दिसं जातील, दिसं येतील

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

अर्थविशेष

शेअरबाजार गुंतवणूकदारांना स्थितप्रज्ञाच्या अवस्थेला नेऊन ठेवतो. संयमाची पुन्हा पुन्हा परीक्षा देऊन शेवटी हे असे का आहे याचा विचार करणे गुंतवणूकदार सोडून देतो. चांगले समभाग मंदीत घ्यायचे, सांभाळायचे आणि तेजीत विकायचे इतका सोपा फॉर्म्युला आहे. पण आचरणात आणायला केवढा कठीण! कारण विकल्यावर शेअर जर वर गेला तर आपला नफा पूर्ण मिळाला नाही ही रुखरुख डोके खात राहते, बरं विकला नाही आणि खाली आला, तरी तेच. पुन्हा वाट पाहणे आले. शेवटी सुख दु:ख बाजूला ठेवून शेअरबाजार माझ्यापेक्षा, आपल्या सर्वांपेक्षा, जास्त शहाणा आहे हेच अंतिम सत्य आहे असे लक्षात येते.  

बा रा एप्रिलच्या सोमवारी बाजार खालच्या बाजूला एका गॅपने उघडला आणि खालीच आला. एप्रिलच्या नऊ तारखेचा निफ्टीचा बंद होता १४,८४०. बारा तारखेला २०० अंश खाली येऊन तो १४,३००च्या वर बंद झाला. नंतर आठवडाभर खरेदी चालू होती पण १४८०चा गड काही सर झाला नाही. या सप्ताहाची सुरुवात देखील (ता.१९ एप्रिल) गॅपनेच झाली. गेले महिनाभर आपण ‘खडाखडी’, ‘सापशिडीचा खेळ’, असे म्हणत १४,३०० ते १४,८५० अशी ट्रेडिंग रेंज अधोरेखित करीत आहोत. आणि शेअरबाजारही गेला महिनाभर तरी निफ्टीच्या १४,३०० या पातळीचा सन्मान करीत आहे. खरेदी टप्प्याटप्प्याने १४,३००-१३,७५० या पातळीवर करावी असेही या सदरात वारंवार सुचवले आहे. खरेदी करणे जमले नाही तरी किमान या पातळीवर आपण सांभाळलेल्या ‘ब्लू चिप्स’ ची विक्री तरी करू नये एव्हढीच अपेक्षा आहे.

‘टीसीएस’ व ‘इन्फोसिस’ पासून मार्च तिमाहीचे निकाल येण्यास सुरुवात झाली. ‘माझे बाबा इतके उंच आहेत की त्यांचे डोके आभाळाला टेकते’, या प्रकारचा आत्मविश्वास कधी कधी अपेक्षाभंग करू शकतो. ‘इन्फोसिस’ आणि ‘टीसीएस’च्या निकालानंतर असेच झाले. या निमित्ताने नव्या गुंतवणूकदाराला पडणारे कोडे सोडवून बघू. उत्कृष्ट निकाल असताना व पुढील अंदाजही छान दिला असतांना हे शेअर पडलेच कसे? विश्लेषक याची अनेक कारणे देऊ शकतील; नवे करार कमी झाले, नफा १७ टक्केच वाढला, कंपनीतर्फे शेअर्सची पुनर्खरेदी अंदाजापेक्षा कमीच आहे. अशी थातूरमातूर कारणे देत शेअर निकालाच्या दिवशी ६ टक्के व एकूण ११ टक्के पडला. खरं तर या वर्षी कंपनीने एक लाख कोटी रुपयांवर विक्री करून दाखवली, एकूण १४ हजार कोटी रुपयांचे नवे करार केले (कंपनीच्या इतिहासात सर्वोच्च). या सर्व बातम्यांकडे बाजाराने पूर्ण दुर्लक्ष केले. ही आपल्यासाठी संधी नव्हे तर काय ? 

आता थोडे मागे जाऊन बघू. ‘इन्फोसिस’चे डिसेंबर तिमाहीचे निकाल १३ जानेवारी रोजी बाजार संपल्यावर घोषित झाले. बाजार संपतांना भाव होता रु.१३८७! हा शेअर २२ डिसेंबर पासून वरच जात होता (२२ डिसेंबरचा भाव रु.१२२०) निकालाआधी भरपूर तेजी झाली होती, त्यामुळे अल्पावधीत मिळाला तेवढा नफा ट्रेडर्सनी खिशात टाकला. सबब निकाल चांगले असूनही शेअर पडला. निकालानंतर दोन सप्ताह पडझड चालू होती. ती २९ जानेवारी रोजी रु.१२४०च्या भावाला थांबली. पुढे नफा अधिक चांगला होईल ह्या अपेक्षेने शेअर पुन्हा १२ एप्रिल पर्यंत १५० रुपयांनी वाढून १४७७ ला टेकला. ‘तुझ्या  परीक्षेचा निकाल लागेल तेव्हा मी घरी नसेन...’ म्हणून मुलाला आधीच चोप देणाऱ्या बापासारखे, बाजाराने इन्फोसिसला वागवले. यावेळी मार्च अखेरचे तिमाही निकाल जाहीर होण्याची वेळ होती १४ एप्रिल. बातमी आधीच शेअर घसरून रु.१४७७ चा रु.१३९७ ला येऊन थांबला कारण चौदा तारखेला बाजार बंद होता. सहसा निकालानंतर नफेखोरीमुळे भाव खाली येतात. तसा एक दोन आठवडे रु. १३००-१३२० ला अडखळून हा शेअर पुन्हा वरच जाणार हे नक्की ! ‘विप्रो’च्या बाबतीत अगदी उलट घडले. फार मोठ्या अपेक्षा नसताना नफा २८ टक्के वाढला. नवे करार, कापको कंपनीचे आग्रहण आदी बातम्या शेअरला नव्या उंचीवर घेऊन गेल्या. अपेक्षा आणि अपेक्षाभंग यावर बाजारभावाची अल्पकालीन वधघट अवलंबून असते हे आपल्या चाणाक्ष वाचकांना आतापर्यंत कळलेच आहे. 

मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार बाजूला ठेवला तर तेजीतल्या माहिती तंत्रज्ञान व औषध उद्योगाच्या शेअर्समध्ये असे अनेक झोके (SWINGS) मिळतात, त्याचा फायदा घेऊन अल्पकालीन ट्रेडिंग करता येणे शक्य आहे. उदाहरणार्थ १४,३०० ते १४,८०० व परत हा निफ्टीचा स्विंग ट्रेड होऊ शकतो. तसेच १२३० ते १३७० अन नंतर १२५० ते १४००, त्यापुढे १३२० ते १४५० असे तीन स्विंग ट्रेंड ‘इन्फोसिस’ने गेल्या चार महिन्यात दिले. डिलिव्हरी उचलण्याची क्षमता व अचूक निर्णय, तसेच आलेखाचे ज्ञान त्यासाठी आवश्यक आहे. हे स्विंग ट्रेडस अत्यंत जोखमीचे असल्यामुळे यापूर्वी कधी सुचवलेले नाहीत.

कोरोनाच्या संदर्भात माध्यमांतून ज्या बातम्या प्रसृत होत आहेत त्या चिंता वाढविणाऱ्या आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे कोरोनाच्या प्रसारासंदर्भात दोन महिन्यात होणारी शिखरावस्था व नंतरचा उतार हा सर्वसामान्य नियम मानला पाहिजे. सोप्या शब्दात सांगायचे तर एप्रिल अखेरपर्यंत महाराष्ट्रात व मे अखेरपर्यंत पंजाब, दिल्ली व मध्यप्रदेशातील दुसरी लाट आटोक्यात येऊ शकते. ही ‘शक्यता’ आपले भय कमी करू शकते. या दरम्यान आपण जर इंग्लंडचे अनुकरण करून लशींची आयात व उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवले तर कोविडवर विजय सहज शक्य आहे. केट बिंग्हॅम ह्यांनी इंग्लंडमध्ये जो चमत्कार घडवला त्यात लस निर्मात्या प्रत्येक कंपनीला काम देणे व लोकसंख्येच्या पटीत लस निर्माण करणे ही मुख्य व्यूहरचना होती. अमेरिकेनेही तेच केले. पुढे आलेल्या प्रत्येक लस निर्मात्यांना प्रथम भरपूर भांडवल पुरवठा केला आणि नंतर तसे कंत्राट दिले. आपणही असे करू शकतो. सुरुवात म्हणून ‘हाफकिन’, ‘इंडियन इम्युनॉलॉजीकल’, तसेच ‘बिबकॉल’ आदी लस निर्मितीसक्षम उत्पादकांची चाचपणी चालू आहे. फरक इतकाच की आपले प्राधान्य स्वदेशी निर्मितीला आहे. कोरोनाचा हाहाकार जर वाढला तर सरकारला विदेशी लस आयातीचे पाऊल उचलावे लागेल. तशी ‘स्पुटनिक’ या रशियन लशीला मान्यता देऊन सुरुवात झालीच आहे. 

अमेरिकेने व ब्रिटनने कोविडवर मात करत अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कंबर कसली आहे. चीन तर १८ टक्के जीडीपी वृद्धी दाखवीत आहे. मग आपले ध्यान ‘टाटा मोटर’कडे वळवायला हवे. (‘जेएलआर’चे प्रमुख ग्राहक अमेरिका, ब्रिटन आणि चीन याच तीन देशात आहेत). त्यात टाटा समूह देखील आपली मालकी टक्केवारी वाढवीत आहे. तीनच महिन्यात किंवा त्याआधी देखील या शेअरला उभारी येऊ शकते. पुढील पंधरा दिवस /महिनाभरात या शेअर खरेदीची छान संधी असेल. रु. २८० ते ३०० ही पातळी त्यासाठी चांगली आहे.  

अर्थव्यवस्थेसाठी दुसरे मोठे आव्हान आहे प्राणवायूचा पुरवठा. इस्पितळांनाच प्राणवायू कमी पडतोय तेव्हा उद्योगांना तो कसा मिळणार? वाहन उद्योग आधीच सेमी कंडक्टर चिप्सच्या मर्यादित पुरवठ्यामुळे त्रस्त आहे. त्यात ही नवी अडचण. सरकारने ५०हजार मेट्रिक टन प्राणवायूची आयात केली आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यात पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. तसेच देशांतर्गत असलेला साठा गरजेप्रमाणे पुरवणे यासाठी सरकार रेल्वे वाहतुकीची मदत घेत आहे. एप्रिल अखेरपर्यंत परिस्तिथी आटोक्यात यावी. एकामागून एक राज्य लॉकडाउन घोषित करीत आहे. त्याचाही परिणाम बाजारावर होतोच आहे. गेले महिनाभर शेअरबाजारात नवीन काही घडत नाही असे दिसते. बाहेरील घटनांचा ताण बाजार व्यक्त करतोय. बिरबलाच्या सल्ल्याप्रमाणे ‘हेही दिवस जातील’ ही आशाच तेजीवाल्यांची तारणहार आहे.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या