गड आला पण सिंह गेला

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 26 जुलै 2021

अर्थविशेष

गेल्या आठवड्यात, आपण सारेच निफ्टी १५९०० हा गड सर करते की नाही याची वाट बघत होतो. याविषयी माध्यमे, दलालपेढ्या, परदेशी गुंतवणूकदार सर्वांमध्ये एकमत होते. पंधरा जुलै रोजी लार्सनच्या दोन उपकंपन्यांनी जोरदार निकाल दर्शविल्यामुळे त्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या उत्कृष्ट कामकाजाच्या उन्मादात हा गड सर झाला खरा, तसेच शुक्रवारी (ता. १६ जुलै) आठवड्याचा निफ्टीचा बंद १५९००च्या वर लागून थोड्या आशाही पल्लवित झाल्या. त्याचबरोबर आयटी क्षेत्रानेही (सीएनएक्स आयटी निर्देशांक) २९८०० हे अत्युच्च शिखर पार केले. अपेक्षापूर्ती तर झाली, पण अपेक्षापूर्तीनंतर बरेचदा आता पुढे काय असे म्हणत असमाधान येते.

शिखरावर फार वेळ थांबता येत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परत बेस कॅम्पला यावेच लागते. तद्वतच बाजाराला वागावे लागेल. खरेदीला ही चांगली संधी असू शकते. आयटी विसावा घेत आहे, रिलायन्स अजूनही फारसा उत्साह दाखवत नाही, उरल्या खासगी बँका. मागील लेखातील आपले महत्त्वाचे वाक्य होतेः ‘फक्त आलेख बघायचे की अर्थव्यवस्था रांगते आहे की पळायच्या तयारीत आहे याचा लेखाजोखा घ्यायचा? यासाठी बँकिंग क्षेत्राचे या तिमाहीचे निकाल बघायला हवे किंवा त्याची वाट तरी बघायला हवी.’

एचडीएफसी बँकेचे निकाल शनिवारी (ता. १७ जुलै) जाहीर झाले. बँकेने शनिवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, नफ्यात वार्षिक तुलनेत १६.१ टक्क्यांची वाढ नोंदविली असून गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ६६५८ कोटी रुपयांच्या तुलनेत नफा ७७२९ कोटी रुपये झाला आहे. (सर्वसंमत अंदाज ७९०० कोटी रुपयांचा होता.) तसेच बुडीत कर्जेही वाढली. विश्लेषकांना सहसा आपले अंदाज चुकलेले आवडत नाहीत व त्याची शिक्षा गुंतवणूकदार बाजारभावाला देतात. इतरही काही दुखऱ्या जागा आहेत. मध्यंतरी दोनवेळा झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे खातेदारांना क्रेडीट कार्ड वापरता आली नव्हती. या अडचणी दूर केल्याचा पुरावा रिझर्व्ह बँकेला देईपर्यंत बँक नवे क्रेडीट कार्ड विकू शकत नाही. हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय असल्यामुळे त्यातील व्यत्यय नफ्यात अडसर होऊ शकतो. तसेच वाहन कर्जाबरोबर एक जीपीएस डिव्हाईस विकत घेण्याचा आग्रह ग्राहकाला केला जात असे. त्याबद्दल काही आक्षेप होते. वाहनचालकाच्या मर्जीविरुद्ध ते लावले असेल तर ते काढून टाकावे व पैसे परत द्यावेत असा आदेश बँकेला मिळाला आहे. त्याखेरीज बँक स्थापनेपासून, ज्यांच्या अथक परिश्रमाने बँक उभी राहिली व अग्रेसर आहे, असे काही जुने महत्त्वाचे सहकारी बँक सोडून जात आहेत. त्यात बँकेचा काहीही दोष नसला तरी त्याचाही काही परिणाम सेंटीमेंटवर झाला असावा. या सर्वांचा एकत्रित परिणामस्वरूप शेअर १०० रुपयांनी खाली आला. 

तसेच वरील निकालाची झळ, इतर सरकारी बँका, एचडीएफसी व कोटक बँकेलाही जाणवेल असे वाटते. त्यात बजाज फायनान्सच्या तिमाही निकालाने बाजाराची निराशाच केली आहे. नफा जेमतेम चार टक्के वाढला. बुडीत व बुडीत होण्याजोगी कर्जे अनुक्रमे तिप्पट व दुप्पट झाली. तरतुदी (१७५० कोटी) वाढवल्या आहेत. एकूणच बँकिंगमध्ये सारे काही आलबेल नाही की काय अशी शंका येण्यास जागा आहे. अर्थात त्याने गडबडून जायचे कारण नाही. वरील सर्व शेअरकडे अशा पडझडीत बघायलाच हवे. कारण बुडीत कर्जातील वाढ तात्पुरती असेल असे समजायला हरकत नाही. त्यासाठी व्यवस्थापन यावर काय भाष्य करते हे बघणे महत्त्वाचे ठरेल. 

एशियन पेंट्सनेही पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. वाढत्या मागणीमुळे विक्री व निव्वळ नफा मागील जूनच्या तुलनेत जबरदस्त वाढला आहे. मार्च अखेरचे आकडे मात्र ओलांडता आले नाहीत. त्याकडे आजतरी बाजाराने दुर्लक्ष केले आहे कारण हा व्यवसाय रिटेल केंद्रित असल्यामुळे व अजूनही काही निर्बंध असल्यामुळे ४८०० कोटींची विक्री बाजाराला सुखावून गेली. इतरही पेंट कंपन्यांचे चित्र असेच असेल असे वाटून या क्षेत्रातच थोडी तेजी आली. त्याच बरोबर एसीसीचे कामकाज उत्कृष्ट झाले आहे. सिमेंट क्षेत्र त्यामुळे बहरले आहे.

लार्सन इन्फोटेक आणि एलटीटीएस, ह्या जुळ्या भावंडांनी, तसेच मास्टेक, टीसीएस, इन्फोसिस आदींनी कामगिरी तर उत्कृष्ट दाखवलीच पण त्यानंतरचे त्यांचे पुढील काळाची चाहूल देणारे भाष्य अत्यंत आशादायक होते. अमेरिकेत व इंग्लंडमध्ये अनेक मोठी कंत्राटे मास्टेकने मिळवली आहेत. कंपनीचे युरोप-प्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ओवेन जानेवारीत सोडून गेल्यानंतरही झालेली ही कामगिरी स्पृहणीय आहे. (या बातमीमुळे शेअरचा भाव जानेवारीत कोसळला होता.) जानेवारी २०च्या आसपास ११०० रुपयांवर असलेला हा शेअर आता २५०० आहे. पुढेही जाण्याची आशा आहे. एकूणच माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आपल्या रडारवर सतत हवे. मोठी तेजी झाल्यानंतर विसावा घेताना; गुंतवणूकदाराला खरेदीला वाव मिळावा म्हणून या व पुढील महिन्यात भाव खाली येऊ शकतात. या संधीचा फायदा जरूर करून घ्यावा. 

बँकिंग क्षेत्राने निराशा केल्यामुळे आता १६५००चा हट्ट काही काळ सोडला पाहिजे. निफ्टी १५२०० ते १५४०० या दरम्यान येऊ शकते, तेच आपले खरेदी स्थान आहे. या बाबतीत एक निरीक्षण नोंदवण्यासारखे आहे. गेल्या वेळी अमेरिकन बाजार घसरले त्याचे कारण होते, रोख्यांवरचा वाढलेला उतारा. दीड टक्क्यांवरून तो उतारा १.६ टक्के झाला होता. नंतर बॉण्ड यिल्ड तेथेच घुटमळले आणि तिकडे लक्ष न देता, अमेरिकन बाजाराने नवीन उच्चांक नोंदवला. यावेळी बॉण्ड यिल्ड खाली आल्यामुळे (१.५ टक्क्यांवरून १.३८ टक्क्यांवर), आता मागणी कमी होणार की काय या भीतीने बाजार खाली आले. आपले सुज्ञ वाचक जाणतात की बाजाराची पातळी अपेक्षेबाहेर वाढली तर बाजार खाली येतो. त्याला फक्त निमित्त लागते. कधी कच्चे तेल ते निमित्त पुरवते तर कधी रोखे.

या निमित्ताने येथे झोमॅटोच्या आयपीओचा उल्लेख केला पाहिजे. नव्या युगातील हा शेअर आहे. कंपनीला नफा नाही, तरीही बाजार भांडवलमूल्य नफ्यात असलेल्या इतर अनेक या क्षेत्रातील शेअरपेक्षा अधिक होईल हे अनेकांना पटायला व पचायला जड जाते. या विषयातील अनेक ‘मिम’ माध्यमात फिरत आहेत. अॅमेझॉन, शॉपीफाय, अलीपे, गुगल आदींचे उदाहरण जरी दिले तरी कळत नाही. यावर सोपा उपाय असा की स्वतःचा पूर्ण विश्वास बसल्याशिवाय येथे पैसे टाकू नयेत. या क्षेत्रातील स्वीगी, उबर इट्स वगैरे प्रतिस्पर्धी लवकरच बाजारात उतरणार आहेतच. या सर्वांमध्ये तुलना करून शांतपणे गुंतवणूक करता येईल.

  • भारतीय बाजारात मात्र पुढील तीन-चार  कारणांमुळे सावध राहिले पाहिजे.
  • नवीन शेअर इश्यूजचा सतत होणारा मारा, त्यात आठ दिवसात पैसे दुप्पट मिळवण्याची संधी दिसते. हे बाजार अमाप वाढल्याचे लक्षण आहे. 
  • कमी तरलता असलेल्या शेअरमध्ये आलटून पालटून वरचे व खालचे सर्किट लागण्याच्या घटना वाढत आहेत. दोन्ही बाजूला सर्किट लागल्यामुळे छोटा गुंतवणूकदार चुम्बकासारखा तेथे ओढला जातो. शहानिशा न करता गुंतवणूक केली जाते व पुढे मार बसतो.
  • म्युचुअल फंडाच्या नव्या नव्या नावांनी निघणाऱ्या योजनांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केवळ दहा रुपये एनएव्हीला मिळतात म्हणून एफपीओमध्ये पैसे टाकले जातात. 
  • एरवी अत्यंत संयमी व सावध असणारे गुंतवणूकदारदेखील मुदत ठेवीतील पाच टक्के व्याजाऐवजी इक्विटीत पैसे टाका असा आग्रह सल्लागारांकडे करीत आहेत.  
  • अदानी समूहाच्या शेअरमधील वधघट सेबीच्या नजरेतून सुटली नाही. सेबी चौकशी करेल. त्यामुळे झटपट श्रीमंतीचे स्वप्न काही काळ सट्टेबाज गुंडाळून ठेवतील. सट्ट्याला आवर बसला तर बाजार शांत होईल. 

बाजारात पुन्हा मोठी मंदी जरी येणार नसली तरी बाजार आपल्याला न सांगता पाच दहा टक्के कधीही खाली येऊ शकतो. त्यामुळे सावध पण आशावादी वाटचाल कधीही उत्तम. संपूर्ण बाजार महाग झालेला नाही. पण काही क्षेत्रातील न थांबता होणारी तेजी मोहात न पडता बघता आली पाहिजे.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या