शेअर बाजाराला चिंतेची किनार 

मुकुंद लेले
सोमवार, 2 डिसेंबर 2019

अर्थविशेष
तेजीवर स्वार झालेल्या शेअर बाजाराला नक्की कशाचे बळ मिळत आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यात प्रामुख्याने अमेरिका-चीन व्यापारयुद्धात घडणाऱ्या सकारात्मक घडामोडींबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या शेअर बाजारावर दाखविलेला विश्‍वास यांचा समावेश आहे. शेअर बाजारात एकतर्फी तेजी सुरू झाल्यावर नफावसुलीचा मार्ग स्वीकारला जाण्याची दाट शक्‍यता असते. 

गेल्या आठवड्यात एकीकडे महाराष्ट्रात सत्तानाट्य रंगलेले असताना दुसरीकडे आपल्या शेअर बाजारातील तेजीने नवा विक्रम प्रस्थापित केला. प्रमुख (कोअर) क्षेत्रातील घसरण, 'जीडीपी'चा घटता अंदाज, वित्तीय आघाडीवर घसरण, उपभोगतेचे (कन्झम्प्शन) प्रमाण कमी अशी अर्थव्यवस्थेतील एकेक विपरीत घटना समोर असतानादेखील 'सेन्सेक्‍स'ने ४१ हजार अंशांचा, तर 'निफ्टी'ने १२ हजार अंशांचा विक्रमी टप्पा गाठला, हे विशेष. सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब शेअर बाजारात उमटते, असे म्हणतात. प्रत्यक्षात मात्र तसे घडताना दिसत नाही. अर्थव्यवस्थेच्या कामगिरीबद्दल सार्वत्रिक चिंता व्यक्त केली जात असली, तरी बाजाराला मात्र भविष्यातील आशावाद दिसत असावा. त्याचमुळे बाजाराने चिंतेला बाजूला ठेवत सकारात्मक वाटचाल चालू ठेवल्याचे दिसत आहे. 

बाजाराला कशाचे बळ? 
 तेजीवर स्वार झालेल्या शेअर बाजाराला नक्की कशाचे बळ मिळत आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यात प्रामुख्याने अमेरिका-चीन व्यापारयुद्धात घडणाऱ्या सकारात्मक घडामोडींबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या शेअर बाजारावर दाखविलेला विश्‍वास यांचा समावेश आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील करारावर या वर्षअखेरीपर्यंत सह्या होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केलेली इच्छा बाजाराला नक्कीच बळ देत आहे. दोन महासत्तांमधील व्यापारयुद्धाचा परिणाम जगभर जाणवत होता. पण आता या आघाडीवर काहीतरी सकारात्मक घडताना दिसत असल्यामुळे आशियायी बाजारांमध्ये सुधारणा दिसू लागली आहे. आपला शेअर बाजारही त्याला अपवाद ठरताना दिसत नाही. 
मध्यंतरी परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या बाजारातून पैसा काढून घ्यायला सुरुवात केली होती. पण आता चित्र बदलताना दिसत आहे. कंपनी करातील कपातीचा परिणाम दुसऱ्या तिमाही निकालांवर झालेला दिसला, तसाच तो यापुढेही राहणार आहे. परदेशी गुंतवणूकदारांना त्याचा मोठा दिलासा मिळाला. 'एनएसडीएल'वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून, परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा भारतीय बाजारात पैसा गुंतवायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मागच्या शुक्रवारी त्यांनी भारतीय शेअर बाजारात पाच हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती. या महिन्यात त्यांनी आतापर्यंत १७,५४८ कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. याचवरून परदेशी गुंतवणूकदार हे आपल्या शेअर बाजाराविषयी आशावादी असल्याचे सूचित होते. जेव्हा देशांतर्गत गुंतवणूकदारांबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांचा पाठिंबा मिळतो, तेव्हा बाजाराला नवनवी उंची गाठणे शक्‍य होते. तीच स्थिती आता दिसत आहे. आशियायी बाजारांच्या साथीने बरेच युरोपीय बाजार वाढ दाखविताना दिसत आहेत. त्याचाही सकारात्मक परिणाम आपल्या बाजारावर होत आहे. 

'सेन्सेक्‍स'मध्ये बदल 
'सेन्सेक्‍स'मध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये मुंबई शेअर बाजाराने काही महत्त्वाचे बदल नुकतेच जाहीर केले आणि ते लक्षवेधक ठरले. टाटा मोटर्स, टाटा मोटर्स डीव्हीआर, येस बॅंक आणि वेदांता हे शेअर आता बाहेर पडले असून, त्यांची जागा अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, नेस्ले इंडिया घेतील. हा बदल २३ डिसेंबरपासून लागू होणार आहे. गेल्या काही काळात घसरणाऱ्या शेअरची जागा अधिक प्रभावी कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरने घेतल्याने 'सेन्सेक्‍स'ला आणखी बळ मिळू शकते. 

चिंतेची किनार  
शेअर बाजार तेजीवर स्वार झालेला असला, तरी अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक अजूनही चिंता वाढविणारे आहेत, हे विसरता येत नाही. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत देशाच्या आर्थिक विकासाचा दर आणखी मंदावेल, असा अंदाज सिंगापूरच्या डीबीएस बॅंकेने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष 'जीडीपी' दर पाच टक्‍क्‍यांच्या खाली म्हणजे ४.३ टक्के राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 'जीडीपी'चा घसरता अंदाज स्टेट बॅंक (४.२ टक्के) आणि कोटक महिंद्रा बॅंकेनेदेखील (४.७ टक्के) व्यक्त केलेला आहे. त्यामुळे विकास दरातील सुधारणा हा निश्‍चितच चिंतेचा विषय ठरणार आहे. 
 उद्योगांच्या प्रमुख क्षेत्रातील उत्पादनही घटताना दिसत आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये ते ५.२ टक्‍क्‍यांनी आक्रसले आहे. आठ प्रमुख क्षेत्रांपैकी सात क्षेत्रांनी नकारात्मक प्रगती दर्शविली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळात प्रमुख क्षेत्रांची घसरण १.३ टक्‍क्‍यांवर आली, वर्षभरापूर्वी ती ५.५ टक्के होती. दुसऱ्या बाजूला भारताची 'कन्झम्प्शन स्टोरी' हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण महत्त्वाच्या क्षेत्रातील उपभोगितेचे (कन्झम्प्शन) प्रमाण यापुढे कमी राहण्याचा अंदाज आहे. 
 थोडक्‍यात, अर्थव्यवस्थेतील कळीचे आकडे आज तरी मंदावलेली स्थिती दर्शवत आहेत. पण सरकारने उचललेल्या विविध पावलांमुळे नोव्हेंबरनंतर चित्र पालटताना दिसेल, अशी आशा भारतीय बाजारांना आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा सोडून तरलता वाढविण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. एकीकडे व्याजदर कमी केले जात असल्याने कर्जांना मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. कर्जांमुळे विविध क्षेत्रांतील उत्पादनांना मागणी वाढल्यास अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसू शकेल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. 

म्युच्युअल फंडाचा मोठा आधार 
परदेशी गुंतवणूकदारांच्या पैशाचा ओघ भारतासारख्या उभरत्या बाजाराकडे वळत असताना, दुसरीकडे देशातील म्युच्युअल फंडांच्या 'एसआयपी'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी गुंतविला जात आहे. त्याचा मोठा आधार शेअर बाजाराला मिळत आहे, हे नाकारता येत नाही. म्युच्युअल फंड उद्योगाने 'एसआयपी'च्या माध्यमातून ऑक्‍टोबरमध्ये ८२४६ कोटी रुपये जमवले आहेत. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत त्यात ३.२ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत 'एसआयपी'तून आलेले एकूण योगदान ५७,६०७ कोटींवर पोचले, जे एप्रिल ते ऑक्‍टोबर २०१८ या काळात ५२,४७२ कोटी होते, असे 'ॲम्फी'च्या आकडेवारीतून दिसून येते. नियमितपणे शेअर बाजारात येणाऱ्या या मोठ्या निधीकडे दुर्लक्ष करता येत नाही. बाजाराला सुदृढ करणारा हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

झी आणि रिलायन्स  
गेल्या आठवड्यात एस्सेल समूहाचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र गोयल यांनी झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बातमी लक्षवेधक ठरली. त्यांनी झी एंटरटेन्मेंटमधील १६.५ टक्के हिस्साविक्री करण्याचे संकेत दिले आहेत. आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्याकडून हे पाऊल उचलले जाण्याची शक्‍यता आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या संचालकपदावरून दूर होण्याचा प्रयत्न अनिल अंबानींकडून केला गेला. आता त्यांच्या कंपनीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजसह काही नामवंत कंपन्या पुढे सरसावताना दिसत आहेत. संकटात सापडलेल्या दूरसंचार क्षेत्राला सरकारकडून अलीकडेच काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याचा परिणाम किती होतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

शेअर बाजारात एकतर्फी तेजी सुरू झाल्यावर नफावसुलीचा मार्ग स्वीकारला जाण्याची दाट शक्‍यता असते. अचानक विक्रीचा दबाव येऊन बाजारात घसरणही पाहायला मिळू शकते. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी सावध राहून 'स्टॉक स्पेसिफिक' राहणेच योग्य ठरेल.   

संबंधित बातम्या