पेट्रोल भडकले...

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 24 मे 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
 

कर्नाटकची निवडणूक संपल्यानंतर पंतप्रधानांनी आपला मोर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर वळवला आहे. २१ मे रोजी ते रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले. व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या अध्यक्षपदाची सूत्रे मागील महिन्यात हाती घेतली होती. त्यानंतर लगेचच त्यांनी नरेंद्र मोदींना भेटीचे आमंत्रण दिले आहे. तसा हा दौरा औपचारिक आहे. तरीही अमेरिकेने इराणबाबतच्या आण्विक करारातून बाहेर पडल्यावर होणारे परिणाम आणि क्षेत्रीय आण्विक सहकार्य या विषयावर भारत - रशियात चर्चा होईल. काही दिवसांपूर्वी मोदी यांनी चीनचा दौरा करून चिनी राष्ट्रपती झी जिनपिंग यांची भेट घेतली होती. रशियानंतर किंवा त्याच सुमारास पंतप्रधान, डच पंतप्रधान मार्क यांची गाठ घेतील. सध्या अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रे यांच्यात पोलाद आणि ॲल्युमिनिअम यावर अमेरिकेने लावलेल्या आयात कराबद्दल वाद आहेत. त्याबाबतही पंतप्रधान चर्चा करतील. टाटा स्टील कंपनीची निर्यात सध्या अमेरिकन करांमुळे चिंतेचे कारण आहे. त्याबाबतही काही विचारविनिमय होईल.

कर्नाटकमध्ये आता जेडीयुचे कुमारस्वामी हेच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार आहेत. काँग्रेसने उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानले आहे. कर्नाटकमध्ये अर्थमंत्री कोण होईल आणि राज्याचा अर्थसंकल्प पुन्हा मांडला जाईल का याबाबतही आता औत्सुक्‍य आहे. २८ मे चार लोकसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याकडेही आता सर्वांचे लक्ष आहे. त्याबाबत भाजपमध्ये बंडाळी असल्याच्या वार्ता आहेत.

कर्नाटकमधील निवडणुका संपल्यानंतर देशात तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर सर्वोच्च पातळीवर नेले आहेत. पेट्रोल लिटरमागे १.६१ रुपयाने महागले आहे तर दर लिटरमागे डिझेल १.६४ रुपयाने महागले आहे. नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ या कालावधीत केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क ९ वेळा वाढवले आहे. पेट्रोलवर आतापर्यंत प्रति लिटरला १२ रुपयाने भाव वाढले आहेत. डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३.४७ रुपयाने वाढवले आहे. अपवाद म्हणून ऑक्‍टोबर २०१७ मध्ये उत्पादन शुल्क २ रुपयाने कमी केले गेले होते.

अरुणाचल सीमेलगत चीनने सोन्याच्या खाणी हुडकण्यासाठी उत्खनन सुरू केले आहे. अरुणाचल पलीकडील भागात चीनला सोने - चांदी आणि अन्य खनिजे सापडली आहेत. या खनिजांच्या साठ्यांची किंमत ६० अब्ज डॉलर्स इतकी असेल असा अंदाज आहे. भारतीय सीमेलगत असणाऱ्या चीनच्या हद्दीत लूज या भागात या खाणी आहेत. चीन या भागाला तिबेटचाच भाग समजतो. भारतातील अंतर्गत परिस्थिती राजकीयदृष्ट्या डळमळीत होत आहे, असे दिसले की चीन अशा कुरबुरी वाढवीत असतो.

आतापर्यंत ज्या कंपन्यांनी २०१७-१८ वर्षातील जानेवारी - मार्च या तिमाहीसाठी विक्री व नफ्याचे आकडे जाहीर केले आहेत त्यात भरपूर वाढ दाखवली आहे.

२०१७ च्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेखाली, विमा कंपन्यांनी जेमतेम ७३३ कोटी रुपयांचे दावे (Claims) पुरे केले आहेत. मागितलेल्या रकमेपैकी ही रक्कम जेमतेम ५ टक्के आहे. २०१६ च्या खरीप पिकांसाठी पीक विम्यापोटी विमा कंपन्यांनी ९५ टक्के रक्कम दिली होती. अनेक राज्यांनी विमा हप्ता न भरल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. विमा हप्त्यापैकी शेतकरी २० टक्के रक्कम देतो आणि केंद्र सरकार व राज्य सरकारे प्रत्येकी ४० टक्के वाटा उचलतात. राज्य सरकारांनी आपला वाटा दिला नाही तर केंद्र सरकारही आपली रक्कम देत नाही. बिहार आणि ओडिशासारख्या राज्यांनी तर २०१६-१७ वर्षासाठीही आपली पूर्ण रक्कम अदा केलेली नाही.

२०१६-१७ तील जानेवारी - मार्च २०१७ ही चौथी तिमाही निश्‍चलनीनंतरची पहिली तिमाही होती. निश्‍चलनीकरण व वस्तूसेवा कर यामुळे परिस्थिती गडबडली होती.

अमेरिकेने आयातकर वाढविल्यामुळे भारतही अमेरिकेतून इकडे येणाऱ्या बदाम, सफरचंदे व काही मोटरसायकली अशा एकूण २० वस्तूंवर शंभर टक्‍क्‍याने आयात कर वाढवण्याचा विचार करीत असल्याचे भारताने जागतिक व्यापार संघटनेला कळवले आहे. अमेरिका जसे आपले धोरण आखेल तसे धोरण भारतही यापुढे आखण्याची शक्‍यता आहे.

ऊर्जा कंपन्यांनी एप्रिल २०१८ मध्ये कोळशाची आयात २२ टक्‍क्‍याने कमी केली आहे. ही आयात ३७.३ लक्ष टन होती. एप्रिल २०१७ मध्ये ही आयात ४७.९८ लक्ष टन होती.

कायटेक्‍स गारमेंटस्‌ची विक्री मार्च २०१८ तिमाहीत १३१.२ कोटी रुपये झाली. ढोबळ नफा १८.२ कोटी रुपये होता. नक्त नफा १०.३ कोटी रुपये होता. या तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन फक्त १.६ रुपये होते. सध्या शेअरची किंमत २२६ रुपये आहे. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे ३४६ रुपये व १९८ रुपये होता.

अतुल ऑटोची मार्च २०१८ तिमाहीसाठीची विक्री १५०.६ कोटी रुपये होती. ढोबळ नफा १८.१ कोटी रुपये होता. नक्त नफा ११.७ कोटी रुपये होता. या तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन ५.३ रुपये आहे.

बलरामपूर चिनी मिल्सची या तिमाहीसाठी (मार्च २०१८) विक्री १०२५ कोटी रुपये होती. नफ्याऐवजी कंपनीला ढोबळ तोटाच ७.८ कोटी रुपये होता. नक्त नफा न होता तोटाच ४२.७ कोटी रुपये झाला आहे.

गल्फ ऑइल ल्युब्रिकंटस्‌ची मार्च २०१८ तिमाहीची विक्री ३७३.६ कोटी रुपये होती. ढोबळ नफा ६२.९ कोटी रुपये होता. करोत्तर नफा ४१.४ कोटी रुपये होता. मार्च २०१८ तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन ८.३ रुपये होते.

कल्याणी स्टील्सची या तिमाहीची विक्री ३५६.३ कोटी रुपये होती. ढोबळ नफा ५४.९ कोटी रुपये होता. करोत्तर नफा ३० कोटी रुपये होता. या तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन ६.९ रुपये होते. सध्या शेअरचा भाव २९५ रुपये आहे. गेल्या बारा महिन्यातील कमाल व किमान भाव अनुक्रमे ४६९ रुपये व २६२ रुपये होते. पुढील काही दिवसात हा शेअर २६० रुपयांच्या आसपास आला तर जरूर घ्यावा. सध्याच्या भावाला किं/ऊ. गुणोत्तर ११.२ पट पडते. कल्याणी स्टील्स पुन्हा ३५० रुपयांचा भाव गाठू शकते.

सोभाची या तिमाहीची विक्री ७७० कोटी रुपये होती. कंपनीने या तिमाहीत सुमारे १० लाख स्क्वेअर फूट जागा विकली. या तिमाहीचे उत्पन्न त्यामुळे ९१० कोटी रुपयांवर गेले होते. कंपनीला १३६.४ कोटी रुपये ढोबळ नफा झाला आहे. करोत्तर नफा ६५.४ कोटी रुपये आहे. या तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन ६.९ रुपये होते.

मन्नापुरम फायनान्सचे नक्त व्याजाचे उत्पन्न ६२१.७ कोटी रुपये होते. नक्त नफा १८२.२ कोटी रुपये होता. कंपनीच्या व्यवस्थापनाखाली जिंदगीचे मूल्य १५,७६४ कोटी रुपये आहे. तिची नक्त अनार्जित कर्जे फक्त ०.३ टक्का इतकी आहेत.

गुजराथ अंबुजा एक्‍सपोर्टस्‌चा ढोबळ नफा यावेळेला मागील मार्चपेक्षआ जास्त आहे. मक्‍याच्या पिकाने तिला हात दिला आहे.

बजाज फायनान्सच्या व्यवस्थापनाखाली जिंदगीचे बाजारमूल्य मार्च २०१८ तिमाहीसाठी ८०,४४४ कोटी रुपये होते. गेल्या मार्चपेक्षा हा आकडा ३४ टक्‍क्‍याने जास्त आहे. सध्याच्या भावाला हा शेअर जरूर घ्यावा. बजाज फायनान्सचा भाव सध्या २१०५ रुपये आहे. वर्षभरात तो भाव २५०० रुपये होऊ शकेल. २०२० मार्चसाठी शेअरगणिक उपार्जन ८६ रुपये व्हावे. गेल्या बारा महिन्यातील किमान भाव ११९१ रुपये होता. वरील सर्व कंपन्यांची माहिती जरी दिली असली तरी सध्या गुंतवणूक ग्रॅफाईट इंडिया व हेगमध्येच हवी. पेट्रोलचे भाव भडकत असल्याने, त्यावर अवलंबून असलेल्या रेन इंडस्ट्रीजचा भाव २०० रुपयांखालीही येईल, तोपर्यंत खरेदीची घाई नको. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या