शेअर बाजारात उसळी!

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

अर्थनीती : शेअर बाजार
 

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर तीन महत्त्वाच्या घटना घडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ व २०१६ च्या अमेरिकन दौऱ्यांनंतर तीन वर्षांनी पुन्हा दौरा केला. टेक्‍सास राज्यातील ह्युस्टन येथे ५०,७०० भारतीय अनिवासी व अमेरिकन नागरिकांसमोर भाषण केले. मोदींना भेटण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्युस्टनला गेले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची व अमेरिका-भारत संबंधांची भरभरून स्तुती केली. ट्रम्प यांनी स्वतःला व्हाईट हाउसमधील भारताचा आत्तापर्यंतचा सर्वांत उमदा दोस्त म्हणून भलावण करून घेतली. 
 
राष्ट्रीय स्तरावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट करात पाच टक्के कपात करून तो २५ टक्‍क्‍यांवर आणला. शेअर बाजारात त्यामुळे निर्देशांक एकदम १,८०० अंकांनी वर गेला, तर निफ्टीही एक हजार अंकांनी वाढला. सोमवारी २३ सप्टेंबरला निर्देशांक आणखी वाढून ३९,१८८ वर गेला, तर निफ्टी ३४२ अंकांनी वाढून ११,६०७ वर गेला आहे. कित्येक शेअर्स पाच ते दहा टक्‍क्‍यांनी वाढले. सोमवारी २३ सप्टेंबरला बजाज फायनान्स ४,०२७ वर गेला होता. अन्य शेअर्सही खूप वाढले. त्यांचे आकडे लेखाच्या पुढील भागात दिले आहेत. 

राज्यस्तरावर महाराष्ट्र व हरयाणा राज्यात विधानसभांच्या निवडणुका जाहीर झाल्या. एकाच दिवशी २१ ऑक्‍टोबरला मतदान होईल व २४ ऑक्‍टोबरला निकाल जाहीर होईल. महाराष्ट्रात भाजप प्रचंड बहुमताने निवडून येईल. भाजपला १५० च्या वर जागा मिळून स्वबळावरही सत्ता स्थापन करता येईल. पण पक्ष शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवू इच्छितो. युती झाली तर तिला २२० च्या वर जागा मिळतील. प्रथम शिवसेनेने प्रत्येक सत्रात म्हणजे १४४ जागा मागण्याचा आविर्भाव आणला. पण त्यांना शेवटी वास्तवाचे भान ठेवून ११५ ते १२० जागांवर समाधान मानावे लागेल. कारण भाजपच्या अन्य सहकारी पक्षांना १५ ते १८ जागा द्याव्या लागतील. इतकेही करून शिवसेनेला ८० च्या वर जागा जिंकता येणार नाहीत. 

भाजपमध्ये सध्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या लोकांची रांग लागली आहे. त्यांच्यापैकीही काही लोकांना उमेदवारी देऊन भाजपमध्ये पुनर्वसन करावे लागेल. सातारचे उदयनराजे यांच्याप्रमाणे हर्षवर्धन पाटीलही भाजपमध्ये गेले. 

कोकणामध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार येथे पेट्रोल शुद्धीकरणाचा जगातील मोठा कारखाना (Refinery) सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे किमान एक लाख कोकणवासियांना रोजगार मिळेल. याचबरोबर ''आरे'' येथे मेट्रो शेड प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले आहे. कुठल्याही चांगल्या कामाला शिवसेनेचे मांजर नेहमी आडवे जाते. दोन्ही ठिकाणी पर्यावरण दूषित होईल आणि मोठ्या प्रमाणावर झाडे तुटतील असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. पण अनेक वर्षांपूर्वी दहेज प्रकल्पाबद्दलही बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला असला, तरी एन्‍रॉनच्या अमेरिकन धुरीणांनी त्यांची कशी समजूत काढली त्याचप्रमाणे यावेळीही शिवसेनेची समजूत काढली यात शंका नाही. 

गेल्या आठवड्यात पेट्रोल व डिझेलचे भाव जगात वाढल्याने भारतातही ते लीटरमागे चार ते पाच रुपयांनी वाढावेत. पण महाराष्ट्रातील विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, त्या होईपर्यंत सबुरी बाळगली जाईल. 

पावसाळा आता ओसरू लागला असल्याने मोठ्या प्रमाणावर निवासिकांची कामे सुरू होतील. म्हाडातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेतून ३०९ शहरांतून १० लाख कामे सुरू करण्याची सरकारची मनीषा आहे. त्यामुळे ओबेरॉय रिॲल्टि, सनटेक रिॲल्टी, अशोक बिल्डकॉन, दिलीप बिल्डकॉन यांची बांधकामे वाढतील. त्यामुळे रोजगारही मोठ्या प्रमाणावर वाढेल. हा रोजगार ग्रामीण भागातही वाढू शकतो. 

पावसाळ्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढत असते. त्याचा फायदा पराग मिल्क सारख्या कंपन्यांना होईल. या कंपनीने दूधभुकटी करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. मार्च २०१९ वर्षासाठी तिची विक्री २,३९६ कोटी रुपयांची होती. मार्च २०२१ पर्यंत ती ३,१३४ कोटी रुपये व्हावी. नक्त नफा मार्च २०१९ साठी १२० कोटी रुपये होता. २०२१ मार्चमध्ये तो १५२ कोटी रुपये झाल्याचे दिसेल. पराग मिल्कचा शेअर सोमवारी २३ सप्टेंबरला १६ रुपयांनी वाढून १६८ रुपये झाला. गेल्या १२ महिन्यांतील त्याचा किमान भाव १३० रुपये होता, तर कमाल भाव २७९ रुपये होता. रोज सुमारे पाच लाख शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ११.८३ पट दिसते. वर्षभरात हा शेअर किमान ४० ते ४५ टक्के वाढून २४० रुपयांपर्यंत जावा. 

कॉर्पोरेट कर कमी झाल्यामुळे बजाज फायनान्सने ३,३०० रुपयांवरून ४,०२३ रुपयांपर्यंत उसळी घेतली आहे. मार्च २०२० पर्यंत तो ४,८०० रुपये तरी व्हावा. रोज सुमारे ४० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. या शेअरचे किं/उ गुणोत्तर मात्र अत्यंत महागडे म्हणजे ५४ पट आहे. 

पिरामल एंटरप्राइझेसचा शेअर सध्या १८-४५ रुपये आहे. गेल्या १२ महिन्यांतील त्याचा किमान भाव १,६५२ रुपये होता, तर कमाल भाव २,७८७ रुपये होता. वर्षभरात तो पुन्हा उच्चांकी भावात जावा. रोज सुमारे त्यात १० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १८.५ पट आहे. मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज कंपनीने तो काही महिन्यांत २,४०० रुपयांपर्यंत जाईल असे म्हटले आहे. 

अमेरिकेतील मोदी यांच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या गळामिठीनंतर दोन्ही देशांतील व्यापार वाढविण्याचे संकेत दिले आहेत. भारतातील अनेक वस्तू अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात होतील. त्याचवेळी अमेरिकन वस्तूही भारतात मोठ्या प्रमाणात आयात होतील. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धात अमेरिका भारताचा उपयोग करू शकते. भारतात मोठ्या प्रमाणावर यापुढे डॉलर्स येतील. भारताला आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत वाढवायची आहे. परदेशी गुंतवणुकीचा त्यासाठी मोठा फायदा होईल. त्याचाच एक परिणाम रुपयाचा डॉलरशी असणारा विनिमय दर सुधारण्यात होणार आहे. तो ६६ ते ६७ रुपयांपर्यंत येऊ शकतो. 

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ऑगस्टमध्ये आपला रेपोदर ३५ पैशांनी कमी केला होता. ऑक्‍टोबर व डिसेंबर या महिन्यांत तो आणखी कमी होऊ शकेल. 

रिझर्व्ह बॅंकेने काही महिन्यांपूर्वी सरकारकडे एक लाख ७६ हजार कोटी रुपये वर्ग केले होते. त्यामुळे आपली वित्तीय तूट बरीच कमी झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था उत्तम आहे. अमेरिकेतील दौऱ्यात पंतप्रधानांनी विविधतेतून एकात्मता दाखवण्यासाठी आमचे चांगले चालले आहे असे पाच भागात म्हटले होते. अशा बारीकसारीक खुब्यांनी नरेंद्र मोदी आपले वक्तृत्व उत्तम प्रकारे खुलवीत असतात. २००४ ते २०१४ या दहा वर्षांतील मौनी मनमोहनसिंग हे निष्प्रभ दिसतात. 

 २०१९ च्या निवडणुका मोठ्या प्रमाणावर जिंकल्यानंतर मोदींची तयारी आतापासूनच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू झाली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासारखे विरोधी पक्ष पूर्णपणे हतप्रभ होणार आहेत. 

शेअरबाजारात पुन्हा एकदा नजर टाकताना काही शेअर्सचे सोमवार २३ सप्टेंबरचे भाव पुढे दिले आहेत. तसेच कंसात सोमवारी झालेली वाढ दाखवली आहे. 

बजाज फिनसर्व्ह ८२९७ (६०४ रुपये), बजाज फायनान्स ४०२७ (३४२ रुपये), लार्सेन अँड टुब्रो १५२८ (११७ रुपये), दिलीप बिल्डकॉन ४५१ (१५ रुपये), मॅक्‍स फिनान्शिअल सर्व्हिसेस ६९५ (३६ रुपये), जे. एस. डब्ल्यू स्टील २४३ (२ रुपये), एपीएल अपोलो १४०६ (९७ रुपये), जे. कुमार इन्फ्रा १४३ (१२ रुपये), स्टेट बॅंक ऑफ इंडिया ३१४ (१२ रुपये), कॅनरा बॅंक २१० (८ रुपये), एचडीएफसी बॅंक १२५७ (५७ रुपये), ज्युबिलंट लाइफ सायन्सेस ५५० (१६ रुपये), बंधन बॅंक ५२८ (३१ रुपये), आरबीएल बॅंक ३९९ (१७ रुपये), जीएचसीएल २१८ (७ रुपये), अपोलो टायर्स १८९ (४ रुपये), बाळकृष्ण इंडस्ट्रीज ७९६ (-), इंडुसिंड बॅंक १५११ (९२ रुपये), सिएट ९६७ (५८ रुपये), अतुल ३९४६ (१४६ रुपये), ओबेरॉय रिॲल्टी ५५६ (२५ रुपये), पराग मिल्क १६८ (१५ रुपये). 

शेअर बाजार यापुढे मार्च २०२० पर्यंत तेजीचीच वाटचाल चालू लागेल. वेग वाढवताना मनुष्याचाही पाय घसरण्याची व मुरगळण्याची शक्‍यता असते. शेअर बाजारही अनेकदा माणसासारखाच वागतो. तिथे लोभ आणि भीतीचा पगडा कायमच असतो. त्यामुळे ''जोडो निया धन। उदास विचारे। वेच करी''

संबंधित बातम्या