खडाखडी

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 5 एप्रिल 2021

अर्थविशेष

तांबड्या मातीत दोन पैलवान जेव्हा एकमेकांना भिडतात तेव्हा पहिला काही काळ खडाखडीत, प्रतिस्पर्ध्याची शक्ती अजमावण्यात जातो. हा वेळ प्रेक्षकांच्या नजरेतून अत्यंत कंटाळवाणा असतो. तसेच काहीसे शेअरबाजाराचे झाले आहे. तेजीवाले आणि मंदीवाले एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

मागील आठवड्यात पहिले चार दिवस मंदीवाल्यांचे वर्चस्व होते, शुक्रवारी तेजीवाल्यांनी तलवार उगारली. पण अजून कुस्ती संपलेली नाही. जोपर्यंत कोविडचा जोर भीती दाखवत आहे, तोपर्यंत मंदीवाल्यांना आशा आहे. आपल्या दृष्टीने हे कन्सॉलीडेशन चालू आहे. बोलता बोलता ‘पडेल’ मार्च महिना संपला. एप्रिल महिन्याची वायद्याची सुरुवात ३० मार्चला होत आहे. हा आठवडा तीनच दिवसांचा असल्यामुळे खरी रंगत ५ एप्रिल नंतर येईल. पुढच्या १४ तारखेला इन्फोसिसचे निकाल जाहीर होतील आणि त्यापाठोपाठ इतर कंपन्यांचे. हे निकाल वरील सामन्याची तिसरी बेल वाजवतील. हा झाला शॉर्ट टर्म दृष्टिकोन.

हे कन्सॉलीडेशन किती दिवस चालेल याचा अंदाज थोडा कठीण आहे. पण दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिल्यास बाजाराला पुढील वरचा टप्पा गाठायचा आहे हे लक्षात येते. लग्नाच्या पंगतीचे भरपेट जेवण झाल्यावर संध्याकाळी पटकन भूक लागत नाही तसेच. गेल्या वर्षात निर्देशांक जवळपास दुपटीने वाढल्यामुळे, ही वाढ पचवायला; या पातळीची सवय व्हायला काही काळ जाऊ द्यावा लागेल. गेल्या वर्षी जीडीपी जरी ८ टक्क्यांनी आकुंचन पावला असला तरी बाजारातील बिनीच्या १०० शेअर्सची (TOP 100) नक्त मिळकत सरासरी ५ टक्क्यांनी वाढली आहे. आता तर ‘फीच’ या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने पुढील वर्षी भारतीय जीडीपीची वाढ १२.८ टक्क्यांनी होईल अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची आगेकूच सुरूच आहे. कोविड असो वा नसो ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राला चांगलेच दिवस असतात. औषध उद्योग पुन्हा डोके वर काढत आहे. रसायन निर्मात्यांची चंगळ इतक्यात थांबणार नाही. ‘रिलायन्स’ आज ना उद्या पुढे वाट काढेलच. पोलाद निर्माते इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांच्या उभारणीत आपला मोठा वाटा देत आहेत. ‘टाटा स्टील’, ‘जेएसडब्ल्यू स्टील’ व इतर याच क्षेत्रातील शेअर्समध्ये नि:संशय तेजी आहे. मग थोडी वाट बघावी लागली तर काय वाईट वाटून घ्यायचे? उलट टप्प्याटप्प्याने खरेदीची संधी मिळतेय हीच आनंदाची बाब. 

सव्वीस मार्चला संपलेल्या आठवड्यात निर्देशांक १४,२५० ते १४,८०० च्या दरम्यान घुटमळत होता. अजूनही पुढील काही दिवसात निफ्टी १३,७००ची पातळी दिवसभराच्या प्रवासात स्पर्शेल की काय ही भीती कायम आहे. तसे झाल्यास ती एक सुवर्णसंधी असेल. वर निर्देशित केलेल्या क्षेत्रातील आपल्याला आवडतील ते शेअर विकत घेण्याचा जरूर विचार करावा. 

भारत वगळता आशियायी बाजार चांगले चालले आहेत. इंग्लंडमधील लॉकडाउन उठला आहे. तिथे लसीकरणही ८० टक्के झाले आहे. अमेरिकेतही कोविड बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. चीनला तर कोविडची भीती वाटते की नाही तेच कळत नाही. युरोप व दक्षिण अमेरिका हे खंड बरेच बाधित आहेत. भारतातही रोज मोठ्या संख्येने रुग्ण नोंदवले जात आहेत. महाराष्ट्रात व पंजाबमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. पण लॉकडाउन न करता कडक निर्बंध लादून ही दुसरी लाट आटोक्यात आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत असे दिसते. आपला बाजार थंडावलेला असण्याचे ते एक प्रमुख कारण आहे.

‘टीव्हीएस मोटर’चे चेअरमन श्रीनिवासन पुढील वर्षी पायउतार होत आहेत. त्यांची जागा ‘जेएलआर’चे पूर्वाश्रमीचे प्रमुख राल्फ स्पेथ घेतील. वेणू श्रीनिवासन यांनी हा उद्योग १९८०च्या मुहूर्तमेढी नंतर जागतिक पातळीवर नेला आहे. गेल्या वर्षी इंग्लंड मधील ‘नॉर्टन’ हा मोटर सायकल ब्रॅण्ड टीव्हीएसने विकत घेतला. दुसऱ्या महायुद्धात जवळजवळ एक लाख मोटरसायकल्स ‘नॉर्टन’ने पुरवल्या होत्या. कंपनीच्या ७५० व ८५० सीसीच्या दुचाकी ‘कमांडो’ या नावाने पहिल्या क्रमांकावर होत्या. पुढे आर्थिक अडचणीमुळे कंपनी डबघाईला आली व तो ब्रॅण्ड विकावा लागला. आता हा प्रीमिअम ब्रॅण्ड घेऊन उत्तर अमेरिका व युरोपमध्ये शिरकाव करण्याची योजना स्पेथ ह्यांनी आखली आहे. आजच्या तरुणवर्गात ‘पावरबाज’ वाहने घेण्याचे फॅड आहे. कमीतकमी वेळात प्रचंड वेग घेऊ शकणारी ही वाहने परदेशातील रस्त्यावर किमान २५० कि.मी. प्रती तास या वेगाने धावतात. किमतीकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. हे वेड भारतातही आहेच. त्याचा मागोवा घेत आपली किमान २० टक्के विक्री प्रीमिअम ब्रॅण्डची असावी व पुढील पाच वर्षात विक्रीतील निर्यातीचा वाटा ५० टक्के असावा असे उद्दिष्ट कंपनीने आखले आहे. आज ५७० च्या आसपास असलेला हा शेअर दीर्घ पल्ल्यासाठी छान आहे. 

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मोबाईल गेमिंग कंपनी ‘ड्रीम 11’ ने आपले काही शेअर ४० कोटी डॉलरला विकले. या विक्रीमुळे ‘ड्रीम स्पोर्ट्स’ कंपनीचे मूल्यांकन ३५० अब्ज रुपयांवर गेले आहे. या सदरात वारंवार सुचवलेल्या ‘नझारा टेक’ हा शेअर देखील सूचीबद्ध होताना किमान १५-१६००चा भाव दाखवेल. ज्याला लॉटरी लागली असेल त्याने तिकीट सांभाळून ठेवावे.  

‘टेन सेंट’ कंपनीने नुकतेच आपले निकाल जाहीर केले. चिनी सरकारच्या दबावाखाली केलेल्या बदलाचा यत्किंचितही परिणाम न होता तिने विक्रीत २६ टक्के वृद्धी दाखवली आहे. ‘अलिबाबा’ आणि ‘टेन सेंट’ आदी कार्पोरेटचा गगनव्यापी उत्कर्ष सतत सलत असल्यामुळे अनेक बंधने तेथील नियामकांतर्फे घालून देखील विक्री व नफा वाढताच आहे. गेमिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असल्यामुळे तिचा विचार आपल्याकडे येणाऱ्या गेमिंग व फिनटेक क्षेत्रात महत्त्वाचा ठरतो.

सुवेझ कालवा काही काळ वाहतुकीसाठी बंद राहिल्याने आशिया व युरोप मधील दळणवळण स्थगित झाले होते. या काळात जागतिक व्यापाराचे तासाला ४० कोटी डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. युरोपमधल्या सर्वच कारखान्यात JET (Just in time) पद्धतीने माल पुरवठा होत असल्यामुळे तेथील उत्पादन खंडित झाले होते, परिणामी कच्चे तेल, शिपींग आणि वाहन उद्योगाला याचा थोडाफार फटका बसेल हे निश्चित. कोविड्ग्रस्त अर्थव्यवस्थेला हा आणखी एक फटका आहे. धुळीच्या वादळामुळे भरकटलेल्या ह्या महाकाय जहाजाने अर्थकारणावर पुरते गंभीर परिणाम व्हायच्या हा प्रश्न सुटला ही आनंदाची बातमी.

मित्रहो, शेअरबाजारात पाय रोवून उभे राहिले आणि चांगले व्यवस्थापन असलेले शेअर सांभाळले तर भांडवल नक्की  वाढते हे समजूनच गुंतवणूक करावी

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या