बाजारात चढउतार अपेक्षित

डॉ. वसंत पटवर्धन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

अर्थनीती

गेल्या आठवड्यात रिझर्व बॅंकेने आपले २०१८-१९ या आर्थिक वर्षातले पहिले द्वैमासिक धोरण जाहीर केले. ‘जैसे थे’ प्रकारच्या या धोरणात नवीन काही नव्हते. रेपो दर ६ टक्केच कायम राहिला. स्वागतार्ह म्हणजे एकूण धोरण मवाळ होते. तसेच एप्रिल - सप्टेंबर २०१८ या पहिल्या सहामाहीत महागाईत फक्त ४.७ टक्के ते ५.१ टक्के इतकीच वाढ होईल व सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) ७.४ टक्‍क्‍याने वाढेल, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेत फेडरल रिझर्वने व्याजदरात पाव टक्का वाढ केल्याने इथेही पाव टक्का वाढीची अटकळ होती. पण तीन झाल्याने समाधानाचा सुस्कारा टाकला आहे. पावसाळा यंदा समाधानकारक होईल, असे हवामानतज्ज्ञांचे अंदाज आहेत त्यामुळे यापुढे ‘अच्छे दिन’ नक्की पहायला मिळतील. फक्त त्यानंतर राजकीय वातावरणातील गढूळपणामुळे किती खराबी होईल ते सांगता येत नाही. मोदी विरोधकांचा आवाज सध्या बुलंद आहे. सर्वांची एक महाआघाडी करण्याचे स्वप्न आहे. पण काँग्रेस, सपा, बसपा, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, या सर्वांना आघाडीचे नेतृत्व करावे अशी मनीषा आहे. सत्ताधारी पक्षातही काही असंतुष्टांमुळे तडे जात आहेत. त्यातच अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती नादुरुस्त आहे. ते घरूनच काम बघत होते गीतांजली जेम्सनंतर, व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बॅंकेने दिलेली मोठी कर्जे सध्या गाजत आहेत. कंपनीच्या अध्यक्षा चंदा कोचर सध्या टीकेचे लक्ष्य आहेत. तसेच ॲक्‍सिस बॅंकेच्या शिखा शमा यांच्याबाबतही रिझर्व बॅंकेने त्यांना फक्त एकच वर्षाची मुदतवाढ द्यावी असे सुचवले आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंकांबरोबर काही खासगी बॅंकादेखील प्रसारमाध्यमांत चर्चेत आहेत. त्यामुळे कुठल्याच बॅंकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक नसावी. कदाचित येस बॅंकेचा अपवाद करता येईल.

जागतिक स्तरावर सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूवर भारी आयात कर लावून, व्यापारयुद्ध सुरू केले आहे. चीननेही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले असल्याने, सध्या ट्रम्प व उत्तर कोरिया ऐवजी ट्रम्प व चीन यांच्यात जुगलबंदी सुरू आहे. त्यामुळे १९३०च्या वेळचे जागतिक मंदीचे वातावरण तयार होत आहे. या युद्धाचा भारतीय निर्यातदारांना फायदा उठवायला हवा आहे.

चालू २०१८-१९ वर्षात, इराणने भारताला तेल (क्रूड) खरेदीसाठी बरीच सवलत द्यायचे ठरवल्याने, सौदी अरेबियाऐवजी आपली आयात यापुढे इराणमधून जास्त होईल. इराणमधील फर्झद ‘क्षेत्रा’मधल्या नैसर्गिक वायूची विक्री अन्य देशांना केली जात असल्याने भारत इराणवर नाराज होता. पण फेब्रुवारीमध्ये पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बीजन अंगाने या प्रतिनिधीची भेट घेतल्यानंतर परिस्थिती सुधारली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम मिळून रोज ३ लाख ९६ हजार तेल पिंपे आयात करणार आहे. मागील वर्षी त्यांनी २ लाख ५ हजार पिंपे आणली होती. 

नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडियाने २०१७-१८ वर्षात ७४०० किलोमीटर्स इतक्‍या महामार्गाची कामे सुरू करून १.२ ट्रिलियन रुपयांच्या मूल्यांचा उच्चांक गाठला आहे. संकल्पित अशा पूर्वीच्याच कित्येक प्रकल्पांची कामे कंपन्यांना अजून द्यायची असल्याने २०१८-१९ मध्ये महामार्ग बांधणीचा उच्चांक गाठला जाईल. हे एकच क्षेत्र देशात खूप मोठा रोजगार निर्माण करते. त्या खालोखाल वाहननिर्मितीतून मोठा रोजगार मिळतो. मार्च २०१८ महिन्याचे वाहन कंपन्यांचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार नेहमीप्रमाणे मारुती सुझुकीने मार्च २०१७ महिन्यापेक्षा २५ टक्के जास्त विक्री केली आहे. हिरो मोटो कॉर्प, बजाज ऑटो, ह्युंडाई, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स यांच्याही विक्रीत गेल्या मार्चपेक्षा त्यावेळी लक्षणीय वाढ आहे. जुलै २०१७ ते मार्च २०१८ या नऊ महिन्यात औद्योगिक कंपन्यांनी सरासरीने ९.२ ते ९.७ टक्के विक्रीत वाढ दाखवली आहे. करोत्तर नफ्याचा विचार करता १८.२ टक्के जास्त नफा दिसतो. धातू व खाणकाम क्षेत्रात २२.९ टक्‍क्‍याने नफा वाढल्याने या क्षेत्रातील शेअर्स तेजीत आहेत. बॅंका व वित्तसंस्थांनीही नफ्यात २३ टक्के वाढ दाखवली पण त्यातली बरीच रक्कम तरतुदीपोटी (Provisions for NPAs) साठी खर्ची घालावी लागली.

गेल्या काही दिवसात नव्या कंपन्यांची भागविक्री कमी झाली आहे. टाटा केमिकल्सने नुकताच अलाईड सिलीका या कंपनीचे सिलीका व्यवहाराचे आग्रहण १२३ कोटी रुपयाला केले आहे. तमिळनाडूमध्ये ही कंपनी आपले उत्पादन करीत आहे. टाटा केमिकल्सच्या सोडा ॲश निर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल. खास प्रकारच्या सिलीकाच्या या उत्पादनामुळे स्पेशॅलिटी केमिकल्सच्या उद्योगात मोठी वाढ होणार आहे. या कंपनीचे संशोधन क्षेत्र पुण्यात आहे.

जानेवारी - मार्च २०१८ या तिमाहीत औद्योगिक कंपन्या विक्रीत २० टक्के वाढ दाखवतील. लार्सन अँड टूब्रोला जानेवारी - मार्च २०१७ तिमाहीच्या तुलनेत अडीच टक्के वाढ दाखवता आली आहे. संगणन कंपन्याही यंदा चांगला नफा दाखवतील.

गीतांजली जेम्स आणि व्हिडीओकॉनने भारतीय बॅंकांना झटके दिल्यानंतर त्याच बॅंकांना ऊर्जा क्षेत्रातील १७८ अब्ज डॉलर्सच्या दिलेल्या कर्जापैकी ५३ अब्ज डॉलर्सची कर्जे अनार्जित होण्याच्या मार्गावर जातील. अशी भीती बॅंक ऑफ अमेरिका - मेरिल लींच यांच्या एका अहवालात नोंदली गेली आहे. पण हा धक्का बहुधा एक वर्षानंतर बसेल. डिसेंबर २०१७ च्या अखेरीस बॅंकांची ऊर्जा, पोलाद, महामार्ग, खाणी, दूरवाहिनी या क्षेत्रातील डळमळीत कर्जे एकूण कर्जाच्या साडेदहा टक्के झाली आहेत. गुंतवणूकदारांनी अशा सर्व बातम्यांचा अभ्यास वेळोवेळी करून आपल्या गुंतवणुकीबद्दल निर्णय घेतले पाहिजेत.

ग्रॅफाईट, हेग, दिवाण हाउसिंग व रेप्को होम्स तसेच जिंदाल समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक असावी त्याचप्रमाणे या वर्षी नॉन-बॅंकिंग फिनान्स कंपन्यांतील मन्नापुरम फायनान्समध्ये व मुथुट फायनान्समध्ये तसेच बजाज फायनान्समध्ये गुंतवणूक अवश्‍य हवी. बजाज फायनान्सचा गेल्या बारा महिन्यातील किमान भाव ११९० रुपये होतो तो आता १९४३ पर्यंत वर चढला आहे. ही वाढ ६० टक्के आहे. खासगी क्षेत्रातील येस बॅंक काही महिन्यापूर्वी २७६ रुपयांपर्यंत घसरला होता. आता तो ३१५ रुपयांपर्यंत आला आहे. तरीही या भावात खरेदी श्रेयस्कर ठरेल. वर्षभरात हा शेअर ४३० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही वाढ ४० टक्के ठरेल.

नावकर कॉर्पोरेशन सध्या १७२ रुपयाला उपलब्ध आहे. त्यातही ३५ टक्के वाढ वर्षभरात मिळू शकेल.

वाहनांच्या सुट्या भागातील आंतरराष्ट्रीय कंपनी मदर्सन सुमी सध्या उच्चांकी भावाला पोचला आहे. गेल्या वर्षभरात तो ३३५ ते ३४० रुपयांच्या दरम्यान फिरत आहे.

बांधकाम क्षेत्रातील एनबीसीसी, सोभा, प्रेस्टीज इस्टेटस्‌, अहलुवालिया काँट्रॅक्‍टस, बी. एल. कश्‍यप या कंपन्यांचा आवर्जून अभ्यास हवा. पोलाद क्षेत्रातील गोदावरी पॉवरने गेल्या बारा महिन्यात ८८ रुपयाचा किमान भाव दाखवला होता. आता तो ५२५ रुपयाला, त्याच्या जवळपास उपलब्ध आहे. इथेही वर्षभरात ४० टक्के वाढ संभवनीय आहे. गोदावरी पॉवरला कोळसा, लोहमाती, मॅंगनीज यांच्या ठोकळ्यासाठी (Pallet) स्वतंत्र सायडींग रायपूरच्या जवळ मिळाले आहे. त्यामुळे कंपनीच्या यातायात खर्चात बरीच बचत होईल. येते सहा महिने शेअरबाजार भरपूर हालचाल दाखवील म्हणून गुंतवणूक अभ्यासपूर्णच हवी.

बिनानी समूहातील बिनानी सिमेंट ही सध्या नादारीच्या उंबरठ्यावर उभी आहे. बिनानी इंडस्ट्रीज, बिनानी सिमेंटचे ८ हजार कोटी रुपयांचे कर्ज फेडण्याची तयारी दाखवत आहे. याबाबत त्यातील प्रमुख बॅंकेने बिनानी इंडस्ट्रीला ७५० कोटी रुपयाचा विसार मागितला आहे. बॅंकांबरोबर जर ही तडजोड झाली तर औद्योगिक वातावरण सुधारेल. २०१६-१७ वर्षामध्ये बिनानी सिमेंटच्या १५२७ कोटी रुपयांच्या विक्रीवर तिला ३४८ कोटी रुपयांचा नक्त तोटा सोसावा लागला होता. सर्व धनकोंची द्यावयाची रक्कम एकूण ६४६९ कोटी रुपये आहे. बिनानी सिमेंटला स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय बॅंक, कॅनरा बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया आणि अन्य कंपन्यांनी कर्जे दिली होती.

भारताची अर्थव्यवस्था सक्षम होत चालली आहे. तसतसा नवधनिक मध्यमवर्ग वाढत आहे. शहरीकरणामुळे व लांब अंतरामुळे वाहन असणे अपरिहार्य झाले आहे. त्यातही स्कूटर्स, मोटर बाईकस्‌ यांना जास्त पसंती मिळत आहे. मोटारीपेक्षा जास्त माईलेज मिळते. पार्किंग मिळण्यासाठी कष्ट पडत नाहीत. त्यामुळे बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्प आणि आयशर मोटर्सच्या EICHER MOTORS) ला प्राधान्य मिळते. त्यातही वेग देखणेपणा व थोडी महागडी म्हणूनही आवडणारी आयशर मोटर्सच्या शेअरचा भाव गेल्या शुक्रवारी २९८०० होता. २०१७-१८ वर्षासाठी शेअरगणिक उपार्जन ८३९ रुपये होते. २०१८-१९ वर्षासाठी संभाव्य उपार्जन ११०० रुपये असेल. गेल्या वर्षातील उच्चांकी भाव ३३४८० रुपये होता, तर किमान भाव २५३२० रुपये होता. येत्या बारा महिन्यात शेअरचा भाव २५ टक्के वाढून ३५ हजार रुपयांवर जावा.

कंपनीचे शेअरगणिक उपार्जन चार वर्षात तिप्पट झालेले दिसणार आहे. भाव जरी २५ हजार रुपयांइतका असला तरी हल्ली एक शेअरही घेता येतो. त्यामुळे उपार्जनाकडेच लक्ष द्यायला हवे. त्यातूनही जास्त शेअर्सच्या संख्येची इच्छा असेल तर ८० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंतचे शेअर्स घेता येतात. वर्षात भांडवलाची वाढ किती टक्के होते या एकाच निकषावर गुंतवणुकीसाठी शेअर्स निवडता येतात. त्यामुळे दिवाण हाउसिंग फायनान्स, येस बॅंक, ग्रॅफाईट, जिंदाल पॉवर अँड स्टील, गोदावरी पॉवर, रेप्को होम्स लोन्स, कॅपिटल फर्स्ट, इंडियन ऑइल, ओएनजीसी, मदर्सन सुमी, इंडिया बुक्‍स हाउसिंग, स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीस, केपीआयटी टेक्‍नॉलॉजी हे शेअर्स विचारार्ह ठरू शकतात.

संबंधित बातम्या