गुंतवणुकीस अनुकूल काळ

डॉ. वसंत पटवर्धन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

गेल्या आठवड्यात बऱ्याच घडामोडी राजकीय, आंतरराष्ट्रीय व आर्थिक आघाडीवर घडल्या. निर्वाचन आयोगाने राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, तेलंगणा व झारखंडच्या विधानसभांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आतापासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होतील व सर्वांचे निकाल डिसेंबर ११ ला जाहीर होतील. त्यामुळे आता आर्थिक सुधारणांना विराम मिळेल. या निवडणुकांनंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चांगले यश मिळाले तर पंतप्रधान लोकसभेच्या एप्रिल २०१९ मधल्या निवडणुका आधीही ओढू शकतील.

गेल्या आठवड्यात बऱ्याच घडामोडी राजकीय, आंतरराष्ट्रीय व आर्थिक आघाडीवर घडल्या. निर्वाचन आयोगाने राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, तेलंगणा व झारखंडच्या विधानसभांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आतापासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होतील व सर्वांचे निकाल डिसेंबर ११ ला जाहीर होतील. त्यामुळे आता आर्थिक सुधारणांना विराम मिळेल. या निवडणुकांनंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चांगले यश मिळाले तर पंतप्रधान लोकसभेच्या एप्रिल २०१९ मधल्या निवडणुका आधीही ओढू शकतील.

विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत. राजस्थान व तेलंगणा डिसेंबर ७, मध्यप्रदेश २८ नोव्हेंबर, छत्तीसगड नोव्हेंबर १२ व २०, आणि मिझोराम नोव्हेंबर २८ अशा आहेत.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारताच्या दौऱ्यावर गेल्या आठवड्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्याबरोबर भारताने शुक्रवारी ५ ऑक्‍टोबरला, ८ महत्त्वाच्या करारांवर सह्या केल्या. संरक्षण, अंतराळ, आर्थिक  सहकार्य आणि अणुसहकार्य या क्षेत्रात हे आठ करार झाले आहेत. भारताच्या ‘गगनयान’ या मानवी अंतराळ मोहिमेला रशियाची मदत लाभणार आहे. रशियाशी असलेल्या संबंधांना भारताकडून सर्वोच्च प्राधान्याची ग्वाही देताना पंतप्रधान मोदी यांनी झपाट्याने बदलणाऱ्या जगात भारत आणि रशियाचे सत्तर वर्षांचे संबंध अधिक दृढ झाले असल्याचे मत व्यक्त केले. मनुष्यबळापासून नैसर्गिक स्रोतांपर्यंत, व्यापारापासून गुंतवणुकीपर्यंत, अणुऊर्जेपासून सौर ऊर्जेपर्यंत, समुद्रापासून अंतराळापर्यंत भारत आणि रशियाच्या संबंधांच्या कक्षा आणखी रुंदावतील, असेही पंतप्रधान म्हणाले. रशियासोबत आमचे संबंध अद्वितीय असून, त्यात अध्यक्ष पुतीन यांचे अतुलनीय योगदान असल्याचे मोदी म्हणाले. आगामी ब्लादिवोस्तोक व्यासपीठाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले. भारतात येणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून, ही भेट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरल्याचे नमूद करताना भारताबरोबर सहकार्यासाठी सदैव तत्पर राहण्याची प्रतिबद्धता अध्यक्ष पुतीन यांनी व्यक्त केली.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडक निर्बंधांच्या इशाऱ्याला न जुमानता शुक्रवारी भारताबरोबर ५.४३ अब्ज डॉलर किंवा सुमारे ४० हजार कोटींच्या ‘एस-४०० ट्रायम्फ’ या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा करार केला. जगातील सर्वांत भेदक व अत्याधुनिक असलेल्या या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे भारताला प्रत्यक्ष युद्धादरम्यान महत्त्वाची शहरे, तसेच अणुऊर्जा संयंत्रांचे रक्षण करणे शक्‍य होणार आहे. ३८० किमी अंतरापर्यंतच्या टप्प्यात येणारी शत्रूची लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रे ‘एस-४००’ नष्ट करू शकते. एकाचवेळी ७२ क्षेपणास्त्रे डागण्याची आणि ३६ लक्ष्यांना भेदण्याची ‘एस-४००’ची क्षमता आहे. रडारवर न दिसणारी स्टेल्थ प्रकारची विमानेही ही क्षेपणास्त्र यंत्रणा टिपू शकते. करारानंतरच्या २४ व्या महिन्यापासून रशियाकडून ही क्षेपणास्त्रे मिळणे सुरू होईल.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मंजुरी दिलेल्या ‘कॅटसा’ कायद्यानुसार रशियाकडून शस्त्रखरेदी करणाऱ्या देशांवर कडक निर्बंध लादले जाणार आहेत. भारत-रशियातील क्षेपणास्त्र करारानंतर अमेरिकन दूतावासातील प्रवक्‍त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, ‘निर्बंध लादण्याच्या हेतुमागे अमेरिकेचे मित्र असलेल्या देशांची लष्करी क्षमता दुबळी करण्याचा हेतू नसून, रशियाला धडा शिकवणे हा आहे,’ अशी सावध भूमिका त्याने व्यक्त केली. अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भारतासारख्या काही देशांसाठी निर्बंध शिथिल करण्याचे संकेतही त्याने दिले.

शुक्रवारी ५ ऑक्‍टोबरला रिझर्व्ह बॅंकेने आपले ऑक्‍टोबर-नोव्हेंबरचे द्वैमासिक धोरण जाहीर केले. यावेळी अपेक्षा रेपोदरात पावटक्का वाढ होईल अशी होती, पण डिझेल-पेट्रोलमधील वाढत्या भावामुळे महागाई वाढत असता, अर्थव्यवस्थेला आणखी धक्का नको. म्हणून तिने रेपो व रिव्हर्स रेपो दरांत काही बदल केला नाही. रेपोदर ६.५० टक्के व रिव्हर्स रेपो ६.२५ टक्के कायम राहिला आहे. सप्टेंबर तिमाहीसाठी महागाई दरांत ३.७ टक्‍क्‍यांपर्यंतच वाढेल असे तिला वाटते. ही महागाई वाढ खरी किरकोळ आहे व रेपो दर वाढविण्याऐवजी जी कमी करण्याची गरज आहे. विशेषतः रुपयाचा डॉलरसाठी विनिमय दर आता ७४ रुपयांवर गेला आहे. आयएल अँड एफएसचे अरिष्ट आणि शेअरबाजारातील घसरण कदाचित रिझर्व्ह बॅंकेने लक्षात घेतली असावी.

अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले आहेत, तरीही भारताने इराणकडून तेल घ्यायचे थांबविलेले नाही. कारण इराण, रुपयांत म्हणजे अप्रत्यक्षपणे वस्तुरूपानेच तेलाची किंमत स्वीकारतो. पुढच्याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व मंगलोर रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स अनुक्रमे ६० लाख व ३० लाख; एकूण ९० लाख - बॅरल्सची आयात करणार आहेत.

मात्र पेट्रोल व डिझेलचे भाव सरकारने वाढवताना, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व भारत पेट्रोलियम कंपन्यांची अनुदाने कमी केली व या कंपन्यांनाच भाव लिटरमागे एक रुपयाने कमी करायला सांगितले. परिणामी या कंपन्यांचा नफा घसरणार आहे, त्यामुळे हे शेअर्स अनुक्रमे १७१ रुपये, १२४ रुपये व २६५ रुपयांपर्यंत घसरले आहेत. (निर्देशांक शुक्रवारी ८ ऑक्‍टोबरला ३४४७४ व निफ्टी १०३४८ वर होता.) हे शेअर्स भविष्यकाळात नक्की वाढणार आहेत, त्यामुळे धाडसी निवेशकांनी जोखीम घेऊन ते  जरूर खरेदी करावेत. वर्षभरात त्यांत ३५ टक्के नफा सहज मिळेल.

तसेच स्टरलाइट टेक्‍नॉलॉजी, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स हे शेअर्सही खूप घसरल्याने खरेदीसाठी आकर्षक झाले आहेत. गृहवित्त कंपन्यांचे शेअर्सही निष्कारण खाली आले आहेत. दिवाण हाउसिंग फायनान्स २२३ रुपयांवर आला आहे. इंडिया बुल्स हाउसिंग ९४० रुपयांपर्यंत आला आहे. आता रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर वाढवला नसल्याने या कंपन्यांचे व्याजदरही स्थिर राहतील. या दोन्ही कंपन्यांत जरूर गुंतवणूक हवी.

येस बॅंकेचे अध्वर्यू व प्रमुख राणा कपूर यांना रिझर्व्ह बॅंकेने फक्त ४ महिन्यांची म्हणजे जानेवारी २०१९ अखेर मुदतवाढ दिल्याने त्या बॅंकेचा शेअर घसरून एकवेळ १६५ रुपयांपर्यंत गडगडला होता. चतुर गुंतवणूकदारांनी या घसरणीचा फायदा गुंतवणूक करायला सुरुवात केल्याने तो २१८ रुपयांपर्यंत चढला व २०७ रुपयाला बंद झाला. या भावाला किं/अु. गुणोत्तर फक्त ११.४ पट इतके आकर्षक आहे. सर्वसाधारणपणे या बॅंकेसाठी १८ ते २० पट गुणोत्तर वाजवी समजले जाते, त्यामुळे हा 

शेअर सात-आठ महिन्यांत पुन्हा ३०० रुपयांची पातळी ओलांडेल. गेल्या बारा महिन्यातील येस बॅंकेचा कमाल भाव ४०४ रुपये होता. चाणाक्ष गुंतवणूकदारांनी इथे जरूर जोखीम घ्यावी.

येस बॅंकेचे २०१८ मार्च वर्षाचे प्रत्यक्ष व २०१९ व २०२० चे संभाव्य आकडे पुढे गुंतवणूकदारांना निर्णय घेण्यास सोपे जावे म्हणून दिले आहेत. सर्व आकडे कोटी रुपयांत आहेत. शेअरगणिक उपार्जन रुपयांत व किं/ अु गुणोत्तर पटीत आहे. (चौकट वरीलप्रमाणे)

खासगी कंपन्यांत एचडीएफसी बॅंकेनंतर येस बॅंक गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांचे सप्टेंबर २०१८ तिमाहीचे आकडे बघितल्यावर त्यांचा विचार करता येईल. वेदांत, नॅशनल ॲल्युमिनियम, हिंडाल्को हेही वाढू शकतील. ग्राफाईट इंडिया व हेगचे तेजोवलय ओसरणार आहे, कारण पर्यावरण विभागाची या कंपन्यांवर नजर पडली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारानी पूर्वी अंदाज केलेले अंदाज विसरून, विक्री करून बाहेर पडावे व येस बॅंक, दिवाळ हाउसिंग, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, क्षेत्रातील बाळकृष्ण इंडस्ट्रीज व सिएट, नुकताच बक्षीस भाग दिलेली मदर्सन , MCIL, नाल्को, हिंडाल्को इकडे आपली नजर वळवावी. मात्र आता चार-सहा महिन्यांत मोठा नफा मिळवण्याचे ‘अच्छे दिन’ संपले आहेत. सप्टेंबर व डिसेंबर तिमाहीचे आकडे व ११ डिसेंबरला पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल यावर शेअरबाजारातील तेजी वा मंदी अवलंबून राहील.  

संबंधित बातम्या