स्टॅच्यू...

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 19 जुलै 2021

अार्थिक

‘स्टॅच्यू’ हा खेळ आपण लहानपणी खेळलो आहोत. शेअरबाजारात सध्या हाच खेळ चालू आहे. निफ्टी १५९००च्या आसपास थोडी जरी घुटमळली तरी मंदीवाले तिला `स्टॅच्यू’ करून खाली ढकलतात. एके काळी आभाळात ढग जरी आले तरी प्रथम वीज जायची, तसेच कुठलेही निमित्त निफ्टीला पुरते. 

गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अमित शहा यांना गृहमंत्रीपदाबरोबर सहकार खातेही दिले आहे. तसेच छत्तीस नवे मंत्री आता कार्यभार सांभाळतील.  यातील कुठल्याही खात्यापेक्षा शेअरबाजाराची नजर अर्थमंत्र्यांच्या नेमणुकीवर लागलेली असते. पण बाजाराच्या कितीही मनात असले तरी दरवेळी बाजाराच्या मनासारखेच होईल असे नाही. मग बाजार अपेक्षाभंगाच्या दु:खात काही दिवस काढतो. हे दिवस आपणही स्थितप्रज्ञाच्या अवस्थेत काढलेले बरे.

हे कन्सॉलीडेशनच आहे. गेला आठवडाभर (५ ते १२ जुलै) ‘निफ्टी’ फक्त २०० अंश वरखाली झाली. सहा आणि सात जुलैला ती जरी १५९०० या लक्ष्मणरेषेला  दिवसभरात चाटून गेली असली तरी तो टप्पा काही पार झाला नाही. तसेच ती १५६००च्या खालीही आली नाही. प्रत्येक खालच्या पातळीवर खरेदी होतेच आहे. 

शेरलॉक होम्ससारखा आपणही निष्कर्ष काढू शकतो की, बाजार खाली येत नाही म्हणजे त्याला वरच जायचे आहे. पण हा अंदाज चुकला तर? फक्त आलेख बघायचे की अर्थव्यवस्था रांगते आहे की पळायच्या तयारीत आहे याचा लेखाजोखा घ्यायचा? 

यासाठी बँकिंग क्षेत्राचे या तिमाहीचे निकाल बघायला हवे किंवा त्याची वाट तरी बघायला हवी. एचडीएफसी बँक, कोटक बँक व बजाज फायनान्स किरकोळ ग्राहक कर्जे प्रामुख्याने देतात तर स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक व अॅक्सीस बँक या कॉर्पोरेट बँका म्हणून ओळखल्या जातात. तसेच सिटी युनियन बँक व ए यू फायनान्स लघु व मध्यम उद्योगांना कर्ज देते. उज्जीवन, इक्वीटास आदी सूक्ष्म कर्जांसाठी, तर कॅथॉलिक सिरीयनचा मुथूट सारखा सोने कर्ज गहाणवटीचा मुख्य व्यवसाय आहे. बँकिंग क्षेत्राचे निकाल अशा तऱ्हेने संपूर्ण अर्थव्यवस्थेचे चित्र उधृत करतात. या महिन्याच्या अखेरपर्यंत हे चित्र स्पष्ट व्हावे. तरी या महिन्यातील बँक निफ्टीची वाटचाल पाहता तिच्या सहकार्याने आपली ‘निफ्टी’ १६ हजाराचा टप्पा पार करेल अशी आशा आहे. 

२००८च्या अनुभवातून शहाणे होऊन व आयबीसी-एनसीएलटीचा बडगा असल्यामुळे, कंपन्यांच्या कर्ज उभारणीला थोडासा चाप बसला आहे. धंद्यातील स्वतःची कमाई घरी न नेता पुन्हा व्यवसायात टाकणे, शेअरबाजार तेजीत असल्यामुळे कर्जाऐवजी भाग भांडवल उभारणी करणे वाढते आहे. मागील आर्थिक वर्षात विक्री जरी थोडी नरमली असली तरी रोजकीर्द सक्षम व शिलकीत आहे (कॅश फ्लो मजबूत आहे). २०२१-२२ चे निफ्टीच्या सर्व घटकांचे एकत्रित शेअरमागे रु. ७३५ ते ७५० उत्पन्न असण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवतात. म्हणजे चालू वर्षी होणाऱ्या अंदाजे मिळकतीवर पी ई रेशो २१च्या आसपास पडतो, तो पुढील वर्षासाठी १८-१९च्या आसपास होईल. त्यामुळे बाजार स्वस्त नसला तरी महाग निश्चित नाही. कृत्रिमपणे का होईना, व्याजदर नियंत्रणात असणे; तेजीचाच पाठपुरावा करते.  

गेली चारपाच वर्षे डुलक्या घेत असलेले बांधकाम क्षेत्र आता खडबडून जागे झाले आहे. ह्या क्षेत्रात मोठी रोजगारक्षमता आहे. मजुरांचा प्रश्न बराच सुटला आहे व महारेरामुळे नावाजलेल्या बिल्डर्सकडे मागणी भरपूर नसली तरी वाढते आहे. शहरी बेरोजगारीला त्यातून आळा बसेल. गोदरेज प्रॉपर्टीज, ब्रिगेड, ओबेराय रियाल्टी, सोभा, डीएलएफ सारखे शेअर त्यासाठी आपल्या रडारवर हवेत.

त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वप्रकारच्या कृषी उत्पादनांचे भाव प्रचंड वाढले आहेत. आपल्याकडे नुकत्याच शेतमालाच्या पायाभूत किमती सरकारने वाढवून दिल्या. त्याबरोबर मॉन्सून सरासरीएवढा झाल्यास बळीराजा आनंदीच राहील. दुबार पेरणीचे संकट टळल्यास ग्रामीण भारत सुबत्तेत राहील. शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही कमी झालेय व आणखी कमी होईल. मागे दर्शवल्याप्रमाणे किसान क्रेडीट कार्ड व किमान एक लक्ष साठ हजार रुपयांचे विनातारण कर्ज या उपायांमुळे ग्रामीण व शहरी ग्राहकांची मागणी वाढती राहील. 

महागाईचा नुकताच जाहीर झालेला निर्देशांक जरी कांकणभर खाली आला असला तरी कच्चे तेल जर असेच वाढत राहिले तर पेट्रोल व डिझेल ऐकणार नाही. डिझेलच्या वाढीव दरामुळे वाहतूक खर्च वाढतील व त्यातून महागाई वाढेलच. आज ना उद्या व्याजदर वाढवावे लागतील. जोखीम आहे ती तेथेच.

झोमॅटोच्या प्राथमिक भागविक्रीच्या निमित्ताने जगभरच्या फिनटेक कंपन्यांचा आढावा घ्यायचे ठरवले तर लक्षात येते की चीनमधे गेल्या सहा महिन्यात अलिबाबा, मितुआन व पीडीपी ह्यांचे बाजार भांडवल मूल्य एक लाख कोटी डॉलरने कमी झाले आहे. चीनच्या नियामक मंडळांनी घातलेले निर्बंध अलिबाबा व त्या समूहातील उद्योगांना जाचक ठरताहेत व त्यामुळे भागधारकांच्या विक्रीला सतत सामोरे जावे लागते आहे. कंपनीस दहा लाखांपेक्षा अधिक ग्राहक असल्यास विदा सुरक्षेला प्राधान्य द्यायचे असे सरकारने ठरवले आहे. याच काळात अमेरिकन बाजार मात्र १४ टक्के वाढले. तेव्हा फार गडबडून जायचे कारण नाही. उलट भारतासाठी ही संधी आहे का याचा विचार केला पाहिजे. झोमॅटो व लागोपाठ पेटीएमची भागविक्री होत आहे. त्यात छोट्या गुंतवणूकदारांसाठी जेमतेम १० टक्के कोटा आहे. या कारणामुळे संस्थात्मक मागणी चांगली असू शकते. इंडोनेशियात एरवी दुर्लक्षित असलेल्या कॅशलेझ, गो पे, अझैब आदी फिनटेक कंपन्या आळस झटकून भांडवल बाजारात उतरण्याच्या बेतात आहेत. एकच निष्कर्ष काढता येतो की पुढील काळात झोमॅटो, इन्फोएज, बजाज फायनान्स, पेटीएम वगैरे शेअरची चलती राहू शकते. 

पुढील महिनाभर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाही निकालांचा जोर राहील. पहिला नंबर लावला टीसीएसने. कंपनीचे निकाल चांगलेच आहेत. बाजार तात्पुरता निराश झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून या शेअरचा विचार करायला हवा. त्यासाठी रुपये ३००० ते ३१०० हा भाव आकर्षक आहे. ४५४०० कोटींवर विक्री व ९००० कोटी नफा, मागील वर्षांच्या तुलनेत विक्री १८ टक्के तर नक्त नफा २८ टक्के वाढला, त्यात पुढे अजून १० टक्के वृद्धी होणे अपेक्षित! त्यामुळे निकालाची मंदी ओसरली की या शेअरला पुन्हा चांगले दिवस यावेत. मात्र हा सावकाश वर जाणारा समभाग आहे हे लक्षात ठेवावे. आजकाल स्मॉल कॅप शेअर एकेका दिवशी दहा दहा टक्के वर जातात. तशी अपेक्षा ठेऊ नये..  

या पाठोपाठ इन्फोसिस, माईंड ट्री, एलअॅण्डटी समूहाच्या सॉफ्टवेअर कंपन्या, एशियन पेंट, बजाज फायनान्स अशी रांगच लागली आहे. शेअरबाजाराचा ईसीजी या निकालाबरोबरच अपेक्षापूर्ती व अपेक्षाभंगामुळे वर खाली होईल, बाजाराचे नेतृत्व करणाऱ्या एका जरी लाडक्या कंपनीने अपेक्षेपुढे निकाल व त्यानंतरचा अंदाज दिला तर दिल्ली दूर नही!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या