भयपूर्ण चित्त जेथं!

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 9 ऑगस्ट 2021

अर्थविशेष

कुठलाही अपेक्षाभंग शेअरबाजाराला खाली आणू शकतो. मात्र बाजारात मनाजोगती घसरण आल्यावर शेअर खरेदीकडे पाठ फिरवता कामा नये.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या अत्यंत उत्कट कवितेचा मराठी भावानुवाद अर्थशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी ‘भयशून्य चित्त जेथं..’  असा केला आहे. याच चालीवर शेअरबाजाराच्या आजच्या मन:स्थितीचे वर्णन करायचे तर ‘भयपूर्ण चित्त जेथं...’ असे म्हणता येईल. शेअरबाजारात सहभागी असणाऱ्या कुणालाही विचारून बघा. म्युचुअल फंड व्यवस्थापक, विश्लेषक, सल्लागार किंवा देशी वा परदेशी गुंतवणूकदार! सर्वांची भावना भीतीची आहे. बाजार कधी खाली पडेल हीच ती भीती! रोज नवी बातमी व तिला जोडून नवी घसरण होईल ही भावना! मागील सप्ताहात प्रथम अमेरिकेतील बाजार घसरले कारण त्यांना पुन्हा कोविडच्या डेल्टा अवताराची भीती वाटतेय. तेथे मास्क न वापरण्याची मुभा आता काढून टाकली आहे. तसेच जीडीपी वृद्धीचे अंदाजदेखील ८.५ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर आलेत. पण दुसऱ्या बाजूस मोठ्या कॉर्पोरेटचे जून अखेरचे निकाल भक्कम असल्यामुळे व भरीसभर ह्यावेळच्या बैठकीत नक्कीच व्याजदर वाढवणार नाही ही आशा; यामुळे सप्ताहाअखेरीस लागलीच बाजार पुन्हा सावरलेदेखील!

त्यानंतर चीन व हाँगकॉंगचे बाजार कोसळले. गेल्या सप्ताहांती गुंतवणूकदारांना किमान एक लाख कोटी डॉलरचा फटका बसला. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने १९८०च्या दशकानंतर प्रथमच शिक्षण संस्थांच्या संबंधित आर्थिक धोरणात मोठा बदल करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण संस्थांनी नफाच करू नये अशी नियामकांची इच्छा आहे. ‘न्यू ओरिएन्टल एज्युकेशन’ आणि ‘ताल’सारखे शेअर अर्ध्यावर आले. (आपल्यासारखे कठोर सर्किट्स तेथे नाहीत). चीनमधे धनाढ्य व सामान्य नागरिकांतील दरी वाढते आहे. ‘मितुआन’सारख्या (आपल्या झोमॅटोचा चिनी अवतार) तयार खाद्य घरपोच देणाऱ्या संस्थांकडून डिलिव्हरी बॉईजचे  जे शोषण होते त्याकडे सरकारने मोर्चा वळवला आहे. नवे निर्बंध, पगार व कामाचे तास यासाठी तर आहेतच व त्यातून वरील उत्पन्नातील दरी कमी करण्याचा हेतू आहे. या निर्बंधांमुळे मितुआनचे शेअर्स १५ टक्क्यांनी पडले. पुढील ‘स्पुटनिक’ कुठल्या उद्योगावर बरसणार यावर विश्लेषकांत तर्कवितर्क चालू आहेत. कदाचित रिअल इस्टेट किंवा गेमिंग क्षेत्राचा नंबर लागावा. ह्यापुढेही नियामक अधिक कठोरपणे अनुपालन अमलात आणतील अशी वदंता व भीती आहे. खरेतर जुलै महिना विकसनशील देशांना खडतरच गेला. या महिन्यात ‘मॉर्गन स्टॅनले इमर्जिंग मार्केट्स’चा निर्देशांक ६.७ टक्क्यांनी खाली आला. त्यात मुख्य वाटा चीन व इंडोनेशियाचा (कोविड रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे) होता.

या तुलनेत, आशियाई शेअर बाजार खाली आले तरी २ ऑगस्टच्या सोमवारी आपला बाजार वरील घटनांना बेफिकिरीने सामोरे जात फारसा पडला नाही. एसजीएक्स निफ्टीने कितीही घाबरवले तरी आपली निफ्टी आठवडाभर स्थिरच राहिली.  

हा सर्व ऊहापोह करण्याचे कारण एकच, जाणकारांना कितीही भीती वाटली तरी  शेअरबाजाराची सहजासहजी खाली यायची इच्छा नाही. या सदरात पुन्हा पुन्हा म्हटले आहे की बाजार न सांगता कधीही ५ ते १० टक्के खाली येऊ शकतो (पण म्हणजे येईल असेही नाही). त्याची जर तयारी असेल तर मग भीती कशाची? 

दुसऱ्या बाजूला कोट्यवधी नवे, अननुभवी ‘रॉबिन हुड’ निवेशक रोजच बाजाराच्या पायऱ्या चढत आहेत. (अँजेल ब्रोकिंग, ग्रो, झीरोधा आदी दलाल पेढ्यांच्या नवीन ग्राहकांची संख्या बघा.) त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नाही. लोभ आहे पण त्याचा अतिरेकही सर्वत्र दिसत नाही. त्यात शेअरबाजाराच्या सुरक्षेसाठी, सेबीने मार्जिन वाढवत जवळपास ७५ टक्क्यांवर आणले आहे. ते लवकरच १०० टक्के होईल, पण त्यामुळेही तेजीची पकड सैल होत नाही. किंबहुना परदेशी गुंतवणूकदारांची सर्व विक्री आपले म्युचुअल फंड्स व रॉबिन हुड निवेशक पचवताना दिसताहेत. श्वास रोखून वाचा, जुलैत परदेशी गुंतवणूकदारांनी २३,१९३ कोटी रुपयांची विक्री करूनदेखील निर्देशांक खाली आले नाहीत. 
इंडिया विक्सबद्दल मागेही अनेकदा विवेचन केले आहे. तेराच्या जवळ असलेली तिची पातळी पुन्हा एकदा धीर देत आहे. निष्कर्ष एकच! शेअरबाजार खाली यायच्या ऐवजी वर जाण्याची शक्यता अधिक आहे. पुन्हा एकदा १६,५००ची आशा करायला हरकत नाही.

गुंतवणूकदारांना पडलेला मुख्य प्रश्न म्हणजे मग बाजार खाली येणार तरी कधी? याचे उत्तर असे की क्षेत्रबदल होताना काही शेअर खाली येतात. म्हणजे निर्देशांक एकाच जागी राहून काही शेअर मात्र खाली येतात. उदाहरणार्थ बोलता बोलता एचडीएफसी, एचडीएफसी बँक, कोटक बँक रिलायन्स आदी मोहरे खाली आले. त्यांची जागा इन्फोसिस, सन फार्मा, अल्ट्राटेक, टायटन, भारती घेत आहेत. एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाताना हे सतत होत असते. तसेच एक महिन्यापूर्वी एनएसई ५०० निर्देशांकातील ९२ टक्के शेअर ५० दिवसांच्या चलसरासरीच्या वर होते (म्हणजे सोप्या भाषेत तेजीत होते), या महिन्यात जेमतेम ५८ टक्के शेअर वर आहेत. म्हणजेच आपल्या नकळत बाजार खाली आला होता. यापुढे दमदार निकाल येत राहिले आणि कोविडची तिसरी लाट सुसह्य असेल तर आपले १६५००-१६६००चे लक्ष्य साधायला हवे. 

कुठलाही अपेक्षाभंग शेअरबाजाराला खाली आणू शकतो. मात्र बाजारात मनाजोगती घसरण आल्यावर शेअर खरेदीकडे पाठ फिरवता कामा नये. असो. 

गृह कर्जात अग्रेसर असलेल्या एचडीएफसी कॉर्पचे जून अखेरचे निकाल व त्याहीपेक्षा व्यवस्थापनाचे भाष्य उत्साहवर्धक आहे. एकूण कर्जात व्यक्तिगत कर्जांचा वाटा ७८ टक्के आहे. त्यातही किफायती घरांसाठी ३३ टक्के कर्जवाटप केले आहे. जुलै महिन्यात  कर्जवाटपाच्या दृष्टीने इतिहास नोंदला गेला. त्यातही ८८ टक्के कर्जे ऑनलाइन विक्रीतून आली आहेत. कर्जवसुलीची कार्यक्षमता ९८ टक्के आहे. निकाल अंदाजासमोर डावे असले तरी भविष्याचे चित्र आशादायक आहे. जून अखेरच्या तिमाहीत कोविडचा जोर असला तरी व्यवसाय वाढता आहे. ह्या शेअर खरेदीची शिफारस मागेही केली होती, २४०० रुपयांची पातळीही त्यावेळी निर्देशित केली होती.

त्यापाठोपाठ ब्रिटानियाने अपेक्षेपेक्षा वरचढ निकाल नोंदवले. करपूर्व ढोबळ नफा व निव्वळ नफा दुपटीहून जास्त आहे. ४१३ कोटी रुपयांचा नफा होईल असा अंदाज होता, प्रत्यक्षात ५४२ कोटींचा नफा नोंदवला आहे. विक्रीही वाढली आहे. (२६ टक्के) कंपनीकडून अशीच अपेक्षापूर्ती या आर्थिक वर्षात अपेक्षित आहे. 

‘एसआरएफ’ हा आपल्या लाडक्या रसायन क्षेत्रातील शेअर आहे. निकाल कसेही असते तरी बाजाराने उचलून घेतले असते. पण विश्लेषकांची कुठलीही निराशा कंपनीने केली नाही. मागील वर्षीच्या १५०० कोटी रुपयांसमोर, या तिमाहीची विक्री २७०० कोटी आहे. इपीएस दुप्पट झाला आहे. प्रती शेअर मिळकत तिमाहीत ६६.७ रुपयांवर गेली आहे. आमदानीचा वर्षभराचा अंदाज २८० ते ३०० रुपये प्रती शेअर आहे. वर्ष २२-२३मध्ये किमान १५ टक्के शेअरमागे उत्पन्न वाढल्यास २५ ते २७ दरम्यान पी /ई गुणोत्तर येते. किमान दोन वर्षे जवळ बाळगण्याचा विचार करूनच पाऊल उचलावे. बोलता बोलता निफ्टीने १६००० अंशाला स्पर्श केलाच आहे. आपल्या सर्व अपेक्षा शेअरबाजार पुऱ्या करो हीच सदिच्छा!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या