जो जे वांछील तो ते लाहो...

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 14 जून 2021

अर्थविशेष

फत्ते शिकस्त झाली, निर्देशांकांनी नवे विक्रम नोंदवले, आता तरी बाजाराने विसावा घ्यावा की नाही? गेल्या सोमवारी (ता. ७ जून) निफ्टीने १५,७५० व सेन्सेक्सने ५२,३२८ असा बंद दिला. दोन्ही निर्देशांक अत्युच्च पातळीवर बागडताहेत. पण त्यांचा गतीवेगच (मुमेंटम) इतका जोरात आहे की थांबायचे नाव नाही. चारच  महिन्यांपूर्वी, ‘आता बघा बाजार कसा खाली येतो ते,” अशी भाकिते करणारे स्वयंघोषित तज्ज्ञ आता २० हजार निफ्टी आणि वर्षअखेर ९० हजार सेन्सेक्स होईल असे सांगतात. थोडक्यात काय, तात्पुरती आवराआवरीची वेळ जवळ येत चाललीय. (येथे ‘तात्पुरती’ हा शब्द महत्त्वाचा आहे.)

गेले महिनाभर शेअरबाजाराने प्रत्येकाला भरभरून दिले, मग तो डे ट्रेडर असो की दीर्घ पल्ल्याचा गुंतवणूकदार. चांगले शेअर नुसते सांभाळले तरी किंमत वाढत होती. तेजीतल्या शेअरमध्ये दिवसभरातही पैसे मिळत होते आणि डिलिव्हरी घ्यायची ताकद असेल तर आठवडा, महिनाभरातदेखील काकणभर अधिकच पदरात पडत होते.

चोखंदळ मंदीवालादेखील क्षेत्रबदल होताना हात धुऊन घेत होता. (उदा. तंत्रज्ञान क्षेत्रातील तेजी व नंतरची मंदी) अर्थात अंगात साहसी वृत्ती व जोखीमक्षमता असल्याशिवाय हे शक्य नाही. ती हवीच, अन्यथा भीती पिच्छा सोडत नाही. तेजीत पैसे कमीच पडतात कारण रोजच नवनवे प्रलोभन असते. सहसा माध्यमात व दलाल पेढीत रोज काय विकत घ्यावे याची शिफारस असते. विक्रीची असेलच असे नाही. पण सतत भांडवल कसे उभे करणार? यावर एक सोपा उपाय आहे. नवीन खरेदी करताना काय विकता येईल हे प्रथम बघायला हवे. म्हणजे मारुतीच्या शेपटीसारखी डिमॅट यादी वाढणार नाही व वेळोवेळी नफाही ताब्यात येईल. हा नफा ठेवबाजारात गुंतवता येईल. एरवी आपला फोलिओ वीस शेअरच्या वर असू नये असा संकेत आहे. त्यापलीकडे प्रत्येक  शेअरकडे लक्ष देणेही कठीण असते.  

‘जो जे वांछील तो ते लाहो’ असे भरभरून दान मिळाल्यानंतर तो नफा सांभाळणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आज नव्याने आत येणाऱ्या गुंतवणूकदाराने टप्प्याटप्प्यानेच गुंतवणूक करायला हवी. आता हौशा, नवश्यांचा आत्मविश्वास जसा वाढलाय तशी जोखीमही वाढली आहे. पण उत्साह जेव्हा उतू जातो तेव्हा कुठलाच धोका वाटेनासा होतो. मागील लेखातील सावधगिरीचा इशारा पुन्हा द्यावासा वाटतोय. ‘इंडियन रोप ट्रिक’सारखे, दिवसागणिक वीस वीस टक्के रोज वर जाणाऱ्या शेअर्स पासून सावधान. पूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्यांना हात लावू नये. शक्यतो ‘ए’ ग्रुपकडे लक्ष द्यावे. त्याबाहेर बघायचे असेल तर व्यवस्थापन पारखून घ्यावे. अर्थात शेअरबाजाराच्या ‘खिलाडी पंटर्स’ना हे वाचून हसू येईल कारण त्यातच खरे पैसे असतात असेच त्यांना वाटत असते. असो.

क्या लगता है?
शेअरबाजारात रस घेणारे दोघे भेटले की पहिला प्रश्न पुढे येतो, ‘क्या लगता है?’ आज बाजारात तेजी वाटते की मंदी? डे ट्रेडर असो वा गुंतवणूकदार, हा प्रश्न ठरलेला! खास करून दोघांच्याही मनात धाकधूक असतेच. या क्षेत्रातले दिग्गज सांगतात की आपण तेजीत असलो तर मंदिवाल्याजवळ जाऊन बसावे, बाजार किंवा शेअर का खाली येणार आहे, याची अनेक कारणे तो सांगतो. त्यातले एकेक कारण मनात खोडता आले तर चांगला वर जात असलेला शेअर न विकता थांबता येते. किंवा कारण पटले तर नफा ताब्यात घेता येतो. तसेच आपण विकलेला शेअर खाली जात असताना टेबलावर उभे राहून तो आणखी विकावासा वाटतो, अशा वेळी आपण तेजीवाल्याच्या जवळ बसावे. तो ‘का घ्यावा’ याची अनेक कारणे तो आपल्याला सांगतो. कारण पटले नाही तर सोडून देता येते, पटले तर शेअर विकत घेऊन नफा ताब्यात येतो. मूळ सूत्र असे की सर्व बाजूच्या तज्ज्ञांचे ऐकून स्वतः निर्णय घेणे. 
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची घोडदौड चालूच आहे. थोडा विसावा घेऊन ‘इन्फोसिस’, ‘टेक महिंद्रा’, ‘पर्सिस्टंट’, ‘मास्टेक’, ‘कोफोर्ज’ पुढे चालले आहेत. हे सारे शेअर, याच सदरातून वारंवार सूचित केले आहेत. औषध उद्योग सध्या कन्सॉलीडेट करीत आहे, त्यातून पुढील चालीसाठी निवड करता येईल. काही दिवसांपूर्वी ‘पॉलीकॅब’चे निकाल हाती आले. अत्यंत उत्कृष्ट असे हे निकाल आहेत. निकालाचे स्वागत करताना ‘पॉलीकॅब’ने बाजारात नवी उंची गाठली व रोजच नव्या पातळीवर बंद होत आहे, त्याची ही कारणमीमांसा! ‘हॅवेल्स आणि पॉलीकॅब या दोन्ही कंपन्यांमध्ये ‘हॅवेल्स’ हा लाडका समजला जातो. कल्पक जाहिरातींमुळे (‘ये सिलिंग फॅन नही फिलिंग फॅन है’ आणि आठवा त्या अग्निरोधक हॅवेल्स केबल्सच्या जाहिराती) ‘हॅवेल्स’चे ब्रँडीग छान झाले आहे, त्याखेरीज ‘क्रॅबट्री’, ‘लॉईड’ इत्यादी लोकप्रिय ब्रँड या कंपनीकडे आहेत. घरोघरी वापरली जाणारी  अनेक साधने व उपकरणे तयार करणारी ही कंपनी ग्राहक व उद्योग (बी-टू-बी) दोन्ही क्षेत्रात पुढे आहे. ‘पॉलीकॅब’ ग्राहकाभिमुख उत्पादनात थोडा मागे असला तरी हाती घेतलेल्या योजनेनुसार ही पिछाडी कमी होईल. (चालू वर्षी विक्रीतील प्रत्यक्ष ग्राहक हिस्सा ३२ टक्क्यांवरून ४० टक्के झालाय) भाग भांडवलावरील उतारा दोघांचाही सारखाच असला तरी ‘हॅवेल्स’ दुपटीहून अधिक महाग आहे. शेअरमागे मिळकतीच्या (इपीएस) ‘हॅवेल्स’ ६५ पट (बाजारभाव १०४०) तर ‘पॉलीकॅब’ ३० पट (बाजारभाव १७४०) आहे. ह्या वाढीव किमतीतही पुढे जायला जागा आहे. इंजिनिअरिंग व प्रोजेक्ट्स विभागाची विक्री गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे कमी झाली. त्यात पुढे चांगली वाढ होऊ शकते. जवळपास ९००० कोटीची विक्री व ८८० कोटी करोत्तर नफा असलेला हा समभाग प्रत्येक घसरणीत आग्रहित करावा. 

‘फ्रॅन्कलीन टेम्पलटन’च्या काही डेट योजना मध्यंतरी अचानक स्थगित केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात पडल्या होत्या. सेबीने नुकताच ह्या फंडाला एक हिसका दिला आहे. त्यानुसार ५ कोटीचा दंड व व्याजासह ५१२ कोटी गुंतवणूकदारांना परत करण्यास सांगितले आहे. तसेच संचालक मंडळातील कुडवा ह्यांनी या वादग्रस्त योजना स्थगित होण्याआधी स्वतःचे भांडवल का काढून घेतले याची कारणे द्या अशी सूचनावजा नोटीस दिली आहे. या फंडाने गुंतवणूकदारांचे स्कीम प्रमाणे ४२ ते ९२ टक्के भांडवल परत केले आहे. २५२१५ कोटी पैकी १७,७७८ कोटी गुंतवणूकदारांना मिळाले आहेत व उर्वरित रक्कमही जमा करून परत करू असा विश्वास फंड व्यवस्थापनाने दिला आहे. वरील नोटिशीचे खंडन करीत व्यवस्थापनाने आपली बाजू मांडली आहे व अपिलेटकडे दाद मागू असे सूचित केले आहे. घोडा मैदान जवळच आहे. हा विषय समाधानकारकरीत्या नक्कीच मिटेल अशी आशा करूयात. 

या संदर्भात सेबीने ‘म्युचुअल फंड’च्या डेट योजनांसाठी नवे जोखीम निदर्शक जारी केले आहेत. आधीचे रीस्कोमीटर अजूनही गुंतवणूकदारांना फारसे पचनी पडले नाही पण गुंतवणूकदार शिक्षण व प्रबोधनातूनच जोखीमक्षमता व स्कीममधील जोखीम ह्यातील मेळ, हे ध्येय साध्य व्हावे. हर्षद मेहता प्रकरणानंतर एप्रिल १९९२ मध्ये सेबीला अधिकार देण्यात आले. पुढील तीस वर्षात सेबीने भारतीय शेअरबाजार अनुपालनाच्या बाबतीत जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहेत. म्युचुअल फंडदेखील आपल्या प्रतिमेला जपतात व गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी काळजी घेतात. हा विश्वासाचा पाया, पुढे फंड योजना वितरकही  जपत असल्यामुळे म्युचुअल फंड व्यवसाय पुढील काही वर्षात आताच्या किमान तिप्पट होईल असा अंदाज आहे. 

शेअरबाजार रोजच नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहे. थोडी काळजीपूर्वक चोखंदळ निवड केल्यास व आजच्याआज श्रीमंत होण्याचा हट्ट बाजूला ठेवल्यास ही नवी पिढी याच बाजारातून शाश्वत समृद्धी मिळवेल असे वाटते.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या