पोस्ट पेमेंट बॅंकेचा शुभारंभ

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

अर्थनीती : शेअर बाजार
 

आर्थिक सुधारणेमुळे आणखी एक पाऊल म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक १ सप्टेंबरला सुरू करण्यात आली. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले खाते उघडून तिची सुरुवात केली. पुण्यात ही सेवा लक्ष्मी रस्त्यावरील सिटी पोस्टमध्ये केंद्रातील मनुष्य विकासबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुरू केली. पोस्टाची एक लाख पंचावन्न हजार कार्यालये देशभरात आहेत. तसे पाहिले तर या आधीही पोस्टात बचत खाती, आवर्तन खाती उघडण्यात येत होती व जास्त शिल्लक असलेल्या खातेदारांना चेकबुकही दिली जात होती. या बॅंकेमुळे डिजिटल क्रांती होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या बॅंकेसाठी रिझर्व्ह बॅंकेने दोन वर्षापूर्वीच परवानगी दिली होती. आता पोस्टातून कदाचित एटीएम यंत्रेही बसवली जातील. बॅंकेत फक्त ठेवी स्वीकारल्या जातील. कर्जे वा क्रेडिट कार्डे दिली जाणार नाहीत. खाते उघडण्यासाठी आधारकार्डाचा आधार पुरेसा ठरेल. खात्यात एक लाख रुपयापर्यंतच ठेव स्वीकारली जाईल. मोबाईल पेमेंट, नेट बॅंकिंग, थर्ड पार्टी ट्रान्सफर सेवाही खातेदारांना मिळतील. सध्या व्यापारी व सहकारी बॅंकांच्या मिळून जेवढ्या शाखा आहेत तितक्‍या पोस्ट खात्याच्या कचेऱ्या आहेत. पोस्टमन हा अत्यंत विश्‍वासू समजला जातो. आणि आता पोस्टवुमेन म्हणून महिलांची त्यांना जोड आहे.

बॅंकिंग क्षेत्रातील या बॅंकेत तीन लाख कर्मचारी आहेत. तिचे भांडवल १४३५ कोटी रुपये असेल. नोटाबंदीला आता २१ महिने झाले आहेत. या सुधारणेनंतर प्राप्तिकर विवरणपत्रे सादर करावयाच्या संख्येत भरघोस वाढ होऊन तो आकडा ६.८६ कोटीवर गेला आहे. नोटाबंदीच्या आधीच्या दोन वर्षात वाढ ६.६ टक्के व ९.० टक्के अनुक्रमे होती. पण त्यानंतरच्या दोन वर्षातील वाढ १५ व १८ टक्के आहे. दोन वर्षापूर्वी ३.१ कोटींचा आकडा होता. 

केंद्र सरकारला सुखावेल अशी आणखी एक बातमी म्हणजे जून २०१८ च्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढीचा दर आता ८.२ टक्के झाला आहे. बॅंकिंग क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रातील टक्केवारी वाढली आहे. गेल्या दोन वर्षातील हा उच्चांकी दर आहे. वर्षभरापूर्वी औद्योगीक उत्पादनात १.८ टक्‍क्‍यांनी घट होती. गेल्या वर्षभरातील सेवा क्षेत्रातील वाढ मात्र जास्त होती. बांधकाम क्षेत्रात या तिमाहीत ८.७ टक्के वाढ आहे. ऊर्जा, वायू या क्षेत्रात तसेच संरक्षण क्षेत्रातही जून २०१८ तिमाहीत वाढ आहे. ती ७ टक्‍क्‍यापेक्षा (३३.७४) जास्त आहे. २०११-१२ च्या पायाभूत किमतीच्या आधारावर २०१८-१९ च्या या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन (Gross Domestic Production) ३१.७४ लाख कोटी रुपये झाले. गतवर्षी या काळात ते ३१.१८ लाख कोटी रुपये होते. मागील तीन वर्षापूर्वी म्हणजे २०१५ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाचे आधारभूत वर्ष २००४-०५ ऐवजी २०११-१२ करण्यात आले होते. चीनमध्ये याच काळात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर भारतापेक्षा कमी ६.७ टक्‍क्‍यावर होता. रिझर्व्ह बॅंकेच्या अपेक्षेप्रमाणे २०१८-१९ मध्ये अर्थव्यवस्था ७.४ टक्‍क्‍याने विकसित होईल.

भारताची विमानसेवा युरोप-अमेरिकेसाठी जास्त आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या एका शिष्टमंडळाने ब्रिस्बेन-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियातील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रातील जलसंधारण विभागात गुंतवणूक करावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले आहे. सध्या गोदावरी खोऱ्याचे काम त्या देशाबरोबर झालेल्या सामंजस्य करारानुसार होत आहे. मराठवाड्यात वॉटरग्रीडच्या माध्यमातून दुष्काळ निवारणाचे कार्य चालू आहे. त्यात ऑस्ट्रेलियाची मदत अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील धरण प्रकल्पात ऑस्ट्रेलियाने यावे असे प्रयत्न चालू आहेत. 

महाराष्ट्रात मेट्रो ट्रान्स हार्बर लिंक व नवी मुंबई विमान तळाची कामेही जोरात सुरू आहेत. देशात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीपैकी ५० टक्के रक्कम महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्रातील जास्त जमीन बागायतीखाली यावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्राने एकूण ५०० मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील २०० मेगावॉट व दुसऱ्या टप्प्यातील ३०० मेगावॉटचे हे प्रकल्प विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र इथे उभारण्यात येत आहेत.

पहिल्या टप्प्यात २० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प गव्हाणकुंड येथे होत आहे. प्रत्येकी २ ते ७ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प कुही, भेरड, अंजनगाव-बारी, यवती या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्‍चरचे काम सुरू आहे. हे काम या वर्षातील डिसेंबर अखेरपर्यंत पुरे होईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प फेब्रुवारी २०१९ पर्यंत पुरे होतील. नुकतीच अहमदनगरमधील राळेगण सिद्धी व यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबे येथे या प्रकल्पाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 

आपल्याकडे कागदोपत्री काही सामाजिक व शैक्षणिक संस्था उभारल्या जातात आणि कुठलेही काम वर्षानुवर्षे सुरू होत नाही. या संस्था बंद करण्याची कारवाई महाराष्ट्रात सुरू झाली असून १ लाक २९ हजार ६५२ संस्थांना निष्क्रिय ठरवून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. नागपूर विभागातील १७८२७ संस्था निष्क्रिय आहेत. मुंबईत अशा १८४५७ संस्था आहेत. पुणे विभागातील निष्क्रिय संस्थांची संख्या १३८३० आहे. या संस्थांना आपले म्हणणे मांडण्यासाठी १ महिन्याची मुदत देण्यात आली होती ती आता संपली आहे. राज्यात सध्या ७ ते ८ लाख अशा संस्था नोंदल्या गेल्या आहेत. त्यापैकी सुमारे ३ लाख संस्था निष्क्रिय आहेत. त्यातील सव्वा लाख संस्थांना नोटिसा देऊनही त्यांनी काही कारवाई केली नाही. या संस्थांपैकी आता १ लाख २९ हजार ६५२ संस्थांची नोंदणी रद्द होण्याच्या मार्गावर आहे. यानंतरही आणखी दीड लाख संस्था निष्क्रिय होण्याची शक्‍यता राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी व्यक्त केली आहे. 

आता लोकसभेच्या निवडणुकांचे वेध सुरू होतील. त्या थोड्या आधी घ्याव्यात व काही राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका त्याबरोबर एकत्रित घेऊन खर्च वाचवावा असे विधी आयोगाचे मत आहे. निर्वाचन आयोगाने त्याला दुजोरा दिला तर काही राज्यांच्या निवडणुका चार पाच महिने पुढे ढकलल्या जातील तर काही आधी ओढल्या जातील. राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड ही राज्ये त्याच्याशी संबंधित असतील. 

देशातील २८ विमानतळामध्ये सर्वाधिक उत्पन्नाच्या गटात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्या पाठोपाठ अहमदाबाद आणि गोव्याचा समावेश आहे. पुणे विमानतळाचे उत्पन्न आर्थिक वर्षात १६० टक्के वाढले. पुणे विमानतळाचे उत्पन्न आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ५६ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ते १४६ कोटी रुपयांवर गेले. हे उत्पन्न २०१५-१६ मध्ये ३० कोटी तर २०१४-१५ मध्ये २८ कोटी रुपये होते.

देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत पुणे विमानतळाने सहाव्या स्थानी मजल मारली आहे. पुणे विमानतळावरून चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत तब्बल ७२ टक्‍क्‍यांनी माल वाहतूक वाढली आहे. अशी माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली आहे.

देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई आणि बंगळूर पाठोपाठ पुण्याने स्थान मिळवले आहे. मालवाहतुकीसाठी मोठी विमाने उपलब्ध व्हावीत, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. ही विमाने आणि त्यासाठीची जागा २८ ऑक्‍टोबरच्या सुमारास उपलब्ध होईल. त्यानंतर मालवाहतुकीत आणखी ५० टक्‍क्‍यांनी वाढ होईल. पुणे विमानतळावरून एअर इंडियाने नुकतीच मालवाहतूक सुरू केली. पहिल्या फेरीत त्यातून ५५० किलो मक्‍याचे दाणे (बेबी कॉर्न) दुबईला पाठविण्यात आले. अमेरिका, इंग्लंड किंवा युरोपीय देशांत माल पाठविण्यासाठी विशेष विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन एअर इंडिया करीत आहे. 

गुंतवणुकीसाठी सुंदरम फायनान्सचीही आपण निवड करू शकतो. सुंदरम समूहातील ही नॉन-बॅंकिंग फायनान्स कंपनी १९५४ साली स्थापन झाली. जून २०१८ च्या (२०१८-१९) पहिल्या तिमाहीत तिची विक्री २२ टक्‍क्‍याने वाढून ७३३.१८ कोटी रुपये झाली. जून २०१७ तिमाहीची विक्री ६१४.७४ कोटी रुपये होती. ढोबळ उत्पन्न जून २०१७ व २०१८ तिमाहीसाठी अनुक्रमे ४७५.७९ कोटी रुपये व ६१९.३४ कोटी रुपये होते.नक्त नफा अनुक्रमे १११.७५ कोटी रुपये व १४०.७२ कोटी रुपये होता. या दोन तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे १०.९६ रुपये व १२.६७ रुपये होते. कंपनीकडे २५०० कोटी रुपयांच्या ठेवी असून, ठेवीदारांना आकृष्ट करण्यासाठी तिने नुकतीच व्याजाचे दर वाढवले आहेत. या तिमाहीत सुंदरम फायनान्सचे ४०६२ कोटी रुपयांची कर्जे दिली. गतसाली जून तिमाहीत ३४२० कोटी रुपयाची कर्जे दिली होती. कंपनीची एकूण कर्जे (तिने घेतलेली) २४४९ कोटी रुपयांची आहेत. तिच्या व्यवस्थानाखालील जिंदगीची रक्कम २५७४१ कोटी रुपयांची आहेत. गेल्या जून अखेर हा आकडा २१३६४ कोटी रुपये होता. 

चिकित्सक गुंतवणूकदारांसाठी पिरामल एन्टरप्रायझेस हा शेअर सुचविता येईल. सध्या हा शेअर ३१०० रुपयाच्या आसपास उपलब्ध आहे. वर्षभरातील त्याचा किमान व कमाल भाव अनुक्रमे २२७५ व ३३०७ रुपये होता. सध्याच्या शेअरच्या किमतीवर किं/अु गुणोत्तर १२.३६ पट दिसते. रोज सुमारे सव्वातीन लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सहा महिन्यात या शेअरची किंमत ४००० रुपये व्हावी.

लार्सन अँड टुब्रोने आपल्या एल अँड टी इन्फोटेकमधील ३.४१ टक्के असलेले शेअर्स (५९ लाख शेअर्स) १७०० रुपये भावाने विकायचे ठरवले आहे. जर जास्त देकार आला तर ती आणखी ४६.३ लाख शेअर्स विकेल. सध्याच्या १७९५ रुपये भावापेक्षा ती ९५ रुपये कमी घेऊन हे शेअर्स विकणार आहे. आयडिया सेल्युलरने आपले नाव आता व्होडाफोन आयडिया असे दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर केले आहे. 

येत्या सहा महिन्यात पेट्रोलच्या एका बॅरलला १०० डॉलर्सपर्यंत किंमत वाढेल; असा अंदाज आहे. पण वैयक्तिक ग्राहकांना जरी त्याची झळ बसली तरी पेट्रोलचे उत्पादन करणाऱ्या ओ.एन.जी.सी., ऑइल इंडिया व चेन्नई पेट्रोलियमला त्याचा फायदा होईल. ओएनजीसीने नुकतीच हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी सरकारकडून विकत घेतली आहे. त्यामुळे उत्पादनाबरोबर ती तेलशुद्धीकरणातही आहे. म्हणून या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स घेणे उत्तम ठरेल. 

ओएनजीसी सध्या १८० रुपयाला मिळत आहे. गेल्या बारा महिन्यातील त्याचा कमाल भाव २१३ रुपये होता. तो पुन्हा सहा आठ महिन्यात दृष्टिक्षेपात येईल. सध्याच्या भावाला किं/अु गुणोत्तर १०.५ पट आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम सध्या अकारण घसरून २५४ रुपयावर आला आहे. या भावाला किं/अु गुणोत्तर ५.३६ पट आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन १५६ रुपयाला मिळत आहे. त्याचा गेल्या बारा महिन्यातील उच्चांकी भाव २२२ रुपये होता. वर्षभरात भाव पुन्हा त्याच्या आसपास जाईल. सध्याच्या गुंतवणुकीवर ४५ टक्के नफा मिळावा.  

संबंधित बातम्या