नफा बघून गुंतवणूक करावी

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ 
बुधवार, 30 मे 2018

अर्थनीती ः शेअर बाजार

गेल्या आठवड्यात मे महिन्याच्या शेवटी रालोआ सरकारला चार वर्षे पूर्ण झाली. भाजपजवळ पूर्ण बहुमत असल्याने अन्य पक्ष नामधारीच आहेत. भाजपच्या केंद्र सरकारमधील प्रमुख मंत्र्यांची कुंडलीही अनेक माध्यमांनी मांडली. रोज ३२ किलोमीटर रस्ता बांधणाऱ्या नितीन गडकरी व प्रकाश जावडेकर या महाराष्ट्रातील मंत्र्यांना भरघोस माप मिळाले आहे. भारताचे परराष्ट्र धोरण वास्तविकरित्या पंतप्रधान हाताळत असले तरीही सुषमा स्वराज यांनी सर्व राष्ट्रांशी चांगले संबंध जोडले आहेत. गडकरींनी २ लाख किलोमीटर्स रस्त्याची उभारणी केली. मुंबई-पुणे महामागाप्रमाणे देशांत बारा द्रुतगती महामार्ग उभारण्याचे काम चालू आहे. गंगा नदी शुद्धीकरणाचा ‘नमामि गंगे’ कार्यक्रमही बाळसे धरीत आहे. जावडेकर यांनी शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विस्तार होण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. पीयूष गोयल यांनी रेल्वेखाते उत्तम सांभाळले आहे. लातूर येथे सुरू होणारी रेल्वे कोच फॅक्‍टरी रोजगार वाढवेल. जेटली आजारी असल्याने अर्थखातेही त्यांच्याकडे आले आहे. (कदाचित १ फेब्रुवारी २०१९ चा केंद्रीय अर्थसंकल्प तेच मांडतील व २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तो येणार असल्याने तो लोकाभिमुख, विकास व रोजगाराला महत्त्व देणारा ठरेल. तसे झाले तर निवडणुकीनंतर अर्थखाते त्यांचेकडेच राहण्याची शक्‍यता आहे. सुरेश प्रभू यांचीही कामगिरी उत्तम आहे. निर्यात निश्‍चित वाढत आहे. चीनमध्ये भारताची मोठ्या प्रमाणावर निर्यात वाढवून, चीनबरोबरचा व्यस्त आयात निर्यात व्यापार ते सुधारत आहेत. तांदूळ, फळे, मांस, औषधे, भाजीपाला या वस्तू आता चीनमध्ये निर्यात होणार आहेत. नऊ मेगा फुडपार्क व ६२ शीतगृहे त्यांनी देशात उभारली आहेत. चर्मोद्योग क्षेत्रातली भारताची जागतिक बाजारपेठ ते दुप्पट करून बघत आहेत. या सर्व मंत्र्यांचे चार वर्षाचे परिश्रम पुढील निवडणुकीत पक्षाला पुन्हा सत्तेवर आणतील असे चित्र दिसते. 

भारताची कापसाची निर्यात यावर्षी ७५ लक्ष गासड्यांची (bales) होणार आहे. चार वर्षातला हा उच्चांक ठरेल. ही निर्यात अमेरिका, ब्राझील व ऑस्ट्रेलिया इथे मोठ्या प्रमाणावर होईल. जवळ जवळ ६३ लक्ष गासड्यांची निर्यात होईल. मागच्या वर्षी ५८.२ लक्ष गासड्या निर्यात झाल्या होत्या.  २०१८ मध्ये आतापर्तंय रुपयाचा डॉलरशी विनिमय दर ६२ रुपयाने घसरून ६८ रुपयावर गेला आहे. निर्यातदारांना त्याचा फायदा होत आहे. पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम व चीन या राष्ट्रांकडूनही यंदा भारती कापसाला मागणी आहे. भारतात यंदा १२ लक्ष कापूस गासड्यांची आयात होणार आहे. हा कापूस वेगळ्या प्रतीचा असतो. पुन्हा एकदा राजकीय परिस्थितीकडे वळायचे झाले तर, रालोआ गटबंधनातून तेलंगणा देशम बाहेर पडल्याची नोंद घ्यावी लागेल. महाराष्ट्रात शिवसेना सतत भाजपला वाकुल्या दाखवतच असते. २८ मे रोजी झालेल्या एका पोटनिवडणीसाठीही हे दोन पक्ष समोरासमोर ठाकले होते. कैसना या उत्तर प्रदेशामधल्या जागेसाठीही भाजप निकराने लढली. कर्नाटकमध्ये थोड्याने भाजपचा विजय निसटला. पण विरोधकांनी एकत्र येण्याची ती संधी साधली व तिथून रान जास्त पेटत जात आहे. तरीही मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये भरघोस जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देईल. एकूण वातावरणामुळे पुढील वर्षाची सार्वत्रिक निवडणूक भाजपला अटीतटीची म्हणून लढवावी लागेल. आजच्या अंदाजाप्रमाणे जागा कमी आल्या तरी बहुमत भाजपचेच असेल. सलग दहा वर्षे डॉ. मनमोहनसिंग यांना मिळाली होती. तशीच ती नरेंद्र मोदींना मिळाली तर देशाची अर्थव्यवस्थेची प्रगती सहज ८ ते १० टक्‍क्‍यांनी होईल. ग्रामीण भागात २०२२ सालापर्यंत नागरिकांचे विशेषतः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे अभिवचन नरेंद्र मोदींनी दिले आहे ते पुरे होऊ शकेल. (अर्थात समाधानकारक पावसाळा, चीन व पाकिस्तानकडून शांततेची हमी, यावरही ते अवलंबून असेल.) शिवाय रिझर्व्ह बॅंकेचे स्थिर ‘जैसे थे’ व्याज धोरण व स्थिर रुपया-डॉलर विनिमय दर हे ही घटक महत्त्वाचे ठरतील. 

केंद्रीय सार्वजनिक कंपन्या आणि रेल्वे, भारतीय गृहकंपन्या यांनी २०१७-१८ मध्ये बरीच भांडवली गुंतवणूक केली आहे. २०१६-१७ वर्षांपेक्षा ती १६ टक्के जास्त आहे. २०१७-१८ मध्ये भांडवली गुंतवणूक त्यांनी २.४२ लक्ष कोटी रुपये इतकी केली. भांडवली गुंतवणूक अर्थव्यवस्थेचा पाया बळकट करते व रोजगार निर्माण करते. सुमारे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीमुळे एक रोजगार निर्माण होतो, या हिशोबाने २.४० कोटी रोजगार आता निर्माण झाले असावेत. त्यामुळेच निवासिकांची मागणी वाढते. तसेच वाहनांची मागणी वाढते. प्रेसिडेंट बिल क्‍लिंटन यांच्या १९९२ ते २००० या कारभारात इतका रोजगार निर्माण झाला होता व घरबांधणी प्रचंड प्रमाणात झाली होती. २००६ साली अर्थव्यवस्था गोठल्यासारखी झाले हे रोजगार वितळले व अमेरिकेत फेनीमा, फ्रेड मेक सारख्या कंपन्या कोसळल्यावर नवीन stmulus ची योजना करावी लागली. भारतालाही stmulus काही वर्षांपूर्वी द्यावे लागले होते व त्यानंतरच इथेही २०१० सालानंतर परिस्थिती बदलली. त्यावर भाष्य पुढील लेखात.

मार्च २०१८ वर्षाचे व तिमाहीचे बरेच कंपन्यांचे विक्रीचे व नक्त नफ्याचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील महत्त्वाच्या काही कंपन्यांचा परामर्श पुढे घेतलेला आहे. त्या कंपन्यांचे त्रैमासिक विक्री व नफ्याचे आकडे बघून मगच गुंतवणूक करावी. कारण गुंतवणूक करताना आपली कुवत बघून जोखीम घ्यायची असते. 

भारत फोर्जचा शेअर सध्या ६८१ रुपयाला आहे. वर्षभरातील कमाल व किमान भाव ८०० रुपये व ५१० रुपये होता. या मार्च २०१८ तिमाहीची विक्री १४६६.६ कोटी रुपये होती. करोत्तर नफा २३३.५ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन या तिमाहीसाठी ५ रुपये होते. ओतीव धातुकाम (forging) व संरक्षण साधनांचे तिचे उत्पादन आहे. भारत फोर्ज ६०० रुपयाखाली मिळाला तरच घ्यावा. 

बॉश या मोटारींचे सुटे भाग करणाऱ्या कंपनीची मार्च २०१८ ची विक्री ३१५८ कोटी रुपये होती. नक्त नफा ५२७.७ कोटी रुपये झाला. या तिमाहीचे शेअरगणिक उपार्जन १४२.१ रुपये आहे. सध्या शेअरचा भाव १७६५५ रुपये आहे. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे २५२४५ रुपये व १६९७५ रुपये होते. ज्यांनी किमान भावात तो घेतला असेल त्यांना वर्षभरात ५० टक्के नफा झाला आहे. मात्र बॉश हा एक महाग शेअर आहे व तो जपून घ्यायला पाहिजे. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची या तिमाहीची विक्री ११७३६८ कोटी रुपये होती. नक्त नफा ५२१८.१ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन या तिमाहीला ५.४ रुपये होते. सध्या हा शेअर १६४ रुपयाला मिळत आहे. सध्याच्या भावाला किंमत/उ गुणोत्तर ७.५ पट दिसते. हा शेअर वर्षभरात ४० टक्के वाढून २३० रुपयांपर्यंत जावा. इंडियन ऑईलमध्ये भांडारातील १० टक्के गुंतवणूक हवी.

हिंदुस्थान पेट्रोलियमची मार्च २०१८ तिमाहीची विक्री ६०८१० कोटी रुपये होती. करोत्तर नफा १७४७.९ कोटी रुपये होता. या तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन ११.५ रुपये आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम सध्या २९५ रुपयाला मिळत आहे. या भावाला कि/उ गुणोत्तर हे फक्त ५.४६ पट दिसते. गेल्या १२ महिन्यातील कमाल व किमान भाव ४९२ रुपये तर २७२ रुपये होता. वर्षभरात तो पुनः ४४० ते ४६० रुपयाचा भाव दाखवू शकेल. मात्र सध्या भाव कमी होत असल्याने खरेदीसाठी थोडे थांबावे. 

बाटा इंडियाची मार्च २०१८ तिमाहीची विक्री ६३२.३ कोटी रुपये झाली. मार्च २०१७ तिमाहीत ती ५९१.४ कोटी रुपये होती. यावेळी मार्च २०१८ तिमाहीत नक्त नफा ५२.१ कोटी रुपये झाला. शेअरगणिक उपार्जन ४.१ रुपये होते. 

धानुका ॲग्रिटेकचा सध्या भाव ५६६ रुपये आहे. वर्षभरातील किमान भाव ५३६ रुपये होता, तर कमाल भाव ९२९ रुपये होता. या मार्च २०१८ तिमाहीची विक्री १८५.१ कोटी रुपये होती. नक्त नफा २८.६ कोटी रुपये होता. या तिमाहीचे शेअरगणिक उपार्जन ५.८ रुपये आहे. कृषिक्षेत्रातील ही एक चांगली कंपनी आहे. 

नोव्हार्टिस ही औषधी कंपनी आपला त्वचा औषधी विभाग (सॅंड्रोज खाली असलेला) विकत आहे. व हैदराबादची अरविंदो फार्मा या व्यवहारासाठी १.६ बिलियन डॉलर्स द्यायला तयार आहे. हा व्यवहार झाला तर गेल्या दोन वर्षातील अरविंदो फार्माचे हे दुसरे आग्रहण ठरेल. तशी ही वावडी जुनी आहे. पण पुन्हा उडवली गेली आहे. गुंतवणूकदारांनी तिकडे लक्ष देऊ नये. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने मार्च २०१८ तिमाहीसाठी निराशाजनक कामगिरी केली असली तरी व्यवस्थापनाने भविष्यकाळ उज्वल असल्याची ग्वाही दिली आहे. नादारी व दिवाळखोरी कायद्याचा तिला फायदा होणार आहे. तिची अनार्षित ढोबळ कर्जे २२३४२७ कोटी रुपये आहेत. त्यापैकी गेल्या वर्षात ५० हजार कोटी रुपये वसूल होतील असा तिचा विश्‍वास आहे. एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स या तिच्या पोटकंपनीची प्राथमिक भाग विक्री पुढच्या वर्षी होईल. एस.बी.आय. कार्डसची ही प्राथमिक भागविक्री २०१९-२० मध्ये व्हावी. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या