देशाचा विकासदर समाधानकारक

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ    
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अर्थनीती ः शेअर बाजार    

भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात सध्या सामाजिक उद्रेक फार वाढला आहे. त्याची परिणती जाळपोळ, हिंसाचार, प्रक्षोभक भाषणे यांत होत आहे. पण त्यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबेल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ‘‘विश्‍व झालिया वन्हि। संतमुखे व्हावी पाणी’’ असे म्हटले आहे. पण इथे कुणीच संत सध्या नसल्याने हे होत नाही. आणि ज्यांनी बोलायला हवे ते सोईस्कर मिठाची गुळणी घेऊन असले आहेत. नाणार प्रकल्प आला तर एकाने कोलदांडा घालायचा आणि इतर प्रश्‍न आले, की विरोधकांनी एकत्र येऊन विकासाच्या वृक्षावर कुऱ्हाड मारायची हा प्रकार केवळ खुर्चीसाठी चालला आहे. तरीही विकासासाठी झुंजणारे धीर सोडीत नाहीत हे सामान्य जनांचे भाग्य आहे. त्यामुळेच अजूनही बुलेट ट्रेनचे जाळे मुंबईपासून सुरू करण्याची तयारी चालू आहे असे गेल्या आठवड्यात लोकसभेत सांगण्यात आले आहे. केवळ मुंबई-अहमदाबाद-दिल्ली एवढ्यावरच बुलेट ट्रेन न थांबता, दिल्ली, चेन्नई, कोलकता अशी शहरे (सहा बुलेट ट्रेनद्वारा जोडली जातील. त्यातील महत्त्वाच्या स्थानकांचे महत्त्वही आपोआप वाढेल.) या बुलेट ट्रेन्सना ‘हीरक चतुष्कोन - Diamond Quadrangle असे नाव देण्यात आले आहे. दिल्ली-कोलकता बुलेट ट्रेन लखनऊमार्गे जाईल. दिल्ली-चेन्नई-नागपूरमार्गे असेल. मुंबई-कोलकताही नागपूरमार्गेच असणार आहे. चेन्नई-बंगळूर-म्हैसूर ही आणखी एक बुलेट ट्रेन असेल. यापूर्वीच जपानने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ८८ हजार कोटी रुपयांचे कर्ज फक्त एक टक्का नाममात्र व्याजाने मिळणार आहे. (जपानमधील उद्योग-व्यवसाय वाढावा यासाठी अन्य राष्ट्रे कशी प्रयत्नशील असतात, हे उद्योगांसाठी वा शेतीसाठीही संबंध नसणाऱ्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. पण इथे हरिभाऊ आपट्यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरी वाचनातच नेते कदाचित मग्न असावेत. देशातील सहा महानगरे एकत्र आल्याने, आता संतुलित विकास होईल. मुंबई-अहमदाबाद ट्रेन २०२२ या वर्षी धावू लागेल असा अंदाज आहे. बुलेट ट्रेनमुळे सात तासांचा प्रवास फक्त दोन तासांत होईल. विमानतळावरून जाण्या-येण्यासाठीचा वेळ लक्षात घेता, तेवढ्याच वेळामध्ये या बुलेट ट्रेनमुळे शहरांच्या थेट मध्यभागी जाता यावे अशी कल्पना आहे.

यावर्षी जुलैमध्ये प्रवासी वाहन (Passenger Car) विक्रीत, गेल्या जुलैपेक्षा २.७१ टक्के घसरण झाली आहे. २९९०६६ गाड्यांच्या विक्रीऐवजी या जुलैत २९०९६० वाहने विकली गेली. मात्र एकूण वाहन विक्री, स्कूटर्स धरून २२४४८७५ इतकी झाली. ही वाढ ७.९७ टक्के जास्त आहे.

अमेरिकेतील सधनता, स्वस्ताई व अन्य जीवनावश्‍यक सुखसोई यांमुळे अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी वाढत आहे. प्रवासी व्हिसा घेऊन जाणारे कित्येक जण व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तिथे बेकायदा रहात आहेत. गेल्या वर्षी विमानांनी किंवा अन्य मार्गाने, अमेरिकेत एकूण ७०१९०० लोक आले होते. गेल्या वर्षी ‘बी १’ व ‘बी २’ या व्हिसांच्या आधारे १०.७ लाख भारतीय अमेरिकेत गेले होते. याशिवाय, शिक्षणासाठी १२७४३५ भारतीय विद्यार्थी अमेरिकेत गेले आहेत. उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा भारतीयांचा कल आहे. कारण तिथे त्यांना चांगल्या पगारावर लगेच नोकऱ्या मिळतात व अनेक वर्षे राहता येते. नोकरी मिळाली नाही तरी तसेच राहण्याचे प्रमाण वाढत असून, सध्या व्हिसा संपल्यानंतरही २१ हजार भारतीय अमेरिकेत बेकायदा रहात आहेत. आसाममध्ये वा पश्‍चिम बंगालमध्ये बेकायदा राहणाऱ्या रोहिंग्यांगासारखाच हा प्रकार आहे. मात्र केवळ भारतीय व्यक्तीच अशा रहात नसून, अन्य दहा दिशांतून (विशेषतः मेक्‍सिकोमधून) असे नागरिक आले असल्याचे, अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने म्हटले आहे. अशा रीतीने ब्रिटन, युरोप वा ऑस्ट्रेलिया, कॅनडात राहता येत नाही. राहणारे हे सर्व लोक बुद्धिमान आहेत. त्यामुळे आपण आपल्या देशांतच या लोकांनी राहावे यासाठी उच्च प्रतीचे रोजगार निर्माण करायला हवेत. इतकेच नाही तर सर्व स्तरावर रोजगार वाढवून, बेरोजगारी कमी करण्यावर भर द्यायला हवा. नाणारसारखे प्रकल्प आले तर दहाबारा हजारांना सहज काम मिळते. त्यामुळेच आरक्षणाच्या सध्याच्या संदर्भात वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलेला ‘पण रोजगार कुठे आहेत?’ हा प्रश्‍न ज्वलंत ठरतो. 

भारत अजूनही कृषी प्रधान आहे. त्यामुळे ५२ टक्के लोक इथे सामावले गेले आहेत. अन्य देशांप्रमाणे कृषी क्षेत्रावरील लोक कमी झाले, तर भारतात अनवस्था प्रसंग ओढवेल. सुदैवाने सेवा क्षेत्र (पर्यटन, व्यापार, बॅंकिंग, विमा, संगणन, डिजिटल व्यवहार) वाढत असल्याने हे क्षेत्रही उद्योगांचाच भाग झाले आहे.

भविष्यकाळाचा विचार करून केंद्र सरकार एक नवीन औद्योगिक धोरण आखण्याचा विचार करीत आहे. पुढील पंधरवड्यात ते विचारार्थ कॅबिनेट पुढे ठेवले जाणार आहे. स्पर्धात्मकता समावेश व टिकून राहण्याची क्षमता यावर ती केंद्रित असेल. व्यवसाय करण्याची सुलभता (Ease of Doing Business) जास्त स्वस्त कशी करता येईल यावरही भर दिला जाईल. वस्तुसेवाकरासाठी एक परिषद नेमली गेली आहे. तशीच एक परिषद या आर्थिक धोरणाचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन केली जाईल. श्रमिक वर्ग व भूसंपादन यावर नव्या औद्योगिक धोरणात जास्त भर असेल. उद्योगक्षेत्राचा ऊर्जेवरील खर्च कसा कमी होईल व उत्पादकता वाढेल यावरही औद्योगिक धोरण विचार करेल. नव्या धोरणांत राज्यांनाही समाविष्ट करण्याचा केंद्राचा विचार आहे, त्यामुळेच ‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येय साध्य होईल. औद्योगिक धोरण आखताना, रोजगारावर विशेष कटाक्ष असेल. रोजगार वाढला तर अर्थव्यवस्थाही आपोआप वाढते. नुकतेच, भारताच्या विकासाच्या गतीबद्दल जागतिक नाणेनिधीने समाधान व्यक्त केले असले, तरी संकल्पित दहा टक्के वाढीपेक्षा तो अजून खूप कमी आहे. अजून आपण ८ टक्‍क्‍यांचाही पल्ला गाठलेला नाही. मात्र, चीनच्या तुलनेत आपली वाढ नक्कीच स्पृहणीय आहे. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, जपान या विकसित देशाची वाढ तर तीन टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे. २०२२ पर्यंत कृषिउत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट जर साकार झाले तर अर्थव्यवस्था नक्कीच दहा टक्‍क्‍याने वाढेल. मात्र त्यासाठी सुस्थिर एकहाती सरकार अजून पाच वर्ष हवे आहे. तसेच चांगला धडाडीचा सक्षम अर्थमंत्रीही हवा आहे. सध्या तात्पुरते नेमले गेलेले अर्थमंत्री पीयूष गोएल असे सक्षम अर्थमंत्री होऊ शकतील.

ग्रॅफाईट इंडियाचा शेअर चंद्रकलेप्रमाणे रोज वाढत आहे. १६ मे रोजी ७६८ रुपयाला तो मिळत होता. गेल्या शुक्रवारी तो ११२७ रुपयांपर्यंत चढला व ११०८ रुपयाला बंद झाला. ग्रॅफाईट इंडियाची जून २०१८ तिमाहीची विक्री १९३५ कोटी रुपयांची होती व नक्त नफा ९७७ कोटी रुपये होता. ढोबळ नफा १४३५ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन ४९ रुपये (वार्षिकीकृत १९६ रुपये) झाले. म्हणजे या शेअरचे किं/अु. गुणोत्तर ५.५ पट इतके कमी आहे. तिचे भागभांडवल ३९.१ कोटी रुपये आहे. मार्च २०१९ ची ग्रॅफाईट इंडियाची संभाव्य विक्री ७३५० कोटी रुपये व ७६२० कोटी रुपये व्हावी. करोत्तर नफाही अनुक्रमे २५९७ कोटी रुपये व २७०० कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक संभाव्य उपार्जन १३८ रुपये व्हावे. त्यामुळे १० पट किं/अु गुणोत्तर वाजवी धरले तर बारा महिन्यांत शेअरचा भाव १४०० रुपये व्हावा. वाचकांना शेअर्सच्या परामर्षाचा भरपूर फायदा होत असावा.

टाइम टेक्‍नोप्लास्टचा जून २०१८ चा नक्त नफा ४३.३० कोटी रुपये झाला. जून २०१७ तिमाहीला तो ३०.३१ कोटी रुपये होता. नफ्यातली ही वाढ १९.२५ टक्के आहे. कंपनीची या तिमाहीची विक्री ७८१.४७ कोटी रुपये होती. गेल्या जून तिमाहीची विक्री ६८०.५७ कोटी रुपये होती. शुक्रवारी १० ऑगस्टला या शेअरची किंमत १५०.९५ रुपये होती. गेल्या बारा महिन्यातील कमाल व किमान भाव अनुक्रमे २३३ रुपये व ११६ रुपये होते. सध्याच्या भावाला किं/अु गुणोत्तर १८.९२ पट दिसते. रोज सुमारे ४० हजार शेअर्सचा व्यवहार होतो. फॅस्टीक्‍स क्षेत्रातल्या या कंपनीची २०१९ व २०२० मार्च वर्षाची संभाव्य विक्री ३५९० कोटी रुपये व ४२१० कोटी रुपये व्हावी. संभाव्य करोत्तर नफा अनुक्रमे २३४ कोटी रुपये व ३०६ कोटी रुपये व्हावा. संभाव्य शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे १०.४ रुपये व १३.५ रुपये पडावे. हा शेअर सध्या १६० रुपयाला उपलब्ध आहे. वर्षभरात तो ५० टक्के वाढावा. म्हणून माफक प्रमाणात इथे गुंतवणूक करायला हरकत नाही. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे कर्जावरील व्याजाचे उत्पन्न ३९९१६.९० कोटी रुपये झाले आहे. गुंतवणुकीवरील उत्पन्न १९८९३.९७ कोटी रुपये झाले आहे. एकूण उत्पन्न ७४९९३.४१ कोटी रुपये झाले. अनार्जित कर्जासाठी तिने १९४९९.२१ कोटी रुपयांची प्रचंड तरतूद केली आहे. त्यामुळे तिला यावेळी ४२३०.४४ कोटी रुपयांचा तोटा दाखवावा लागला आहे. बॅंकेचे भागभांडवल ८९२.४६ कोटी रुपये आहे. शेअरचे दर्शनी मूल्य १ रुपये आहे. केंद्र सरकारकडे ५७.६६ टक्के भांडवल आहे. स्टेट बॅंकेची एकूण बुडीत कर्जे २,१२८४० कोटी रुपयांची आहेत. निव्वळ बुडीत कर्जे ९९,२३६ कोटी रुपयांची आहेत. बुडीत कर्जासाठी या तिमाहीत १९२२८ कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. स्टेट बॅंकेमध्ये १,५६,९६४ कर्मचारी आहेत.

राष्ट्रीयकृत युनियन बॅंक ऑफ इंडियाचे या तिमाहीसाठी कर्जावरील व्याजाचे उत्पन्न ६०११.५१ कोटी रुपये आहे. गुंतवणुकीवरील व्याजाचे उत्पन्न २३५२.१९ कोटी रुपये आहे. एकूण उत्पन्न ९९०८.७६ कोटी रुपये आहे. अनार्जित कर्जासाठी बॅंकेने २२२९ कोटी रुपयांची तरतूद करूनही १२९.५४ कोटी रुपये नफा दाखवला आहे. या तिमाहीत ती पहिल्यांदाच नफ्यात आली आहे. तिचे भागभांडवल ११६८.५७ कोटी रुपये आहे. केंद्र सरकारकडे तिचे ६७.४३ टक्के भांडवल आहे. बॅंकेला शेअरगणिक २९.५९ रुपयांचा तोटा झालेला आहे.

देना बॅंकेच्या तोट्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये (एप्रिल-जून) या सरकारी बॅंकेला ७२१.७१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये या बॅंकेला १३२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बुडीत कर्जाच्या तरतुदीत वाढ झाल्याचा फटका या बॅंकेला बसला आहे. या तिमाहीत बॅंकेच्या महसुलामध्ये आठ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये बॅंकेचे उत्पन्न २,६२० कोटी रुपये होते. देना बॅंकेच्या बुडीत कर्जाचे प्रमाण २२.६९ टक्के इतके धोकादायक पातळीवर गेले आहे. 

हिंदुस्थान पेट्रोलियमची या तिमाहीची विक्री ७२९२२.५९ कोटी रुपये होती. तिचे अन्य उत्पन्न ६३२.७९ कोटी रुपये होते. नक्त नफा १७०४.०८ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन ११.२८ रुपये पडते. कंपनीचे भागभांडवल १५२३.८२ कोटी रुपये आहे. हा शेअर सध्या २८३ रुपयाला उपलब्ध आहे. पण वर्षभरात तो ३९० ते ४२५ रुपयांपर्यंत जाईल. कंपनी लाभांशही भरपूर देते. ३१ ऑगस्टला भरणाऱ्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ती कदाचित अंतरिम लाभांशही जाहीर करील. सध्याच्या गुंतवणुकीवर ६ टक्के परतावा देणाऱ्या या शेअरमध्ये भरपूर गुंतवणूक हवी.

विंध्या टेलिलिंक्‍स या ऑप्टिकल फायबर केबल्सचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीची विक्री या तिमाहीत ४०४.६८ कोटी रुपये झाली आहे. जून २०१७ तिमाहीची विक्री ३०२.६० कोटी रुपये होती. जून २०१८ चा नक्त नफा ३३.२९ कोटी रुपये होता. ३० जून २०१७ साठी तो १८.६४ कोटी रुपये होता. कंपनीचे भागभांडवल ११.८४  कोटी रुपये आहे. गेले तीन महिने या कंपनीच्या शेअरचा भाव चांगल्या नफ्याच्या अपेक्षेने वाढत होता. गेल्या शुक्रवारी १० ऑगस्टला तो १३२७ रुपये होता. गेल्या बारा महिन्यातील कंपनीच्या शेअरचे कमाल व किमान भाव अनुक्रमे १५०९ रु. व ८९० रु. होते. याच क्षेत्रातील स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीजचा भाव ३६१ रु. आहे. हे दोन्ही शेअर्स गुंतवणुकीस चांगले आहेत. 

संबंधित बातम्या