घसरला.. झेपावला.. छे छे..सावरला!!!

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 5 जुलै 2021

अर्थविशेष

गेल्या आठवड्यात आपण निफ्टीच्या पातळीची मीमांसा केली होती. सोळा हजारचे शिखर जवळ दिसतेय, पण हाती येत नाही अशी मानसिकता होती. जूनच्या २५ तारखेला संपलेल्या सप्ताहाचे समालोचन करताना आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. निफ्टी २१ जून पासून रोजच १६ हजाराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेय. अर्थात, १५९०० ते १६००० या दरम्यान कुणीतरी ठरवून विक्री करतंय, पण ही विक्री पचवून बाजार पुन्हा पुढील वाटचालीला तयार होतोय. निष्कर्ष एकच ! पिक्चर अभी बाकी है !

‘रिलायन्स’ची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीसारखीच वाजत गाजत पार पडली. मागील सदरात लिहिलेल्या सर्व अपेक्षित बातम्या, अधिकृतपणे जाहीर झाल्या. रुमाय्या यांचा संचालक मंडळात समावेश, 4जी युक्त व 2जी मुक्त नव्या जिओ स्मार्ट फोनची घोषणा तसेच सुंदर पिचाई ह्यांचा सहभाग, जिओ व गुगल क्लाऊड ह्यांचा 5जी तंत्रज्ञानात सहभाग, १०० कोटी भारतीयांसाठी खिशाला परवडेल अशा वाजवी किमतीत विदा उपलब्ध, ‘रिलायन्स रिटेल’ची विक्री तिप्पट होण्याचा अंदाज वगैरेंपैकी कुठलीही बातमी बाजारभाव सावरू शकली नाही. कदाचित पेपर आधीच फुटल्यामुळे असेल किंवा ७५ हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक बाजाराला आवडली नसेल, पण शेअर खाली आला. तरीही हा निरुत्साह तात्पुरता असावा असे वाटते. वर्षभरात जसजशी आश्वासने पुरी होत जातील तसा उत्साह परतावा. 

‘रिलायन्स’खेरीज विश्लेषक आतुरतेने ‘अॅक्स्चेन्चर’च्या तिमाही आकड्यांची वाट पाहात होते. माहिती तंत्रज्ञानातील या अग्रेसर कंपनीने मात्र कुठलीही निराशा केली नाही. विक्रीत १६ टक्के वाढ व पुढील वर्षीचे भरघोस ऑर्डर बुक, झालंच तर शेअरमागील मिळकत पुढील वर्षात किमान १० ते ११ टक्के वाढण्याचा अंदाज, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला सुखावून गेला. ‘अॅक्सेन्चर’ने १५४०० कोटी डॉलरच्या नव्या ऑर्डर्स तसेच जपान, जर्मनी, इंग्लंड, इटली, ब्राझील खरंतर सर्वच कार्यक्षेत्रात १० टक्क्यांच्या वर मागणी नोंदवून स्वतःचे आयटीतील नेतृत्व कायम राखले.

साहजिकच, गेला आठवडा खऱ्या अर्थाने आयटी क्षेत्राचा होता. आयटी मधील तेजी कुठपर्यंत, यावर जरी तज्ज्ञांत मतभेद असले, तरी नित्यनेमाने येणारे शेअर बाय बॅक, गुंतवणूकदारांना विश्वास देतील असे वाटते. ‘सेबी’च्या नव्या नियमावलीचा आधार घेत, २०१७ साली ‘इन्फोसिस’ने प्रथम बाय बॅक जाहीर करून त्याची ११५० रुपये किंमत ठरवली. पुढे २०१९मध्ये पुनःश्च ७४७ रुपयांची किंमत एक्स बोनस शेअरला देऊ केली. लागलीच यावर्षी पुन्हा ‘इन्फोसिस’ने भागधारकांकडून १७५० रुपयांना शेअर विकत घेण्याचे जाहीर केलेच आहे. ‘इन्फोसिस’ची महती अशी की वरील तीनही बाय बॅक खेरीज २०१८मध्ये एकास एक बोनसही कंपनीने दिला आहे. हा शेअर गुंतवणूकदारांचा लाडका असल्यास नवल नाही. इतरही आयटी कंपन्या याच पावलावर पावले ठेवीत, पुनर्खरेदी जाहीर करीत असतात. शेअरची कंपनीकडून पुनर्खरेदी हा भागधारकांच्या हातात एक प्रकारचा बोनसच असतो. जवळील शेअर कंपनीला विकत देऊन, पुनर्खरेदी संपल्यावर तेच शेअर खालच्या भावात विकत घेणे सहज शक्य आहे. त्यामुळे ‘रिलायन्स’ सहभागी झाला नाही तरी आयटी व बँकांनी निर्देशांकांना नवे बळ दिले. बँकांच्या शेअरनेही तेजी अजून संपली नसल्याची पावती दिली. तेव्हा १६ हजार काय त्यापुढेही जाण्यास निफ्टीला वाव आहे हे नक्की. केव्हा? हाच फक्त प्रश्न आहे. 

‘एचडीएफसी लाइफ’मधील आपला ३.४६ टक्के हिस्सा ‘स्टॅण्डर्ड लाइफ’ बाजारात विकणार आहे. ६५८-६७८ असा किंमत पट्टा आहे. हा शेअर आपल्या भांडारात समाविष्ट करण्यास ही चांगली संधी आहे. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत ही विक्री पुरी झालीही असेल. आजकाल या बातम्या शेवटच्या क्षणी कळतात, त्यामुळे एखाद्या कर्णपिशाच्च्याने सांगितल्याशिवाय त्यावर कृती करता येत नाही. (तरी या शेअरच्या आलेखामध्ये एक धोक्याची सूचना २५ जून रोजी मिळाली होती व त्याला अचानक विक्रीला सामोरे जावे लागले होते. काही कारण नसताना हा शेअर ५ टक्के खाली आला होता.) यातील मंदीची भावना अधिक काही काळ राहिल्यास ६६० ते ६८०च्या दरम्यान या शेअरचा नक्कीच विचार करता येईल. 

गेल्या सोमवारी (ता. २८ जून) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांची पत्रकार परिषद झाली. आर्थिक पॅकेज मधील नवे कर्ज वाटप निर्देशांकातील विक्री थांबवू शकली नाहीत. कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या हाहाकारानंतर अशी काही मदत योजना जाहीर होईल अशी अपेक्षा होतीच. यातील प्रमुख सवलत म्हणजे, गेल्या वर्षीच्या अर्थसाहाय्य योजनांचा कालावधी वाढवला आहे. (त्याची गरजच होती.) त्याखेरीज पर्यटनास चालना देण्यासाठी पर्यटन संस्था व गाइडसाठी आर्थिक मदत कर्ज रूपात देऊ केली आहे. बेकार माणसाला बेकार भत्ता देण्याऐवजी कर्ज उचलून देण्याचा हा प्रकार आहे, असेच टीकाकार म्हणतील. कोविड लाट शमल्यावर कदाचित पर्यटन करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी काही सवलती सरकार जाहीर करेल अशी आशा करू. त्यात भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी व्हिसा शुल्क ३१ मार्च २०२२ पर्यंत माफ केले आहे. त्यातली माफीची रक्कम किरकोळ (जेमतेम ६९ डॉलर्स) असली तरी त्याने सेंटीमेंट सुधारेल. अर्थात तिसऱ्या लाटेच्या भीतीने पर्यटनास किती परदेशी पाहुणे धजावतील हा प्रश्नच आहे. अमेरिकेत पुढील सहा महिन्यापर्यंत सर्वच क्रुझची आगाऊ नोंदणी झाली आहे. घरात बसून लोक कंटाळलेले असल्यामुळे देशांतर्गत पर्यटन आपसूकच वाढू शकते. त्यात सरकारने काही सवलती दिल्यास गेले दीड वर्ष चिंताग्रस्त असलेल्या ह्या उद्योगांचे कल्याण होईल.

आरोग्य क्षेत्रात नवीन उद्योगांसाठी किंवा व्यवसाय विस्तारासाठी, १०० कोटी रुपयांपर्यंत सवलतीत (७.९५ टक्के व्याजाने) कर्ज व सूक्ष्म कर्जे, मायक्रोफायनान्स देणाऱ्या संस्थांना सरकारी बँकांनी प्रत्येकी सव्वा लाख रुपयांच्या कर्जासाठी हमी द्यावी अशी योजना आहे. ह्या दोन्ही तरतुदी स्वागतार्ह आहेत. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने रब्बी पिकातील ४३२ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात ८५ हजार कोटी रुपये अनुदानापोटी जमा केले. तसेच यावर्षी खत अनुदानात आणखी १५ हजार कोटींची भर पडेल. खत उत्पादक शेअर आधीच तेजीत असल्यामुळे पुढे वाढले नाहीत. पण याच सदरात सहा महिन्यापूर्वी  सुचवलेला ‘कोरोमंडल इंटरनॅशनल’ इतर फर्टिलायझर शेअरच्या तुलनेत कमी वाढला आहे. तेथे एक हजार रुपयांची अपेक्षा ठेवता येईल. सरकारचे हे नवे पॅकेज बाजारासारखेच कुठल्याच उद्योगाला आवडलेले नाही. त्यातल्यात्यात ग्रामीण भागातील सूक्ष्म कर्जपुरवठ्याला दिलेली चालना तेथील उत्पन्नाचे स्रोत वाढवेल. 

शेअरबाजार एक महत्त्वाचे शिखर काबीज करण्याच्या बेतात आहे. या शिखरावर किमान १० टक्के नफा खिशात टाकून तो ठेवबाजारात वळवायला हवा. येथूनच निर्देशांक मागे फिरले तर १५ हजार निफ्टीच्या खाली नवी विक्री येऊ शकते. तोपर्यंत संयम ठेवणे हिताचे ठरेल.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या