वेध अर्थसंकल्पाचे!

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
जगात क्रूड पेट्रोलचे भाव वाढू लागले आहेत. हा भाव बॅरलला ८० डॉलर्सपर्यंत चढला तर तो ओएनजीसीला फायदा होईल. तेल उत्पादन करणाऱ्या ओएनजीसीने तेल शुद्धीकरण करणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियमचे शेअर्स सरकारकडून ४५००० कोटी रुपयाला घेऊन, तिच्याबरोबर संयुक्तीकरण करणार आहे. त्यामुळे धीम्या नफ्याची अपेक्षा असणाणाऱ्यांनी तीन वर्षांच्या मुदतीसाठी सध्याच्या १९९ ते २०० रुपयांच्या भावाला जरूर घ्यावा. वर्षभरात तो २६० रुपयांपर्यंत चढेल.

अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला मांडला जाणार असला तरी त्यासाठी न थांबता वस्तु सेवाकर परिषदेने गुरुवारी १८ जानेवारीला २९ वस्तू व ५४ सेवांवरील कराचे दर कमी केले. नव्या व जुन्या SUV तसेच बायोफ्यूएलवर चालणाऱ्या बसेसवरील कर २८ टक्‍क्‍यांवरून १८ टक्के केला आहे. अन्य जुन्या व नव्या मोटारींवर २८ टक्‍क्‍यांऐवजी १२ टक्के कर असेल. हिरे व मौल्यवान रत्नखड्यावरील कर ३ टक्‍क्‍यांऐवजी पाव टक्का केला गेला आहे. श्रीमंतांवर ही मेहेरनजर कशासाठी याचे उत्तर सामान्य जनतेने परिषदेकडे मागायला हवे. गवताच्या टोपल्या, वेलीच्या तंतूंच्या वस्तूवरील कर १८ वरून ५ टक्के झाला आहे. क्रूड पेट्रोल, नैसर्गिक वायू, खाणी व खोदकाम, सबकाँट्रॅक्‍टरची कामे (सरकारसाठी) इथे १८ टक्‍क्‍यांऐवजी १२ टक्के कर लागेल.

अर्थसंकल्पात फार सवलत असणार नाही, असा सूर जरी पंतप्रधानांनी आळवला असला तरी जेटली यांना काही सवलती द्याव्याच लागतील. करमुक्त प्राप्तीची पातळी कदाचित २५ हजार रुपयांनी वाढवली जाईल. लाभांश विवरण कर कमी केला जाईल. स्पेशल इकॉनॉमिक झोन्स सध्या भरकटलेले आहेत. त्यासाठी काही नवे धोरण जाहीर होईल. कॉर्पोरेट करावरील अधिभार कमी होईल. वस्तू सेवाकराबाबतचे अधिकार आता वस्तुसेवाकर परिषदेकडे असल्याने अर्थमंत्र्यांना आता कॉर्पोरेटकर व प्राप्तिकर आणि सीमाशुल्क इथेच काही फेरबदल करायला जागा आहे.

गेल्या फेब्रुवारीतल्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात सीमा शुल्काची जमा २४५ हजार कोटी रुपये होती (यंदा हा आकडा २७० हजार कोटी रुपये व्हावा.) प्राप्तिकराची व कॉर्पोरेटकराची जमा अनुक्रमे ४४१ हजार कोटी रुपये व ५३९ हजार कोटी रुपये होती. यावेळी हे आकडे अनुक्रमे ५१ हजार कोटी रुपये व ६ लाख कोटी रुपये असावेत.

डाव्होसला जागतिक आर्थिक शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी गेले होते. तिथे त्यांनी पूर्वी ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधान परदेशी दौऱ्यावर गेल्यावर जशा देशाच्या निर्यातीचा विचार करायचा व सक्षम अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायच्या, तसेच डाव्होसमध्ये भारताची बाजू मांडली. डाव्होसला २० वर्षांपूर्वी देवेगौडा नामधारी पंतप्रधान होते, तरीही गेले होते. त्यानंतर मोदी यंदा गेले. डॉ. मनमोहनसिंग लोकांना अर्थतज्ज्ञ वाटतात, तरीही पंतप्रधान असताना डाव्होसला गेले नव्हते. गेल्या आठवड्यात ओमप्रकाश दावत यांची नवे निर्वाचन मुख्यायुक्त म्हणून नेमणूक झाली. त्यांनी ए.के. जोती यांच्याकडून सोमवारी, २२ तारखेला पदभार स्वीकारला. निवृत्त अर्थसचिव अशोक लवासा हेही निर्वाचन कमिशनर म्हणून नियुक्त झाले आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पाचा चेहरामोहरा बहुधा ग्रामीण असेल. बॅंका व अन्य पतसंस्था, नाबार्ड वगैरेंनी यंदा १२ लक्ष कोटी रुपयांची कर्जे वितरित करावीत अशी अपेक्षा आहे. गतवर्षीपेक्षा ही रक्कम २० टक्के जास्त असेल. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न सध्याच्या दुप्पट व्हावे अशी सरकारची मनीषा गेल्या वर्षामध्येच व्यक्त झाली आहे. भारत अजूनही स्वतःला कृषिप्रधान देशात समजत आहे. इतके असूनही इथली दर हेक्‍टरी उत्पादकता चीन, अमेरिका व युरोपियन राष्ट्रांपेक्षा खूप कमी आहे. यांत्रिकी शेती इथे अजूनही मोठ्या प्रमाणावर होत नाही. वैयक्तिक भूधारकांचे लहान लहान तुकडे व काँट्रॅक्‍ट शेतीकडे दुर्लक्ष ही त्यामागची कारणे आहेत.

सर्वसामान्य ग्राहकांसाठी गॅस सिलिंडर्सचे दर लवकरच २०० रुपयांनी कमी होण्याची सुखद शक्‍यता गेल्या आठवड्यात नितीन गडकरी यांनी वर्तवली आहे. हे होणार असेल तर अशी घोषणा पेट्रोल मंत्र्यांकडून होणे जास्त उचित ठरले असते.

अर्थसंकल्पाबाबत अनेक तर्क जरी सध्या होत असले तरी शेअरबाजार कंपन्यांच्या डिसेंबर २०१७ तिमाहीच्या आकड्यांसाठी जास्त जागरूक आहे व बहुतेक कंपन्या विक्री व नक्त नफ्यात भरपूर वाढ दाखवीत आहेत. त्यामुळे निफ्टी व निर्देशांक रोज नवी शिखरे गाठत आहेत. भारतातील शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य जमा १५४ ट्रिलियन (ट्रिलियन म्हणजे एकावर बारा शून्ये) झाले आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बरोबर आता हे बाजारमूल्य आले आहे. काही कंपन्यांचे किं/अु. गुणोत्तर तर शंभरपटीवरही गेले आहे.

सकल राष्ट्रीय उत्पादनात हवी तितकी वाढ देण्यात कारखानदारी व कृषी हे दोन्ही विभाग कमी पडले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी होत आहे. वस्तुसेवाकराबाबत जी विवरणपत्रे भरावी लागत आहेत, त्यांतच कृषिउत्पादनाची माहिती पुरेशी व बरोबर येत नाही असे म्हटले जात आहे. निश्‍चलनीकरणाचा फटका वाटला होता, बसला नाही तरी ही स्थिती निर्माण झाली आहे.

पेट्रोल निर्माण करणाऱ्या व वितरण करणाऱ्या आणि निर्यात करणाऱ्या OPEC राष्ट्रापेक्षा आता अमेरिकेचे उत्पादन जास्त होऊ लागले आहे. सध्या अमेरिकेचे उत्पादन दररोज ९९ लाख बॅरल्स आहे. त्यामुळेच यावर्षी पेट्रोलचे भाव भडकतील असा सहा महिन्यांपूर्वीचा तर्क खरा ठरलेला नाही. भारताच्या ही बाब पथ्यावरच पडणारी आहे.

डिसेंबर २०१७ च्या तिमाहीसाठी दिवाण हाउसिंग फायनान्सचे नक्त उत्पन्न ७३९ कोटी रुपये झाले. ढोबळ नफा ४६१ कोटी रुपये होता व नक्त नफा ३०६ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन ९.८ रुपये पडले. मार्च २०१८ वर्षासाठीचे पूर्ण वर्षाचे उपार्जन ३८ रुपये व्हावे. या भावाला किं/अु. गुणोत्तर १६.३४ पट दिसते. सध्या शेअरचा भाव ६२६ रुपये आहे. वर्षभरात तो ७७० रुपये व्हावा. डिसेंबर २०१६ तिमाहीचे कंपनीचे उत्पन्न ५६६ कोटी रुपये होते, तर सप्टेंबर २०१७ या मागच्या तिमाहीसाठी ते ७१० कोटी रुपये होते. सप्टेंबर २०१७ व डिसेंबर २०१६ तिमाहीसाठीचा नफा २९३ कोटी व २४४ कोटी रुपये होता. कंपनीने या डिसेंबर २०१७ तिमाहीत १६५५२ कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली व डिसेंबर २०१६ तिमाहीच्या ९४५९ कोटींपेक्षा ६० टक्के जास्त आहे. हा शेअर प्रत्येक गुंतवणूकदारांच्या भागभांडारात हवा.

गुजराथ-नर्मदा व्हेली फर्टिलायझर्स (GNFC) ची या तिमाहीची विक्री १५९०.९ कोटी रुपये होती. अन्य उत्पन्न धरून हा आकडा १६२४ कोटी रु. होता. गेल्या डिसेंबरमध्ये तिमाहीसाठी ती १२२० कोटी रुपये होती. डिसेंबर २०१६ तिमाहीचा नक्त नफा ६६.८ कोटी रुपये होता. यावेळी तो २२७.९ कोटी रुपये आहे. सप्टेंबर २०१७ तिमाहीचा नक्त नफा १६६.१ कोटी रुपये आहे. नफ्यात २५ टक्के वाढ आहे. शेअरगणिक उपार्जन १४.७ रुपये आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी दहेजचा कारखाना वायुगळतीमुळे अनिश्‍चित काळ १५ जानेवारीपासून बंद ठेवला होता.

सध्या शेअरबाजारातील तेजी कायम आहे. निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे ३५६२५,१०९२९ इथे आहेत. अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्प जर भरघोस सवलतींचा असला तर मार्च अखेर निर्देशांक ३७००० पर्यंत जावा. आणि निफ्टी ११७०० पर्यंत चढावा. पण पंतप्रधानांनी मात्र तो कठोर असेल असे म्हटले आहे.

आतापर्यंत बऱ्याच कंपन्यांचे डिसेंबर २०१७ तिमाहीचे विक्रीचे व करोत्तर नफ्याचे आकडे प्रसिद्ध झाले. स्टरलाइट टेक्‍नॉलॉजी, अल्ट्राटेक सिमेंट, थिरुमलाई केमिकल्स, दिवाण हाउसिंग, गुजरात नर्मदा फर्टिलायझर्स हे त्यांत प्रमुख होते.

भागभांडारात असावा असा एक शेअर म्हणजे थिरुमलाई केमिकल्स होय. तिची या तिमाहीची विक्री ३४५.६२ कोटी रुपये होती व नक्त नफा १००.०८ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन ५०.२५ रुपये होते. सध्याचा भाव २१७६ रुपयांच्या मागेपुढे आहे. वर्षभरात तो २८०० रुपये व्हावा. थिरुमलाई केमिकल्सची डिसेंबर २०१७ अखेरच्या नऊ महिन्यांची विक्री १००६.८५  कोटी रुपये होती. २०१६ च्या नऊ महिन्यांची विक्री ७८४ कोटी रुपये होती. करोत्तर नफा २०१६ च्या पहिल्या नऊ महिन्यांसाठी ५१ कोटी रुपयांचा होता. तो २०१७ च्या नऊ महिन्यांसाठी १३१ कोटी रुपये झाला आहे. अजून सव्वा वर्षाने म्हणजे मार्च २०१९ वर्षासाठी तिची संभाव्य विक्री १७७५ कोटी रुपये व्हावी.

थिरुमलाई केमिकल्सचा मार्च २०१९ वर्षांचा संभाव्य नक्त नफा २४२ कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक उपार्जन २३५ रुपये व्हावे. या उपार्जनासाठी किं/अु. गुणोत्तर फक्त ९ पट असेल.

रसायन क्षेत्रातील सर्वच कंपन्यांची सध्या भरभराट चालू आहे. विष्णू केमिकल्स, सुदर्शन केमिकल्स, बोडल केमिकल्स या तीन कंपन्यांकडेही गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे.

स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीने सप्टेंबर २०१७ ला जसे उत्तम आकडे दाखवले तसेच यावेळीही दाखवले. तिची या तिमाहीची विक्री ८३५.२ कोटी रुपये होती. नक्त नफा ९०.१ कोटी रुपये होता. विश्‍लेषकांची अपेक्षा अशी आहे, की कंपनी ७६ कोटी रुपये नफा दाखवील. कारण सप्टेंबर २०१७ च्या तिमाहीचा नफा ७१.२ कोटी रुपये व डिसेंबर २०१६ तिमाहीचा नफा ४९.१ कोटी रुपये होता. या तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन २.२ रुपये होते. मार्च २०१९ वर्षासाठी किं/अु गुणोत्तर २.४ पट असेल. कंपनीकडे ४५७३ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. ऑप्टिकल फायबर केबल्सचे तिचे उत्पादन आहे. डिसेंबर २०१६ तिच्याकडे २६७४ कोटी रुपयांच्या तर सप्टेंबर २०१७ मध्ये ३८३२ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स होत्या. २०१८ मार्च पूर्ण वर्षासाठी शेअरगणिक उपार्जन १० रुपये व्हावे. मार्च २०१९ मध्ये ते ११ रुपये व्हावे. वर्षभरात या शेअरचा भाव ४५० रुपये व्हावा. जिंदाल समूहातील जेएसडब्ल्यू स्टील्सचे आकडे गेल्या चार तिमाहीचे विक्रीचे खाली दिले आहेत.

 

विक्रीच्या प्रमाणात नक्त नफा वाढत राहणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षे या कंपनीसाठी उत्तम असतील. हा शेअर तसेच जिंदाल सॉ पाईप्स (हिस्सार) व जिंदाल स्टेनलेस हे ही सध्या योग्य भावाला मिळत आहेत. हे वर्ष पोलाद कंपन्यांना चांगले जाईल. म्हणून हे तीनही शेअर्स खरेदी करावेत.

थोडी जोखीम घेणाऱ्या निवेशकांना वरील कंपन्यांसारखे शेअर्स भावतात, तर काही जणांना हिंदुस्थान लिव्हर, अल्ट्राटेक सिमेंटस्‌ यासारखे मोठे शेअर्स आवडतात. त्यांचा नफा दरवर्षी वाढत असतो व भावातही १० ते १५ टक्के निश्‍चित वाढ होत असते. हिंदुस्थान लिव्हरचे या तिमाहीचे उत्पन्न ८५९० कोटी रुपये होते. नक्त नफा १३२६ कोटी रुपये आहे. यावेळचा नफा डिसेंबर २०१६ पेक्षा ३० टक्के जास्त आहे.

अल्ट्राटेक सिमेंटची या तिमाहीची विक्री ८०१९ कोटी रुपये आहे. नक्त नफा ४५६.३० कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन १६.६२ रुपये आहे. सध्या शेअरचा भाव ४४०० ते ४५०० रुपयांच्या पातळीत फिरत आहे. वर्षभरात तो ५३०० रुपये व्हावा.

जगात क्रूड पेट्रोलचे भाव वाढू लागले आहेत. हा भाव बॅरलला ८० डॉलर्सपर्यंत चढला तर तो ओएनजीसीला फायदा होईल. तेल उत्पादन करणाऱ्या ओएनजीसीने तेल शुद्धीकरण करणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियमचे शेअर्स सरकारकडून ४५००० कोटी रुपयाला घेऊन, तिच्याबरोबर संयुक्तीकरण करणार आहे. त्यामुळे धीम्या नफ्याची अपेक्षा असणाणाऱ्यांनी तीन वर्षांच्या मुदतीसाठी सध्याच्या १९९ ते २०० रुपयांच्या भावाला जरूर घ्यावा. वर्षभरात तो २६० रुपयांपर्यंत चढेल. 

संबंधित बातम्या