सापशिडीचा खेळ...

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 12 एप्रिल 2021

अर्थविशेष

गेला आठवडा तीनच दिवसांचा होता. निफ्टीने, १ एप्रिलला १४८००च्या वर बंद देऊन आशा पल्लवित केल्या खऱ्या; पण ही खडाखडीच चालू आहे हा कयास बरोबर ठरला. तेजीवाले आणि मंदीवाले ह्यांचे युद्ध पुढील राउंडला गेलेय.

मागील आठवड्यात लिहिल्याप्रमाणे शेअरबाजार लॉकडाउनला टरकून असतो. लॉकडाउन असे न म्हणता सरकार कडक निर्बंध घालत आहे. असे असले तरी बादशहाचा पोपट मेला आहे हे बाजाराने ओळखले आणि म्हणूनच सोमवारी बाजार कोसळले. जोपर्यंत कोविडचे संकट वाढतेय तोपर्यंत मंदीवाल्यांचा जोर कायम राहणार हे नक्की. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. सबब अजूनही हा सापशिडीचा खेळ चालूच राहील असे दिसते. आनंदाची बाब म्हणजे सोमवारी ५ एप्रिल रोजी निफ्टी १४५०० अंशाच्या वर विसावली. विश्लेषकांचे डोळे आता लसीकरणाचा वेग आणि मार्च अखेरचे तिमाही निकाल यांकडे लागले आहेत. त्या आशादायक बातम्यांनी तेजीवाल्यांना स्फुरण चढेल.

गेले सहा महिने आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्र घोकत आहोत. ‘इन्फोसिस’, ‘एचसीएलटेक’, ‘टीसीएस’, ‘कोफोर्ज’ असे आपले लाडके शेअर सोमवारी सेन्सेक्स १००० अंश खाली घसरूनदेखील वरच होते. तीच कथा पोलाद निर्मात्यांची व इतर अलोह धातूंची. ‘सेल’, ‘टाटा स्टील’, ‘जेएसडबल्यू स्टील’ प्रभृतींनी वर्षभराचे उच्चांक पुन्हा सर केले. ‘हिंदाल्को’, ‘नाल्को’, ‘हिंदकॉपर’ हेही सारे पुढे सरसावले. सिमेंट उत्पादकही मागे राहिले नाहीत. तसेच ‘अतुल’, ‘नवीन फ्लोरिन’, ‘दीपक नायट्राईट वगैरे रसायन क्षेत्रातील उद्योग नवनवे उच्चांक करीत आहेत. या क्षेत्रांकडे पाहताना उरलेल्या बाजाराने पायाशी घेतलेली लोळण बोचत नाही. शेअरची अचूक निवड किती महत्त्वाची आहे हेच यातून अधोरेखित होते. असो. निवडलेल्या क्षेत्रातील समभाग विकत घेऊन स्वस्थ बसणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्टॉपलॉस थोडे खोलवर ठेवले आणि बाजाराच्या हालचालींपासून हाताच्या अंतरावर दूर राहिले तरच भीती दूर होईल. काही काळ मंदीचा विचार दूर ठेऊ. पुढील तीन ते सहा महिने हातातले भांडवल थोडे थोडे गुंतवत राहिले आणि किमान तीन वर्षांच्या पुढचा वेध घेतला तर सारे काही सोपे वाटेल. मित्रहो, मंदी अवघड असली तरी तिचा अहोरात्र विचार जास्त अवघड आहे. बाजार खाली येण्याचीच आपण वाट पाहात होतो ना? मग आता पाऊल मागे का? आपापल्या जोखीमक्षमते प्रमाणे काही काळ वाट पाहायलाही हरकत नाही. १३७०० ते १४५०० या टप्प्यात खरेदी केली आणि १६०००च्या निफ्टी पातळीचे टार्गेट ठेवले तरी मुदतठेवी पेक्षा अधिक परतावा मिळेल. 

मार्च महिन्याचे जीएसटीचे संकलन एक लाख चोवीस हजार कोटींवर गेले आहे.  व्यक्तिगत प्राप्तिकर संकलनाने एक सुखद धक्का - २.५ टक्के वृद्धी -सरकारला दिला आहे. कॉर्पोरेट कराचा महसूल जरी ६ टक्के कमी असला तरी त्याला वेगळी पार्श्वभूमी आहे. परदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी २०१९ साली त्यात मोठी कपात केली होती.

गुंतवणूकदारांच्या मनातील मुख्य धाकधूक म्हणजे मार्च २०२० ची पुनरावृत्ती होईल का? या प्रश्नाला साधे सोपे उत्तर नाही. एकतर, वर्षापूर्वी कोविडबद्दल भीती जास्त होती; भिती आताही आहे मात्र मृत्यूदर  कमी आहे. लस आली नव्हती, आता आली आहे, लसीकरणही चालू झाले आहे. विकसित देशांनी त्यावेळी अर्थव्यवस्थेत मोठे भांडवल ओतले नव्हते,  आता तसे नाही, मोठे भांडवल आत आले आहे. चीनला एक पर्याय म्हणून भारतीय उत्पादने जगभर विकली जात आहेत. व्याजदर लगेच वाढणार नाहीत. आपण वेळोवेळी नफा ताब्यात घेतला आहे. आता निफ्टी आणि सेन्सेक्सची १३७५० किंवा ४६००० ही पातळी, तंबूत फारच घबराट झाली तरच  येऊ शकते, हे गृहीत धरून खरेदी करावी. तरच भांडवल वृद्धी होईल. वेळ आपल्या हातात आहे. वर्ष नाही तर दीड वर्ष, अंतिम विजय गुंतवणूकदाराचाच आहे.  

तेजीत पैसे मिळवायचे असतील तर मंदीत पाय रोवून उभे राहता आले पाहिजे व हिम्मतीने खरेदी करता आली पाहिजे. नाहीतर शेअरबाजार पायाशी लोळण घेईल आणि आपण आणखी खाली यायची वाट बघत बसू. तो पुढे वाढला तरी आपण तेथेच बसलेले असू. कविवर्य नीरज ह्यांनी कदाचित असे म्हटले असते:

लुट गए सिंगार सभी बाग़ के बबूल से
और हम खड़े-खड़े, दिलसे भी डरे डरे 
बजार की चढाव का, उतार देखते रहे
कारवां गुज़र गया गुबार देखते रहे!
***

आपला शेजारी देश पाकिस्तान सध्या त्रस्त आहे. त्यांच्या निर्यातीचा ६० टक्के हिस्सा असणारा कापड उद्योग अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे आणि कीड लागल्यामुळे कापसाचे उत्पादन २० टक्क्यांनी घटले आहे. त्यांना कापसाची आयात दूरवरून इजिप्त सारख्या देशातून करावी लागते. त्यात तेथील महागाई प्रचंड वाढली आहे. पूर्वी भारताबरोबर करमुक्त व्यापार चालायचा, पुलवामा हल्ल्यांनंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला आहे. आपण १९९६ पासून पाकिस्तानला (एकतर्फी) हा दर्जा देऊन करमुक्त वा अल्पकरात निर्यात करीत असू. त्यांनी मात्र भारताला तसा दर्जा दिला नाही. आज पाकिस्तान सर्वच बाजूने कात्रीत सापडला आहे. भारताकडून व्यापार व इतर सवलती हव्या आहेत, पण काश्मीर प्रकरणी भारताची भूमिका मान्य करायची त्यांची तयारी नाही. सीमेवरील आतंकवाद थांबल्याशिवाय कुठलीही सवलत देणार नाही असा सज्जड इशारा मिळाल्यामुळे, पाकिस्तानचे पूर्व उच्चायुक्त अश्रफ जहांगीर काझी यांनी नुकतीच शिष्टाईला सुरुवात केली. आपल्या व्यापाराचा जेमतेम एक टक्का इतकाच हिस्सा या शेजारी देशाबरोबर असल्यामुळे आपल्याला फारसा फरक पडत नाही. पाकिस्तानच्या कापडउद्योगाचे संकट आपल्या पथ्यावर पडू शकते. ‘वेलस्पन इंडस्ट्रीज’ टॉवेल व इतर गृहसजावटीची  वस्त्रे निर्यात करते. अमेरिकेत भारतीय वस्त्रांवरील आयातकर १० टक्के तर चीनसाठी १५ टक्के आहे. आपल्या रडारवर ठेवण्यासारखा हा शेअर आहे. मार्च अखेरच्या तिमाही निकालानंतर खरेदीचा निर्णय घ्यावा.

‘बजाज फायनान्स’ने नुकताच आपला तिमाही आढावा (निकाल नव्हे) स्टॉक एक्स्चेंजला पाठवला. नेहमी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारा विद्यार्थी काठावर पास झाला असे बाजाराला वाटल्यामुळे हा समभाग या पत्रानंतर ५.४ टक्के घसरला. ही पडझड संधी मानून ४९५० ते ४६५० या दरम्यान जरूर गुंतवणूक  करावी. मागे वरच्या पातळीवर केली असल्यास वाढवावी. कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता एक लाख त्रेपन्न हजार कोटीवर पोहोचली आहे. जेमतेम ४ टक्केच वृद्धी असली तरी समाधानकारक समजायला हरकत नाही. कंपनीचे नवे कर्जवाटप कमी झाले आहे. तरीही मार्च तिमाहीच्या निकालानंतर पुढील अंदाज चांगले बांधता येतील. काही वाचकांनी विचारले आहे की ह्या सदरातले लेख वाचेपर्यंत अनेक शेअरचे भाव हातातून निघून जातात. काय करावे? प्रश्नाला उत्तर असे की थोडा संयम ठेवल्यास भाव मिळतात. आता ‘हवा हवा ही’ (सकाळ साप्ताहिक ३ एप्रिल) या लेखातील ‘अडानी पोर्ट’चेच उदाहरण घेऊ. लेख प्रसिद्ध झाल्यानंतरही मार्केटच्या धामधुमीत हा शेअर ७१५ रुपयांना मिळत होता. असो. 

सापशिडीचा खेळ लवकर संपून शेअरबाजाराला दिशा मिळावी हीच प्रार्थना.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला 
घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या