कोरोना आणि बँकिंग व्यवहार 

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 27 एप्रिल 2020

अर्थविशेष
 

सध्या जगतील सुमारे २१० देशांवर कोरोनाचे संकट कोसळले आहे आणि आपला भारत देशही या संकटाचा धीराने सामना करीत आहे. दुर्दैवाने अजून तरी या विषाणूवर १०० टक्के मात करू शकेल अशी लस उपलब्ध नाही. जागतिक पातळीवर यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे आणि अशी अशा आहे, की शास्त्रज्ञ लवकरच अशा लशीचा शोध लावून दिलासा देतील. परंतु, तोपर्यंत या महामारीला येनकेन प्रकारे थोपविणे हीच आजची प्राथमिकता आहे.

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्याने यापासून बचाव करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे कसोशीने पालन करणे व त्यासाठी आपल्या घरातच राहणे, बाहेर शक्यतो न पडता होता होतील तेवढी कामे घरी राहून करणे, हेच हितावह असणार आहे.

मात्र या काळातसुद्धा काही दैनंदिन व्यवहार थांबविता येत नाहीत, तर यातील काही कामे आर्थिक व्यवहाराशी निगडित असतात. उदा. काही दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी, पंतप्रधान केअर्स फंड, चीफ मिनिस्टर फंड यांना द्यावयाची देणगी, दरमहाची विविध बिले उदा. लाइट बिल, मोबाइल बिल, क्रेडिट कार्ड बिल, ब्रॉडबॅंड, ई-बिले, पेपर, दूध, किराणा, भाजी व फळे यांचे पेमेंट. असे व्यवहार आपण जर संबंधित व्यक्तीस प्रत्यक्ष भेटून अथवा बँकेत किंवा संबंधित कार्यालयात जाऊन केले, तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. परिणामी आपण कोरोनाला स्वतःहून आमंत्रण दिल्यासारखे होईल. सुदैवाने आजकाल बहुतांश बँका आपल्या खातेदारांना ऑनलाइन तसेच डिजिटल सेवा देऊ करत आहेत. गरज आहे ती ऑनलाइन किंवा डिजिटल सेवा वापरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची. हे आपल्याला अगदी सहजपणे खालील प्रमाणे करता येईल.

शक्यतो बँकेत जाऊन रोख रक्कम काढू नये. यामुळे आपला बँकेच्या कर्मचाऱ्यांशी, तसेच बँकेत आलेल्या अन्य ग्राहकांशी संपर्क येणार नाही. त्याऐवजी एटीएममधून रक्कम काढावी व एकदाच पुरेशी काढावी, म्हणजे पुन्हा पुन्हा जावे लागणार नाही. काढलेली रक्कम लगेचच न वापरता सुमारे ८-१० तासांनी वापरावी. त्याआधी ती रक्कम बाजूला ठेऊन द्यावी व आपले हात लगेचच साबणाने अथवा सॅनिटायझरने साफ करावेत (नोटा वरचेवर हाताळल्या जात असल्याने व्हायरसचा धोका संभवतो).
     बहुतांश व्यवहार रोख रक्कम न वापरता चेकने करता येतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत चेक देणे घेणेसुद्धा व्हायरस संक्रमणाचे कारण ठरू शकते. यावर  नेट बँकिंग, मोबाइल ॲप्समध्ये भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम यासारखे विविध पर्याय आहेत व हे पर्याय वापरण्यास अगदी सोपे आहेत. यामुळे आपण कोणाच्याही प्रत्यक्ष संपर्कात येत नाही शिवाय करवयाचे पेमेंट अगदी तात्काळ व विनासायास होते.
     याशिवाय आपण डेबिट/क्रेडिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन पेमेंट करू शकता.
     समजा आपल्याला कोणास पैसे पाठवायचे आहेत किंवा कोणाकडून पैसे मागवायचे आहेत. यासाठी एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस यासारखे पर्याय उपलब्ध आहेत व सर्व पर्याय घरबसल्या आपल्या सोयीने वापरता येतात. यासाठी आपले नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग कार्यान्वित असणे आवश्यक आहे किंवा आपण भीम, गुगलपे, फोनपे यांचाही वापर करू शकता.
     याशिवाय आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट, ठेवीचे नुतनीकरण, अथवा मॅच्युरिटी पेमेंट यासारखे व्यवहार नेट बँकिंग/मोबाइल बँकिंगद्वारा करू शकता, बँकेत जाण्याची अजिबात गरज नाही.

नेट बँकिंग/मोबाइल बँकिंग तसेच भीम, गुगलपे, फोनपे यासारख्या सुविधा वापरताना पुढीलप्रमाणे दक्षता घेणे अगदी आवश्यक आहे. 

  • आपले लॉगइन व ट्रॅनझॅक्शन पासवर्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड पिन व सीव्हीव्ही नंबर, एमपीएन नंबर लक्षात राहण्यास सोपे, परंतु इतरांना कळण्यास कठीण असे तयार करावेत.
  • आपण मोबाइल नंबर बदल्यास बँकेस लगेचच कळवून नवीन नंबर रजिस्टर करावा, म्हणजे आपला ओटीपी भलत्याच व्यक्तीस कळणार नाही. आपला फोनवर आलेला ओटीपी कधीही अनोळखी व्यक्तीस फोनवर सांगू नये.
  • ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षित नेटवर्क वापरावे, सार्वजनिक नेटवर्क वापरू नये.
  • गॅजेटमध्ये योग्य असा अँटिव्हायरस इनस्टॉल करावा.
  • जाहिराती, पॉपअप डिसेबल करावेत.
  • फ्रॉड्युलंट मेल, एसएमएस व लिंकला अजिबात प्रतिसाद देऊ नये. यातून आपली फसवणूक होऊ शकते.

थोडक्यात सध्याच्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे नितांत गरजेचे आहे व याचाच एक भाग म्हणून डिजिटल बँकिंगचा वापर करणे काळाची गरज आहे. यातून आपण सुरक्षित तर राहाल व पुढे लॉकडाऊन संपल्यावरसुद्धा ही सवय आपल्या फायद्याची राहील.  

संबंधित बातम्या