फायनान्स कंपन्या तेजीत

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 3 मे 2018

अर्थनीती : शेअर बाजार

गेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला भेट दिली. २० एप्रिलला पहिल्या दिवशी त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची वुहान या मध्य चीनमधल्या शहरात भेट घेतली. दोन्ही राष्ट्रांनी अनेक विविध मुद्यांवर चर्चा केली. एक नवे महत्त्वाचे सामंजस्य धोरण दोन्ही देश राबवतील असा विश्‍वास चीनच्या अध्यक्षांनी प्रकट केला. जगाच्या लोकसंख्येपैकी ४० टक्के लोक या देशात राहतात.

चीन-भारताचे संबंध सुधारत आहेत, त्याच वेळेला उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांनी आपले मतभेद मिटवण्याचे ठरवले आहे. पंतप्रधानांना लघुरूपशब्द (Aeronyms) वापरायची हौस असते. म्हणून दोन्ही राष्ट्रांतील STRENGH शब्दाची फोड त्यांनी Spirituality, Tradition, Relatioship, entertainment, genurity व Health अशी फोड केली. उत्तर कोरियाला आता अण्वस्त्रे वा क्षेपणास्त्रे यांची आवश्‍यकता नसल्याचे त्यांच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. देशादेशांतील असे संघर्ष कमी झाले तर जागतिक वातावरण खूप सुधारेल व त्यामुळे जगभरातील शेअरबाजार उसळतील.

आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्र सरकारने ३६८५ हेक्‍टर्स एवढी खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील आरक्षित जमीन, जी No Development Zone म्हणून ठेवली होती, ती मोकळी करायची ठरवलं आहे. मुंबई विकास २०३४ अशा नावाने हा आराखडा केला आहे. त्यांत १० लाख परवडणारी घरे, येतच्या सोळा वर्षांत बांधली जातील. मुंबई महापालिका हा १४.१५ लाख कोटी रुपयांचा प्रकल्प राबवेल. हा १७ वर्षांचा कार्यक्रम सुमारे १ कोटी लोकांना रोजगार देईल. घरबांधणी, रस्ते बांधणी व वाहन व्यवहार या तीन उद्योगांतूनच रोजगार मिळू शकतो. तो देशभर ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही विभागांत असतो. त्यामुळे अर्थनीती एका बाजूलाच कलंडली आहे असे होत नाही. रस्ते बांधणीसाठी गडकरी यांनी २०१८-१९ मध्ये रोज ३५ किलोमीटर महामार्ग बांधणीचे लक्ष्य ठरवले आहे. त्यामुळे २०१८-१९ मध्ये आणखी १२ हजार किलोमीटर रस्ते होतील. रस्त्यांची स्थिती सुधारत असल्यानेच वाहनांचे उत्पादनही वाढत आहे. पॅसेंजर मोटारीमध्ये मारुती सुझुकीने तर ४० टक्‍क्‍यांवर आपला वाटा नेला आहे.

घरबांधणीमुळे नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्यांतील, दिवाण हाऊसिंग फायनान्स, रेप्को होम फायनान्स, इंडिया बुल्स हाऊसिंग कंपन्यांनी आपले लक्ष्यही वाढवले आहे. या शेअरमध्ये पुढील पाच वर्षे गुंतवणूक उत्तम ठरेल. केंद्र सरकारने २०१८-१९ साठी कच्च्या तागाची (Raw Jute) हमी किंमत २०० रुपयाने वाढवून एका क्विंटलला ३७०० रुपये केली आहे. इंडस टॉवर्स भारतीय इन्फ्राटेलमध्ये विलीन होत आहे, त्यामुळे ‘भारत इन्फ्राटेल’ जगातली सर्वांत मोठी टॉवर कंपनी ठरेल.

बॅंकांबद्दल उलट्या-सुलट्या बातम्या येत असल्या, तरी गेल्या पंधरवड्यात, बॅंकांच्या ठेवी ७.९६ टक्‍क्‍याने वाढल्या व कृषिक्षेत्र सोडून कर्जे ११.५ टक्‍क्‍यांनी वाढली.

एकूण अर्थव्यवस्थेचे बळ सर्व बाजूने वाढत आहे. २०१८-१९ मध्ये अर्थव्यवस्थेची वाढ ७.८ टक्के इतकी होईल असा नाणेनिधी, जागतिक बॅंक व इतर अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.

मल्टि कमॉडिटी एक्‍सचेंज ऑफ इंडिया (MCX) चे २०१७-०१८ वर्षांचे उत्पन्न २५९.८४ कोटी रुपये होते. ९२ कोटी रुपयांचे अन्य उत्पन्न धरून एकूण उत्पन्न ३५१.८६ कोटी रुपये होते. नक्त नफा १०८.३६ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन २१.३१ रुपये होते. MCX चा सध्याचा भाव ७८० रु. आहे. मार्च तिमाहीचा नफा मार्च २०१७ तिमाहीपेक्षा ५५ टक्के जास्त आहे. वर्षभरात कंपनीचा शेअर ९०० रुपयांपर्यंत जावा.

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमध्ये गेल्या वर्षांत ३१ लाख नवीन कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. रोजगार देशात वाढत नाही, असं म्हणणाऱ्या विरोधकांना या आकड्यांमुळे उत्तम उत्तर मिळाले आहे.

टाटा पॉवर रिन्यू, आंध्र, कर्नाटक या राज्यांत सौर ऊर्जा निर्मितीसाठी ६१०० कोटी रुपये गुंतवेल. ४ मे रोजी वस्तुसेवा करपरिषदेची बैठक होणार होती. अर्थमंत्री अरुण जेटली आजारातून उठल्यानंतर या बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. जागतिक बॅंकेने आर्थिक समावेशन प्रकल्पांसाठी (Inelusiveness Project) साडेबारा कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.

२०१८-१९ साठी अन्नधान्याचे उत्पादनाचे उद्दिष्ट २८.४ कोटी टन आहे. उत्तेजन म्हणून खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना हमीभाव वाढवून दिले जाणार आहेत.

एसबीआय लाईफ इन्शुअरन्स कंपनीचे नव्या व्यवसायाचे प्रिमियमचे उत्पन्न २५४१ कोटी रुपये आहे. गतवर्षीच्या २३३७ कोटी रुपयांपेक्षा ते ८ टक्‍क्‍याने जास्त आहे. कंपनीला ३८.१२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. व्यवस्थापनाखालील 

जिंदगी (Assets under Management) ११ हजार ६२० कोटी रुपयांची आहे.

महिंद्र अँड महिंद्र फिनान्शियल सर्व्हिसेसला या मार्च २०१८ तिमाहीत ४९९.९ कोटी रुपयांचा नक्त नफा झाला आहे. गतवर्षीच्या मार्च तिमाहीचा नक्त नफा फक्त २७८ कोटी रुपये होता. म्हणजे यावेळी ८० टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या या वर्षीच्या मार्च २०१८ तिमाहीचे उत्पन्न २५०७ कोटी रुपये आहे. मार्च २०१७ तिमाहीला ते २१३३ कोटी रुपये होते. कंपनीने गेल्या २०१६-१७ पूर्ण वर्षात ५१२ कोटी रुपये नक्त नफा मिळवला होता. यंदा त्यात १०० टक्के वाढ होऊन तो १०२४ कोटी रुपये झाला आहे.

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमध्ये जाऊन तेथील अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट मध्य चीनमधल्या वूहान शहरात घेतली. दोन्ही देशांनी शांतता राखण्याचे समंजस धोरण सरहद्द विषयापासून, आयातनिर्यात धोरण अशा सर्व वादग्रस्त बाबतीत स्वीकारण्याचे ठरवले आहे. त्याचवेळी उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या राष्ट्रांनीही अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रे न वापरण्याचे जाहीर केले आहे. 

परवडणाऱ्या घरांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाचा समावेश प्राधान्य क्षेत्र कर्जात करावा (Priority Sector Loans) अशी बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी केली होती. पण रिझर्व्ह बॅंकेने त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. सरकार अशा कर्जावरील व्याजासाठी अनुदान देते व ही कर्जे इन्फ्रास्ट्रक्‍चरचा भाग समजते. बॅंकांना सध्या प्राधान्य क्षेत्राच्या कर्जाची निर्धारित टक्केवारी गाठता येत नसल्याने त्यांनी अशी विनंती रिझर्व्ह बॅंकेकडे केली होती. 

नॉनबॅंकिग फायनान्स कंपन्यांत सध्या गुंतवणूक इष्ट ठरेल. महिंद्र अँड महिंद्र फायनान्शियल प्रमाणेच मुथूट फायनान्स, मन्नापुरम फायनान्स, बजाज फायनान्स, कॅपिटल फर्स्ट, उज्जीवन फायनान्स, एल अँड टी फायनान्स या ही कंपन्या २०१८-१९ वर्षांत उत्तम वाढ दाखवतील. भारत फायनान्शियल इंडुसिंड बॅंकेत विलीन होणार असल्याचे ठरले असले तरी अजून त्यात प्रगती नाही. भारत फायनान्शियल सध्या ११५० रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरातील तिचा किमान भाव ६५१ रुपये होता. तो येत्या सात-आठ महिन्यांत १३५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणून त्यावेळी तो विकावा किंवा सध्याही विकून ती गुंतवणूक मन्नापुरम फायनान्समध्ये करावी. मन्नापुरम फायनान्स सध्या १२१ रुपयांच्या आसपास आहे. डिसेंबरपर्यंत तो १६० रुपये व्हावा. बजाज फायनान्स १९०० रुपयांपर्यंत चढला आहे. तो वर्षभरात २२०० रुपये होऊ शकतो.

गेल्या आठवड्यात टाटा एलेक्‍सी, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स कॅपिटल, एसबीआय लाईफ इन्शुअरन्स यांचे आकडे प्रसिद्ध झाले. अल्ट्राटेकचा ढोबळ नफा (EBITDA) २०१७ तिमाहीपेक्षा ३३ टक्‍क्‍याने वाढून १७०० कोटी रुपये झाला आहे. पण नक्त नफा ७२६ कोटी रुपये झाला. २२६ कोटी रुपयांची स्टॅंम्प ड्युटीची एक वेळ तरतूद केल्याने नफा घटला आहे. एकूण विक्री ९४२१ कोटी रुपये होती व ती गेल्या मार्च तिमाहीच्या ७०२० कोटी रुपयांपेक्षा ३४.२ टक्के जास्त आहे. पेट-कोकच्या किमती कमी होत असल्याने त्याचा फायदा अल्ट्राटेक व अन्य सिमेंट कंपन्यांना होईल.

जिंदाल स्टेनलेसला या तिमाहीत २८.७ टक्के कमी नफा झाला आहे. कंपनीचा ‘स्टॅंड अलोन’ नक्त नफा यावर्षी ११४.७४ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीसाठी तो १६१.१२ कोटी रुपये होता. बजाज कॉर्पचा या तिमाहीत ५५.४१ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या या तिमाहीत तो ५२.६६ कोटी रुपये होता.

भारती एअरटेलला मार्च २०१८ तिमाहीत ८३ कोटी रुपयांचा नक्त नफा झाला. विश्‍लेषकांना तिला यावेळी १०५ कोटी रुपयांचा तोटा होईल असे वाटले होते. अशा अंदाजामुळेच बऱ्याच विश्‍लेषकांवर गुंतवणुकदारांचा विश्‍वास नसतो. कंपनीला सध्या जीओ रिलायन्सची खूप मोठी जीवघेणी स्पर्धा सहन करावी लागत आहे. (या सदरात दूरवहन कंपन्यांबद्दल कधीही गुंतवणूक करावी अशा स्वरुपाचे लिहिले गेले नाही.)

कॅन फिन होम्स या गृहवित्त संस्थेचे मार्च २०१८ ला संपलेल्या वर्षासाठीचे उत्पन्न १५४३.९० कोटी रुपये होते. मार्च २०१५ ते मार्च २०१७ या तीन वर्षांसाठी ते अनुक्रमे ८१७ कोटी रुपये, १०८४ कोटी रुपये व १३५३ कोटी रुपये होते. या वर्षासाठीचा नक्त नफा ३०१.७७ कोटी रुपये होता. मार्च २०१५ ते मार्च २०१७ या तीन वर्षांसाठीचा नफा अनुक्रमे ८८ कोटी रुपये. १५७ कोटी रुपये व २३५ कोटी रुपये होता. कंपनीचे भागभांडवल फक्त २६.६३ कोटी रुपये आहे.

‘अतुल’ या कृषी रसायनांचे उत्पादन असलेल्या कंपनीचे २०१७-२०१८ वर्षाची विक्री ३३८८ कोटी रुपये होती. अन्य उत्पन्न २५ कोटी रुपयांचे होते. कंपनीचा या वर्षीचा नक्त नफा २८१.२४ कोटी रुपये होता. कंपनीचे शेअरगणिक उपार्जन ९४.८२ रुपये होते.

मार्च २०१८ तिमाहीचे कंपन्यांचे येणारे आकडे बाजार तेजीतच राहील असे सुचवणार आहेत. त्यातल्या त्यात धातु कंपन्या, खासगी बॅंका, गृहवित्त कंपन्या यांत गुंतवण इष्ट! जागतिक घडामोडींमध्येच काही उलटसुलट झाले नाही तर सर्वत्रच शेअरबाजार सुधारतोच. त्यातल्या त्यात भारताचा शेअरबाजार जास्त सुधारेल व डिसेंबरपर्यंत निर्देशांक ३७५०० पर्यंत चढेल. 

संबंधित बातम्या