खनिज तेल कडाडले!

डॉ. वसंत पटवर्धन
गुरुवार, 5 एप्रिल 2018

अर्थनीती ः शेअर बाजार

गेल्या आठवड्यात २०१७-१८ या आर्थिक वर्षाची सांगता झाली. वर्षाअखेरीस गुरुवारी व शुक्रवारी अनुक्रमे महावीर जयंती व गुड फ्रायडेच्या सुट्ट्या होत्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्ष २८ मार्चलाच संपले. सध्या संसदेचे अधिवेशन चालू असून, दोन्ही सभागृहात फक्त गदारोळ चालू असल्याने, लोकांना लोकशाहीचा वेगळाच अवतार दिसत आहे. इथून तिथून प्रसारमाध्यमांनी खूप दिवस दुर्लक्ष केल्यामुळेही अनेक जणांना आपले अस्तित्व दाखविण्याच्या नवीन क्‍लृप्त्या योजाव्या लागत आहेत. यावेळी संसदेतील विलंबामुळे १८० कोटी रुपयांचा देशाला फटका बसला आहे. राजकीयदृष्ट्या कर्नाटकात १३ मे रोजी विधानसभांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १९ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. मागील वेळेपेक्षा या वेळेला भारतीय जनता पक्ष जास्त जागा मिळवेल असा अंदाज आहे. पक्षाला तिथे जर बहुमत मिळाले तर कर्नाटकात नवीन अध्याय सुरू होईल व त्याचा एकूण राजकारणावर परिणाम होईल. हा लेख होईपर्यंत रिझर्व्ह बॅंकेने २०१८-१९ वर्षांचे पहिले द्वैमिासक धोरण ४ एप्रिलला जाहीर केले असेल. बहुधा रेपोदरात पाव टक्के वाढीची अपेक्षा होती. पण बॅंकांकडे सध्या भरपूर द्रवता असल्याने, रेपोदराची घोषणा हा एक औपचारिक प्रकार झाला आहे. मात्र अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह व्याजाचे दर वाढवीत असल्याने, इथेही रिझर्व्ह बॅंक व्याजदर वाढवू शकेल.

पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळा, नीरव मोदी प्रकरण, विजय मल्ल्यांचे भारत सोडून, कर्जफेड चुकवणे अशा बातम्या नित्याच्याच होत असताना, ॲक्‍सिस बॅंकेने व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्जाचे प्रकरण चिघळत आहे. बॅंकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांचे पती व्हिडीओकॉनशी संबंधित आहेत. शिखा शर्मांना चौथ्यांदा संचालक मंडळाने नेमू नये असा रिझर्व्ह बॅंकेचा अप्रत्यक्ष सल्ला आहे. शिखा शर्मा यांच्या काळात, २००९ ते २०१७ या नऊ वर्षांत बॅंकेचा करोत्तर नफा कमीजास्त होत राहिला. बॅंकेच्या जिंदगीची गुणवत्ताही घसरत गेली. पुढे दिलेले आकडे त्याच्या कार्यावर प्रकाश पाडतील. बॅंकेची बुडीत/अनार्जित कर्जे आता २५ हजार कोटी रुपयांची आहेत. २०१५ मध्ये ती फक्त २१७५ कोटी रुपये होती व २००९ मध्ये ती फक्त ११७३ कोटी रुपये होती. त्यांना तीनदा, तीन वर्षाचा कार्यकाळ मिळाला होता. सध्या दुसरा पर्यायी चांगला अध्यक्ष मिळेपर्यंत बॅंकेचे संचालक मंडळ शिखा शर्मांना एक वर्षांची मुदतवाढ देईल. त्याला रिझर्व्ह बॅंकेची संमती असावी लागेल.

आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपल्याने, बॅंकांनी ठेवीवर कापलेला आगाऊ कर ताबडतोब भरावा असे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍सेशन सांगितले आहे. रिझर्व्ह बॅंकेचे आर्थिक वर्ष जूनअखेर संपले व तिचा नफा जुलैला सरकारी तिजोरीत जमा होता. यावेळी त्यातली काही रक्कम सरकारला लगेच हवी आहे. अर्थ मंत्रालयाची सद्यःस्थिती चिंताजनक असावी का अशी शंका येते. वस्तू व सेवाकरांचे उत्पन्न आता दरमहा मिळत असूनही ही परिस्थिती आहे.

एस्सार स्टील कंपनी, कर्जबाजारीपणामुळे विकायला काढली गेली आहे. कंपनीची मूळ प्रकृती उत्तम असल्याने, ती घेण्यासाठी चढाओढ आहे. आपल्या हातून ही कंपनी जाऊ नये म्हणून प्रवर्तकही बोली लावण्यासाठी आटापिटा करीत आहेत. पण स्वयंवराची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे सांगणे अवघड आहे.

गेल्या आठवड्यात तेल कंपन्यांनी डिझेलचे भाव भरपूर वाढवले. चार वर्षांतील उच्चांक त्यांनी गाठला आहे. मुंबईला आता डिझेलचा भाव ६८.७७ रुपये झाला आहे. जगभरात पेट्रोल व डिझेल भाव वाढत आहेत. सध्याचा भाव चार वर्षांतील उच्चांकी आहे. भारताला पेट्रोलच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून रहायला लागते. त्यामुळे आपल्या डॉलरच्या साठ्यावर परिणाम होतो. अमेरिकेत ठेवीवरील व्याजाचे दर कमी होण्याऐवजी वाढत असल्याने अनिवासी भारतीयांकडून येणारी आवक मंदावली आहे. प्रखर उन्हाळा हा आणखीनच वाढत आहे. गेल्या जुलैपासून दहा महिने वाढ चालू आहे. २०१७-१८ मध्ये भारताला पेट्रोल आयातीसाठी ८८ अब्ज डॉलर्स मोजावे लागले. २०१६-१७ मध्ये हा आकडा ७० अब्ज डॉलर्स होता.

कोल इंडियाने पुढच्या दहा वर्षांसाठी वीस हजार मेगॅवॅट ऊर्जेच्या उत्पादनाचे लक्ष्य ठरवले आहे. तसेच २०२२ सालापर्यंत सौरऊर्जा १०० मेगावॉटपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल याचा आकडा कंपनीने दिलेला नाही. रत्नागिरीजवळील दाभोळच्या कारखान्यात सौदी अरेबियातील महाकाय अरॅमको कंपनीने मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. ही गुंतवणूक तीन ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत होऊ शकेल. तिची एकूण क्षमता त्यामुळे ६० मेट्रिक टन इतकी होईल. मात्र त्यासाठी सौदी कंपनीला खूप मोठी भागीदारी हवी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियमबरोबर अरॅमको कंपनीने नुकताच एक करार केला आहे. 

वस्तू सेवाकर लागू झाल्यापासून निर्यातदारांना सरकारने १२ हजार ७०० कोटी रुपयांचा रिफंड जाहीर केला आहे. 

भारताला जास्त डॉलर्स मिळवण्यासाठी निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची जरुरी आहे. मात्र देशातच उत्पादनाला भरपूर मागणी असल्याने निर्यातदारांना निर्यात वाढवण्याची क्षिती वाटत नाही. त्यातल्या त्यात यंदा कांद्याचे व साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने या दोन्ही वस्तूंची निर्यात वाढू शकेल. देशाची निर्यात वाढली तरच व्यापार तुलनेतील चालू खात्याची तूट कमी होऊ शकेल. पण सरकारही याबाबत उदासीनच आहे. राजकारणाच्या रणधुमाळीत आर्थिक आघाडीवर सामसूम आहे. 

भाग भांडारात काही निवडक शेअर्सच असावेत आणि त्यात निर्देशांकातील ३० किंवा निफ्टीमधील पन्नासमधल्या फारच थोड्या शेअर्सचा समावेश असावा. मोठ्या भाग भांडवलामुळे कित्येक शेअर्सचे बाजारमूल्य वाढल्यासारखे दिसते. पण ते सर्व फसवे असते. गेल्या वर्षी ज्यात जास्त भाववाढ दिसली ते सर्व शेअर्स मिडकॅप किंवा स्मॉलकॅप क्षेत्रातलेच होते. ठराविक उद्योग क्षेत्रातील मोठे शेअर्स या निफ्टी निर्देशांकात असले तरी त्यांचेकडे दुर्लक्ष करून चांगले वर्धिष्णू मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्सच निवडावेत.

गेल्या आठवड्यात सोमवार ते बुधवार असा तीन दिवसच बाजार उघडा होता. गुरुवारी महावीर जयंती व शुक्रवारी गुडफ्रायडेची सुट्टी होती. त्यामुळे जगातले सर्व बाजार या दोन दिवशी बंद होते. बुधवारी २०१७-१८ हे आर्थिक वर्ष सरले. या वर्षांची फलश्रुती सांगायची तर निर्देशांक किमान २९२४१ अंकावरुन ३६४४४ पर्यंत वाढला व वर्ष अखेरीला थोडा कमी म्हणजे ३२९६८ वर थबकला. निफ्टीची वर्षभरातील कमाल व किमान पातळी १११७१ आणि ९०७५ अशी होती व वर्षअखेरीस ३१ मार्चला १०११३ वर बंद झाला होता. २०१८-१९ या वर्षात निर्देशांक व निफ्टी जोरात वाढ दाखवतील व अनुक्रमे ३६५०० आणि ११५०० वर बंद व्हावेत. बहुतेक कंपन्यांचे मार्च ते डिसेंबर या तीन तिमाहीचे विक्री आणि करोत्तर नफ्याचे आकडे वरचेच असावेत. त्यामुळे गतवर्षांपेक्षा हे वर्ष निवेशकांना चांगले जावे. भारतीय पंचांगाप्रमाणे यंदा अधिक महिना असल्याने निवेशकांना अधिकच नफा व्हावा.

गेल्या वर्षी निफ्टी वा निर्देशांकात नसलेले हेग व ग्रॅफाईट इंडियाच बाजी मारून गेले. नशिबाने निफ्टीमध्ये नसलेले हेग व ग्रॅफाईट प्रचंड वाढले. अगदी किमान भावात म्हणजे सुमारे १०३ ते १२० रुपयांपर्यंत ज्यांनी ग्रॅफाईट खरेदी केला त्यांच्या घरावर चांदीचे छप्पर आले. सध्या तो ७२५ ते ७५० रुपयाच्या पातळीत फिरत आहे. अजूनही तो घ्यावा कारण वर्षभरात तो १००० रुपयांच्या वर भाव दाखवील. कंपनीने मार्चमध्येच म्हणजे गेल्या महिन्यातच ग्रॅफाईट धातूचा भाव वर्षाला १४ हजार डॉलर्स, एका टनासाठी जाहीर केला आहे. त्यामुळे तिचे जून, सप्टेंबर, डिसेंबर २०१८ चे तिमाही आकडे प्रचंड नफा दाखवतील. आतापर्यंत टनाला ८ हजार डॉलर्सचा भाव आकारणाऱ्या ग्रॅफाईट इंडियाने मार्च २०१८ मध्ये हा भाव १ टनाला ७५ टक्‍क्‍याने वाढविल्यामुळे ग्रॅफाईट इंडियाचे २०१९ मार्च वर्षाचे संभाव्य उपार्जन २३० ते २५० रुपये व्हावे. फक्त ५ पट कि./उ गुणोत्तर धरले तरी हा भाव किती होईल याचा निवेशक अंदाज करू शकतील.

याच क्षेत्रातील हेग या कंपनीची ऊर्जितावस्थाही अशीच असेल. सध्या हेगचा भाव ३१५० रुपयांपर्यंत आहे. पण वर्षभरात तो ४ हजार रुपयांची पातळी ओलांडेल.

हे दोन शेअर्स कल्पवृक्षांसारखे किंवा कामधेनुसारखे आहेत. आणि प्रत्येक निवेशकांच्या भाग भांडारात किमान २० टक्के तरी शेअर्स या दोन कंपन्यांचे हवेत.

गुंतवणुकीमध्ये ‘तुरंत दान महापुण्य’ वर विश्‍वास असणाऱ्यांना डे ट्रेडिंग, फ्युचर ऑप्शन यांचा लोभ किंवा हाव सुटत असते. त्यापासून कटाक्षाने दूर रहायला हवे. डे ट्रेडिंग, फ्युचर ऑप्शन म्हणजे दुताचे फासेच असतात. ते उलटे कधी पडतील सांगता येणार नाही. त्यामुळे त्यापासून नेहमी दूरच रहायला हवे. त्यापेक्षा ‘थेंबे थेंबे तळे साचे’ही म्हण सदैव लक्षात ठेवायला हवी. जगामध्ये पेट्रोलचे भाव आता वाढत राहणार आहेत. त्यामुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम या तेल शुद्धीकरण कंपन्यांप्रमाणेच, तेल उत्पादन करणाऱ्या ओएनजीसी, ऑइल इंडिया, चेन्नई पेट्रो यांचे शेअर्स वाढत राहतील. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन येत्या काही वर्षात ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून व ती १.४० लक्ष कोटी रुपयांपर्यंत वाढवून आपली शुद्धीकरण क्षमता दुप्पट करणार आहे. २०३०पर्यंत तिची शुद्धीकरण क्षमता १५ कोटी टनापर्यंत नेणार आहे. पेट्रो केमिकल्स व पर्यायी इंधन क्षेत्रातही पदार्पण करून आपली क्षमता सर्वांगाने वाढणार आहे. भारतातल्या २३ शुद्धीकरण कारखान्यांपैकी तिच्या मालकीचे ११ कारखाने आहेत. वर्षाला ८ कोटी टन तेलाच्या शुद्धीकरणाची तिची क्षमता आहे. पुढील दोन वर्षांतील तिची गुंतवणूक १६६२८ कोटी रुपये असणार आहे. सुमारे ३६५०० कोटी रुपयांच्या तिच्या प्रकल्पाला अजून संचालक मंडळाकडून हिरवा कंदील मिळायचा आहे. कारण हे प्रकल्प लाल फितीत अडकले आहेत. तरीही एक दीर्घ मुदती गुंतवणूक म्हणून हा शेअर भाग भांडारात सदैव हवा. सध्या किंमत १७६ रुपये आहे. ती २५० रुपये व्हावी. 

संबंधित बातम्या