मी अभिमन्यू की अर्जुन?

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 31 मे 2021

अर्थविशेष

महाभारताच्या युद्धाची कहाणी सर्वश्रुत आहे. कौरव सैन्याने युद्धात एक दिवस चक्रव्यूहाची रचना केली होती. तिचा भेद करून सहीसलामत बाहेर पडण्याची कला व ज्ञान फक्त आणि फक्त अर्जुनाकडे होते. नेमका त्यावेळी अर्जुन दुसरीकडे लढत होता. अभिमन्यूला चक्रव्यूहाचा भेद करणे माहीत होते, पण त्याला बाहेर येता येत नव्हते व आलेही नाही. 

चक्रव्यूह भेदल्यावर चक्रव्यूहाबाहेर पडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे बिटकॉइन व इतर आभासी चलनांचे नुकतेच झालेले पानिपत. हजारो अजाण गुंतवणूकदारांचे झालेले नुकसान आता बरेच दिवस माध्यमांना शिदोरीसारखे पुरेल. रोजच नवे नवे तज्ज्ञ, या भावात आभासी चलनात गुंतवणूक करावी किंवा नाही याचा ऊहापोह करतील. महत्त्वाची बाब अशी की हे आभासी चलन आहे व याचा पुरवठा मर्यादित आहे, हीच काय ती जमेची बाजू! बिटकॉइन वा इथीरीयम वापरून आता काही खरेदी करणे दुरापास्त. टेस्ला कंपनी जोपर्यंत आभासी चलन स्वीकारत होती तोपर्यंत भाव वर जात होते. यावरून इतिहासातील महम्मद तुघलकाच्या एका प्रयासाची आठवण झाली. एक दिवस सुलतानाने ठरवले की सोन्याच्या मोहरा ऐवजी चामड्याच्या मोहरा वापरूया, तसे त्याने फर्मान काढले व मोहरा निर्माण केल्या. पण बाजारात कोणी चामड्याच्या मोहरा घेऊन वस्तू देईना. सम्राट मात्र चामड्याच्या मोहरा घेऊन त्याजागी सोने देत असे. पाहता पाहता तिजोरीत फक्त चामडेच उरले आणि सोने संपले. आणि शेवटी खजील होऊन सुलतानाने ते फर्मान रद्द केले. या बिटकॉइन बाबतीत काय झाले, चीनने बिटकॉइन व्यवहारांवर बंदी का आणली याच्या तपशीलात न जाता सामान्य गुंतवणूकदाराने या क्रिप्टोकरन्सीच्या नादी सहसा का लागू नये याची काही कारणे :

  या व्यवहारांना कोणीही नियामक नाही त्यामुळे व्यवहार पूर्ण करण्यासाठी  समोरच्या व्यक्तीला बांधून कसे ठेवावे हे कळत नाही. 

 खरेदी विक्रीसाठी जॉबिंग फेर, म्हणजे खरेदी विक्रीची तफावत ४ टक्के आहे. हा खर्च प्रचंड आहे. म्हणजेच खरेदी करताना २ टक्के जास्त मोजावे लागतात आणि विकताना दोन टक्के कापून सौदा होतो. त्यावर ब्रोकरेजची फोडणी आहेच!  कित्येकदा एकाच बाजूने व्यवहार होतो. मंदीमध्ये समोरचा जॉबर फक्त विक्रीचा सौदा बोलतो. 

 भारतात तर या आभासी चलनाला कायदेशीर मान्यताच नाही.

 अनेकदा अल्प कालावधीत क्रिप्टोकरन्सीत २० ते ५० टक्के वधघट झाली आहे. बोलता बोलता त्यात निरनिराळी चाळीसच्या वर नवी चलने आली आहेत. त्यामुळे कुठले घ्यावे ह्याचा स्वतंत्र गोंधळ आहेच. 

 दिवसरात्र चालणारा हा बाजार, त्यात आपण लक्ष कसे देणार? नफा कागदावरचा खिशात कसा व किती सहजपणे आणणार? मोठा तोटा, कागदावरचा का असेना, सहन करण्याची मानसिकता आपल्याकडे  आहे का? आदी प्रश्नांची उकल करता येत असेल तरच त्या दिशेला बघावे. 

शेअरबाजाराच्या युद्धातही असेच आहे. संधी साधून आत शिरताही आले पाहिजे आणि नफा खिशात टाकून बाहेरही पडता आले पाहिजे. पण आभासी चलनाच्या गुंतवणुकीपेक्षा ते फार सोपे आहे. असो. 

आपला मागील सप्ताहातला अंदाज खरा ठरला, १५,००० या निफ्टी पातळीला धडक मारता मारता तेजीवाल्यांनी हे शिखर काबीज केले. आता लक्ष्य किमान १५५०० निफ्टीचे आहे. पुढची वाटचाल करताना ध्यान सजग हवे. कारण तेजी गुंतवणूकदाराला सतत खुणावत असते. येथे बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक वाढवता येईल. त्यातल्या त्यात आयसीआयसीआय बँकेचा शेअर आकर्षक वाटतो. पण जरा जपून. वरच्या पातळीवर, वाढीव भावात किरकोळ खरेदी करावी. त्यातच एचडीएफसी बँकेने सावधगिरीचा इशारा दिला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे रिटेल कर्जे बुडीत होण्याचे प्रमाण वाढू शकते. तसे होते अथवा नाही ते यथावकाश कळेलच. सर्व शक्तीनिशी अडकलो आणि बाजार पडला तर खालच्या पातळीवर खरेदी करायला भांडवल कमी पडेल. आज खरेदी करताना, जर का १४,७०० ते १४,९५० या दरम्यान निफ्टीने तंबू ठोकला तर नव्या गुंतवणुकीची तरतूद करून ठेवायला हवी. त्याखाली आपला विमा स्टॉप लॉस आहेच.

पोलाद, तांबे अन् अॅल्युमिनियम यांचे भाव कमी झाल्यास ते वाहनउद्योगासाठी वरदान ठरेल. पोलाद १२ टक्के, अॅल्युमिनियम व तांबे ९ टक्के व रबर २० टक्के खाली आले आहेत. कच्चा माल पुरवठा ही वाहन उद्योगाची मोठी समस्या आहे. त्यात सेमी कंडक्टर चिप्सची कमतरता ही मुख्य जोखीम आहे. तैवान, कोरिया त्या उत्पादनात अग्रेसर आहेत. नवी उत्पादन क्षमता निर्माण होण्यास प्रचंड भांडवल लागते व वेळही. त्यामुळे पुरवठा सुरळीत होण्यास काही काळ जाऊ द्यावा लागेल. वाहनांच्या बाबतीत, पुरवठा कमी व मागणी अधिक असे होण्याची शक्यता लॉकडाउन उठल्यावर होऊ शकते. तसे झाल्यास वाढीव स्टीलच्या किमती ग्राहकाकडे वळविणे सोपे जाईल. त्यानिमित्ताने ‘बजाज’, ‘टीव्हीएस’, ‘मारुती’ व त्यांना माल पुरवठा करणाऱ्या ‘मिंडा इंडस्ट्रीज’, ‘एनड्यूरन्स’, ‘ऑटोमोटिव्ह ॲक्सेल’, ‘अॅलीकोन कास्टिंग्ज’ इत्यादी समभागांकडे बघता येईल. ‘भारत फोर्ज’, ‘आरके फोर्ज’देखील डोके वर काढत आहेत. या सदरात सतत सांगितल्याप्रमाणे स्मॉल व मिड कॅप क्षेत्रात अजून तेजी टिकून आहे. त्यातील इंडेक्स फंडांकडे बघता येईल.

जानेवारी-मार्च २०२१ तिमाहीचे निकाल सुखावह आहेत. ‘ग्रासिम’ने नुकतेच त्यांचे निकाल जाहीर केले. इतर उत्पन्न कमी होऊनदेखील निव्वळ नफा ४८० कोटी झाला. ढोबळ नफ्याची मार्जिन दुप्पट झाली आहे, ९ रुपये लाभांश देऊ केला आहे. नवा पेंटचा कारखाना सुरू करण्याची कंपनीची इच्छा आहे. (आश्चर्य म्हणजे ह्या बातमीचे त्यावेळी बाजाराने उत्साहाने स्वागत केले) याखेरीज ‘बिर्ला कॉर्प’, ‘दालमिया’, ‘रामको सिमेंट’, ‘अल्ट्राटेक’ आदी सर्वच सिमेंट कंपन्या वाढता नफा व विक्री दाखवीत आहेत. ‘श्री सिमेंट’ने केलेली किरकोळ निराशा वगळता हे वर्ष या सर्व क्षेत्राला बरे जावे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठीही सिमेंट व स्टील लागतेच. बांधकाम क्षेत्रही पुन्हा ताजेतवाने होत आहे. सिमेंट व स्टीलची मागणी टिकून राहावी अशी अपेक्षा आहे. 

कोविडचे रुग्ण जसजसे कमी होऊ लागले, तसतशी टेस्ट लॅबची चकाकी कमी होत आहे. आजचे कमी झालेले भावदेखील चढेच आहेत. नफा असेल तर तो ताब्यात घ्यावा असे वाटते. २२०० ते २४०० रुपयांत ‘डॉ. लाल’ व २००० रुपयांच्या आसपास ‘मेट्रोपॉलीस’मध्ये पुन्हा गुंतवणूक करता येईल. कोविड, म्युकरमायकोसीस अशा नव्या रोगांची भीतीच टेस्ट लॅब्सना नवा व्यवसाय मिळवून देते.

बाजाराने तेजीची चाहूल दिली आहे. कलेकलेने वाढत निफ्टी प्रथम १५,५०० व पुढे १६,००० पर्यंत जावी अशी अपेक्षा आहे. विशेषत: शेतीसाठी गेले वर्ष चांगले होते व हेही वर्ष चांगले जाईल अशी अपेक्षा आहे. शेतमालाचे आंतरराष्ट्रीय भाव वधारलेले आहेत. नुकतीच सरकारने खतांच्या सबसिडीत भरपूर वाढ केली आहे. त्याच बरोबर सरकारमान्य गोदामात धान्याची साठवणूक, त्याची ई-पावती व त्या पावतीवर कर्ज घेण्याची सुविधा बळीराजाला नक्कीच सुखावून जाईल. चांगला पाऊस झाल्यास ग्रामीण भागात सुबत्ता येईल. 

तेजीत अधेमधे गतिरोधक येतच असतात. त्यांचा उपयोग करून आपला फोलिओ संपन्न करणे आपल्याच हाती आहे. त्यासाठी शुभेच्छा.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या