धातू कंपन्यांत गुंतवणूक फायद्याची

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
सर्वसाधारणपणे एप्रिलमध्ये शेअर्सचे भाव चांगले असतात. त्यावेळी विक्री करून मग मे महिन्यात भाव उतरतात, तेव्हा खरेदी करावी. पावसाळा मागच्या प्रमाणेच समाधानकारक व सर्वत्र झाला तर अन्नधान्य उत्पादनात रब्बीचा वाटा मोठा असेल.

गेल्या सोमवारी २०१८ हे नवे वर्ष सुरू झाले. सर्व वाचकांना नववर्षाच्या शुभेच्छा! नवे वर्ष सुरू होताना, जुन्या वर्षाचा आढावा घेतला जातो व नव्या संभाव्य घटनांची अपेक्षा वर्तवली जाते. २०१७ च्या पहिल्या आठ महिन्यांतच, वित्तीय तूट ३.५ टक्‍क्‍यांची सीमा ओलांडून गेली होती. पण पुढील वर्षात, २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने, कदाचित या फेब्रुवारीतच सवलती  मिळतील. नवे वर्ष सुरु होताना, एका आर्थिक वृत्तपत्राने, प्रमुख कंपन्यांच्या वरिष्ठांना त्यांचे मत विचारले होते. बहुतेकांनी मोदींवर प्रचंड विश्‍वास दाखवला, पण कृषिक्षेत्र व निर्यातीबद्दल चिंता वर्तवली. चीनमधून होणाऱ्या आयातीकडेही काहींनी लक्ष वेधले. चीनी वस्तू मुद्दाम इथे स्वस्तात तिकडून निर्यात केल्या जातात. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात Counterveiling Duty लावणे आवश्‍यक आहे. २०१८-१९ मध्ये अर्थव्यवस्था ६.५ ते ७ टक्के वाढेल असे ५५ टक्‍क्‍यांना वाटले तर हा वेग ७ ते ८ टक्‍क्‍यांपर्यंत असेल असे ३९ टक्‍क्‍यांना वाटते. ३३ टक्के कंपन्या भांडवली गुंतवणूक करतील असा अंदाज आहे. विकास आणि नफा क्षमता वाढेल असा विश्‍वास ९२ टक्के लोकांना वाटतो. त्यामुळे या वेळच्या फेब्रुवारीतील अर्थसंकल्पांकडे अनेक आशाभूत डोळे लागले आहेत. अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्यासाठी भांडवली खर्च/ गुंतवणूक आवश्‍यक आहे, पण त्याचा विचार करतानाही वित्तीय दृढीकरणाकडे (Fiscal Consolidation) डोळेझाक केली जाणार नाही. कारण विदेशी गुंतवणूकदार त्याबाबत कटाक्षाने सतर्क असतात. २०१७ मध्ये शेवटी निर्देशांक बंद झाला. २०१८ डिसेंबरअखेर तो ३८००० ची पातळी ओलांडेल. ही वाढ ११.२ टक्के दिसली तरी २०१७ प्रमाणे काही शेअर्स ५० ते १०० टक्के वाढही दाखवतील. त्याचा परामर्श वेळोवेळी या लेखमालेत घेतला जाईल. त्याप्रमाणे निवेशकांनी गुंतवणूक करावी. त्यातील काही शेअर्सचे आजचे व संभाव्य भाव अनुक्रमे पुढे दिले आहेत.

केपीआयटी टेक्‍नॉलॉजी १८५/२५०; ॲटलांटा ११८/१७५, हेस्टर बायो १८५६/२७००, डिक्‍सन ४१००/६०००, एस्कॉर्टस ८००/११००, एपीएल अपोलो १९७५/२७००, स्टरलाइट टेक्‍नॉलॉजी ३००/४००, आर. एस. सॉफ्टवेअर ९०/१४०, कल्याणी स्टील ४००/५४०. या शेअर्सचे भाव जेव्हा उतरतात, तेव्हा त्यात आणखी भर घालावी.

याखेरीज कोलते पाटील, टिटाघर वॅगन्स, वॉख बेस, जिंदाल सॉ पाइप्स (इस्सार), जिंदाल स्टील, नॅशनल ॲल्युमिनिअम कंपनी (नाल्को), हिंडाल्को, हिंदुस्थान कॉपर, हे ही शेअर्स गुंतवणूकदारांच्या ‘रडार’वर हवेत.

महाराष्ट्र राज्यानेही २०१८ मध्ये काही प्रकल्पांचे संकेत दिले आहेत. मराठवाड्याला वॉटर ग्रीडसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. गोदावरी खोऱ्यातून पन्नास टीएमसी पाणी आणले जाऊन ही योजना पुरी केली जाईल. पश्‍चिम महाराष्ट्र जसा सुजल आहे, तसाच मराठवाडाही सुजल झाला तर महाराष्ट्रातील अन्नधान्याचे उत्पादन वाढेल.

२०१७ सालातील गुंतवणुकीचा विचार केला तर त्यात वर्षभर आश्‍वासक वातावरण होते. मिडकॅप शेअर्स व निफ्टी, निर्देशांक यांच्यात असलेल्या शेअर्सपेक्षा अन्य शेअर्सना मागणी होती. काही शेअर्सच्या किमती ५० ते २०० टक्के वाढल्या. सप्टेंबरपासून हेग व ग्रॅफाईट इंडिया या दोन ग्रॅफाईट इंडस्ट्रीजमधल्या शेअर्सनी फक्त चार महिन्यांत लोकांना सव्वाशे टक्के नफा दिला. काही शेअर्सचे वर्षअखेरचे कमाल भाव व किमान भाव खाली दिले आहेत.

येस बॅंक ३१५/३८२/२२६, मदर्सन सुमी २७२/३९५/२१३, दिवाण हाउसिंग ५८३/६७९/२४१, बजाज फिनसर्व्ह ५२३०/५७९०/२८५८, भारत फिनान्शियल (पूर्वीचे नाव एसकेएस मायक्रो) १०००/१०४७/५८९, हिंदुस्थान पेट्रो ४१९/४९२/२९४, भारत पेट्रोलियम ५१७/५५१/३९९, जे. कुमा इन्फ्रा ३००/३४५/१८२, मुथुट फायनान्स ४७४/५२५/२८१, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स १४८१/१४९६/८५५, इंडिया बुल्स हाउसिंग ११९६/१३७३/६४१, ओ.एन.जी.सी. १९५/२११/१५५, चोलमंडलम फायनान्स १३००/१३२४/९१२, बजाज फायनान्स १७६६/१९८५/८४२, फ्युचर रिटेल ५२४/५५६/१२६, ॲव्हेन्यू सुपर मार्टस (डी. मार्ट नावाने ही दुकाने आहेत) ११८१/१२८८/५५०, विध्या टेलिलिंक्‍स १२९०/१४७५/५९१, फिलिप कार्बन ९७५/१०९७/२२३, मन्नापुरम फायनान्स १२३/१२६/६७, लार्सन टुब्रो इंफोटेक १११८/११२६/६५६, हेग २३३६/२३३६/१४८, ग्रॅफाईट इंडिया ७१०/७२४/७२, लार्सन टुब्रो फायनान्स १७४/२१४/८८, स्टरलाइट टेक्‍नॉलॉजी २९३/३०३/९६, पेट्रोनेट LNG २५४/२७५/१७६, जीएनएफसी ४९४/५४८/२१३, अशोका बिल्डकॉन २४४/२६८/१५४, रेन इंडस्ट्रीज ३७१४०२/५४. मुद्दाम ही यादी विस्ताराने दिली आहे. कारण, हे होते जुन्या वर्षातील काही निवेशनीय शेअर्स! त्यातले रेन इंडस्ट्रीज, ग्रॅफाईट इंडिया, हेग, ॲव्हेन्यू, सुपर मार्टस हे शेअर्स खूप नफा देऊन गेले. अजूनही त्यातले काही शेअर्स यंदा वाढीव नफा देतील. पण त्यातून नफा घेऊन वेळेवर बाहेर पडायला हवे.

२०१८ वर्षासाठी गुंतवणुकीची नवी यादी तयार करायची असेल तर स्टरलाइट टेक्‍नॉलॉजी, जिंदाल सॉ पाइप्स (हिस्सार), जिंदाल स्टील, ए. पी. अपोलो ट्यूब्ज, एल अँड टी. फायनान्स, एडेल वाईज फायनान्शिअल, पाँडी ऑक्‍साईडस, गेल इंडिया, ओएनजीसी, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल हाउसिंग, दिवाण हाउसिंग फायनान्स, संधी इंडस्ट्रीज, केपीआयटी टेक्‍नॉलॉजी, टाटा मोटर्स, येस बॅंक, इंडुसिंड बॅंक, कल्याणी स्टील, किर्लोस्कर फेरस, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व एमओआयएल.

राष्ट्रीयकृत बॅंकांमधील इंडियन बॅंक, आंध्र बॅंक, कॅनरा बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांनी अनार्जित कर्जे २०१८ मध्ये कमी होण्याच्या शक्‍यतेमुळे काही विश्‍लेषक त्यांची जरी भलावण करीत असले तरी माझ्यामते चांगले शेअर्स हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे जाऊ नये.

मात्र शेअर्सची निवड करताना पूर्ण अभ्यास करूनच निर्णय घ्यायला हवा. २०१८ मध्ये गुंतवणुकीवर परिणाम करणारे अनेक घटक असतील. काही जागतिक, काही भारतीय राजकारणाशी संबंधित, काही नैसर्गिक तर काही विशिष्ट व्यवहारक्षेत्राशी संबंधित असतील.

या २०१८ वर्षात कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. काँग्रेसने गुजरातमध्ये बरीच जोराची टक्कर दिली. त्यानंतर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांना जोश आला आहे. म्हणून या निवडणुका चुरशीच्या व्हाव्यात. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी त्या महत्त्वाच्या ठरतील. ती नाटकापूर्वीची नांदी ठरेल. रिझर्व्ह बॅंकेच्या पुढील महिन्यातील द्वैमासिक आर्थिक धोरणात व्याजकपात तर होणार नाहीच, उलट एप्रिलमध्ये रेपो व अन्य व्याजदर वाढण्याचीच शक्‍यता आहे. पण रिझर्व्ह बॅंकेचे हे बऱ्याच अंशी अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह काय करेल त्यावर अवलंबून राहील. तिथे व्याजदर वाढीची शक्‍यता आहे. कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था यंदा तीन टक्‍क्‍याने वाढणार आहे.या सर्वांपेक्षा भारतावर बोजा पडणार आहे, तो पेट्रोलचे दर वाढण्यामुळे/ ओपेक राष्ट्रांनी तेल उत्पादन कमी करून क्रूडचा दर ७० डॉलर (बॅरलसाठी) पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील. तसे झाले तर आपल्यावर १५ अब्ज डॉलर्सचा ताण पडेल व इथेही पेट्रोल, डिझेल, केरोसिनचे भाव वाढतील.

उद्योगक्षेत्रात उत्पादन वाढत राहावे, त्यामुळे रोजगार वाढावा. रोजगार वाढीसाठी जेटली अर्थसंकल्पात काही घोषणा करण्याची शक्‍यता आहे. या वर्षीचा फेब्रुवारीतला अर्थसंकल्प हा ही खऱ्या अर्थाने सत्ताधीशांसाठी महत्त्वाचा ठरेल. त्यात बऱ्याच सवलती याव्यात. वस्तुसेवाकराचे जुलैपासूनचे उत्पन्न अपेक्षेइतके नसल्याने जेटलींना सार्वजनिक कंपन्यांना जास्त लाभांश देण्याचे आवाहन करावे लागेल. तसेच निवेशनही मोठ्या प्रमाणावर करावे लागेल. २०१९ च्या निवडणुकापूर्वीचा हा पूर्ण अर्थसंकल्प असेल. त्यामुळे वित्तीय तुटीवर फार भर न देता, रस्ते, पूल, रेल्वे, इन्फ्रास्ट्रक्‍चर यासाठी भरपूर तरतूद केली जावी. परदेशी भांडवल माकर्षित व्हावे, म्हणूनही काही योजना येतील. पाठोपाठ  गडकरींना अभिप्रेत असलेले ७ लक्ष कोटी रुपयांचे इन्फ्रास्ट्रक्‍चर रोखेही काढले जावेत. जर अर्थसंकल्पातील तरतूद तुटपुंजी वाटली तर हे रोखे अपरिहार्य ठरतील.

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून कंपन्यांचे डिसेंबर २०१७ तिमाहीचे विक्री व करोत्तर नफ्याचे आकडे प्रसिद्ध होऊ लागतील. त्या अनुषंगाने व अर्थसंकल्प बघून मग यावर्षी कुठे गुंतवणूक करायची त्याचे आडाखे बांधता येतील. तरीही गृहवित्त कंपन्या, नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्या, खासगी बॅंका, पोलाद, तांबे, शिसे मॅंगेनीज अशा धातूंच्या कंपन्या आकर्षक ठरतील.

सर्वसाधारणपणे एप्रिलमध्ये शेअर्सचे भाव चांगले असतात. त्यावेळी विक्री करून मग मे महिन्यात भाव उतरतात, तेव्हा खरेदी करावी. पावसाळा मागच्या प्रमाणेच समाधानकारक व सर्वत्र झाला तर अन्नधान्य उत्पादनात रब्बीचा वाटा मोठा असेल. यावर्षीचे रब्बीचे पीक उत्तम असावे. पण गहू, डाळी, तेलबिया यांचे आकडे मार्चमध्ये मिळतील. त्यावर महागाई अवलंबून राहील. पण हे सर्व जमेस धरूनही शेअरबाजार तेजीतच राहील. निर्देशांक ३८००० पर्यंत जावा व निफ्टी १२५०० पर्यंत वाढेल. ज्यांना वेगवेगळ्या शेअर्समध्ये अभ्यास करून गुंतवणूक करण्याचे कष्ट घ्यायचे नसतील, त्यांनी निफ्टी व इंडेक्‍समध्ये किंवा एक्‍स्चेंज ट्रेडेड फंड्‌स (ETF) मध्ये गुंतवणूक करावी. इथेही SIP चा (Systematic Investment Planning) तंत्राचा अवलंब करावा. 

संबंधित बातम्या