उद्योग क्षेत्रात मंदी..? पण शेअर बाजारात तेजी!

मुकुंद लेले
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

अर्थविशेष
उद्योग क्षेत्रातील सद्यःस्थितीची सरकारला कल्पना आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने ‘बूस्टर डोस’ देत आहे. त्याचा परिणाम दिसायला काही काळ लागेल, हे निश्‍चितच! सरकारने सवलतींचा हात दिलेली क्षेत्रे सुधारणा दाखवू शकतील, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मागणीत वाढ झाल्यास अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. रिझर्व्ह बॅंकेने या वर्षात सातत्याने व्याजदरकपात केली आहे. शेअर बाजाराला पूरक ठरणारा हा घटक भविष्यात महत्त्वपूर्ण ठरू शकतो. थोडक्‍यात, अर्थव्यवस्थेत हळूहळू सुधारणा होण्याची अपेक्षा धरता येईल. सध्याचा बाजार हा किफायतशीर मूल्यांकनाच्या सीमेच्या आत आहे आणि भविष्यात कंपन्यांच्या उत्पन्नात सुधारणा झाल्यास तो नव्या उंचीवर पोचू शकतो.

कंपन्यांचे तिमाही निकाल संमिश्र, आर्थिक विकासदराचे घटलेले अनुमान, औद्योगिक उत्पादनाचे आकडे नीचांकी पातळीवर, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन या साऱ्या निराशाजनक घटना-घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, ‘मूडीज’ने भारताविषयीचे अनुमान ‘स्टेबल’कडून ‘निगेटिव्ह’ केल्याने आगीत तेल ओतले गेले. दुसरीकडे, जागतिक पातळीवर फार मोठी सकारात्मक घटना घडलेली दिसत नाही. असे असले तरी आपल्या शेअर बाजारात तेजीची झुळूक अनुभवायला मिळत आहे. अर्थात नफावसुलीचा दबाव आहेच, पण तरीही अर्थव्यवस्थेतील अनेक नकारात्मक घटना बाजाराने पचविलेल्या दिसत आहेत. त्यामुळे ‘सेन्सेक्‍स’ आता ४० हजार अंशांच्या पार, तर ‘निफ्टी’ जवळजवळ १२ हजार अंशांपाशी खेळताना दिसत आहे. एकूणच बाजार घनत्न (कन्सॉलिडेशन) बनवत असल्याचे जाणवते. 

कंपन्यांची कमाई कशी? 
देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र समाधानकारक नाही, हे अनेक निकषांवरून सहजपणे दिसते. देशांतर्गत व्यापक (मॅक्रो) घटकांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर बऱ्याच गोष्टी चिंता वाढविणाऱ्या आहेत. देशाचे औद्योगिक उत्पादन (सप्टेंबरमध्ये) सलग दुसऱ्या महिन्यात घटले आहे. गेल्या साडेसात वर्षांतील सर्वांत खराब कामगिरी (४.३ टक्के) यावेळी नोंदली गेली आहे. ‘मूडीज’ने विकासदराचा अंदाज ५.८ टक्‍क्‍यांवरून ५.६ टक्‍क्‍यांवर खाली आणला आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) घसरण ही आधीच्या अपेक्षेपेक्षाही जास्त काळ टिकताना दिसत असल्याचे निरीक्षण नोंदले गेले आहे. देशाचा घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) ऑक्‍टोबरमध्ये काहीसा घसरला. सप्टेंबर २०१९ मध्ये तो ०.३३ टक्के होता, तर ऑक्‍टोबरमध्ये तो ०.१६ टक्के नोंदला गेला. देशाच्या किरकोळ चलनवाढीने ऑक्‍टोबरमध्ये रिझर्व्ह बॅंकेचे मध्यमकालीन उद्दिष्ट (४ टक्के) जुलै २०१८ नंतर प्रथमच तोडले आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतवाढीने हे घडले. 

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांचा हंगाम आता संपला आहे. या निकालांवर एक नजर टाकली तर बऱ्याच कंपन्यांनी अपेक्षेइतकेच आकडे जाहीर केले आहेत. विशेषतः विक्री, करपूर्व नफा आणि इबिटा (अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट, टॅक्‍सेस, डेप्रिसिएशन अँड ऍमॉर्टायझेशन) या आघाड्यांवर बहुतांश कंपन्यांनी अपेक्षापूर्ती केली आहे. ‘निफ्टी’तील कंपन्यांचा विचार केला, तर मारुती सुझुकी, एचसीएल टेक्‍नॉलॉजीज आणि टाटा मोटर्स यांनी करपूर्व नफ्याच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली आहे, तर इंडियन ऑईल, अल्ट्राटेक सिमेंट यांनी काहीसा अपेक्षाभंग केला आहे. सर्वसाधारणपणे या तिमाहीतील कमाईचा हंगाम ऑटोमोबाईल आणि कॉर्पोरेट बॅंकांसाठी सकारात्मक ठरल्याचे दिसून येते. ‘एफएमसीजी’ कंपन्यांसाठी स्थिर, तर ‘आयटी’साठी सावधगिरीचा इशारा देणारा आहे. 

कंपनीकरकपातीचा लाभ 
एकुणात, बऱ्यापैकी समाधानकारक ठरलेल्या तिमाही निकालांना बळ मिळाले ते सरकारच्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांचे! संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेतील काही क्षेत्रांसाठी सरकारने धाडसी निर्णय घेतले. विशेषतः कंपनीकरातील कपातीच्या निर्णयाचा उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळालेला आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्या शेअर बाजारात उमटले आहे. बाजारातील ‘सेंटिमेंट’ सुधारण्यासाठीही त्याचा मोठा उपयोग झाल्याचे जाणवते. या निर्णयाचा खरा लाभ कंपन्यांच्या नफ्यावर दिसून येत आहे आणि यापुढेही दिसणार आहे. त्यामुळे आगामी तिमाहींमध्ये कंपन्यांच्या नफ्यात अपेक्षेपेक्षा अधिक सुधारणा झाल्याचे दिसून आल्यास नवल वाटायला नको. 

एअर इंडिया व बीपीसीएल  
अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारकडून पाठोपाठ निर्णय घेतले जात आहेत. आता एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची मार्च २०२० पूर्वी विक्री करून एक लाख कोटी रुपये उभे करण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले आहे. अपेक्षेप्रमाणे विक्री झाली तर सरकारला मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. आर्थिक मंदावलेपणातून देशाला सावरण्यासाठी सरकारने योग्य दिशेने पावले टाकली आहेत आणि आता बरीच क्षेत्रे संकटातून बाहेर येत आहेत. यामुळे वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) संकलनात मोठी उसळी दिसून येईल, असा आशावादही त्यांनी जागविला आहे. 

सीएसबी बॅंकेचा ‘आयपीओ’ 
देशातील खासगी बॅंकिंग क्षेत्रातील जुन्या बॅंकांपैकी एक (पूर्वीची कॅथलिक सिरियन बॅंक) सीएसबी बॅंकही आता भांडवली बाजारात प्रवेश करीत आहे. २२ ते २६ नोव्हेंबर या काळात या बॅंकेचा ‘आयपीओ’ खुला राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकी १० रुपये मूल्याच्या शेअरसाठी १९३ ते १९५ रुपये असा किंमतपट्टा ठेवण्यात आला आहे. किमान ७५ आणि त्यापुढे ७५ शेअरच्या पटीत बोली लावता येणार आहे. ९८ वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या या बॅंकेचे केरळमध्ये भक्कम जाळे आहे. त्याशिवाय तमिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी अस्तित्व आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांत सलग तोटा आणि सप्टेंबर २०१९ अखेर नफा दाखविलेल्या या बॅंकेच्या ‘आयपीओ’ला सध्याच्या वातावरणात गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात, ते लवकरच समजेल. 

‘सौदी अरॅमको’ची उत्सुकता 
देशांतर्गत पातळीवर नजीकच्या काळात कोणतीही नियोजित महत्त्वाची घटना दिसत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवरील घटनांचे संकेत आपल्या बाजाराला खुणावतील आणि साहजिकच त्याचे पडसाद बाजारात उमटू शकतील. त्यात प्रामुख्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे धोरण, कच्च्या तेलाचे भाव, अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार करार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोग आणि जगातील सर्वांत मोठी खनिज तेल उत्पादक कंपनी असलेल्या ‘सौदी अरॅमको’ची बहुचर्चित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) यांचा समावेश असेल. भांडवली बाजारातील हा आतापर्यंतचा जगातील सर्वांत मोठा ‘आयपीओ’ ठरण्याची शक्‍यता आहे. सौदी अरेबियाने कंपनीचे १.७१ लाख कोटी डॉलरचे मूल्यांकन केले आहे. रियाध शेअर बाजार आणि जगातील प्रमुख भांडवली बाजारात अरॅमको १.५ टक्के शेअरची विक्री करून २४ ते २५.६ अब्ज डॉलरचा निधी उभा करण्याचा कंपनीचा मानस आहे. यासाठी प्रतिशेअर ३० ते ३२ सौदी रियाल असा किंमतपट्टा निश्‍चित करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून ‘सौदी अरॅमको’च्या ‘आयपीओ’ची बाजारात चर्चा होती. गेल्या १७ नोव्हेंबरपासून तो संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. छोट्या गुंतवणूकदारांसाठी तो येत्या २८ नोव्हेंबरपासून खुला होणार आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

सध्याचा बाजार कसा? 
या पार्श्‍वभूमीवर सध्याचा बाजार कसा वाटतो? उद्योग क्षेत्रात मंदीची चर्चा होत असली तरी ती कितपत खरी आहे, हे काळच ठरवेल. मात्र, ही मंदी (रिसेशन) नसून, मंदावलेली स्थिती (स्लोडाऊन) आहे आणि महत्त्वाचे म्हणजे उद्योगचक्राचा तो एक भाग आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एखाद-दुसऱ्या तिमाहीचे आकडे फारसे समाधानकारक आले नाहीत तर लगेच ‘मंदी’ म्हणणे योग्य ठरणार नाही, असे त्यामागचे स्पष्टीकरण दिले जाते. उद्योग क्षेत्रातील सद्यःस्थितीची सरकारला कल्पना आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने ‘बुस्टर डोस’ देत आहे. त्याचा परिणाम दिसायला काही काळ लागेल, हे निश्‍चितच! सरकारने सवलतींचा हात दिलेली क्षेत्रे सुधारणा दाखवू शकतील, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मागणीत वाढ झाल्यास अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. रिझर्व्ह बॅंकेने या वर्षात सातत्याने व्याजदरकपात केली आहे. शेअर बाजाराला पूरक ठरणारा हा घटक भविष्यात महत्त्वपूर्ण ठरू शकतो. थोडक्‍यात, अर्थव्यवस्थेत हळूहळू सुधारणा होण्याची अपेक्षा धरता येईल. सध्याचा बाजार हा किफायतशीर मूल्यांकनाच्या सीमेच्या आत आहे आणि भविष्यात कंपन्यांच्या उत्पन्नात सुधारणा झाल्यास तो नव्या उंचीवर पोचू शकतो, असे विश्‍लेषकांना वाटते. 

गरज पेशन्स ठेवण्याची 
सध्या शेअर बाजार नवनवी उंची गाठत आहे तो प्रामुख्याने म्युच्युअल फंडासारख्या देशांतर्गत वित्तीय संस्था आणि कर्मचारी भविष्यनिर्वाह संस्थेकडून येणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीमुळे. छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात संपूर्ण बाजार वर जाण्याऐवजी विशिष्ट क्षेत्रातील शेअर वर जाण्याचा ट्रेंड दिसेल, असे तज्ज्ञांना वाटते. लार्ज कॅपमधील शेअरवर भर देत असतानाच, मिड कॅपकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण लार्ज कॅपच्या तुलनेत मिड कॅपचे मूल्यांकन आता आकर्षक पातळीवर आले आहे. निवडक लार्ज आणि मिड कॅप शेअरचा मिलाफ लाभदायी ठरू शकतो, असे जाणकार सांगतात. ‘स्टॉक स्पेसिफिक’ राहून स्थिती अधिक स्पष्ट होण्यासाठी गुंतवणूकदारांनी ‘पेशन्स’ ठेवण्याची गरज आहे. प्रख्यात गुंतवणूक गुरू वॉरन बफे हे शेअर बाजाराविषयी काय म्हणतात ते या निमित्ताने सांगावेसे वाटते - ‘स्टॉक मार्केट इज अ डिव्हाइस फॉर ट्रान्स्फरिंग मनी फ्रॉम द इंपेशंट टू द पेशंट.’ शेवटी हाच संदेश गुंतवणूकदारांनी लक्षात घेतला पाहिजे. बघा पटतेय का? 

लक्षवेधक शेअर कोणते? 
देशातील नामांकित ब्रोकिंग कंपन्यांनी आगामी वर्षभराचा कालावधी डोळ्यासमोर ठेवून सुचविलेले लार्ज कॅप आणि मिड कॅप शेअर पुढीलप्रमाणे - 
अ) आनंद राठी : 
१) एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स : (उद्दिष्ट ः रु. ७१०, अपेक्षित परतावा ः २३ टक्के) 
देशातील खासगी आयुर्विमा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी असून, तिचे देशभर अस्तित्व आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही कंपनी सातत्याने प्रगती करीत आहे. ग्राहकानुरुप योजनांची आखणी आणि विस्तृत पर्याय ही भक्कम बाजू आहे. एजन्सी, डायरेक्‍ट आणि बॅंकॲश्‍युरन्स अशा तिन्ही पद्धतीने वितरण जाळे पसरलेले आहे. आपल्या देशात आयुर्विमा क्षेत्रात विस्तार करण्यास भरपूर वाव असल्याने मागणी वाढती राहणार आहे. 
२) एचडीएफसी बॅंक : (उद्दिष्ट ः रु. १४१०, अपेक्षित परतावा ः १० टक्के) 
खासगी बॅंकिंग क्षेत्रातील आघाडीची नामांकित बॅंक. या बॅंकेने दुसऱ्या तिमाहीत चांगले निकाल जाहीर केले आहेत. करपश्‍चात नफा वार्षिक २६.८ टक्‍क्‍यांनी वाढता आहे. तो ६३४५ कोटी रुपयांवर नोंदला गेला आहे. निव्वळ व्याजउत्पन्न १४.९ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. भक्कम ताळेबंद, दर्जेदार ॲसेट क्वालिटी आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे ही बॅंक भविष्यातही चांगल्या परताव्यासह उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. 
३) हिंदुस्थान युनिलिव्हर : (उद्दिष्ट ः रु. २४२२, अपेक्षित परतावा ः १८ टक्के) 
‘एफएमसीजी’ क्षेत्रातील या नामांकित कंपनीने गेली अनेक वर्षे महसुलाच्या आघाडीवर अतिशय चांगली कामगिरी नोंदविलेली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने वार्षिक तत्त्वावर ६.७ टक्के इतकी महसूलवाढ दाखविली आहे. ग्रामीण भागातील मागणीत घट आणि मंदावलेली अर्थव्यवस्था असतानाही ‘इबिटा’ आणि ‘पॅट’ (करपश्‍चात नफा) अनुक्रमे २१ आणि २१.५ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. आगामी काळात कंपनी अशीच चांगली कामगिरी करू शकते. 

ब) कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग : 
१) श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स : (उद्दिष्ट ः रु. १३३२, अपेक्षित परतावा ः १८ टक्के) 
व्यावसायिक वाहनांना अर्थसाह्य करणाऱ्या कंपन्यांपैकी ही एक आघाडीची कंपनी आहे. एप्रिल २०२० पासून बीएस-6 लागू झाल्यानंतर वाहनांच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वी वाहनविक्री वाढू शकते आणि त्याचा कंपनीला फायदा होऊ शकतो. पहिल्या सहामाहीत वाहनविक्री मंदावलेली असल्याने कंपनीने व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा (एयूएम) अंदाज १५ टक्‍क्‍यांवरून एक आकडी संख्येवर आणला आहे. पण आगामी काळात अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यास ‘एयूएम’ची वाढ १२ टक्के (सीएजीआर) होऊ शकेल. 
२) रिलॅक्‍सो फूटवेअर : (उद्दिष्ट : रु. ६३८, अपेक्षित परतावा : १७ टक्के) 
पादत्राणांच्या उद्योगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेल्या या कंपनीने ‘बाटा’ या बाजारातील आघाडीच्या कंपनीपेक्षा चांगली प्रगती आणि परतावा नोंदविला आहे. आगामी काळातही कंपनीची प्रगती दमदार होईल आणि महसुलाच्या आघाडीवर ती नवी उंची गाठेल, असे वाटते. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पादत्राणांच्या कंपन्यांमध्ये ‘रिलॅक्सो’ ही सर्वांत चांगली कामगिरी ठरेल. 

क) एसएमसी ग्लोबल : 
१) टेक महिंद्रा : (उद्दिष्ट : रु. ९१४, अपेक्षित परतावा : २० टक्के) 
महसुलातील चांगली वाढ, विक्रमी व्यवहार, एंटरप्राईज सेगमेंटमध्ये स्थिर सुधारणा यामुळे कंपनीची उत्तरोत्तर प्रगती होईल. कंपनीने सातत्याने मोठे व्यवहार करण्यात यश प्राप्त केले आहे. त्यामुळे बाजारातील कंपनीचे वेगळेपण उठून दिसणारे आहे. कम्युनिकेशन्स आणि एंटरप्राईज व्यवसायात चांगली प्रगती होण्याचा कंपनीला विश्‍वास आहे. ‘डिजिटल’ हा कंपनीच्या प्रगतीतील महत्त्वाचा घटक असेल. 
२) केईसी इंटरनॅशनल : (उद्दिष्ट : रु. ३३५, अपेक्षित परतावा : २१ टक्के) 
महसूल, नफा आणि ऑर्डर या तिन्ही आघाड्यांवर कंपनीने सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे. प्रसारण आणि वितरण व्यवसायातील कामगिरी अधिक लक्षवेधक आहे. रेल्वे व्यवसायानेही प्रगतीची गती चांगली पकडली आहे. जॉर्डन, सौदी, इंडोनेशिया, थायलंड आदी देशांकडून मोठ्या ऑर्डर मिळतील आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायाला पुन्हा चालना मिळेल, असे व्यवस्थापनाला वाटते. 

ड) बोनान्झा पोर्टफोलिओ :
१) ॲव्हेन्यू सुपरमार्टस (डी-मार्ट) : (उद्दिष्ट ः रु. २२६१, अपेक्षित परतावा ः २१ टक्के) 
उच्च प्रगतीचा दर आणि तशाच प्रकारचा नफा हे या कंपनीचे बलस्थान आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीचा महसूल आणि करपश्‍चात नफा अनुक्रमे २४ टक्के आणि ३७ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. चांगली उलाढाल आणि कमी खर्चाची रचना यांमुळे या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीचे ‘इबिटा मार्जिन’ हे अधिक आहे. कंपनीच्या धोरणातील फेररचनेनुसार, स्वतःच्या स्टोअर्सबरोबरच भाड्याच्या स्टोअर्समुळे प्रगतीचा वेग वाढण्याची शक्‍यता आहे. 
२) टायटन कंपनी : (उद्दिष्ट ः रु. १४९०, अपेक्षित परतावा ः २९ टक्के) 
‘टायटन’ने प्रमुख राज्यांनुसार आपले ‘वेडिंग कलेक्‍शन’ सादर करण्याचा विचार सुरू केला आहे. तसेच दागिन्यांच्या क्षेत्रात किफायतशीर दरातील हिऱ्यांचे कलेक्‍शन सादर करण्याची शक्‍यता आहे. ‘एंगेजमेंट कलेक्‍शन’च्या माध्यमातून यंदा मोठी उलाढाल करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांची बदलती अभिरूची आणि आगामी लग्नसराईचा मोसम लक्षात घेऊन दागिने सादर करण्यावर कंपनीचा भर असेल. त्यामुळे ‘तनिष्क’च्या माध्यमातून दुसऱ्या सहामाहीत महसुलात मोठी वाढ अपेक्षित आहे.
 

संबंधित बातम्या