शेअर विक्रीची घाई नको

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
बुधवार, 21 मार्च 2018

अर्थनीती

गेल्या आठवड्यात ईशान्येच्या तीन राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल प्रसिद्ध झाले. त्रिपुरामधील २५ वर्षांची कम्युनिष्ठ राजवट उलथवून भाजपने निर्णायक बहुमत प्राप्त केले. नागालॅंडमध्ये एनडीपीपी बरोबर आघाडी करून भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आणि मेघालयामध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळाल्यातरी, भाजपने अन्य पक्षांबरोबर आघाडी करून सत्ता संपन्न केली आहे. या घटना जरी राजकीय असल्या तरी त्यांचा आर्थिकस्थिती व शेअरबाजार यांच्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. निकालानंतरच्या सोमवारी ५ मार्चला मात्र जगातील अन्य शेअरबाजारात घसरण झाल्याने इथेही त्याचा परिणाम झाला व तात्पुरता निफ्टी व निर्देशांक १०३५८ व ३३७४६ वर बंद झाला. त्याचा विस्ताराने परामर्श पुढे घेतला आहे.

एकतीस मार्चपूर्वी बॅंकातील खाती ‘आधार’शी जोडण्याची वेळ असली तरी सध्याचा ८० टक्के म्हणजे ८७ कोटी बॅंक खाती ‘आधार’शी जोडली गेली आहेत. ६० टक्के मोबाईल टेलिफोन्सही आता ६० टक्के आधारशी जोडले गेले आहेत. पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्यामुळे खातेदार संभ्रमित झाले असल्याने बॅंक खाती, आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी मुदत वाढवून द्यावी असे ॲसोमेच या उद्योग संघटनेने म्हटले आहे. त्याचबरोबर युआयडीएआयने ‘आधार’ची व्याप्ती वाढवण्यासाठी व्हर्च्युअल आयडीची कल्पना मांडली आहे. मात्र एकावेळी ही नवी व्हर्च्युअल आयडीची कल्पना लोकांना मानवणार नाही. देशात सध्या १०९.९ कोटी बॅंकखाती आहेत व १४३ कोटी मोबाईल फोन्स आहेत. कारण कित्येक व्यक्तींचे एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर आहेत. पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक कुठल्याही स्वरूपात असलेल्या तसेच प्रत्येक ४०० फुटांपेक्षा मोठी निवासिका धारकाला प्राप्तिकर खात्याने pna क्रमांकही अपरिहार्य करायला हवा. म्हणजे अर्थव्यवस्थेला सर्वांगीण आकार येईल.

तमिळनाडूमध्ये नोकियाच्या कराचे एक घोंगडे कित्येक वर्षे भिजत पडले आहे. ते पूर्णपणे संपवून टाकण्यासाठी फॉक्‍सकॉम टेक्‍नॉलॉजीने पुढाकार घेतला आहे. 

अमेरिकेने इतर देशातून येणाऱ्या पोलाद व पोलादी वस्तूवर दोन टक्के कर लावला आहे. अमेरिकेत कॅनडा, दक्षिण कोरिया व जपान यांच्याकडून जास्त पोलाद आयात केले जाते. भारताकडून होणारी आयात फक्त २ टक्के आहे. पण आपल्या दृष्टीने याचे रूपांतर १९.७ टक्के होतं. पोलाद उत्पादनापैकी या उलट भारत ९ टक्के पोलाद आयात करतो. आता भारतात पोलाद निर्यात करण्यासाठी चीन, दक्षिण कोरिया, जपान यांच्यात स्पर्धा सुरू होईल. टाटा स्टीलने आपले करीमनगर इथले उत्पादन वाढवायचे त्यामुळेच ठरवले आहे. भूषण स्टील या बंद पडलेल्या कंपनीचा चालू स्थितीतला कारखाना, टाटा स्टील म्हणूनच घेण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेत पोलादाच्या किंमती वाढतील पण भारतात त्या घसरतील. घरबांधणी व महामार्गबांधणी उद्योगांना त्याचा फायदा व्हावा.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (isma) यंदाच्या वर्षी साखरेचे उत्पादन १० लाख टनाने वाढून २.६१ कोटी टन व्हावे असा अंदाज प्रगट केला आहे. (साखर वर्ष ऑक्‍टोबर-सप्टेंबर असते) महाराष्ट्राचे साखर उत्पादन आता कमाल पातळीवर या वर्षी असेल. महाराष्ट्रात १८५ चालू साखर कारखाने आहेत. प्रथम ६.५ कोटी टन ऊसापासून ७.२ कोटी टन ऊस गाळला जाण्याचे अंदाज होते. हा आकडा आता ७.६७६ कोटी टन इतका व्हावा. महाराष्ट्रात यंदा साखरेचा उतारा सरासरी १०.९९ टक्के असेल. (गतवर्षी ११.२० टक्के उतारा होता) सर्व गाळप बंद झाले की महाराष्ट्राचे साखर उत्पादन ९० लक्ष ते १ कोटी टन व्हावे. भारताचे एकूण साखरेचे उत्पादन ३ कोटी टन अपेक्षित आहे. ग्राहकासाठी मात्र साखरेचे भाव सध्या कडूच आहेत. साखर कारखान्यांना सरकारने १५ लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी द्यावी अशी अपेक्षा आहे. कच्च्या साखरेची निर्यात ४० लाख टन होऊ शकेल. त्यामुळे सरकारने साखर साठ्यावरचे निर्बंध सैल करावेत, किमान निर्यात दर जाहीर करावा असे वाटते. 

वाहन कंपन्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वाहन उत्पादनाचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. कंपन्यांची विक्री किती टक्‍क्‍याने वाढली त्याचे आकडे पुढे दिले आहेत.

बजाज ऑटो ३०.६ टक्के, एस्कॉर्टस ५० टक्के, टीव्हीएस मोटर्स ३७ टक्के, मारुती सुझुकी १५ टक्के, महिंद्र अँड महिंद्र १८ टक्के, अशोक लेलॅंड २९ टक्के, टाटा मोटर्स ३८ टक्के, आयशर मोटर्स २५ टक्के, हिरो मोटो कॉर्प २० टक्के.

संसदेचे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अधिवेशन स्थगित झाले होते. ते लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. मार्च २०१८ ला बहुतेक कंपन्यांचे वर्ष पुरे होते. त्यांचे ताळेबंद मे अखेर उपलब्ध होतील. त्याच वेळी त्यांचा लाभांशही जाहीर होत राहील. पूर्वी लाभाशांमुळे गुंतवणुकीवर परतावा चांगला मिळायचा. आता लाभांशासाठी कुणीही गुंतवणूक करीत नाहीत. एक वर्ष तरी मुदत ठेवून, शेअर्स घेण्याची प्रथा होती. कारण एक वर्षांनंतर विक्री केली तर दीर्घमुदती नफ्यावर कर नव्हता. पण १ एप्रिलपासून आता दीर्घ मुदती नफ्यावरही दहा टक्के कर लावला गेला आहे. किरकोळ लाभांश असेल तर तो करमुक्त आहे. 

अर्थव्यवस्थेत आता फारशा सुधारणांसाठी वाव राहिलेला नाही. तिच्या वाढीचा वेग हा ७ ते ७.५ टक्‍क्‍यांपर्यंत असेल. या टक्केवारीतील किरकोळ बदलामुळे मूळ स्थितीत बदल होत नाही. आपली अर्थव्यवस्था आता जगातील पहिल्या दहा अर्थव्यवस्थेत मोडते. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स, दक्षिण कोरिया, सिंगापूर, हाँगकाँग, रशिया नंतर आपला क्रमांक आहे. २०२५ सालापर्यंत आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न त्यावेळच्या अपेक्षित चालू भावानुसार दुप्पट होणार आहे. त्यात कृषिक्षेत्राचा मोठा वाटा असेल. 

नुकतीच शुक्रवारी धुळवडीची सुट्टी होती. त्यामुळे फक्त चारच दिवस व्यवहार झाले. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हवर नवीन अध्यक्ष आले आहेत. त्यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था सशक्तच राहील व दिवसेंदिवस वाढत राहील असा आशावाद व्यक्त केला आहे. त्यामुळे तिथला बाजार तेजीतच राहील. व्याजाचे दर तिथे अल्प प्रमाणात तरी वाढतीलच. म्हणून अन्य देशात डॉलरचा ओघ राहणार नाही. भारतातही तो कमी होईल. पण इथला शेअरबाजार तेजीतच राहणार असल्याने गुंतवणूक संस्था इथे खरेदी करत राहतील. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने डिसेंबर २०१७ तिमाहीत २४१६ कोटी रुपयाचा तोटा दाखवला आहे. तिची एकूण ढोबळ अनार्जित कर्जे (gross NPAS) १०९९ लक्ष कोटी रुपयांइतकी झाली आहेत. 

सिंडिकेट बॅंकेने डिसेंबर २०१७ तिमाहीसाठी ८६९.७७ कोटी रुपयांचा तोटा जाहीर केला आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीचा नक्त नफा ९३.५६ कोटी रुपये होता. बॅंकेचे एकूण उत्पन्न ४९४५.१५ कोटी रुपये झाले. गतवर्षीच्या या तिमाहीचे एकूण उत्पन्न ६५५४.०४ कोटी रुपये होते. अनार्जित कर्जासाठी २०८९.९९ कोटी रुपयांची तरतूद केली गेली. गतवर्षीच्या या तिमाहीत २३२.५९ कोटी रुपयांची तरदूत होती. ढोबळ अनार्जित कर्जे एकूण कर्जाच्या ९.६२ टक्के आहेत. गतवर्षाच्या या तिमाहीत ही टक्केवारी ८.६९ होती. नक्त अनार्जित कर्जे डिसेंबर २०१७ व डिसेंबर २०१६ तिमाहीसाठी अनुक्रमे ५.४४ टक्के व ५.६३ होती. सध्या बॅंकेच्या शेअरचा भाव ६५ रुपये आहे.

गेल्या आठवड्यात ग्रॅफाईट इंडिया व हेग या कंपन्यांना चांगली मागणी होती. ७०० रुपयांच्या आसपास जेव्हा जेव्हा ग्रॅफाईट इंडियाचा शेअर मिळेल तेव्हा तेव्हा हापूसच्या आंब्यासारखी त्याची अढी घालून ठेवावी. वर्षभरात हा शेअर ९०० रुपयाच्या वर जावा. त्याची खरी क्षमता १०५० रुपयांपर्यंत वाढण्याइतकी आहे. ग्रॅफाइटच्या उत्पादनाचे तिचे आकडे वाढत असल्यामुळे हा शेअर विकायची घाई करू नये. चीनने पुन्हाः या व्यवसायात लक्ष घालायचे ठरवले आहे.

आरती इंडस्ट्रीजचा सध्याचा भाव ११७० रुपयाच्या आसपास आहे. कंपनीला नुकतेच १०० अब्ज रुपयांचे कॉन्ट्रॅक्‍ट सॅबिक या कंपनीच्या अमेरिकेतील कारखान्याकडून मिळाले आहे. सॅबिक कंपनीचे पूर्ण नाव सौदी बेसिक इंडस्ट्रीज असे आहे. सॅबिकच्या प्लॅस्टिकच्या धंद्यासाठी पुढील वीस वर्षे आरती इंडस्ट्रीज एक मूल्यवान स्पेशॅलिटी केमिकल विकणार आहे. या निर्यातीसाठी कंपनी ३।। ते ३ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करून गुजरातेत एक कारखाना टाकणार आहे. त्यामुळे हा शेअरही गुंतवणुकीसाठी योग्य ठरेल. वर्षभरात तो ३० टक्के वाढून १४७० रुपयांपर्यंत जावा.

गोदरेज ॲग्रो हेट ही कंपनी निवेशकांच्या डोळ्यासमोर फारशी नसते. पण हिचा माफक प्रमाणात गुंतवणुकीसाठी विचार करायला हरकत नाही. तिचा चार प्रकारचा व्यवसाय आहे. त्याचा परामर्श विस्ताराने पुढील लेखात असेल.

या लेखमालेत दिवाण हाउसिंग फायनान्सचा अनेकदा निवेशनासाठी उत्कृष्ट शेअर म्हणून परामर्श घेतला आहे. घरांसाठी मध्यमवर्गीयांकडून मोठी मागणी होत असल्यामुळे कंपनीचा कर्जव्यवहार पुढील तीन वर्षे २५ टक्‍क्‍याने वाढत राहील. तिने आपल्या प्रॅमेरिका लाइफ इन्शुरन्स कंपनीतील ५० टक्के भाग १९६९ कोटी रुपयाला विकले आहेत. त्यामुळे या कंपनीचा शेअर गेल्या आठवड्यात वाढला असला व ५५३ रुपयांपर्यंत गेला असला तरी तो ५३५ रुपयाच्या आसपास येईल तेव्हा जरूर घ्यावा. वर्षभरात हा शेअर सुमारे ३५ टक्के वाढून ७३५ रुपयांपर्यंत जावा. 

संबंधित बातम्या