वॉलमार्ट : आव्हाने व फायदे 

कौस्तुभ मो. केळकर, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
गुरुवार, 17 मे 2018

भाष्य
 

आपल्या देशातील ई कॉमर्स क्षेत्रात ९ मे रोजी सर्वांत मोठ्या विलीन आणि अधिग्रहण व्यवहारात जगातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी वॉलमार्टने फ्लिपकार्ट विकत घेण्याचा करार केला. फ्लिपकार्ट ही आपल्या देशातील सर्वांत मोठी ई कॉमर्स कंपनी आहे. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बेंगळुरूत याबाबत बैठक झाली. या बैठकीत वॉलमार्टने फ्लिपकार्टचे ७७ टक्के शेअर्स १६ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे १ लाख ७ हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय घेतला. फ्लिपकार्टमधील एक प्रमुख गुंतवणूकदार सॉफ्टबॅंकेचे सीईओ मासायोशी सोन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या बैठकीत वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन यांच्यासह कंपनीचे आणखी काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फ्लिपकार्टमधील उर्वरित २३ टक्के हिस्सा कंपनीच्या सध्याच्या भागधारकांकडे कायम राहील. यामध्ये फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, चीनमधील टेन्सेंट होल्डिंग्ज लिमिटेड, टायगर ग्लोबल, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन यांचा सहभाग आहे. फ्लिपकार्टच्या खरेदीमुळे अमेरिकी वॉलमार्टला ई रिटेल क्षेत्रात पाय रोवता येतील. 
वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील हिस्सा ८५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्याचे योजले असून कंपनी भारतामधील व्यवसायांत सुमारे २ अब्ज डॉलर्स गुंतवणार आहे. या क्षेत्रात सध्या कंपनीला स्पर्धक ॲमेझॉनचे जबरदस्त आव्हान आहे. वॉलमार्टचे ई-रिटेल क्षेत्रात नगण्य अस्तित्व असून आता फ्लिपकार्टमुळे दोन्ही रिटेल क्षेत्रामध्ये व्यवसायवृद्धी करता येईल. फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टमधील व्यवहारानंतर फ्लिपकार्टच्या दोन संस्थापकांपैकी फ्लिपकार्टचे कामकाज बिन्नी बन्सल यांच्या हाती आले आहे, तर दुसरे संस्थापक सचिन बन्सल यांनी आपला ६ टक्के इतका पूर्ण वाटा विकून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये ७७ टक्के हिस्सा खरेदी करण्याअगोदर आणि नंतर विविध घटकांचा हिस्सा कसा आहे आणि असेल हे पुढील तक्‍त्यामध्ये दिले आहे.. 

फ्लिपकार्टमधील गुंतवणूकदार हिस्सा % 
सॉफ्टबॅंक                  २२.३ 
टायगर ग्लोबल           २२ 
नेसपेर्स                     १३.८ 
एसेल                        ६.९ 
इबे                           ६.६ 
टेंसेंट                        ६.३ 
सचिन बन्सल            ६ 
कर्मचारी आणि इतर    ६ 
बिन्नी बन्सल            ५.६ 
डीएसटी ग्लोबल         २.७ 
मायक्रोसॉफ्ट             १.८ 

फ्लिपकार्टमधील गुंतवणूकदार हिस्सा % 
वॉलमार्ट                                                                                                                   ७७ 
टायगर ग्लोबल, टेंसेंट, नेसपेर्स, बिन्नी बन्सल, एसेल, मायक्रोसॉफ्ट, कर्मचारी आणि इतर      २३  

भारतातील किरकोळ विक्री क्षेत्राचे महत्त्व 
देशातील किरकोळ विक्री प्रचंड वेगाने वाढत असून देशाच्या एकंदर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जीडीपीमध्ये या क्षेत्राचा सुमारे १० टक्के वाटा आहे. तर एकूण रोजगारांमध्ये ८ टक्के वाटा आहे. एका अहवालानुसार २०२० पर्यंत किरकोळ विक्री क्षेत्रातील उलाढाल सुमारे १.१ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाईल; तर २०१३ मधील ई-रिटेल व्यवसाय ३.५ अब्ज डॉलर्सवरून २०२० पर्यंत २७.९ अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल. ग्रॉस मर्चंडाइझ व्हॅल्यूचा (जीएमव्ही) विचार केला, तर ती २१० अब्ज डॉलर्सची पातळी पार करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रोजगारक्षम क्षेत्र म्हणून किरकोळ विक्री पुढे येत आहे. यामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ पाहता या क्षेत्रात  दुकाने, साखळी पुरवठा, गोदामे, ग्राहकांपर्यंत माल पोचवणे अशा  विविध विभागांमध्ये रोजगारनिर्मिती होत आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाल्यास जनतेच्या खिशात आणखी पैसे येतील आणि या क्षेत्राला आणखी तेजी येईल. 

आपल्या देशातील अशा या उभरत्या आणि भविष्यात सातत्याने वाढत जाणाऱ्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यासाठी वॉलमार्ट सतत धडपड करत होती. भारतात किरकोळ विक्री (रिटेल) क्षेत्रात १०० टक्के थेट गुंतवणुकीला परवानगी नसल्याने वॉलमार्टने भारती एंटरप्रायझेसबरोबर भागीदारीत ‘इझीडे स्टोअर्स’ सुरू केली. परंतु ही जोडी फार काळ टिकली नाही. नंतर वॉलमार्टने घाऊक विक्री दालने उघडली; ती अजूनही व्यवसाय करत आहेत. परंतु किरकोळ विक्री क्षेत्रात पुन्हा एकदा पदार्पण करण्यासाठी अखेरीस ई रिटेल चा पर्याय निवडला. आपल्या देशात ई रिटेलमध्ये मार्केटप्लेस मॉडेल पद्धतीमध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी आहे. हे सर्व पाहून अमेझॉनसुद्धा भारतामधील आपल्या व्यवसायात गुंतवणूक वाढवत आहे. 

फ्लिपकार्टचा यशस्वी प्रवास 
फ्लिपकार्ट ही सचिन व बिन्नी बन्सल या दोन आयआयटी इंजिनिअर्सनी स्थापन केलेली कंपनी आहे. २००७ मध्ये यांनी बेंगळुरूत तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये आपला व्यवसाय ऑनलाइन पुस्तक विक्रीने सुरू केला. आज फ्लिपकार्टचे मुख्यालय एक लाख चौरस फुटाचे  असून या कंपनीमध्ये सुमारे ६,७०० हून अधिक कर्मचारी आहेत. गेल्या दहा वर्षांत फ्लिपकार्टचे व्यवसायमूल्य २०.७०  अब्ज डॉलर्सवर पोचले आहे. सचिन बन्सल यांनी सुरवातीला व्यवसायात सुमारे ८९ हजार रुपये गुंतवले होते. आता त्यांना त्यांच्या ६ टक्के हिस्सा विक्रीतून सुमारे ६ हजार ७०० कोटी रुपये मिळतील. हा स्वप्नवत प्रवास पुढे दिला आहे. हा प्रवास ‘स्टार्टअप्स’करता आयकॉन झाला आहे. 

वॉलमार्टची व्यवसाय पद्धती 
अमेरिकेतील वॉलमार्ट ही किरकोळ व्यवसाय क्षेत्रातील एक बलाढ्य कंपनी असून २०१७ अखेर त्या कंपनीचा व्यवसाय सुमारे ४८५ अब्ज डॉलर्स होता. तर २०१८ मध्ये तो ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. या वॉलमार्टची २८ देशांमध्ये सुमारे ११ हजार स्टोअर्स आहेत. ग्राहकांची मानसिकता, त्यांच्या गरजा यांचा सखोल अभ्यास, विश्‍लेषण करून दररोज कमी किमतीमध्ये दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देणे (EDLP - Every day low prices) हे कंपनीच्या व्यवसायाचे ब्रीदवाक्‍य आहे. जगभरात सुमारे २६ अब्ज ग्राहकांना कंपनी सेवा देते. वस्तूंच्या किमती कमी ठेवण्यासाठी कंपनी जगभरातील अनेक ठिकाणांहून कच्चा माल आणि वस्तू खरेदी करते. उत्तम साखळी पुरवठा आणि कमीत कमी नुकसान हे किरकोळ व्यवसाय क्षेत्राचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत. वॉलमार्ट यांचे महत्त्व चांगलेच जाणते. अशी ही वॉलमार्ट आपल्या देशात व्यवसायासाठी येणार, यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना धोका पोचण्याची शक्‍यता आहे. या करारानुसार देशातील ३ कोटी दुकानदारांना थेट नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे देशातील सुमारे ६ लाख नोकऱ्या धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे, अशा स्वरूपाची वक्तव्ये केली जात आहेत. या कराराला विरोध करण्यासाठी देशातील अनेक व्यापारी एकत्र येणार असून, सरकारला याबाबत आवाहन करणार आहेत. याबाबत ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे सचिव जनरल प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले, की वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार झाल्यानंतर वॉलमार्टसारख्या कंपन्यांना जगातून कोणत्याही ठिकाणांहून वस्तू आणता येऊ शकतात. भारतात त्या विकताही येऊ शकतात. देशातील  सर्वसामान्य दुकानदार यामुळे मागे राहण्याची शक्‍यता आहे. 

परंतु या सर्व शंका, भीती अनाठायी वाटते. आपल्या देशातील दुकानदार, व्यापारी उत्तम व्यावसायिक आहेत. कोणत्याही स्पर्धेला तोंड देऊन टिकून राहण्याची त्यांची क्षमता आहे. आज टाटा, बिर्ला, रिलायन्स यांनी किरकोळ विक्री क्षेत्रात प्रवेश केला, परंतु यामुळे छोटे दुकानदार, व्यापारी यांच्यावर व्यवसाय बंदीची वेळ आली नाही. देशातील बाजारपेठ मोठी आहे आणि सर्वांना संधी आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे, आज देशात छोटे दुकानदार, किरणामालाचे विक्रेते, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स डिजिटल, बिग बझार, टाटा स्टार बाजार, आदित्य बिर्ला समूहाचे ‘मोर’ स्टोअर्स, तर ई रिटेलमध्ये स्नॅपडील, अमेझॉन, फ्लिपकार्ट असे किरकोळ विक्री क्षेत्रातील अनेक प्रकारातील अनेक व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. परंतु कोणाचा धंदा बंद झाल्याचे ऐकिवात नाही. वॉलमार्ट ‘शेतकरी ते ग्राहक’ जोडण्यासाठी उत्तम साखळी पुरवठा व्यवस्थापन करते. यामध्ये शीतगृहे, भाजीपाला, दूध, फळे वाहून नेण्यासाठी खास वातानुकूलित यंत्रणा उभारणे यावर भर देते. वॉलमार्टच्या आगमनाने शेतकरी वर्गाला वरील सर्व योजनांचा फायदा होऊ शकेल. हे सर्व पाहता वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील हिस्सा खरेदी केल्याने भारताचा फायदाच होणार असून, देशात कोट्यवधी रोजगार निर्माण होतील. याच सोबत अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल, असा विश्‍वास वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी व्यक्त केला आहे. 

कहानी मे ट्विस्ट 
हे सर्व चांगले घडत असताना, देशात मोठी गुंतवणूक येत असताना, आपले सरकार विघ्नसंतोषीपणा केल्याशिवाय स्वस्थ कसे बसेल? याचे उत्तर ‘सीबीडीटी’ (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍सेस) यांनी वॉलमार्टला एक पत्र पाठवून हा करारामधील अटी, शर्तींनुसार सचिन बन्सल, बिन्नी बन्सल, सॉफ्टबॅंक यांना हिस्सा विक्रीची रक्कम देताना भांडवली नफा कर कापणे आणि तो भरणे आवश्‍यक आहे असे कळवले आहे. हे लक्षात घेता सचिन बन्सल, बिन्नी बन्सल यांना हिस्सा विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर कर द्यावा लागेल. तसेच सॉफ्टबॅंकेच्या फ्लिपकार्ट मधील २.४ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची किंमत वाढून आज ती सुमारे ४ अब्ज डॉलर्स झाली आहे. हे लक्षात घेता सॉफ्टबॅंक हिस्सा विक्रीवर सावध पवित्रा घेत असून हिस्सा विक्री लांबणीवर टाकण्याचा विचार करत आहे. ‘मेक इन इंडिया’च्या घोषणा करणाऱ्या सरकारला हे शोभत नाही.  एकंदर पाहता आपल्या देशातील ई रिटेल व्यवसायात वॉलमार्ट आणि अमेझॉन या दोन बलाढ्य कंपन्यांमधील तीव्र स्पर्धा पाहायला मिळेल. या सर्वांतून, जनतेला, उत्तम दर्जाच्या वस्तू, सेवा आणखी किफायतशीर दरात मिळतील. ‘एकदा विकलेला माल कोणत्याही परिस्थितीमध्ये परत घेतला जाणारा नाही’, तसेच ‘एमआरपी पेक्षा कमी दराने वस्तू मिळणार नाही’ अशा जोखडातून मुक्ती मिळून आता ग्राहक राजा होणार हे नक्की.

संबंधित बातम्या