर्स ऐकतच नाहीत. थोडा खाली आला तर घेऊ असे म्हणता म्हणता ती संधी मिळतच नाही. शेवटी उद्वेगाने वरील चारोळी गुणगुणायला लागते. ‘अदानी एन्टरप्रायझेस’, ‘अदानी पोर्ट’, ‘अदानी पॉवर’, ‘अदानी ग्रीन’ अशी न ऐकणारी नावे! ‘अदानी एन्टरप्रायझेस’ २९ जानेवारीला रु.५०० ओलांडून जो पुढे धावला, तो रोज वाढतच होता. तीन आठवड्यात त्याने रु.८००चा टप्पा ओलांडला. इथे घ्यायची हिंमत गोळा करता करता तो रु.९०० झाला आणि २२ मार्च रोजी हजारी मनसबदार होऊनच थांबला. तीच गत ‘अदानी ग्रीन’ची. सप्टेंबरच्या दोन तारखेला रु.५००च्या टप्प्यातून तो वर आला अन् न थांबता रु.१२२०चा बंद त्याने दोन महिन्यातच दिला. या पातळीवर खरेदी केलेले गुंतवणूकदार आजही पश्चात्ताप करीत आहेत. ‘अदानी पॉवर’ तर याच महिन्यात रु. ६०चा रु.९० झाला. एखादा निर्भीड व निरागस गुंतवणूकदारच येथे पैसे खिशात टाकू शकेल. कारण ‘अदानी पोर्ट’ वगळता इतर शेअर एवढे आकाशात का? याचे कारण पटत नाही. ‘मार्कोम कॅपिटल’ या संस्थेने अदानी समूहाला ‘सोलर वीज निर्मितीची संपदा जगात प्रथम क्रमांकाची आहे’ असे प्रशस्तीपत्रक दिले आहे, तसेच परदेशी संस्थांची मेहेरनजर या समूहावर आहे. (कारण ज्याचे त्यानी शोधावे.) गोरे गुंतवणूकदार वगळता बाजारातील खुले भांडवल (फ्री फ्लोट) कमी आहे, ह्याचीही नोंद घ्यावी.

‘एपीएल अपोलो’, ‘अपोलो ट्रायकॉट’, ‘अॅफल’, ‘डिक्सन’ ह्यांची तेजीची कारणे कळतात, पटतात पण ते कुठल्याही भावात महागच वाटतात. (उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य हे प्रमुख कारण.) अशा वेळी मनाला आवर घालणे अगदीच शक्य नसेल तर मागील आठवड्याचा नीचतम भावाचा स्टॉप लॉस ठेवून खरेदी करता येईल. फारसे तर्कशास्त्राच्या भानगडीत न पडता खरेदी केली तरच ‘fortune favors the brave’ या उक्तीचा अनुभव येईल. स्टॉप लॉसला पर्याय नाही हे मात्र नक्की. 

काहीच दिवसांपूर्वी जलदिन साजरा झाला. मागे याच सदरातल्या एका लेखात जल-नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्यात शिकागो एकस्चेंजमध्ये ‘वॉटर फ्युचर’ सुरू झाल्याची बातमी दिली होती आणि भविष्यात या थीमवर एखादी म्युचुअल फंड योजना सुरू होण्याची शक्यता वर्तवली होती. बोलाफुलाला चक्क गाठ पडली. ‘बीएनपी पारीबा फंडा’ने  नुकताच 'ॲक्वा फंड’ योजला आहे. त्यातील  गुंतवणूक योग्य राहील असा अंदाज आहे.  थीम फंड असल्यामुळे जोखीम अधिक आहे, त्यामुळे गुंतवणूक आपल्या फोलिओच्या ३ ते ४ टक्क्यांहून अधिक नसावी.  

नवी भागविक्री पूर्ण भरात आहे. ‘बार्बेक्यू नेशन’ने आपला १०.७६ टक्के भागहिस्सा ‘ज्युबीलंट फूड’ला जानेवारीत २५२ रुपयांना विकला. दोनच महिन्यात सामान्य भाबड्या गुंतवणूकदारांना यासाठी ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यातही मेंढीधाव पद्धतीने गुंतवणूक होईल. नवीन भागविक्री तारतम्य वापरून काही प्रमाणात ऑप्शनला टाकावी असे मागे त्यासाठीच सुचवले होते. 

मार्चच्या १५ तारखेला १५ हजारच्या पातळीला स्पर्श केल्यानंतर निफ्टी सरपटत खालीच येते आहे. लागोपाठ पाच दिवस खालचा बंद दिल्यावर १९ तारखेला थोडी तेजी झाली. अर्थात त्याने फारसे उल्हसित व्हायचे कारण नाही. आपला ट्रेडिंग बँड निफ्टी चटकन सोडणार नाही असे वाटते. मार्च महिना हा गेली अनेक वर्षे ‘पडेल’ महिना म्हणून गणला जातो. तो आता संपत आला आहे. मार्चची वायद्याची अखेर २५ तारखेला आहे. फाल्गुन मासात वसंत ऋतू सुरू होतो, आपला वसंत एप्रिलमध्येच सुरू होईल असे वाटते.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या