शेअर बाजार वधारणार!

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
शुक्रवार, 27 जुलै 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
 

मागच्या लेखानंतर २० जुलैला संसदेत काँग्रस पक्षाने पुढाकार घेऊन, विरोधकातर्फे रालोआ शासनावर अविश्‍वासाचा ठराव मांडला. राहुल गांधींनी, राफेल विमान खरेदी, दलितांवर होणारे अत्याचार, सरकारची चार वर्षांची कामगिरी हे मुद्दे मांडून चांगले भाषण केले व त्याला पंतप्रधानांनी दीड तास भाषण करुन आरोपांचे मुद्देसुद खंडन केले. लोकसभेच्या खासदारांची संख्या ५४३ आहे. पण प्रत्यक्ष उपस्थिती ४५१ खासदारांची होती. शिवसेना, तेलंगण राष्ट्र समिती व बिजू जनता दाल यांचे खासदार मतदानाला उपस्थित राहिले नाहीत. अविश्‍वास ठरावाला पाठिंबा फक्त १२६ खासदारांनी दिला. पण विरोधात ३२५ मते पडून, ठराव बारगळला. अनुपस्थित सदस्यामुळे, मताधिक्‍यासाठी फक्त २२६ मतांची जरुरी होती. त्यापेक्षा ९९ मते जास्त सरकारच्या बाजूने पडली. कारण खुद्द भाजपचे खासदारच २७३ पेक्षा जास्त आहेत. 

या ठरावामुळे आगामी राजस्थान, मध्यप्रदेश मधल्या विधानसभांच्या निवडणुका भाजप जास्त आत्मविश्‍वासाने सामोरे जाईल. तिथे घवघवीत यश मिळाले तर पंतप्रधान मे २०१९ मध्ये अपेक्षित असलेली निवडणूक आधीही घेऊ शकतील. दुसरा पर्याय असा आहे की, फेब्रुवारी २०१९ चा अर्थसंकल्प शेतकरी, मध्यमवर्ग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यासाठी भरघोस सवलती देणारा ‘पेश’ करुन मतदारांना आकृष्ट केले जाईल. विरोधकांनी एकजूट करण्याचा प्रयत्न कर्नाटकच्या विधानसभांच्या निवडणुकीपासून जरी सुरू झाला असला, तरी पंतप्रधानकीसाठी अनेक जण बाशिंग बांधून उभे राहणार असल्याने, निवडणूकीला रंग चढेल. ठरावावरील भाषणे चालू असता पंतप्रधानांनी त्यांच्या खुर्चीतच, गांधींनी आलिंगन देऊन रंग आणला. पण त्याच्या त्या कृतीला व नंतरच्या नेत्रकटाक्षाला माननीय अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी नाखुषी दर्शविली. 

 महाराष्ट्रातही वातावरण गेल्या काही दिवसात गढूळ झालेले दिसले. प्रथम दुधासाठी दरवाढ मागितली गेली व लिटरला पाच रुपये दूध उत्पादकांना सरकार कबूल करेपर्यंत दूधपुरवठा बंद केला गेला व काही ठिकाणी जाळपोळही झाली. नंतर आषाढी एकादशीला विठ्ठलरखुमाईची पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करु दिली गेली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आल्याने ठिणग्या पडल्या. मुख्यमंत्र्यांनी नोकऱ्यात १६ टक्के राखीव ठेवण्याचे कबूल केले आहे. नवीन ७२ हजार कर्मचाऱ्यांची भरती यापुढे होणार आहे. त्यांना हे आरक्षण दिले जाईल.

 वस्तूसेवा कराबाबतही काही सवलती जाहीर झाल्या आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सवरील वस्तूसेवाकर काढून टाकण्यात आला आहे. महाराष्ट्राने ही मागणी जोरात लावून धरली होती. त्याखेरीज पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलवरील कर १६ टक्‍क्‍यावरुन ५ टक्के केला गेला आहे. बांबूवरील करही १८ टक्‍क्‍याऐवजी १२ टक्के झाला आहे. त्यामुळे बांबूपासून तयार होणारे फर्निचर आणि फ्लोअरींगवरील करही कमी झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिचे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आहे. रेफ्रिजेटर्स, वॉशिंग मशिन्स, व्हॅक्‍युमक्‍लीनर्स, इलेक्‍टिर शेव्हर्स, ज्यूसर्स यावरही आता कमी वस्तूसेवाकर असेल. 

गुंतवणुकीचा आता विचार करता स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीचा शेअर प्रथम डोक्‍यात भरतो. स्टरलाईटच्या टेक्‍नॉलॉजीच्या उपकंपनीने मेटालुर्सिका ब्रेस्काना एसपीए या कंपनीचे आरक्षण जुलै २० ला पुरे केले आहे. स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीज २००० मध्ये स्थापन झाली. कंपनीचे नवीन ऑप्टिकल फायबर्सचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मार्च २०२०पर्यंत ती १००० कोटी रुपयांचे उत्पादन करु शकेल. त्यामुळे कंपनीचा नक्त नफा १० कोटी डॉलर्सपर्यंत जाईल. स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीसारखी कंपनी आपल्या भाग भांडारात अवश्‍य हवी.

 हेगचे तिमाही आकडे १ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहेत. ग्राफाईट इंडियाचे आकडे ८ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहेत. हेग व ग्राफाईट इंडिया सध्याच्या भावापेक्षा २५ टक्के आणखी जास्त वाढतील. हेग ही कंपनी १९७२ मध्ये सुरू झाली होती. हेगबद्दल अमेरिकेतील जेफ्रीज समूह अत्यंत आशावादी आहे. चीनमध्ये जरी ग्राफाईट इलेक्‍ट्रोड कंपन्या असल्या तरी त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता चांगली नसते. भारतातील ग्राफाईटला सध्या टनामागे १७ हजार डॉलर्सची किंमत मिळेल. 

बजाज फायनान्सची या तीन महिन्याची कामगिरी नेत्रदीपक आहे. जून २०१८ तिमाहीचा तिचा नफा गतवर्षाच्या जूनपेक्षा ६९ टक्‍क्‍याने वाढून १०१८ कोटी रुपये झाला आहे. जून २०१७ तिमाहीसाठी तो ६०२ कोटी रुपये होता. तिची ढोबळ अनार्जित कर्जे १.३९ टक्के आहेत व नक्त अनार्जित कर्जे ०.४४ टक्का आहेत. यात यावेळी १६ टक्के वाढ दिसते. तरतुदीसाठी ३२७ कोटी रुपये बाजुला काढले आहेत. घरांच्या कर्जाची जिंदगी धरून तिची व्यवस्थापनाखालील जिंदगी (assets under mamagement) ९३३१४ कोटी रुपये आहे. जून २०१७ पेक्षा त्यात ३५ टक्के वाढ दिसते. नक्त व्याजाचे उत्पन्न २०४२ कोटी रुपयावरुन २९०४ कोटी रुपयांवर गेले आहे. कंपनीची बजाज हाऊसिंग फायनान्स ही पोटकंपनी जुलै २०१७ मध्ये सुरू झाली. आकडे जाहीर झाल्यानंतर कंपनीचा शेअर २७४६ रुपयांपर्यंत चढला. या भावाला किं/अु गुणोत्तर ५७.८४ पट इतके वर आहे. शुक्रवारी ७३ लाख शेअर्सचा व्यवहार झाला. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे २७४५ व १५११ रुपये होते. 

बजाज फायनान्सचा शेअर दर तिमाहीला वरचा भाव दाखवत आहे. त्यामुळे हा शेअर आताही घेतला तरी चालेल. बजाज फायनान्सप्रमाणेच बजाज फिनसर्व्ह या मूळ कंपनीचेही आकडे उत्तम आहेत. जून २०१७ साठी तिचे उत्पन्न ७५००.५४ कोटी रुपये होते. नक्त नफा ५८४.५३ कोटी रुपये होता. जून २०१८ तिमाहीसाठी एकूण उत्पन्न ८७६७.७३ कोटी रुपये होते. नक्त नफा ८२५.७७ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन गेल्या जूनमध्ये ३६.७ रुपये होते. ते यावेळी ५१.९ रुपये झाले आहे. बजाज फायनान्सचे शेअरगणिक उपार्जन जून २०१७ तिमाहीसाठी ८.४२ रुपये होते. यावेळी तिमाहीचे शेअरगणिक उपार्जन १४.५३ रुपये झाले आहे. 

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह व बजाज ऑटो यातील गुंतवणूक बजाज समूहाने बजाज होल्डिंग्ज अँड इनव्हेस्टमेंट लि. या कंपनीत ठेवली आहे. ही होल्डींग कंपनी वेळोवेळी त्यात खरेदी-विक्रीचा व्यवहार करते. बजाज होल्डींगचे ३० जून २०१८ साठीचे व्यावसायिक उत्पन्न १०४.७१ कोटी रुपये होते. कंपनीचा नफा ७४३ कोटी रुपये होता. कंपनीचे भाग भांडवल १११.२९ कोटी रुपये आहे. १० रुपयाच्या दर्शनी भागाच्या शेअरवरील उपार्जन ४८.३ रुपये होते. कंपनीचे मार्च २०१८ वर्षाचे उत्पन्न ४१९.६५ कोटी रुपये होते. नक्त नफा २६५४ कोटी रुपये होता व शेअरगणिक उपार्जन २३८.५ रुपये होते. कंपनीच्या शेअरचा भाव सध्या ३००० रुपयाच्या आसपास आहे. गेल्या बारा महिन्यातील किमान भाव २२८० रुपये होता. सध्याच्या भावाला किं/अु. गुणोत्तर १०.५५ पट पडते. या लेखात परामर्श घेतलेल्या सर्व कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत. 

स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीजची विक्री जून २०१८ तिमाहीत ८७६.८९ कोटी रुपये होती. करपूर्व नफा १८४.३० कोटी रुपये होता आणि करोत्तर नफा १२०.७१ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन ३.०१ रुपये होते. जून २०१७ तिमाहीसाठी विक्री ७४४.४१ कोटी रुपये होती. करपूर्व नफा ९३.३५ कोटी रुपये होता व करोत्तर नफा ६०.५९ कोटी रुपये होता. जून २०१७ तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन १.५२ रुपये होते. कंपनीचे भाग भांडवल ८०.३० कोटी रुपये आहे. शेअरचे दर्शनी मूल्य दोन रुपये आहे. पुनर्मूल्यन गंगाजळी वगळून नक्त गंगाजळी १०९५.१२ कोटी रुपये ३१ मार्च २०१८ ला संपलेल्या वर्षांसाठी होती. यावेळी कंपनीचा ढोबळ नफा २५२ कोटी रुपये होता व जून २०१७ साठी झालेल्या नफ्यावर यावेळी ५४ टक्के वाढ दिसली. कंपनीकडे ६०३४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. ऑप्टिकल फायबर केबल्सचे ती उत्पादन करते. तसेच ती टेलिकॉम सॉफ्टवेअर क्षेत्रातही आहे. सिस्टीम इंटिग्रेशन सर्व्हिसेस सुद्धा ती पुरवते. 

एल अँड टी टेक्‍नॉलॉजी या तीन महिन्यांचे उत्पन्न ११५२ कोटी रुपये आहे. इतर उत्पन्न ९८ कोटी रुपयाचे होते. त्यामुळे उत्पन्न १२५० कोटी रुपयांचे झाले. नक्त नफा १९८ कोटी रुपयांचा होता. अन्य काही उत्पन्नामुळे कंपनीचे शेअरगणिक उपार्जन १.११ रुपये झाले आहे. विजया बॅंकेने जून २०१८ या तिमाहीसाठी कर्जावरील व्याजाचे उत्पन्न २६५९ कोटी रुपये दाखवले आहे. गुंतवणुकीवरील व्याज ७१९ कोटी रुपये होते. एकूण उत्पन्न ३९३.७७ कोटी रुपये आहे. यावेळी बॅंकेने अनार्जित कर्जासाठी ६५९.३८ कोटी रुपयांची तरतूद केली व १४४. ३४ कोटी रुपये नफा दाखवला. बॅंकेचे भागभांडवल १३०४.१५ कोटी रुपये आहे. केंद्र सरकारकडे ६८.७७ टक्के शेअर्स आहेत. ३० जून २०१७ ला कंपनीचे एकूण उत्पन्न ३५१०.४७ कोटी रुपये होते. एकूण उत्पन्न ३७२८ कोटी रुपये होते. त्यावेळचा नक्त नफा २५४.६९ कोटी रुपये होता.

एच.डी.एफ.सी. बॅंकेचे जून २०१८ तिमाहीसाठी कर्जावरील व्याजाचे उत्पन्न १७३९०.७३ कोटी रुपये होते. अन्य उत्पन्न धरून एकूण उत्पन्न २६३६७ कोटी रुपये झाले. बॅंकेने अनार्जित कर्जासाठी १६२९.३७ कोटी रुपयांच्या तरतुदी केल्या व त्यानंतर ४६०१ कोटी रुपयांचा नफा दाखवला. बॅंकेचे भाग भांडवल ५२०.८३ कोटी रुपये आहे. या तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन १७.५० रुपये आहे. जून २०१७ साठी शेअरगणिक उपार्जन १५ रुपये होते. एच.डी.एफ.सी. बॅंक गुणवत्तेच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे.

समाधानकारक पावसाळा, केंद्रसरकारचे स्थैर्य या दोन गोष्टी जरी शेअरबाजाराच्या पथ्यावर पडल्या असल्या तरी ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात पाव टक्का वाढ होण्याच्या शक्‍यतेमुळे तेजी हळूहळूच वाढेल. 

गुंतवणुकीच्या दृष्टीने जे.के. टायर्स कंपनीचाही विचार करता येईल. हा शेअर सध्या १२१ रुपयाला उपलब्ध आहे. वर्षभरात तो १७० रुपयावर जाईल व सध्याच्या गुंतवणुकीवर ४० टक्के नफा दिसेल. त्यामुळे या शेअरचाही भागभांडारात जरुर समावेश हवा. म्हणजे ग्राफाईट इंडिया, हेग स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीज, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, जे.के. टायर्स असे थोडेच शेअर्स जास्त संख्येने घ्यावेत. त्यामुळे भागभांडारावर सतत नजर ठेवता येते. तसेच सतत तेजी अपेक्षिणे हेही बरोबर नाही. अधूनमधून खरेदीच्या संधीसाठी मंदीही आवश्‍यक असते. 

शेअरगणिक तेजीमंदी, राजकीय, सामाजिक व नैसर्गिक परिस्थितीनुसार येत असते. पण दीर्घ मुदतीसाठी नेहमी विचार केला तर नफाच पदरात पडेल.

संबंधित बातम्या