शेअरबाजारात तेजी

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

अर्थनीती ः शेअर बाजार
 

सध्या भारतात सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त विषयांच्या चर्चा सुरू आहेत. आर्थिक विषयापेक्षा त्यात अन्य गोष्टींचाच भरणा आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा वगैरे पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल डिसेंबरच्या मध्याला लागतील. तोपर्यंत हे वातावरण असेच राहील. सध्या ‘मीटू’ (#MeToo) या हॅशटॅगखाली ज्यांचे लैंगिक शोषण केले गेले अशा अनेक महिला पुढे येत आहेत. या चळवळीमुळे केंद्रातील मंत्री एम जे अकबर यांनाही राजीनामा द्यायला लागला. 

जागतिक रंगमंचावरील अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध थंडावले आहे. क्रूड पेट्रोलचे भाव सतत वाढत असल्याने महागाई वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्राच्या सांगण्यावरून तेलवितरण कंपन्या तेलाचे भाव सतत कमी करीत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्‍टोबरपासून अयोध्या राममंदिराबाबतची सुनावणी रोज सुरू केली आहे. पुढील वर्षाच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी युक्तिवाद संपतील व कदाचित सर्वोच्च न्यायालय अनिर्णित काळ निकाल देणारही नाही. या मुद्द्याखेरीज नेहमीचे मुद्दे - शेतकऱ्यांची दैना, महाराष्ट्रातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळ, त्यामुळे जायकवाडी वा अन्य धरणांना पाणी सोडण्याबाबतची आंदोलने, शबरीमला देवीमंदिरात महिलांचा प्रवेश, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार, अधूनमधून स्वबळाचा साक्षात्कार होणारी अनेक मंडळी, नॉन-बॅंकिंग फायनान्स कंपन्यांना भासणारी द्रवतेची चणचण हे विषय चर्चेत राहतील. त्यातच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या गुन्हा अन्वेषण संस्थेतील पहिल्या दोन क्रमांकात असलेल्या वरिष्ठांची भांडणे व पंतप्रधान कार्यालयाचा त्यात हस्तक्षेप ही चर्चाही रंगत आहे. थोडक्‍यात, ‘महान’ असलेल्या आपल्या भारतात अनेक ‘महान’ गोष्टी सध्या प्रकाशात आहेत. सीबीआयमधील भांडणाचा विरोधक ‘राफेल’ प्रकरणाशी संबंध जोडत आहेत. सध्या तरी सीबीआयचे आलोक वर्मा व राकेश अस्थानाना सरकारने रजेवर पाठविले आहे.

भारती एअरटेलच्या ‘आफ्रिका एअरटेल’ या पोटकंपनीसाठी एअरटेलने सहा ठोक गुंतवणूकदारांना १.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक करायला सांगितले आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्‍स्चेंजवर कदाचित त्यासाठी प्राथमिक भागविक्री (IP) केली जाईल.

प्रसारमाध्यमांनी एका महत्त्वाच्या बातमीकडे दुर्लक्ष केल्यासारखे वाटते. भारताने इस्राईलबरोबर ‘बराक-८’ या दूर पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र खरेदीचा करार भारतीय आरमारासाठी केला आहे. इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये हा करार झाला आहे. भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स या क्षेपणास्त्रांची निर्मिती आता भारतात करेल. आरमारातील सात नौका त्यासाठी उपयोगात येतील. इस्राईलमधील संरक्षण क्षेत्रातील अनेक कंपन्यांबरोबर भारताचे व्यवहार आहेत.

आर्थिक व्यवस्थापनात व अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय बॅंकांचे मोठे स्थान आहे व योगदान आहे; पण सध्या राष्ट्रीयकृत बॅंकांपैकी ११ बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेने ‘Prompt Corrective Action (PCA)’ तत्काळ सुधारणा कृती लादली आहे. या बॅंकांना त्यामुळे नवीन कर्जे देता येत नाहीत. (परिणामी त्यांचा नफा घटत आहे वा तोटा वाढत आहे.) त्यात आता रिझर्व्ह बॅंक काही बदल करणार असल्याने या बॅंकांना श्‍वास घ्यायला फुरसत मिळेल. सरकारला या सुधारणा कृतीत निश्‍चित बदल हवे आहेत; पण सरकारने बॅंकांमध्ये जास्त भांडवल घालावे व त्यांची परिस्थिती सुधारावी व त्यानंतर रिझर्व्ह बॅंक त्याबाबत पावले उचलेल असे आजचे चित्र आहे.

आता बऱ्याच कंपन्यांचे सप्टेंबर २०१८ तिमाहीचे विक्री व नक्त नफ्याचे आकडे जाहीर झाले आहेत. ते आश्‍वासक आहेत. टीटीके प्रेस्टीज, स्टरलाइट टेक्‍नॉलॉजी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो यांची कामगिरी उत्तम आहे.

एल अँड टी फायनान्स होल्डिंगचे या सप्टेंबर तिमाहीची व सहामाहीची विक्री अनुक्रमे ३३२६.०४ कोटी रुपये व ६४७८.७१ कोटी रुपये होती. नक्त नफा अनुक्रमे ५३२.२२ कोटी रुपये व १०६८.८७ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे २.८१ रुपये व ५.५० रुपये होते. सध्या शेअरचा भाव ११७.२० रुपये आहे. या शेअरचा वर्षभरातील कमाल भाव व किमान भाव २०३ रुपये व ११० रुपये होता.

इंडिया बुल्स रिअल इस्टेटचे या तिमाहीचे उत्पन्न १०५९.७१ कोटी रुपये आहे. नक्त नफा ७५८.९० कोटी रुपये आहे. कंपनीचे भागभांडवल ९०१.३६ कोटी रुपये आहे व तिमाहीचे शेअरगणिक उत्पादन १.६८ रुपये आहे. सप्टेंबर २०१८ च्या तिमाहीचा नक्त नफा ६३२ कोटी रुपये होता.

स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीचा या तिमाहीचा नक्त नफा १३१ कोटी रुपये होता. सप्टेंबर २०१७ च्या तिमाहीपेक्षा तो ८४ टक्के जास्त आहे. ढोबळ नफा २५ कोटी रुपये होता. सप्टेंबर २०१७ च्या तिमाहीपेक्षा त्यात ५६ टक्के वाढ आहे. कंपनीच्या हातात ९४५५ कोटी रुपयांची कामे आहेत. शेअरचा भाव ३२६ रुपये आहे. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे ४१५ रुपये व २५३ रुपये होता. सध्या किं/उ गुणोत्तर ३३.५ पट पडते. हा शेअर ३०० रुपयांपर्यंत खाली येईल तेव्हा जरूर घ्यावा. वर्षभरात तो ४५० रुपयांपर्यंत वाढू शकेल. कंपनी ऑप्टिकल फायबर केबल्सचे उत्पादन करते. 

बजाज फायनान्स हा भागभांडारात सदैव असावा असा शेअर आहे. फूड मिक्‍सरपासून मोटारी ते अवजड यंत्रासाठी ती कर्जे देते. तिच्या व्यवस्थापनाखालील जिंदगी १,००,२१७ कोटी रुपयांची आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये हा आकडा ७२,७७९ कोटी रुपये होता. तिचे सप्टेंबर २०१८ तिमाहीचे उत्पन्न ४२९६ कोटी रुपये (गतवर्षी ३०६६ कोटी रुपये) होते. करोत्तर नफा ९२८ कोटी रुपये (सप्टेंबर २०१७ - ५९८ कोटी) होता. या वेळी नफ्यात ५४ टक्के वाढ आहे. दर वर्षी उत्तम प्रगती करणारी ही कंपनी आहे. तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन १५ रुपये होते. (वार्षिकीकृत ६० रुपये) सध्या शेअरचा भाव २३३५ रुपये आहे. आकडे जाहीर होण्यापूर्वी तो २०२५ रुपये इतका खाली होता. वर्षभरातील कमाल व किमान भाव २९९४ रुपये व १५११ रुपये होता. म्हणजे वर्षभरात जवळजवळ ९५ टक्के वाढ झाली आहे. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ४४ पट दिसते. वर्षभरात या शेअरचा भाव ३१०० रुपये सहज व्हावा. दोन वर्षांत तर तो ४२०० रुपये अपेक्षित आहे. बजाज फायनान्स ही बजाज फिनसर्व्हची उपकंपनी आहे. फिनसर्व्हमध्ये विमा व्यवसायही आहे.

बजाज फिनसर्व्ह या तिमाहीचे उत्पन्न ९६९८ कोटी रुपये, करपूर्व नफा १८१० कोटी रुपये व करोत्तर नफा ७०४ कोटी रुपये होता. सप्टेंबर २०१७ तिमाहीसाठी हे आकडे अनुक्रमे ८२६६ कोटी रुपये, १५८४ कोटी रुपये व ६९८ कोटी रुपये होते. सप्टेंबरला संपलेल्या सहा महिन्यांसाठी कंपनीचे एकूण उत्पन्न १८,४६९ कोटी रुपये, करपूर्व नफा ३८०१ कोटी रुपये व करोत्तर नफा १५३० कोटी रुपये होता.

बजाज फायनान्सचे सप्टेंबर २०१८ च्या सहामाहीचे उत्पन्न ८२३८ कोटी रुपये व करोत्तर नफा १७५९ कोटी रुपये होता. गुंतवणुकीच्या दृष्टीने बजाज फिनसर्व्हपेक्षा बजाज फायनान्स चांगला आहे.

गुंतवणुकीसाठी बांधकाम, औषध क्षेत्र व अर्थ क्षेत्र या तिन्हीही भागात काम करणाऱ्या पिरामल एंटरप्राइजेसचा उल्लेख करता येईल. १९८५ च्या सुमारास सुरू झालेल्या या कंपनीला आता ३३ ते ३४ वर्षांचा इतिहास आहे. अजय पिरामल यांच्या समूहातील ही कंपनी ३० देशांत १०० कचेऱ्यांतून व्यवहार करते. तिचे कर्मचारी १० हजारच्या वर आहेत. २१ विविध नॅशनॅलिटीमध्ये ती आहे. पिरामल एंटरप्राइजेसचा त्यातील व्यवहार ४६ टक्के आहे. आरोग्य, जलसंपदा, शिक्षण या क्षेत्रांत ती आहे. स्वाती पिरामल या समूहाच्या उपाध्यक्षा आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये पिरामल प्रतिष्ठानच्या पिरामल स्वास्थ्य व पिरामल सर्वजलचा अभ्यासक्रमात अंतर्भाव आहे.

सध्या १९०० रुपयांना असलेला भाव वर्षभरात ५० टक्के वाढून २९०० ते ३००० रुपये होईल. गेल्या बारा महिन्यांतील शेअरचा कमाल भाव ३३०७ रुपये होता, तर किमान भाव १८६२ रुपये होता. म्हणजे सध्या किमान भाव जवळपास शेअर मिळत आहे. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर फक्त ७.५ पट आहे. रोज सध्या १८ ते २० लाख शेअरचा व्यवहार होत आहे. कंपनीच्या कर्जातील व्यवहारामुळे शेअरची किंमत २४७६ रुपये दिसते. वर्षभरात त्यामुळे तो किमान २९०० रुपये होईल. कंपनीचे भागभांडवल ३४.५ कोटी रुपये आहे. रोख्यांच्या परिवर्तनानंतर ४० कोटी रुपये होईल. कंपनीच्या शेअरची पुस्तकी किंमत ७५० वरून १३२६ व्हावी.

कंपनीला सप्टेंबर २०१८ तिमाहीसाठी ४८२ कोटी रुपये नक्त नफा झाला आहे. हा नफा ३१४४ कोटी रुपयांच्या विक्रीवर आहे. मार्च २०१७ तिमाहीसाठी हे आकडे अनुक्रमे ३८४ कोटी रुपये व २५३६ कोटी रुपये होते. कंपनीने गेल्या वर्षी ४ लाख ६४ हजार परिवर्तनीय रोखे काढले आहेत. प्रत्येक रोख्याची किंमत १,०७,६०० रुपये होती. एप्रिल २०१९ मध्ये २६९० रुपये दराप्रमाणे प्रत्येक रोख्याचे चाळीस सम भागांत रूपांतर होईल. 

संबंधित बातम्या