देशातील तेल उत्पादन घटले

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

अर्थनीती ः शेअर बाजार

सध्या जागतिक अर्थस्थिती पूर्णपणे ढवळून निघत आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला अमेरिका यांच्या हातात दोर आहे व अमृत निघावे म्हणून हे मंथन चालू नसून, दुसऱ्या बाजूला संपवण्यासाठी हलाहल निघावे यासाठी हा खटाटोप चालू आहे. चीन व अमेरिकेचे व्यापारयुद्ध आता खूप पेटले आहे; पण त्याच्या झळा युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आशिया, भारत या सगळ्यांना लागत आहेत. 

गेल्या अनेक दशकात चीनने अमेरिकन सरकारचे काही महाअब्ज (Trillion) रकमेचे कर्जरोखे घेतले होते. आपली तरलता वाढवण्यासाठी व अमेरिकन रोखे व शेअरबाजार कोसळावा या उद्देशाने चीन मुद्दलात खोट घेऊन कमी किंमतीला ते विकत आहे. परिणामी कर्जरोख्यांचा परतावा वाढत आहे. तो वाढत असल्याने तिथे गुंतवणुकीसाठी शेअरबाजारात विक्री चालू आहे. त्यामुळे डाऊ जोन्स व एस ॲड पी घसरत आहे. आणि त्याचा परिणाम भारतीय शेअरबाजारावरही होत आहे. बुधवार, गुरुवारी १० व ११ ऑक्‍टोबरला निर्देशांक हजार हजार अंकांनी घसरत होता व नंतर पाचसहाशे अंकांनी सुधारत होता. दरम्यान पाच विधानसभांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे पुढील दोन महिने आचारसंहिता लागू आहे. डिसेंबर २१ ला निकाल लागेल, तेव्हा संसदेचे हिवाळी अधिवेशनही चालू असेल. 

मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये भाजप अनेक वर्षे सत्तेत आहे. त्यामुळे Anti-Incumbancy चा फायदा विरोधकांना म्हणजे विशेषतः काँग्रेसला होऊ शकेल. काँग्रेस शर्थीने या निवडणुका लढणार आहे. दरम्यान एका निवडणूक निकालांचा एक्‍झिट पोल प्रसिद्ध झाला आहे. त्यात भाजपाला बहुमत मिळून सरकार स्थापता आले, तरी विरोधकांची संख्याही नगण्य असणार नाही. या सर्वेक्षणानुसार भाजपची महाराष्ट्रातही चांगली कामगिरी होईल. स्थैर्याच्या दृष्टीने दिल्ली व मुंबई मजबूत असणे महत्त्वाचे आहे. बाकी कुणी काही म्हटले, तरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund-IMF)भारताची अर्थव्यवस्था भक्कम असण्याचे शिफारसपत्र दिले आहे. 

देशाची सर्वांत जुनी पेट्रोल उत्पादक कंपनी १९७०पासून मुंबईच्या पश्‍चिम किनाऱ्यावर पेट्रोलचे उत्पादन काढत आहे. पण तिच्या किनाऱ्यावरील व पाण्यावरील ६७ ड्रिलिंग रिंग्ज जुनी झाली आहेत. त्यामुळे ती २७ नवीन ड्रिलींग रिंग्ज विकत घेण्याचा विचार करत आहे. कंपनीला त्यासाठी सुमारे ३००० ते ३५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कंपनीचा प्रथम ५० रिंग्ज घ्यायचा विचार होता. पण लागणाऱ्या खर्चाचा विचार करता सध्या फक्त २७ रिंग्ज घ्यायचाच कंपनीने विचार केला आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत यासाठी तिने निविदा मागवल्या आहेत. सध्याच्या २७ चालू रिंग्जपैकी आयुर्मान संपलेल्या रिंग्जची जागा त्या भरून काढतील. याखेरीज कंपनी विहिरीतून तेल उपसण्यासाठी काही रिंग्ज भाड्याने घेत असते. कंपनीने आपली ड्रिलींगची कामे सध्या जोरात वाढवली आहेत. येत्या बारा महिन्यात १७,६०० कोटी रुपये गुंतवून ती ५३५ नव्या विहिरी खणणार आहे. कंपनी आता नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करणार आहे. या नवीन विहिरीतील उत्पादनानंतर देशाची पेट्रोलची आयात सुमारे साडे तीन टक्‍क्‍याने कमी होईल. यावर्षीच्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात कंपनीने १.४६ कोटी मेट्रिक टनाचे उत्पादन घेतले होते. तरीही भारताला अजून ८३ टक्के पेट्रोलची गरज आयात करून भागवावी लागते. सध्या रुपया घसरत असल्यामुळे आपली पेट्रोलची आयातीची किंमत ८८ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. 

भारत ही केवळ वाढीचा वेग सर्वाधिक असणारीच अर्थव्यवस्था नसून, उर्वरित उगवत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वांत कमी कर्ज घेणारा देश असल्याचेही गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) काढले आहेत. भारत वगळता अन्य अर्थव्यवस्थांवरील कर्जाचे प्रमाण अधिक असल्याचेही ‘आयएमएफ’ ने म्हटले आहे. ‘आयएमएफ’च्या माहितीनुसार २०१७ मध्ये जगभरातील एकूण कर्ज १.८२ हजार अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहे. 

‘आयएमएफ’च्या वित्तीय विभागाचे प्रमुख विटोर गॅस्पर म्हणाले, ‘एकूण जीडीपीच्या तुलनेत (जीडीपी) भारतावरील कर्ज जगभरातील एकूण कर्जाच्या तुलनेत खूपच कमी आहे.’ यापूर्वी ‘आयएमएफ’ने जीडीपी वृद्धीच्या बाबतीत भारत अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अव्वल राहील असे भाकीत केले होते. 

‘आयएमएफ’ च्या ताज्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये भारतातील वैयक्तिक कर्जाचे प्रमाण एकूण जीडीपीच्या ५४.५ टक्के, तर सरकारी कर्ज ७०.४ टक्के होते. याचाच अर्थ देशातील एकूण कर्जाचे प्रमाण जीडीपीच्या १२५ टक्के होते. त्याचवेळी चीनवरील कर्जाचे प्रमाण जीडीपीच्या २४७ टक्के होते. 

भारतावरील एकूण कर्ज जगभरातील विकसीत अर्थव्यवस्थांच्या सरासरीइतके आहे. आणि उगवत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. जागतिक वित्तीय संकटानंतर विकसीत अर्थव्यवस्थांनी मोठ्या प्रमाणावर कर्जे घेतली. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील वैयक्तिक कर्जे एकूण जीडीपीच्या साठ टक्‍क्‍यावरून ५४.५ टक्‍क्‍यांवर आली असून आता ती स्थिर झाली आहेत. उगवत्या अर्थव्यवस्थांमध्ये सरकारी कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्जे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. असे निरीक्षणही गॅस्पर यांनी नोंदवले.

चालू आर्थिक वर्षात देशातील तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. रुपयाची सातत्याने होणारी घसरण आणि कच्च्या तेलाच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे केंद्र सरकारला तेलाची आयात करणे खर्चिक ठरत आहे. गेल्या सात वर्षापासून देशातील तेलाचे उत्पादन सातत्याने घसरत असल्याचे दिसून आले आहे. त्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे जुनी झालेली तेलक्षेत्रे होय. या तेलक्षेत्रातून उत्पादन तर सोडाच पण त्यांच्या व्यवस्थापनावरही मर्यादा येत असल्याचे दिसून आले आहे.

पितृपंधरवड्यात बहुतेक भाविक गुंतवणूक, खरेदीसाठी उत्सुक नसतात. त्यातच गेले काही दिवस चीनने व्यापारयुद्ध सुरू केले आहे. तसेच रोख्यातील परतावा वाढत आहे व अमेरिकन नागरिक शेअर्सऐवजी कर्जरोख्यांकडे वळत आहेत. त्यामुळे इथेही निर्देशांक खाली जात आहे. तो आता ३४ हजारपर्यंत उतरला आहे. पण त्यामुळे काही चांगले शेअर्स रास्त भावाला मिळत आहेत. येस बॅंकेचा उल्लेख मागील लेखात होता. तो २२५ ते २३० रुपयांच्या दरम्यान घेतला तर सात आठ महिन्यात ४० टक्‍क्‍यांच्या वर नफा देऊन जाईल. 

हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम अनुक्रमे २१८ व २६६ रुपयांपर्यंत चढले असले, तरी याही भावात त्यात अवश्‍य गुंतवणूक हवी. त्यांच्या नफ्यात डिसेंबरपासून वाढ दिसेल. कारण पेट्रोलचे भाव कमी होत राहतील.

अमेरिकेत ब्रोकरेज संस्थेने पुन्हा एकदा ग्राफाईट इंडिया व हेग या कंपन्यांची जोरदार भलावण केली आहे. ग्राफाईट सध्या ९१५ रुपयांच्या आसपास आहे. त्याचा उच्चांकी भाव १४५० रुपये इतका व्हावा. हेगदेखील १२ ऑक्‍टोबरला ४२८२ रुपयाला होता. ४ हजार रुपयांच्या आसपास तो घेतला, तर आठ नऊ महिन्यात ५४०० रुपयांवर जाईल. गेल्या तीन वर्षात हेग २६ पट वाढला. तर ग्राफाईट इंडिया १० पट वाढला. हे शेअर्स अनेकदा सोन्याची खाण ठरले आहेत. विशेषतः घाऊक प्रमाणात म्हणजे १० हजार ग्राफाईट इंडिया वा ३ हजार हेग घेणाऱ्यांनी दीड वर्षात शब्दशः सोन्याची कौल घरावर घातली आहेत. सकाळच्या या लेखमालेत ते शेअर्स घेण्यासाठी सप्टेंबर २०१७ पासून शिफारस केली आहे. जेएसडब्यु स्टील हा शेअर १२ ऑक्‍टोबरला ३७० रुपयाला उपलब्ध होता. तो तीन महिन्यात ४५० रुपये व्हावा व २० टक्के नफा देऊन जावा. सप्टेंबर २०१८ च्या तिमाहीत तिचे उत्पादन ६ टक्‍क्‍याने वाढून ४१ लाख टनावर गेले आहे. सज्जन जिंदाल या कंपनीचे प्रमुख आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये कंपनीचे उत्पादन ३९.४ टन होते. वर्षाला १.८० कोटी टन पोलाद निर्मितीची तिची क्षमता आहे. कर्नाटकमध्ये विजयानगर इथे तिचा मोठा कारखाना आहे. या एकाच कारखान्याची उत्पादनक्षमता १.२० कोटी टनाइतकी आहे. भाग भांडारातील वैविध्यासाठी पोलाद क्षेत्रातला एखादा शेअर त्यात असणे आवश्‍यक आहे. थोडक्‍यात २०१८ दिवाळी ते २०१९ दिवाळी वर्षासाठी सोळा शेअर्सची निवड करायची झाली तर १. ग्राफाईड इंडिया २. हेग ३. जेएसडब्ल्यू ४. येस बॅंक ५. हिंदुस्थान पेट्रोलियम ६. भारत पेट्रोलियम ७. स्टरलाइट टेक्‍नॉलॉजी ८. सोभा ९. बजाज फायनान्स १०. विंध्या टेलिलिंक्‍स ११. मारुती सुझुकी १२. मदर्सन सुमी १३. वेदांत, १४. आयशर मोटर्स १५. दिलीप बिल्डकॉन १६. एच.जी. इन्फ्रा ही नावे पक्की होतील. रुपया घसरला असल्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची भर त्यात घालता येईल.भागभांडवल याप्रमाणे उभे करताना कुठल्याही शेअरमध्ये गुंतवणुकीच्या रकमेच्या ५ टक्‍क्‍यापेक्षा कमी रक्कम असू नये. तसेच जास्तीत जास्त २५ टक्‍क्‍यावर असू नये. पुढील तिमाहीचा काळ बघून त्यात गृहवित्त क्षेत्रातली दिवाण हाउसिंग फायनान्स व  वा इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स यांची भर घालता येईल. या भागभांडारात अनेक क्षेत्रातली निवड आपोआप होते. या लेखमालेत गुंतवणुकीवरील परामर्श हा जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील राजकीय तसेच प्रमुख अधिकारणाचा विचार प्रथम असतो. त्यानंतर आनुषंगिक विचार म्हणून शेअर्सचा होतो. याचे कारण शेअरबाजारात जरी भाव खालती वरती व्हायचा धोका असला, तरी एकूण भांडार नीट जमवलेले असेल तर वर्षभरात किमान ३० टक्के नफा सरासरीने सहज मिळतो. लाभांशावरील उत्पन्न त्यात धरलेले नाही. कारण सर्वसाधारणपणे लाभांश हा जून ते ऑगस्ट या कालावधीतच (अंतरिम लाभांश सोडून) मिळत असतो. हा लाभांश व्यक्तिगत गुंतवणूकदारांना करमुक्त असतो. कारण तो देण्यापूर्वी कंपनीने लाभांश वितरण कर (divident distribution tax) आधीच भरलेला असतो.

गुंतवणूक तीही शेअर्समध्ये करताना प्रत्येक ठिकाणी यश मिळते असे नाही. क्रिकेटच्या संघातील सर्वच अकरा खेळाडू फलंदाजी वा गोलंदाजीत चमकतात असे नाही. पण त्यांचा एकूण परफॉर्मन्स बघितला जातो. तेच तत्त्व इथे गुंतवणुकीतही लावले जाते. त्यामुळेच गुंतवणूक करताना १. अभ्यास २. संयम ३. सातत्य ४. निष्ठा ५. लाभाबद्दल योग्य कल्पना (लाभ हवा लोभ नको) व अन्य तज्ज्ञांचा सल्ला वा त्यांच्याशी विचारविनिमय आवश्‍यक असतो. त्यासाठी जगात व भारतातही कुठे काय आर्थिक व राजकीय क्षेत्रात चालले आहे त्याचा मागोवा घेणे आवश्‍यकच नव्हे तर अपरिहार्य ठरते. त्याचा अभ्यास करताना प्रत्येकाने तज्ज्ञ व्हायचे कारण नसले, तरी विक्री त्यापैकी निर्यात किती? तो आकडा, ढोबळ नफा, करोत्तर नफा, शेअरगणिक उपार्जन व विविध क्षेत्रासाठी दिसणारे किं/अु गुणोत्तर एवढी किंमत माहिती घेऊन माहिती गोळा करणे महत्त्वाचे ठरते. बातम्यांचे धान्य वदंतांची फोलपटे वेगवेगळी करता आली पाहिजेत. किमान एकतरी आर्थिक वृत्तपत्राचे/नियतकालिकाचे सातत्याने वाचन हवे असते. (विविध विषयावरील वृत्तांत देऊन साप्ताहिक सकाळ व त्यांचा संपादक वर्ग व माहीतगार लेखक ही बाब पुरी करतात.) सगळ्यांनाच पटेल असे नाही. पण अमेरिकेतील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्ये व फेडरल रिझर्व्हची तिथली आर्थिक धोरणे, तसेच आपल्याकडील अर्थमंत्रालय व रिझर्व्ह बॅंक यांची धोरणे शेअरबाजारावर रोज परिणाम करीत असतात. दैवही अनुकूल असावे लागते, तरच शेअर्सची गुंतवणूक हमखास यशस्वी ठरत असते. 

संबंधित बातम्या