झुंजुमुंजु झालंय, तांबडं फुटलंय

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 3 मे 2021

अर्थविशेष

पहाट व्हायची वेळ झालीय. इतक्या दिवसांची खडाखडी आता संपेल असे दिसते.

ज्या  दिवशी देशात कोरोनाबाधितांच्या संख्येचा उच्चांक होईल आणि तेथून उतार पडून लाट ओसरायला सुरुवात होईल; मग ती संख्या कितीही भीतीदायक असो, बाजार तेथून मागे वळून पाहणार नाही, असे तज्ज्ञ म्हणतात! पण हे होणार कधी? उत्तर कठीण आहे. प्रयत्न करू; आज नव्या रुग्णांचा रोजचा आकडा तीन लाखांवर आहे. तो चार ते पाच लाखांवर जाईल असा अंदाज आहे. पुणे, मुंबई व ठाणे येथील नवी रुग्ण संख्या उताराला लागली आहे. या तिन्ही शहरांतील बाधितांच्या आलेखावरून, संख्याशास्त्रीय अंदाजाप्रमाणे बहुधा मे महिन्याचा मध्य वा मे महिन्याची अखेर असे ते संभाव्य उत्तर येते. आजमितीला १४ कोटी नागरिकांना लस देऊन झाली आहे. एक मे नंतर लसीकरणाचा वेग वाढेलच. परदेशात लशीच्या किमतीचा विचार करताना लस निर्मात्यांना अनुदान वा आगावू भांडवल देण्यात येते, आपल्याकडे त्यावर घासाघीस चालू आहे. पण शेअरबाजार स्मार्ट आहे, हे सर्व जाणून बाजाराने स्वतःचा अंदाज कधीच बांधला आहे.  मे महिन्याच्या मध्यापर्यंत थांबल्यास कदाचित निफ्टी १५००० पार करून गेली असेल. असो. 

‘‘मेरे पास गाडी है, बंगला है, दौलत है; तुम्हारे  पास क्या है?’’

‘‘मेरे पास मां है!’’

‘दिवार’ चित्रपटातील हा जगप्रसिद्ध संवाद आठवण्याचे कारण म्हणजे, तेजीवाल्यांकडे आज जागतिक बाजाराची तेजी आहे, अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल आहेत, कमी झालेले व्याजदर आहेत, प्रचंड प्रमाणात आलेला पैसा आहे, मार्केट ब्रेड‌्थ आहे (वर जाणाऱ्या शेअरची संख्या खाली जाणाऱ्या शेअरपेक्षा अधिक आहे), ‘इंडिया विक्स’ आहे, येणारा चांगला मान्सून आहे आणि तुलनेने मंदीवाल्यांकडे फक्त आणि फक्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आहे. तरीही ते वरचढ होतील की काय अशी शंका बाजाराला, विश्लेषकांना आणि गुंतवणूकदारांना वाटतेय. तसे झाल्यास निफ्टीची १३७५० ही पातळी अटळ आहे. पुन्हा पुन्हा पुनरावृत्तीचा दोष पत्करून १४३०० ते १३७५० या पातळीवर शेअर्सची खरेदी करावी अशी आमची शिफारस आहे. 

गेल्या १९ एप्रिल रोजी शेअरबाजाराने त्या आधीच्याच सोमवारची पुनरावृत्ती केली. सोळा एप्रिलचा १४६१७चा ‘निफ्टी’चा वरचा बंद पूर्णपणे झुगारून देऊन एका गॅपनेच बाजार उघडला आणि खालीच आला. मात्र पुन्हा एकदा ‘निफ्टी’चा बंद १४३००च्यावर नोंदवला गेला. मार्चच्या २५ तारखेपासून, जवळजवळ महिनाभर, बाजार या लक्ष्मणरेषेचा मान ठेवतोय, हे चाणाक्ष गुंतवणूकदारांनी ओळखलेच असेल. एप्रिलच्या २२ तारखेला तंबूत घबराट होऊन १४१५१चा तळ (Intra Day) आपल्याला दिसला खरा, पण बंद मात्र १४३०० या पातळीच्या वरचाच लागला. दुसऱ्या दिवशी २३ तारखेला फारशी वधघट न होता बाजार संपला. एकीकडे कोविड बाधितांची संख्या वाढत होती, त्यात माध्यमांमध्ये, समाजमाध्यमांमध्ये खास करून व्हॉट्सअॅपवर प्राणवायू, औषधे व इस्पितळातील खाटांचा तुटवड्यावरून आक्रोश सुरू होता. त्यातून निर्माण होणारी घालमेल गुंतवणूकदारांना बाजारापासून दूर लोटत होती अन् दुसरीकडे एका मागून एक तिमाही निकाल अपेक्षापूर्ती करीत होते. थोडक्यात काय तर वेडी आशा आणि अज्ञाताचे भय ह्या हिंदोळ्यावर बाजार हेलकावत होता. 

शनिवारी (ता. २४ एप्रिल)  ‘आयसीआयसीआय बँके’चे तिमाही निकाल जाहीर झाले. बँकेने सर्वांगीण प्रगती दाखवली. सर्व विश्लेषकांच्या, ‘ब्लूमबर्ग’ संस्थेच्या अंदाजापेक्षा वरचढ नफा, वरचढ व्याजाचे उत्पन्न, खर्चात कपात, आणि अनार्जित कर्जांची कमी झालेली टक्केवारी तसेच सात लाख चौतीस हजार कोटी रुपयांच्या कर्जवाटपावर किमान १.५१ टक्के नफा होईल असा विश्वास व्यवस्थापनाने दिला. निकालाची ही बातमी गुंतवणूकदारांच्या गालावरून मोरपीस फिरवून गेली. निराशेने बाजारात होणारा विक्रीचा मारा कदाचित थांबेल अशी आशा या निकालाने दिली. गेल्या सोमवारी (ता.२६ एप्रिल) बाजारानेही कुठलाच अपेक्षाभंग न करता तेजीचेच संकेत दिले. 

शेअरबाजाराने अल्पकालीन तळ दाखवला आहे हे नक्की. आता बाजार सरळ वर जाणार का? सहसा असे होत नाही. बाजार खाली येतानाही रेंगाळत येतो, मधे मधे शॉर्ट कव्हरिंग होते, थोडासा वर गेल्याचा भास होतो आणि पुन्हा तो खालची वाट धरतो. धारणा मंदीची असली तरी संयम ठेवल्याशिवाय मंदीतही पैसे होत नाहीत. त्यासाठी सतत वाईटसाईट बातम्यांचा रतीब लागतो. याला अपवाद फक्त ‘ब्लॅकस्वान’ घटनांचा. अशा वेळी मात्र  मुसंडी मारून बाजार खाली येतो. 

याच्या अगदी उलट परिस्थिती तेजीत होते. धारणा तेजीची असली तरी ‘पंटर्स’च्या मनात धाकधूक असतेच. त्यामुळे प्रत्येक पातळीवर नफेखोरी होते. चांगल्या बातम्या, चांगले निकाल सतत यावे लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारांचीही साथ लागते. त्यात मधे मधे बातम्यांचे गतिरोधक येतात, ते पार करण्यासाठी पुन्हा संयम लागतो. एकदा का आपल्याला योग्य वाटणाऱ्या गुंतवणूकजन्य क्षेत्राची व त्यातल्या शेअरची निवड पक्की केली की ह्या प्रत्येक गतीरोधकाचा उपयोग करून खरेदी करता येते. इथून पुढे कोविडमुळे किंवा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालांमुळे बाजार तात्पुरता खाली येऊ शकतो, तीच आपली संधी आहे. 

पोलाद व अलोह धातूंमधील संधी अनेकदा वाचकांच्या नजरेत आणून दिल्या आहेत. ‘वेदांत’ हा शेअर १०० टक्के लाभांश पोटात असताना १०० रुपयांवर सुचवला होता, तो आज २४३ रुपये आहे. ‘टाटा स्टील’, ‘जेएसडब्ल्यू स्टील’ तसेच ‘एपीएल अपोलो’, ‘हिंदाल्को’ आदी शेअर्स सुचवल्यापासून वरच जात आहेत. संधी अजूनही गेली नाही. ‘टाटा स्टील’चा शेअर गेल्या १५ जानेवारीला सुचवला, त्याने १९ तारखेला ६०० रुपयांचा भाव दाखवला, त्यानंतरही १९ एप्रिलला ८५०-८६० ला मिळत होता, आज रु.९७७ आहे. तीच गत रसायन क्षेत्राची. सतत सांगितलेला नवीन ‘फ्लोरिन’ ३० मार्च रोजी रु.२४५० होता, आज रु. ३३५० आहे. तात्पर्य एव्हढेच की बाजारभावाकडे लक्ष ठेवून खरेदीसाठी अचूक वेळ साधणे. असो.

अत्यंत महत्त्वाचे असे काही निकाल या आठवड्यात अपेक्षित आहेत. ‘बजाज फायनान्स’, ‘एचडीएफसी लाइफ’, ‘अॅक्सीस बँक’, ‘सिन्जीन’, मारुती, ‘ब्रिटानिया’, ‘एचडीएफसी’ ‘एएमसी’, ‘एबीबी’, ‘हिंद झिंक’, ‘सिम्फनी’, ‘टीव्हीएस मोटर’, ‘सनोफी’, ‘युनायटेड ब्रुवरीज’ अशा विविध क्षेत्रांच्या प्रगतीचा त्यातून अंदाज येईल. बाजार सरळ तेजीत जाईल की एका टप्प्यात (रेंज बाउंड) चालेल याचा फैसला हे तिमाही निकाल व निकालादरम्यान जाहीर होणारे पुढील अंदाज देतील.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला 
घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या