शेअर बाजार स्थिर

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 7 जून 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
 

जून महिना सुरू झाला असल्याने, केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाचे आगमन झाले आहे व वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. पेट्रोल व डिझेल मात्र भडकत असल्याने त्यावर विरोधी पक्ष आपली पोळी भाजून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांची नुकतीच गाठभेट झाली. भारत व सिंगापूरमध्ये आयात-निर्यात व्यापार वाढवण्याचे दृष्टीने दोन्ही राष्ट्रात काही करार-मदार झाले. सिंगापूरच्या निर्यातीसाठी आणखी तीस वस्तूवरील आयातकर भारत कमी करेल. द्विपक्षीय व्यापारासाठीचा हा दुसरा प्रयत्न होता. जूनच्या १ तारखेला मोदी यांनी सिंगापूरचा तीन दिवसांचा दौरा केला होता.

अखिल भारतीय व्यापारी संघटनेने फ्लिपकार्टद्वारे, वॉलमार्ट भारतात ई-व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे व प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीबाबतचे नियम मोडत आहे, अशी तक्रार एनफोसिमेंट डिरेक्‍टोरेटकडे केली आहे. पण सरकारचे मुक्त व्यापार धोरण लक्षात घेता ती तक्रार वाऱ्यावर विरून जाईल. करबुडव्यांबाबत खबर देणाऱ्याला आता सरकारने पाच कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले आहे. पण हा प्रयोग फारसा यशस्वी होणार नाही.

पेट्रोलच्या वाढत्या भावावर काबू मिळवण्यासाठी केंद्राजवळ सध्या अनुदान द्यायला पैसा नाही. त्यामुळे राज्यांनीच आपले त्यावरील कर कमी करावेत असे मत नीती आयोगाने व्यक्त केले आहे. जागतिक स्तरावर पेट्रोलचे भाव वाढून पिंपाला १०० डॉलर्सपर्यंत  जातील अशी शंका व्यक्त होत असली तरी आपला व्यापार कमी होईल, या भीतीने सौदी अरेबिया व मध्य पूर्वेतील राष्ट्रे भाववाढीच्या बाजूने नाहीत. पेट्रोलचे वाढते दर भारताला उपद्रवकारक ठरू शकतात. राज्यांचे मूल्यवर्धित कर किंमती वाढल्या, की राज्यांना जास्त महसूल देऊ शकत असले तरी राज्यांनी कर वाढवून महसूल वाढवण्याचा प्रयत्न करू नये असे नीती आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे. पेट्रोल महाग झाले तर मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंडमधील विधानसभांच्या निवडणुकात रालोआ शासनाला धक्का बसू शकतो व आठ-दहा महिन्यातील संभाव्य लोकसभेसाठीच्या निवडणुका लक्षात घेता, केंद्रसरकार आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना योग्य सल्ला देतील. वेळ पडल्यास संभाव्य अनुदानासाठी केंद्र शासन SUOTI कंपन्यांच्या शेअर्सबाबत निर्गुंतवणुकीचे (Disinvestment) पाऊलही उचलून रक्कम उभी करेल. पेट्रोलबाबत ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ला एक चिंता उद्‌भवली आहे. कंपनीच्या ओएनजीसी विदेश या पोटकंपनीला व्हेनेझुएलाने ४५ कोटी डॉलर्सची देय रक्कम, कठीण आर्थिक परिस्थितीमुळे रोखून धरली आहे. व्हेनेझुएलातील सॅन क्रिस्टोबल तेलखाणीत ओएनजीसीचा ४० टक्के वाटा आहे. तिथून तिला १८००० बोलिव्हार मिळू शकतात. ओएनजीसीच्या ४० टक्‍यांना व्हेनेझुएलाच्या कंपनीने गेली दहा वर्षे डिव्हिडंड दिलेले नाही. २००८ साली ओएनजीसीला शेवटचा ५६०० कोटी डॉलर्स लाभांश मिळाला होता. त्यानंतर तिच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. 

साखरेचे या वर्षी अमाप उत्पादन झाल्याने, सरकार चीनला काही साखर निर्यात करण्याचा प्रयत्न करीत आहे.
४ जूनला गेल्या सोमवारी निर्देशांक ३५१४० च्या आसपास होता तर निफ्टी १०६६५ च्या आगेमागे होता. राजकीय वातावरण गेल्या आठवड्यात ११ पोटनिवडणुका व त्याचे निकाल यामुळे गढूळ होते. पालघरची एक व अन्यत्र एक अशा दोनच जागा भाजपाला जिंकल्या आल्या. जगात व भारतातही पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत असल्याचा फटका पक्षाला बसला. केरळ राज्याने आपले दर कमी करून १ रुपयाने पेट्रोल स्वस्त केले. पण अन्य राज्ये आपले मूल्यवर्धित कर कमी करायला तयार नाहीत. पेट्रोल भडकत राहिले तर २०१९ मधली सार्वत्रिक निवडणूक रालोआला कठीण जाणार आहे.

सुदैवाने पावसाळा चांगला जाणार आहे. मार्च २०१८ तिमाहीनंतर, जून व सप्टेंबर २०१८ तिमाहीचें कंपन्यांचे आकडे उत्तम येण्याची अपेक्षा आहे. १५ जूनला कंपन्यांनी कॉर्पोरेट कराचा तिमाही आगाऊ भरणा केल्यानंतर, जे आकडे मिळतील त्यावर पुढील तिमाहीच्या नफ्याचा अंदाज करता येईल. आता जून १५ नंतर कंपन्यांचे लाभांशाचे चेक्‍सही महिनाभरात मिळतील. या सर्व बाबींमुळे शेअरबाजारातील तेजी वाढली नाही, तरी मंदीही दिसणार नाही. तामिळनाडू सरकारने तुतिकोरिनचा तांब्याच्या भट्टीचा (Smelter) प्रकल्प, वेदांत कंपनीला जरी बंद करायला लावला असला तरी त्यामुळे वेदांतच्या नफ्यात घट होणार नाही.

नुकतंच सेबीने एका फतव्यानुसार १६० शेअर्सना देखरेखीखाली (surveilance) आणले. त्यामुळे रेन इंडस्ट्रीज, ग्राफाईट इंडिया यांच्या भावात घसरण झाली. पूर्वी ज्यांची खरेदीची संधी हुकली असेल त्यांनी हा मोका गमावू नये. ग्राफाईट इंडिया ९०० रुपयांवरून ८.४५ रुपयांपर्यंत उतरला आहे, आणि हेगही ३३६५ रुपयाला मिळत आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत ग्राफाईट इंडिया १००० ते १०५० रुपयांपर्यंत चढू शकेल. तर हेग ४५०० ते ४६०० रुपयांचा भाव दाखवील. रेन इंडिया २२२ रुपयाला आहे तो ३०० रुपयावर जाईल. ग्राफाईट इंडियाचे २०१९ मार्च व २०२० मार्च वर्षासाठीचे शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे ९० रुपये व ११० रुपये आहे. त्यामुळे त्याला १० पट किं/उ. गुणोत्तर मिळायला हरकत नाही. पावसाळा समाधानकारक झाला आणि राजस्थान - मध्यप्रदेश विधानसभांच्या निवडणुकात भाजपला अपेक्षित यश मिळाले तर शेअरबाजार सुधारतच राहील. देशात एकछत्री राज्यकारभार असला तर आर्थिक सुधारणा होऊ शकतात. डॉ. मनमोहनसिंग यांना दहा वर्षे मिळाली तशी नरेंद्र मोदींनाही दहा वर्षे मिळायला हवी.

गेल्या आठवड्यात अर्थव्यवस्थेबाबतचे सुखद आकडे प्रसिद्ध झाले. गेल्या सात तिमाहीतले या तिमाहीचे आकडे उत्तम आहेत. अर्थव्यवस्था यावेळी ७.७ टक्‍क्‍याने वाढली आहे. चीनच्या वाढीपेक्षा ही वाढ एक टक्‍क्‍याने जास्त आहे. टाइड वॉटर ऑईल कंपनी (Tide Water Oil Co.) ची २०१८ तिमाहीची विक्री २९८.१ कोटी रुपये आहे. पूर्ण २०१७-१८ मार्च वर्षाची विक्री १११२ कोटी रुपये आहे. नक्त नफा या तिमाहीत २८.३ कोटी रुपये होता. पूर्ण वर्षासाठी हे उपार्जन ३१४ रुपये होते. २०१९ मार्चचे सध्या किं/उ. गुणोत्तर उपार्जनाच्या संदर्भात १६.६ पट पडते.

सांडूर मॅंगेनीज अँड आयर्न ओअरची या तिमाहीतची विक्री १८७.५ कोटी रुपये होती. गेल्या वर्षीच्या १५९.६ कोटी रुपयांपेक्षा ती १६ टक्के जास्त आहे. या वेळचा करोत्तर नफा ३९.४ कोटी रुपये आहे. या तिमाहीचे शेअरगणिक उपार्जन ४५ रुपये आहे. सध्या फक्त ८.५ किं/उ. गुणोत्तराला मिळणारा हा शेअर खरेदीस योग्य आहे.

भारत पेट्रोलियमची या मार्च तिमाहीची विक्री ६५,२३९ कोटी रुपयांची होती. मागील वर्षाची विक्री ५७,०३६ कोटी रुपयांची होती. या तिमाहीचा नक्त नफा २६७३.६ कोटी रुपये होता. गेल्या मार्चचा हा आकडा १८४१.७ कोटी रुपये होता. या तिमाहीचे शेअरगणिक उपार्जन १२.३ रुपये आहे. सध्या शेअरचा भाव ४०० रुपये आहे म्हणजे त्याच्या आसपास आहे. गेल्या बारा महिन्यातील कमाल व किमान भाव अनुक्रमे ५५२ रुपये व ३७० रुपये होते. सध्या हा शेअर फक्त ८.७ किं/उ. गुणोत्तराला मिळत आहे.

हिंदुस्थान कॉपर या कंपनीची मार्च २०१८ तिमाहीची विक्री ३८२.७ कोटी रुपये होती. गेल्या मार्च तिमाहीचीही विक्री ५६३ कोटी रुपये होती. या तिमाहीचा ढोबळ नफा ८०.८ कोटी रुपये होता. मार्च २०१७ तिमाहीच्या १०३.८ कोटी रुपयापेक्षा तो २० टक्के कमी आहे. शेअरगणिक तिमाही उपार्जन फक्त २० पैसे असल्यामुळे हा शेअर घेऊ नये. प्रवर्तक मात्र बाजारातून या भावाला शेअर्स विकत घेत आहेत.

मे -जूनमध्ये बहुतेक शेअर्सच्या किंमती पडत असतात. धोरणी गुंतवणूकदारांनी त्याचा फायदा घेऊन, सध्या खरेदी केली आहे. त्यातच सेबीने काही कंपन्या देखरेखीखाली आणल्याने एक कुंद वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, मिधानि, दिवाण हाऊसिंगप्रमाणे, मुंबईत मेट्रोची कामे करीत असलेल्या जे. कुमार इन्फ्रा ही सध्याच्या २६८ रुपये भावाला खरेदी केली पाहिजे. गेल्या बारा महिन्यातील त्याचा उच्चांकी भाव ३७५ रुपये होता. त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत तो निदान ३४० रुपयांपर्यंत जाऊ शकेल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या