आहे नजरेत तरी...

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 28 जून 2021

अर्थविशेष

हिमालयात गिर्यारोहण करणाऱ्यांना अनेकदा हा अनुभव येतो. जे काबीज करायचे आहे ते शिखर समोर नजरेत असते, पण लगेच सर करता येत नाही. मधे एखादी दरी आड येते, मग पुन्हा  खडी चढण असतेच. ‘कितने पास मगर कितने दूर’ अशा मानसिकतेत काही काळ  हवामानाशी जुळवून घेत वेळ द्यावा लागतो. शेवटी पुढील चढाई आत्मविश्वासाने करीत ते शिखर सर करायचे असते. आपल्या शेअरबाजारातही असेच काहीसे होते.

निफ्टी १६ हजार अंशाच्या पातळीला स्पर्श करणार असे वाटत असतानाच नेमका १५,९००च्या पातळीवरून बाजार फिरला. सुज्ञ वाचकांना आठवत असेल की १५,५००चे शिखर येण्याआधीही असेच झाले होते. फेब्रुवारीच्या १६ तारखेला १५,४३१ला स्पर्श करून पुढे तीन महिने निफ्टी एका रेंजमध्ये कन्सॉलीडेट होत होती. आजही तसे होण्याची मोठी शक्यता आहे. निफ्टीला १५ जून रोजी १५,९०१ या पातळीवर मोठ्या विक्रीला सामोरे जावे लागले. आता नवी रेंज १५,०००-१५,९८० अशी व्हावी. किमान नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल हाती येईपर्यंत हे चालावे. 

अशा वेळी टप्प्याटप्प्याने प्रत्येक वरच्या पातळीवर चोखंदळ विक्री आणि पुढे क्षेत्रबदल करीत खरेदी ही चाल ठीक राहील असे वाटते. तेजी विसावा घेतेय. संपली नाही. अन्यथा शुक्रवारी अमेरिकन व इतर जागतिक बाजारात पडझड झाल्यावर सोमवारी (ता. २१ जून) १५० अंश खाली उघडून आपला बाजार सावरलाच नसता.

बँक निफ्टीपुढील अडचणी अजून संपलेल्या दिसत नाहीत. ‘रिलायन्स’ पुढे सरसावला आहे व रुपया स्वस्त झाल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उभारी आली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे व्यक्तिगत उपभोगाच्या वस्तूंची बाजारपेठ तेजीत आली आहे. त्याचा फायदा ग्राहकाभिमुख ‘हिंद युनिलिव्हर’, ‘मॅरिको’ आदींना होईल. सोळा हजार व त्यापुढे मजल मारायला बँक निफ्टीची साथ मिळायला हवी. अनार्जित कर्जे अपेक्षेपेक्षा अधिक वाढली व त्यामुळे बँक निफ्टीच्या वाटचालीत अडथळे आले तर मात्र  पुन्हा आढावा घ्यावा लागेल.

‘रिलायन्स’ची वार्षिक सर्वसाधारण सभा एव्हाना पार पडली असेल. दरच वेळेस सभेत नव्या घोषणा करण्याची अंबानी कुटुंबीयांची पद्धत आहे. त्यानुसार ‘आराम्को’चे रुमाय्या ह्यांचा संचालक मंडळात समावेश व त्यापाठोपाठ त्या कंपनीकडून ‘रिलायन्स’मध्ये १५०० कोटी डॉलरची गुंतवणूक वगैरे बातम्या चर्चेत आहेत. ‘गुगल’च्या सहकार्याने नव्या स्मार्ट फोनची घोषणा, लॅपटॉप निर्मितीत पदार्पण आदी बातम्या (?) समाजमाध्यमात फिरत आहेत. सर्वाधिक उत्कंठा जिओ प्लॅटफॉर्म बाबत पुढील दिशादर्शक जाहीर खबर मिळण्याची आहे. मनाजोग्या घोषणा झाल्यास ‘रिलायन्स’ निफ्टीला नवे बळ देईल. ‘रिलायन्स’ व इतर मोठ्या शेअरमुळे निफ्टी वरच्या पातळीवर टिकल्यास स्मॉल व मायक्रो कॅप शेअरमध्ये विक्री येऊ शकते. भाव वरच्या स्तरावर आहेतच. त्यामुळे बाजाराची ब्रेड्थ (रोजचा अॅडव्हान्स/ डिक्लाईन रेशो) बघणे महत्त्वाचे ठरेल. 

नुकतीच ‘पीएनबी हाउसिंग’च्या शेअरने बाजारात खळबळ उडवून दिली. मार्चपासून साडेतीनशे ते साडेचारशे या दरम्यान घुटमळत असलेल्या या शेअरने ‘कार्लाईल ग्रुप’ सोबत सोयरिक जोडल्याची घोषणा केली आणि त्या समूहाला सवलतीच्या दरात (रु.३९० प्रती शेअर) शेअर देऊ केले. ही बातमी ३१ मे रोजी आल्यावर पुढील सहाच दिवसात शेअर दुप्पट झाला. चार हजार कोटी रुपयांची सवलतीच्या दरातील भागविक्री अन त्याबरोबर आदित्य पुरी संचालक मंडळावर येण्याच्या शक्यतेमुळे बाजारभाव उसळले. ‘सेबी’ने त्यावर आक्षेप घेतला आहे. ‘एचडीएफसी’ पुस्तकी किमतीच्या तिप्पट भावात मिळतो तर निमसरकारी ‘एलआयसी हाउसिंग’चा शेअर, त्यादरम्यान बुक व्हॅल्यूच्या १.१ पट किमतीला मिळत होता. त्यामुळे ५२६ रुपये पुस्तकी किंमत असताना ३९० रुपयांची सवलतीची ऑफर बघून ‘सेबी’च्या भुवया उंचावल्या. आता ‘सेबी’ने कंपनीला शेअरचे नव्याने मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. कंपनी अपिलात गेली आहे. 

छोट्या भागधारकांचे हितसंबंध रक्षिण्यास कटिबद्ध असल्यामुळे ‘सेबी’ने हे पाऊल उचलले असावे. त्याचबरोबर गेली दोन तीन वर्षे ‘पीएनबी हाउसिंग’़ बाजारातून भांडवल गोळा करण्यास धडपडते आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. राईट इश्यू काढला असता तर त्यात प्रवर्तक ‘पंजाब नॅशनल बँके’ची निवेशक्षमता बघावी लागली असती. अपिलेटने विशेष सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी दिली आहे, फक्त मतदानाचा निकाल राखून ठेवण्यास सांगितले आहे. आदित्य पुरी ह्यांचेकडे असलेले व्यवस्थापन कौशल्य ध्यानात घेता, हा व्यवहार होणे हे भागधारकांच्या हिताचेच आहे. कदाचित ह्याच किमतीला किंवा ४०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान नवा किंमत पट्टा ठरावा. तो ‘कार्लाईल समूहा’ने स्वीकारल्यास या कलहाचा शेवट गोड होईल व त्याकडे विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे. 

‘व्होडाफोन आयडिया’ने पुन्हा एकदा सात हजार कोटी पर्यंत नवे भांडवल उभे करायचे ठरवले आहे. (भागधारकांसमोर) वाकेन पण मोडणार नाही या बाण्याने ‘व्होडाफोन’ ही लढत देत आहे. त्यामुळे या क्षेत्रात दोनच मोठे खेळाडू राहतील ही आशा मावळत चालली आहे. त्यातून टेलिकॉम मधील हे तिन्ही सेवा पुरवठादार आपापसांतील स्पर्धा कमी करू शकतील का, हा कळीचा मुद्दा आहे. तसे झाल्यास सेवाधीष्टीत मासिक शुल्क आकारता येईल. पोस्ट पेड योजनांमध्ये महसूल वाढवण्याची संधी व व्याप्ती आहे. ‘रिलायन्स’ किती काळ महसुल स्थिर ठेवणार यावर पुढील गणिते ठरतील. 

‘एसबीआय कार्ड’ ही कंपनी भारतात क्रेडिट कार्ड देण्याचे काम करते. भारतातील सर्वात मोठी बँक, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आणि ‘जीई कॅपिटल’ यांनी मिळून ऑक्टोबर १९९८मध्ये ती सुरू केली व २०१७ साली त्यातील ‘जीई’चा हिस्सा असलेले (२६ टक्के) शेअर, ८००० कोटी रुपये बाजार मूल्यांकन गृहीत धरून ‘कार्लाईल समूहा’ने दोन हजार कोटी रुपयांना विकत घेतले. नुकताच ‘कार्लाईल’ने त्यातील ५.१ टक्के वाटा, शेअरबाजारात  विकला. यापूर्वीही त्यांनी वेळोवेळी नफा खिशात टाकला आहे. आज ‘एसबीआय कार्ड्स’चे बाजार भांडवल मूल्य ९६ हजार कोटी आहे. (चार वर्षात बारा पट वाढले). २०२०मध्ये प्राथमिक भागविक्री ७५० रुपयांनी झाली होती. आजही दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकदारांनी या शेअरकडे बघण्यास हरकत नाही. या क्षेत्रात भारतात ही एकमेव सूचीबद्ध कंपनी आहे. अमेरिकेत ‘मास्टरकार्ड’ ($ ३७३) ‘व्हिसा’ ($ २३४) या उत्तरोत्तर भांडवल वृद्धी दाखवीत आहेत. ऑनलाइन खरेदी वाढत असल्यामुळे क्रेडीट कार्डांचा वापर वाढत जाणार आहे. यापूर्वीही याच सदरात या शेअरची शिफारस केली होती. 

संयम न ढळू देता शेअरबाजारातील संधींचे आकलन करून पावले उचलली पाहिजेत हाच प्राथमिक सल्ला.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या