शेअर खरेदीसाठी योग्य वेळ

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
शुक्रवार, 11 मे 2018

अर्थनीती ः शेअर बाजार

भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यात महामार्ग व रेल्वेचा मोठा वाटा आहे. २०१७-१८ या वर्षांत रेल्वेने अनेक अंगाने प्रगती करून त्याला हातभार लावला आहे. सिमेंट, कोळसा, लोहमाती, पोलाद यांच्या घाऊक स्वरूपात मालवाहतुकीतून तिनं यंदा ९८.५ टक्‍क्‍यांपर्यंत कार्मिक नफा (Operating Profit) मिळवला आहे. अतिरिक्त जागा विकूनही तिनं यंदा मोठी रक्कम उभी केली. या दोन्ही प्रकारातून रेल्वेने या आर्थिक वर्षात ७३०० कोटी रुपये मिळवले. या वर्षाच्या अर्थसंकल्पात ९६ टक्के कार्मिक नफा संकल्पिला होता.

जानेवारी-मार्च २०१८ या तिमाहीत, वार्षिक २० लाख रुपये ते दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या १२ लाख व्यावसायिकांनी वस्तुसेवाकर ५७९ कोटी रुपये भरला आहे. अपेक्षेपेक्षा सरकारला दुप्पट महसूल मिळाला आहे. या व्यावसायिकांची पूर्वीची आमदनी ८ ते ९ लाख रुपये वर्षाला होती, ती आता २० लाख रुपयांपर्यंत गेल्याचे दृश्‍य आहे. कॉम्पोझिट स्कीम म्हणून या व्यावसायिकांसाठी ही करप्रणाली आहे. वस्तुसेवा कर जुलै २०१७ ला लागू झाल्यावर पहिल्या तिमाहीत ८.१ लाख करविवरणपत्रे भरली गेली. त्यांनी ३३६ कोटी रुपये कर भरला. ऑक्‍टोबर-डिसेंबर २०१७ तिमाहीत ९.३ लाख विवरणपत्राद्वारे ४२१ कोटी रुपये सरकारला मिळाले. तर जानेवारी-मार्च २०१८ तिमाहीत ११.५ लाख लोकांनी ५७९ कोटी रुपयांची करभरणा केला.

ऊर्जावितरणात सध्या अनेक राज्यांना तोटा असतो. उत्तर प्रदेश त्याला अपवाद नाही. पण या राज्याने पुढील महिन्याच्या १ तारखेपासून (१ जून २०१८) आधी पैसे भरणारे (Pre-Paid) मीटर्स बसवण्याचे ठरवून या समस्येवर मात करण्याचा निश्‍चय केला आहे. राज्यातील प्रत्येक गावाला डिसेंबर २०१८ पर्यंत वीज देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निश्‍चय आहे. सौभाग्य योजनेखाली हा उपक्रम ४ कोटी ग्रामीण घरांसाठी राबविला जाईल. ‘घर तिथे वीज’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी दोन वर्षांपूर्वी दिले आहे. कानपूर, वाराणसी, मीरत,गोरखपूर, बरेली व लखनौ इथले वीजग्राहक मोबाईल फोन जसा चार्ज केला जातो, तसे हे मीटर्स आगाऊ ५० रुपयांपासून चार्ज केले जातील. या साठीच्या निविदा नोव्हेंबर २०१७ मध्ये, राज्याच्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लि. (EESL) या सरकारी कंपनीतर्फे काढण्यात आल्या होत्या व लार्सन अँड टुब्रो, जीनस पॉवर व अलाईड इंजिनिअरिंगना ही कंत्राटे त्यातून मिळाली होती. जीनस पॉवरला ५० टक्के, लार्सन टुब्रोला ३० टक्के व अलाईड इंजिनिअरिंगला २० टक्के वाटा मिळाला. १३७५ कोटी रुपये खर्च करून, एक वर्षात असे मीटर्स बसवण्याचे काम पुरे केले जाईल. त्यामुळे मार्च २०१९ पर्यंत राज्यात सर्वत्र वीजपुरवठा होईल. उज्वल डिस्कॉम ॲश्‍युअरन्स योजना (UDAX) या नावाने कर्जग्रस्त राज्यासाठी सुरू केली गेली आहे. उत्तर प्रदेशात ५ डिस्कॉम केंद्रे आहेत व त्यांचा तोटा सध्या २७.३५ टक्के आहे. गेल्या वर्षीही टक्केवारी ३२.३८ टक्का होती. अन्य राज्यांनी या योजनेसारख्या योजना राबवल्या तर ऊर्जाक्षेत्रात क्रांती घडेल. उर्जाक्षेत्रे, गाभा क्षेत्रापैकी (Core Sector) एक आहे. गाभाक्षेत्रात आठ क्षेत्रे येतात. या गाभा क्षेत्रातील वाढ मार्च २०१८ महिन्यात ४.१ टक्का इतकी कमी झाली आहे. एप्रिल-फेब्रुवारी या ११ महिन्यांसाठीची वाढ ४.२ टक्के होती. मार्च २०१७ ला गतवर्षी ती ५.२ टक्के होती. या आठ क्षेत्रांपैकी, सिमेंटमधील वाढ ६.३ टक्के होती. एकूण उद्योगक्षेत्रापैकी ही आठ गाभाक्षेत्रे Index of Industrial Production (IIP) ४०.२७ टक्के आहेत. सर्व क्षेत्रांचे, मार्च २०१८, एप्रिल-मार्च २०१७-१८ व एप्रिल-मार्च २०१६-१७ चे आकडेवारी पुढे दिली आहे.

भारत सध्या सर्व क्षेत्रांत प्रगती करीत आहे, याचे आणखी एक ताजे उदाहरण म्हणजे, रुरकीच्या इंडस्ट्रिअल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (IIT) ने चिकनगुनियासारख्या रोगावर शोधून काढलेला परमाणू हे आहे. याबाबतचे आणखी संशोधन झाले तर चिकनगुनिया भारतातून पाच-सहा वर्षांत हद्दपार होईल. दुर्दैवाने आपल्याकडे अशा संशोधनासाठी अर्थपुरवठा होत नाही. अर्थसंकल्पात, संशोधन व विकास यासाठी नगण्या रक्कम ठेवली जाते. आणि अमेरिकेप्रमाणे इथले धनिक किंवा दानशूर (?) कंपन्या मोठाल्या देणग्या देत नाहीत. अमेरिकेत अब्जावधी डॉलर्स अशा संशोधनासाठी अनेक विश्‍वविद्यालयांना मिळतात. Corporate Social Responsilrility साठी कंपन्यांना नफ्याच्या निदान १ टक्का रक्कम देण्याचे बंधन आहे.

एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने (ADB) भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ ७.३ टक्के होण्याबाबत प्रचंड आशावाद प्रकट केला आहे. हा दर येत्या दहा वर्षांत दुप्पटही गोऊ शकतो असे तिचे मत आहे. जनतेतील उत्पन्नाबाबतची विषमता कमी करणे आवश्‍यक आहे व निर्यातीवर भर देण्याऐवजी देशांतर्गत मागणी व पुरवठा वाढवायला हवा असे तिला वाटते. २०१८-१९ व २०१९-२० वर्षांसाठी अनुक्रमे ७.३ टक्के व ७.६ टक्के वाढ बॅंकेला अपेक्षित आहे. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन सध्या २३ लाख कोटी डॉलर्स आहे (१ डॉलर = ६५ रुपये) Consumption Can more production अशा शब्दात तिने भारताचे आर्थिक धोरण काय असावे हे विशद केले आहे. त्यासाठी दारिद्य्र निर्मूलनही महत्त्वाचे आहे असे तिने म्हटले आहे. सध्या ५०० रुपयांच्या नोटांचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे, अशी लोकांची तक्रार आहे. पण प्रत्येक दिवशी ३ हजार कोटी रुपयांच्या नोटा छापल्या जात असल्याने, पुरवठा लवकरच सुधारेल. सध्या ATMS ची ८५ टक्के मागणी पुरी केली जात आहे व सध्या कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी व सार्वजनिक विमा व्यवस्था सरकारतर्फे चालवली जात असली तरी त्याबाबत खासगी कंपन्याही ही जबाबदारी देऊन Public - Private Model वापरण्याचा सरकार विचार करीत आहे. कदाचित बॅंकांच्या ज्या विमाकंपन्या आहेत, त्यांना त्यात सहभागी करून घेतले जाईल. वेदांतची या तिमाहीची विक्री २७६३० कोटी रुपये आहे. ढोबळ नफा ७९२९ कोटी रुपये आहे. नक्त नफा ५६७५ कोटी रुपये आहे. या तिमाहीचा नफा मार्च २०१७ तिमाहीच्या नफ्यापेक्षा दुप्पट आहे. पूर्ण २०१७-१८ वर्षाची विक्री ९२९२३ कोटी रुपये होती. करोत्तर नफा १३६९२ कोटी रुपये आहे.

आतापर्यंत एम.आर.एफ. दिवाण हाउसिंग फायनान्स, इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स, फायझर गोदरेज प्रॉपर्टीज, रिलायन्स जिओ, ओरिएंटल सिमेंट, सेंचुरी एंका, सेरा सॅनिटरी वेअर अशा अनेक कंपन्यांचे मार्च २०१८ तिमाही व पूर्ण वर्षाचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी गुंतवणूक योग्य कंपन्यांचा परामर्श या लेखमालेत घेतला जाईल. दिवाण हाऊसिंगने २०१७-१८ वर्षासाठी अंतिम लाभांश शेअरमागे २.५० रुपये इतका जाहीर केला आहे. १५ हजार कोटी रुपयांचे अपरिवर्तित (Non-Convertible) रोखे काढण्याचेही संचालक मंडळाने ठरवले आहे. ही विक्री ७ टक्के दराने झाली तर तिला मोठे भांडवल, व्यवसायवृद्धीला मिळेल.

दिवाण हाऊसिंगचे ‘स्टॅंड अलोम’ स्वरुपा २८०१.९३ कोटी रुपये होते. नक्त नफा ३१२.४० कोटी रुपये झाला. कंपनीचे भागभांडवल ३१३.६६ कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन ९.९६ रुपये होते. मार्च २०१७-१८ वर्षात कंपनीने ६५९३५ कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली होती. सध्या ६८० रुपयाला हा शेअर मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी तो ५२० रुपयांच्या आगेमागे होता. अजूनही हा शेअर इथून २० टक्के नफा देऊन जाईल. इंडिया बुल्स हाऊसिंगचे मार्च २०१८ तिमाहीचे उत्पन्न १७०५८ कोटी रुपये होते. आणि नक्त नफा ९५२ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन २२ रुपये होते. पूर्ण वर्षासाठी ते ८४ रुपये आहे. पुढील दोन वर्षांचे संभाव्य उपार्जन अनुक्रमे १०१ रुपये व १२२ रुपये व्हावे. मार्च २०१९ व २०२० वर्षाची संभाव्य विक्री ७७०० कोटी रुपये व ९८०० कोटी रुपये व्हावी.

या दोन गृहवित्त कंपन्यांप्रमाणेच नॉन बॅंकिंग फायनान्स क्षेत्रातील बजाज फायनान्स, मथुट फायनान्स व मन्नापुरम फायनान्सचेही आकडे उत्तम यावेत. त्यामुळे त्यात आताच गुंतवणूक करणे योग्य ठरेल. मुन्नापुरम फायनान्स सध्या १२८ रुपयांपर्यंत चढला आहे. डिसेंबरपर्यंत तो १५० रुपयांवर जावा. बजाज फायनान्स दिवाळीपर्यंत २ हजार रुपयांचा टप्पा ओलांडेल.

दहा वर्षांपूर्वी कंपन्यांचा इतिहास, गेल्या पाच वर्षातही कामगिरी संचालक मंडळावरील व्यक्ती, कंपन्यांचे उत्पादन, त्याबाबत जागतिक स्तरावर असलेल्या मागणी पुरवठ्याची स्थिती, कंपनीचे बक्षिसभाग व/ वा लाभांश द्यायचे धोरण याचा सम्यक विचार गुंतवणूक करताना व्हायचा. आता याबाबत माहितीचा डोंगर आपल्यावर कोसळत असतो. निफ्टीच्या पन्नास कंपन्या, निर्देशांकातील तीस कंपन्या (या दोन्ही यादीत बरीच नावे तीच असतात.) यावर जास्त भर असायचा. आता स्मॉल कॅप व मिडकॅप कंपन्या उत्पादनात वैविध्य आणत आहेत. स्पेशलायझेशन वाढले आहे. इथल्या तज्ज्ञांपेक्षा अमेरिकेतील गुंतवणूक तज्ज्ञ हिरिरीने सल्ला देत आहेत. त्यांची मते अनेक मान्यवर इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत. राकेश झुनझुनवाला सारखी अभ्यासू व्यक्ती कुठे, किती गुंतवणूक करीत आहे, याबद्दल माहिती येत असते. शेअरबाजार हा जागतिक व राष्ट्रीय घडामोडींवर, नेत्यांच्या व अर्थतज्ज्ञांच्या भाष्यावर तसेच नैसर्गिक गोष्टींवर अवलंबून असतो. सकारात्मक संकेत असले तर तेजीचा नूर असतो. सध्या बाजाराला कर्नाटकमधील विधानसभेच्या निवडणूक निकालाबद्दल उत्सुकता आहे. या आठवड्यात १३ मे रोजी मतदान झाले, की संध्याकाळीच एक्‍झिट पोलचे अंदाज येतील. आणि १५ मे रोजी प्रत्यक्ष निकाल हाती आल्यावर बाजारातील नूर कळेल.पाठोपाठ पावसाळ्याबद्दलची भाकितेही येऊ लागतील. बहुधा गेल्या दोन वर्षाप्रमाणे यंदाही पावसाळा चांगला असण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ७ मे रोजी निर्देशांक ३५२०८ वर बंद झाला तर निफ्टी १०७१५ वर होता. निर्देशांक जुलैपर्यंत ३५५०० झाला किंवा निफ्टी ११५०० झाला तर दिवाळीपर्यंत तेजीच राहील. सध्या मात्र भाव खाली असल्याने खरेदीसाठी योग्य वातावरण आहे. निवडक पाच-दहा कंपन्यांतच अशी खरेदी असावी. 

संबंधित बातम्या