केरळच्या बॅंकांना पुराची झळ

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ    
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

अर्थनीती : शेअर बाजार    
 

गेल्या काही दिवसात आर्थिक घडामोडी फारशा झाल्या नाहीत. पण केरळमध्ये गेल्या शंभर वर्षात झाली नसेल अशी अतिवृष्टी झाली आणि दोन अडीच लाख घरे पाण्याखाली गेली. केंद्र सरकारतर्फे पाचशे कोटी रुपयांची मदत जाहीर झाली. स्वतः नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी केली. आप सरकारपासून ते महाराष्ट्र सरकारपर्यंत राज्यसरकारांनी मदत पाठवली. देशात सुमारे शंभर कोटी मोबाईल फोनधारक आहेत. त्यांनी प्रत्येकांनी शंभर रुपये पाठवले तरी केरळला १० हजार कोटी रुपये मिळतील. रोटरी, लायन अशा संस्थांनी अशावेळी भरभरून मदत पाठवायला हवी. 

भारतात कधी केदारनाथ तर कधी अशा नैसर्गिक आपत्ती येत असतातच. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पात नैसर्गिक आपत्तीसाठी चांगली तरतूद करून खूप मोठा आपत्ती निवारणनिधी उभारला जायला हवा. अशा आपत्तींचा गिरनार पर्वत उचलण्यासाठी प्रत्येकाची एक काठी लागली पाहिजे. कॉर्पोरेट क्षेत्राला CSR साठी दोन टक्‍क्‍यांची रक्कम खर्च करण्याची अट आहे. ती त्याने लगेच वापरायला हवी. पद्मनाभ, तिरुपती, शिर्डी, शेगाव इथे जाणाऱ्या भाविकांसाठी ‘जे का रंजले गांजले। त्याची म्हणे जो आपुले। देव तेथेची जाणावा।।’ या उक्तीला भरभरून साद व दाद द्यायला हवी. आज केरळ जात्यात आहे, अन्य राज्येही सुपात असतील. त्यांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू करायला हवे. शेअरबाजारातल्या गुंतवणूकदारांनीही थोडा नफा अशा कार्य करणाऱ्या संस्थांना द्यायला हवा. हे सर्व या लोकांनी एव्हाना केलेली असेल. तरीही राहवले नाही म्हणून हा लेखनप्रपंच. 

केरळमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय असणाऱ्या फेडरल बॅंक, मुथूट फायनान्स, साउथ इंडियन बॅंक, मन्नापुरम फायनान्स, जे.के. टायर्स, अपोलो टायर्स या कंपन्यांचे २०१८-१९ वर्षाचे नफे कमी राहतील. इथली गुंतवणूक काढून ती अन्यत्र घालायला हवी. 

पुढील काही महिन्यात मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये विधानसभांच्या निवडणूक आहेत. पण त्यांची आत्तापासूनच हवा तापू लागली आहे. सत्तेवर आल्यास मध्यप्रदेशमध्ये कृषीकर्जे माफ केली जातील. ऑर्गेनिक शेतीला उत्तेजन दिले जाईल. कुटीरोद्यागांना भरघोस मदत दिली जाईल व गोबर गॅस प्लॅंट्‌स सर्वत्र उभारली जातील असे काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनतापक्षही वचने देत आहे. गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या रमणसिंग सरकारला ‘ॲण्टी इनकमबन्सी’ (Anti incumbancy)  घटकांचा मुकाबला करायचा आहे. त्यामुळे तिथे व झारखंडमध्येही त्या पक्षाने अनेक घोषणा केल्या आहेत. कृषिसाधन ट्रॅक्‍टर्स विकत घेण्यासाठी अनुदाने, मुलींना विश्‍वविद्यालयीन शिक्षण व आहार मोफत देणे, अशा कार्यक्रमाबरोबरच मनरेगा योजना मोठ्या प्रमाणात राबवणे वगैरे प्रयोगही होणार आहेत. आता फक्त निर्वाचन आयोगाने निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करायचे आहे. ते केल्यानंतर आचारसंहिता लागू होईल. त्यापूर्वीची या दोन्ही प्रमुख पक्षांची धडपड आहे. आता थोडं गुंतवणूकीबद्दल!

नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्यांतील महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल ही कंपनी गुंतवणुकीला चांगली आहे. सध्या हा शेअर ४८० रुपयाला मिळत आहे. पावसाळा उत्तम झाल्यामुळे महिंद्र अँड महिंद्राच्या ट्रॅक्‍टर्सची विक्री जोरात वाढेल. ते खरेदी करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल ही कंपनी कर्ज देते. बजाज फायनान्ससारखीच ही महिंद्रा समूहाची कंपनी आहे. 

टाइड वॉटरची या तिमाहीची विक्री २८९.८२ कोटी रुपये झाली. नक्त नफा २३-४२ कोटी रुपये होता. कंपनीचे भाग भांडवल फक्त १.७ कोटी रुपये आहे. तिची जून २०१७ तिमाहीची विक्री २५५.६९ कोटी रुपये होती व नक्त नफा १६.२९ कोटी रुपये होता. तिचा गेल्या शुक्रवारी भाव ५७७१ रुपये इतका वर होता. या भावाला किं/अु गुणोत्तर १८.३८ पट दिसते. वर्षभरातील किमान व कमाल भाव अनुक्रमे ५४९६ रुपये व ७९५० रुपये होते.

हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल्स या कोलटारचे (डांबरी रस्त्यांना लागणारे) उत्पादन करणाऱ्या कोलकत्याच्या कंपनीची या तिमाहीची विक्री ६०४.७३ कोटी रुपये झाली व करोत्तर नफा ७६.६६ कोटी रुपये झाला. जून २०१७ तिमाहीची विक्री ५०२.६७ कोटी रुपये व नक्त नफा ५०.०३ कोटी रुपये झाला. म्हणजे Y-O-Y  ५२ टक्के नफ्यात वाढ आहे. सध्या कंपनीच्या शेअरचा भाव १३४ रुपये आहे. रोज सुमारे ४ लाख शेअर्सचा व्यवहार होतो. या भावाला किं/अु. गुणोत्तर २२.६ पट दिसते. या किमतीला शेअर घेण्यासारखा नाही. गेल्या बारा महिन्यातील कमाल व किमान भाव अनुक्रमे १९६ रुपये व ८१ रुपये होता.

जून २०१८ तिमाहीसाठी अनेक कंपन्यांनी चांगले आकडे दाखवले. हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल्स, टाइड वॉटर, जिंदाल वर्ल्डवाईड, एशियन ग्रॅनिटो, दिवाण हाउसिंग फायनान्स, रेन इंडस्ट्रीज यांचे आकडे समाधानकारक होते. 

सध्या जरी भाव वाढले असले तरी दिवाण हाउसिंग फायनान्स व रेन इंडिया गुंतवणुकीसाठी चांगले आहेत. गृहवित्त कंपन्यांमध्ये दिवाण हाउसिंग उत्तम आहे. या तिमाहीची तिची विक्री ३१४९.६७ कोटी रुपये होती व करोत्तर नफा ४३५ कोटी रुपये होता; व शेअरगणिक उपार्जन १३.८७ रुपये पडले. जून २०१७ तिमाहीची विक्री व नक्त नफा अनुक्रमे २४.९५.६४ कोटी रुपये व ३२२.४२ कोटी रुपये होता. जून २०१७ तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन १०.२९ रुपये होते. हा शेअर ६१० रुपयाच्या आसपास आला तर जरूर घ्यावा. वर्षभरात तो ३५ टक्के नफा देऊन जाईल. गेल्या बारा महिन्यातील किमान भाव ४३८ रुपये होता. आतापर्यंत त्यात ५५ टक्के वाढ झाली आहे. दिवाण हाऊसिंगप्रमाणे इंडिया बुल्स हाउसिंगही वर्षात २० टक्के वाढ देईल. रेन इंडियाची जून २०१८ तिमाहीची विक्री ३८०३ कोटी रुपये होती. नक्त नफा ४५८.३ कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन १३.६ रुपये आहे. गेल्या आठवड्यात या शेअरला २३० रुपयाला वरचे सर्किट लागले होते. पण दोन महिन्यापूर्वी तो १८० रुपयांपर्यंत खाली आला होता. २२० रुपयाला हा शेअर पुन्हा मिळाला तर जरूर घ्यावा. पुढील बारा महिन्यात तो ३०० रुपयांपेक्षा जास्त वाढेल. ३६० रुपयाचा कमाल भाव दाखवण्याची त्याची शक्‍यता आहे. मात्र नुकतीच त्याच्या काही उत्पादनावर बंधने आणली गेल्याची वार्ता आहे. 

पी.एन.जी. इन्फ्रा ही गुंतवणूक करण्यासारखी एक चांगली कंपनी आहे. सध्या १६८ रुपयापर्यंत मिळणारा हा शेअर वर्षभरात २६८ रुपयांची सीमा ओलांडून २९० रुपयांपर्यंतही जाऊ शकेल. इंद्रप्रस्थ गॅस या दिल्लीच्या बसेसना व घरांना नैसर्गिक वायू पुरवणाऱ्या कंपनीमध्येही गुंतवणूक जरूर हवी. सध्या तो २८२ रुपयाच्या आसपास मिळत आहे. वर्षभरात तो ४८२ रुपयापर्यंत जाईल. 

जिंदाल वर्ल्ड वाईड या वस्त्रोद्योग कंपनीची या तिमाहीची विक्री ५३६.९० कोटी रुपये होती व नक्त नफा १५.९६ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन ३.९८ रुपये आहे. एशियन ग्रॅनेडाची तिमाही विक्री २३८.७१ कोटी रुपये झाली व नक्त नफा ६.३५ कोटी रुपये व शेअरगणिक उपार्जन १.९५ रुपये पडले. निवासिकांची गरज वाढत जाईल तेव्हाच या कंपनीला उठाव येईल.

केवळ माहितीसाठी हे शेअर्स दिले आहेत. त्यात गुंतवणूक करण्यासारखे काही नाही. पण कुणाला भागभांडवलात वैविध्य असेल तर त्यांनाच विचार करावा. कोल इंडियाने या तिमाहीत १५.४ कोटी टन, खाणीतून कोळसा काढला. मार्च २०१९ पर्यंतच्या आर्थिक वर्षात ६५.२ कोटी टन काढण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. या तिमाहीत ८८४ कोटी रुपयांची माल हलविण्यासाठी तरतूद करूनही, तिमाही नफा ३७८६ कोटी रुपये झाला आहे. एकूण उत्पन्न जून २०१७ तिमाहीपेक्षा ७९ टक्‍क्‍याने वाढून हा नफा मिळवला गेला. रुपयाचा विदेशी चलनाबरोबरचा विनिमय दर घसरत असला व आयात केलेला कोळसा महाग होत असला तरी ती बाब कोल इंडियाला पथ्यावर आहे. त्यामुळे ती इथे उत्पादन वाढवायचा प्रयत्न करील. बॅंक ऑफ इंडियाने ५५५७ कोटी रुपयांची पन्नास खात्यातील अनार्जित कर्जे विक्रीला ठेवली आहेत. ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या, चांगला तगादा लावून अशी कर्जे वसूल करू शकतील. त्यांना ही खरेदी परवडेल. अशोक लेलॅंडला बांगलादेशाच्या रोड ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशनकडून ३०० बसेसची ऑर्डर मिळाली आहे. हा शेअर वर्षभरात २० टक्के वाढू शकेल. 

केरळमध्ये पावसाने धुमाकूळ घातल्याने तिथे कार्यरत असलेल्या फेडरल बॅंक, मुथूट फायनान्स, मन्नापूरम फायनान्स व साउथ इंडियन बॅंकांना त्याची झळ लागू शकेल. केरळमधून रबर घेणाऱ्या टायर कंपन्यांवरही त्याचा परिणाम होईल. त्याच्या नफ्यात घसरणाऱ्या रुपयामुळेही परिणामी घट दिसेल. या कंपन्यांपासून सध्या तरी गुंतवणुकीपासून दूर रहायला हवे. त्यातल्या त्यात सीएट इंडियाला पसंती द्यावी.  

संबंधित बातम्या